Go to full page →

अध्याय २५—समुद्राच्या काठी पाचारण DAMar 199

मत्तय ४:१८-२२; मार्क १:१६-२०; लूक ५:१-११.

गालीली समुद्रावर सूर्योदय होत होता. रात्रभर निष्फळ कष्ट केल्याने शिष्य अगदी थकून गेले होते. ते अद्याप आपल्या तारवातच होते. समुद्रकिनाऱ्यावर शांत वातवरणात थोडा वेळ घालवण्यासाठी येशू आला होता. दिवसे न दिवस त्याच्यामागे जाणाऱ्या घोळक्यापासून थोडा विसावा मिळेल ह्या विचाराने तो अगदी सकाळीच तेथे आला होता. परंतु लगेचच लोक त्याच्याभोवती जमू लागले. जमाव वाढल्यामुळे सर्व बाजूने रेटारेट सुरू झाली. त्या अवधीत शिष्य किनाऱ्यावर आले होते. जमावाच्या गर्दीपासून सावरून घेण्यासाठी येशू पेत्राच्या तारवात चढला व तारू किनाऱ्यापासून थोडे आत ढकलण्यास त्याने त्याला सांगितले. हे सोयीचे झाले कारण किनाऱ्यावरील लोकांना येशूचे चांगले दर्शन होऊन ते सर्वजन स्पष्टपणे ऐकू शकत होते. DAMar 199.1

दूतांना हे दृश्य फार विचारणीय व मनोहर वाटले, त्यांचा गौरवशाली सेनापती कोळ्याच्या मचव्यात बसून खवळलेल्या लाटामुळे हेलकावे खात होता आणि किनाऱ्यावर जमा झालेल्या श्रोतेजनांना उद्धाराचा संदेश घोषीत करीत होता. स्वर्गात सन्मान पावलेला त्याच्या राज्याच्या महान गोष्टी सर्वसाधारण लोकांना उघड्यावर सांगत होता. त्याच्या कार्यासाठी ह्याच्यापेक्षा इष्ट दृश्य दुसरे कोणते नव्हते. सरोवर, पर्वत, आजूबाजूला दूरवर पसरलेली शेती, पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश ह्या सर्व सृष्ट वस्तु त्यांच्या मनावर परिणाम करणारे धडे शिकविण्यास उपलब्ध होत्या. ख्रिस्ताचा कोणताही पाठ निष्फळ ठरला नाही. त्याच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द काहीना अनंत जीवनाचा संदेश वाटला. DAMar 199.2

समुद्रकिनाऱ्यावर मिनटा मिनटाला अधिक लोक जमावात सामील होत होते. काठी टेकून वृद्ध लोक, टेकडीवरून दणकट शेतकरी, सरोवरावर मासे धरणारे कोळी, व्यापारी व धर्मगुरू, श्रीमंत व शिक्षीत, वृद्ध व तरुण, आपले आजारी व दुःखणाईत यांना घेऊन आले व दिव्य शिक्षकाचे ऐकण्यास पुढे सरसावले. अशा दृश्यांची अपेक्षा करून संदेष्ट्यांनी लिहिले: DAMar 199.3

“जबुलून प्रांत व नफताली प्रांत,
सुमद्रतीरीचा, यार्देनेच्या पलीकडचा देश
विदेशी लोकांचा गालील,
अशा अंधकारात बसलेल्या लोकांनी
मोठा प्रकाश पाहिला,
आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत
बसलेल्यावर ज्योति उगवली आहे.” DAMar 200.1

गनेसरेत सरोवराच्या काठी जमलेला श्रोतृवर्ग सोडून उपदेश करताना येशूच्या मनात दुसराही श्रोतृवर्ग होता. युगांतून दृष्टीक्षेप करताना, श्रद्धावंत तुरुंगात आणि न्यायालयात, मोहात, एकांतवासात व क्लेशात असलेले त्याने पाहिले. आनंदाचा, हर्षाचा, झगड्याचा व गोंधळाचा प्रत्येक देखावा त्याच्या डोळ्यापुढे होता. त्याच्या सभोवती जमलेल्यांना जो संदेश तो देत होता त्याच वेळी त्या संदेशात हे लोक समाविष्ट केले होते. कसोटीच्या प्रसंगी आशा, दुःखात समाधान, आणि अंधारात दिव्य प्रकाश अशा स्वरूपात त्याचा तो संदेश त्यांच्यासाठी होता. गालीली समुद्रावर कोळ्याच्या मचव्यात बसून काढलेले शब्द काळाच्या शेवटी पवित्र आत्म्याद्वारे मनुष्याच्या अंतःकरणाला शांती संदेश देताना ऐकण्यात येतील. DAMar 200.2

शिक्षण देण्याचे संपल्यावर येशूने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात जाऊ द्या व मासे धरण्यासाठी आपली जाळी खाली सोडा. परंतु पेत्र खचलेला, नाउमेद झालेला होता. सर्व रात्र कष्ट करून त्याला काही मिळाले नाही. एकांताच्या वेळी अंधार कोठडीत बाप्तिस्मा करणारा गळून गेलेला योहान याच्या भवितव्याचा त्याने विचार केला होता. येशू व त्याच्या अनुयायांच्या कार्यातील प्रगती, यहूदा प्रांतातील कार्यातील मंद प्रगती व धर्मगुरू आणि याजक यांचा आकस ह्या सर्वांचा त्याने विचार केला होता. त्याचा स्वतःचा व्यवसायसुद्धा त्याला साथ देत नव्हता; मोकळी जाळी पाहून त्याचे अंतःकरण गळून गेले व त्याचे भवितव्य नाराजीने व अंधाराने भरलेले त्याला दिसले. त्याने म्हटले, “गुरूजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरिले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडितो.” DAMar 200.3

सरोवरातील स्वच्छ पाण्यात मासे धरण्यास रात्रीचा समयच उपयुक्त असतो. रात्रभर कष्ट करून काही धरले नसताना दिवसा जाळी सोडणे अगदी निरर्थक आहे असे वाटले; परंतु येशूने आज्ञा केल्यामुळे आणि आपल्या गुरूवरील श्रद्धेमुळे त्यांनी त्याची आज्ञा मानली. शिमोन व त्याचा भाऊ यांनी आपली जाळी खाली सोडली. थोड्या वेळाने जाळी मचव्यात ओढतांना ती फार जड वाटली आणि त्यामुळे जाळी फाटू लागली. मदतीसाठी त्यानी याकोब व योहान यांना बोलविले मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडण्याच्या धोक्यात होते. DAMar 200.4

परंतु आता पेत्राने मचवा व त्यातील भरलेला माल याकडे दुर्लक्ष केले. आतापर्यंत पाहिलेल्या चमत्कारापेक्षा ह्या चमत्कारामध्ये त्याला दिव्य शक्तीचे दर्शन झाले. सर्व सृष्टीचा नियंता, सूत्रधार येशू असल्याचे त्याने पाहिले. देवत्वाच्या सहवासात त्याला त्याचा अपवित्रपणा दिसला. गुरूजीवरील प्रेम, स्वतःच्या अश्रद्धेबद्दल शरम, खिस्ताच्या अनुग्रहाबद्दल कृतज्ञता आणि या सर्वापेक्षा अनंत पावित्र्याच्या सहवासात स्वतःच्या अशुद्धतेची जाणीव यांनी तो भारावलेला होता. त्याचे सोबती जाळ्यातील मासे काढण्यात गुंतले असता पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभूजी, मजपासून जा, मी पापी मनुष्य आहे.” DAMar 201.1

त्याच दिव्य पावित्र्याच्या सानिध्यामुळे दानीएल देवाच्या दूतासमोर मृतप्राय पडलेला होता. त्याने म्हटले, “माझ्यात काही त्राण उरले नाही. मी निस्तेज होऊन मृतप्राय झालो; मला काहीच शक्ती राहिली नाही.” यशयाने प्रभूचे गौरव पाहिल्यावर म्हटले, “हाय हाय! माझे आता वाईट झाले, का तर मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहातो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले.” दानीएल १०:८; यशया ६:५. पाप व दुर्बलता यांनी भरलेली मानवता देवत्त्वाच्या परिपूर्णतेच्या संबंधात आल्यामुळे त्याला तो अपवित्र व उणा असल्याचे वाटले. देवाचे वैभव व मोठेपणा यांचे दर्शन घडलेल्या सर्वांची स्थिती अशीच असणार. DAMar 201.2

पेत्र उद्गारला, “प्रभूजी, मजपासून जा, मी पापी मनुष्य आहे;” तथापि तो येशूच्या चरणाशी चिकटून राहिला, कारण त्याचा विरह त्याला नकोसा होता. उद्धारकाने उत्तर दिले, “भिऊ नको, येथून पुढे तू मनुष्यांना धरशील.” देवाचे पावित्र्य व स्वतःची नालायकी पाहिल्यावर यशयावर दिव्य वार्ता घोषीत करण्याची कामगिरी सोपविली होती. स्वतःचा त्याग करून दिव्य सामर्थ्यावर अवलंबून राहाण्याचे ठरविल्यावर ख्रिस्तासाठी कार्य करण्यास पेत्राला पाचारण करण्यात आले होते. DAMar 201.3

ह्या समयापर्यंत येशूबरोबर काम करण्यास एकाही शिष्याचा संपूर्णपणे मिलाफ झाला नव्हता. त्यांनी त्याचे अनेक चमत्कार पाहिले होते आणि त्याचे उपदेश ऐकले होते परंतु त्यांचा व्यवसाय त्यांनी पूर्णपणे सोडला नव्हता. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या कारावासाने त्यांची फार मोठी निराशा झाली होती, योहानाच्या कार्याची ही जर निष्पति होती तर त्यांच्या गुरूविषयी फार थोडी आशा होती. कारण त्याच्याविरुद्ध सर्व धर्मने- त्यांनी एकोपा केला होता. ह्या परिस्थितीमुळे काही काळासाठी त्यांच्या समोर मासे धरण्याच्या व्यवसायाकडे वळण्यात त्यांना दिलासा वाटला. परंतु आता त्यांना पूर्वीचे जीवन सोडून त्याच्याबरोबर एकीने कार्य करण्यास येशूने त्यांना पाचारण केले. पेत्राने हे पाचारण स्वीकारले होते. किनाऱ्यावर पोहंचल्यावर येशूने आणखी तिघा शिष्यास म्हटले, “माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हास मनुष्य धरणारे करीन.’ मग ते तत्काळ जाळी सोडून त्याच्या मागे चालू लागले. DAMar 201.4

मासे धरण्यास वापरात आणलेले मचवे व जाळी सोडून देण्यास सांगण्याच्या अगोदर देव त्यांच्या गरजा भागवील अशी येशूने त्यांना हमी दिली होती. सुवार्तेच्या कार्यासाठी पेत्राच्या मचव्याचा फार उपयोग झाला. जो धनवान आहे त्याने म्हटले, “द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल; चांगले माप दडपून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मोजून घालता त्याच मापाने तुम्हास परत घालतील.’ रोम १०:१२; लूक ६:३८. ह्या मापामध्ये त्याने शिष्यांच्या सेवाकार्याचा मोबदला दिला होता, त्याच्या कार्यामध्ये केलेल्या प्रत्येक त्यागाची भरपाई “त्याने केलेल्या कृपेच्या अपार संपत्तीने’ करण्यात येईल. इफिस ३:२०; २:७. DAMar 202.1

सरोवरावरील त्या उदासजनक रात्रीच्या वेळी ख्रिस्तापासून विभक्त झाल्यावर अविश्वासाचा त्यांच्यावर दबाव आला होता व निष्फळ कष्टाने ते थकले होते. परंतु त्याच्या उपस्थितीने त्यांचा विश्वास प्रदीप्त झाला होता, आणि त्यांना हर्ष होऊन यश लाभले. तीच गोष्ट आमची आहे; ख्रिस्ताविना आमचे काम निष्फळ आहे आणि त्यामुळे कूरकूर करण्याला व संशयाला सहज सोपे होते. परंतु आम्ही त्याच्या सान्निध्यात आल्यावर व त्याच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यावर त्याच्या सामर्थ्याच्या लक्षणाने आम्ही हर्ष पावतो. एकाद्याला निराश करणे हे सैतानाचे काम आहे; विश्वास, श्रद्धा व आशा यांनी प्रेरित करणे हे ख्रिस्ताचे काम आहे. DAMar 202.2

चमत्काराद्वारे जो गूढ पाठ शिष्यांना शिकायला मिळाला तोच पाठ आम्हालाही आहे, - ज्याच्या शब्दाने समुद्रातील मासे गोळा करणे शक्य झाले त्याच शब्दाचा प्रभाव मनुष्याच्या अंतःकरणावर पडून त्याच्या प्रेमतंतूने ते आकर्षिले जातील आणि त्यामुळे त्याचे सेवक “मनुष्य धरणारे’ बनतील. DAMar 202.3

गालीली येथील कोळी गरीब व अशिक्षीत होते; परंतु जे कार्य करण्यास त्यांना निवडिले होते ते करण्यासाठी लायक बनविण्यास जगाचा प्रकाश ख्रिस्त समर्थ होता. उद्धारकाने शिक्षण तुच्छ लेखिले नव्हते; कारण देव प्रीतीने नियंत्रित केल्यास व त्याच्या सेवेला वाहून दिल्यास बौद्धिक विकास हा एक कृपाप्रसाद आहे. परंतु त्या काळच्या बुद्धिमानांना त्याने बाजूला ठेवले कारण ते आत्मविश्वासाने स्वार्थी बनले होते व दुःखीतांना सहानुभूती दाखवू शकत नव्हते आणि नासरेथच्या मनुष्याबरोबर काम करू शकत नव्हते. त्यांच्या फाजील धर्माभिमानामुळे ख्रिस्ताकडून शिकणे त्यांना हास्यास्पद वाटले. त्याच्या कृपेच्या दळणवळणास जे विघ्नरहीत साधन बनतील त्यांच्याशी प्रभू येशू सहकार्य करितो. देवाबरोबर सहकामगार बनू इच्छिणाऱ्यांनी पहिली गोष्ट शिकली पाहिजे ती म्हणजे स्वतःवरील फाजील विश्वास सोडणे. त्यानंतर ते ख्रिस्ताच्या स्वभावाची भागीदारी करण्यास तयार होतात. महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील शिक्षणाद्वारे हे प्राप्त करून घेऊ शकत नाही. ते सूज्ञपणाचे फळ आहे आणि ते केवळ दिव्य शिक्षकापासूनच मिळविता येते. DAMar 202.4

त्या काळच्या चुकीच्या चालीरिती व परंपरागत सांप्रदाय यांचा परिणाम त्यांच्यावर न झाल्यामुळे येशूने अशिक्षीत कोळ्यांची निवड केली. त्यांची आंगचीच पात्रता होती आणि ते विनम्र व शिकाऊ होते. त्याच्या कामासाठी त्यांना तो शिकवून तयार करू शकत होता. दररोज जीवनात अनेक लोक सयंमाने कामाचा गाढा ओढीत आहेत. त्यांच्या ठिकाणी असलेल्या सामर्थ्याचा योग्य रीतीने उपयोग केल्यास ते जगातील प्रतिष्ठीत लोकांची बरोबरी करतील ह्याचे ज्ञान त्यांना नाही. सुप्तावस्थेत असलेल्या मानसिक व शारीरिक निसर्गदत शक्तींना उत्तेजीत करण्यासाठी कुशल हस्त स्पर्श हवा आहे. अशा प्रकारच्या लोकांना त्याचे सहकामगार बनण्यास येशूने बोलाविले; आणि त्याच्या बरोबर सहवास ठेवण्याचा फायदा त्याने त्यांना दिला. जगातील महान व्यक्तींना असा शिक्षक कदापि लाभला नाही. उद्धारकाच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर शिष्य अडाणी राहिले नाहीत तर सुसंस्कृत बनले. ते त्याच्याप्रमाणे गुणवान व विचारवंत बनले, आणि ते येशूच्या सहवासात होते ह्या उद्गाराने लोकांनी त्यांची दखल घेतली. DAMar 203.1

केवळ ज्ञान देणे हे शिक्षणाचे सर्वश्रेष्ठ ध्येय नाही तर मनाचा मनाशी व आत्म्याचा आत्म्याशी आलेल्या संबंधातून प्राप्त झालेली चेतनात्मक शक्ती विदित करणे किंवा देणे होय. केवळ जीवन जीवनाला जन्मास आणते. ज्या दैवी जीवनातून जीवन देणारी उत्तेजक शक्ती जगाला कृपाप्रसाद झाली त्या जीवनाशी सतत तीन वर्षे संबंध आलेल्यांचा विशेष करून काय मान होता! सर्व सोबत्यामध्ये जीवलग शिष्य योहान याने त्या अद्भुतजन्य, आश्चर्यकारक जीवनाला वाहून दिले. तो म्हणतो, “ते जीवन प्रकट झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची साक्ष देतो; ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रकट झाले, हे तुम्हास कळवितो.” “त्याच्या पूर्णतेतून आपण सर्वास मिळाले; कृपेवर कृपा मिळाली.’ १ योहान १:२; योहान १:१६. DAMar 203.2

आपल्या प्रभूच्या प्रेषितामध्ये स्वतःचे वैभव किंवा प्रतिष्ठा मिरविण्यासारखे काही नव्हते. त्यांच्या कार्यातील यश केवळ देवामुळे होते हे उघड होते. ह्या माणसांचे जीवीत, त्यांच्या स्वभावगुणातील विकास आणि त्यांच्याद्वारे देवाने केलेले महान कार्य ही सर्व जे शिकाऊ व आज्ञाधारक आहेत त्यांच्यासाठी देव कसा सहाय्यक होतो याची साक्ष आहे. DAMar 203.3

जे ख्रिस्तावर अप्रतिम प्रेम करितात ते अमाप सत्कृत्ये करतील. जो स्वहित बाजूला ठेवून आपल्या अंतःकरणात काम करण्यासाठी पवित्र आत्म्याला जागा करून देतो व देवाला सर्वस्वी वाहून दिलेले जीवन जगतो अशा व्यक्तीच्या उपयुक्ततेला मर्यादा राहात नाही. कूरकूर न करिता किंवा गळून न जाता माणसे मुकाट्याने आवश्यक शिक्षा किंवा शिस्तबद्धपणा सहन करतील अशांना देव तासा तासाला आणि दिवसा दिवसाला शिक्षण देईल. आपली कृपा व्यक्त करण्यास तो फार आतुर आहे. जर त्याचे लोक अडथळे काढून टाकतील तर तो मानवी माध्यमाच्याद्वारे उद्धाराचा विपूल जल वर्षाव करील. जर गरीबीत जीवन कंठणाऱ्याला करता येईल ते सत्कार्य करण्यास उत्तेजन दिले, आणि त्याचा आवेश नष्ट करण्यास त्याच्यावर दबाव आणिला नाही तर जेथे आज ख्रिस्तासाठी एक कामगार आहे तेथे शेकडो उभा राहातील. DAMar 203.4

जसे आहेत तसे देव मनुष्यांना घेतो आणि त्यांनी संमति दिली तर त्याच्या सेवेसाठी त्यांना शिक्षण देतो. अंतःकरणात देवाचा आत्मा स्वीकारल्यावर मानसिक व शारीरिक निसर्गदत सर्व शक्ती प्रज्वलित होतील. देवाला मोकळेपणाने वाहिलेले मन पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली समतोल विकास पावते आणि देवाच्या अपेक्षित गोष्टी समजून घेण्यास व त्यांची पूर्ती करण्यास ते बळकट बनते. दुर्बल व डळमळीत स्वभाव खंबीर व शक्तीमान बनतो. सातत्याच्या भक्तीने येशू आणि त्याचा शिष्य यांची जवळीक इतकी घनिष्ठ होते की तो मनाने (विचाराने) आणि गुणाने त्याच्यासारखा बनतो. ख्रिस्ताच्या सान्निध्यामुळे त्याला स्पष्ट व विशाल दृष्टिकोण येईल. त्याची तारतम्य जाणण्याची शक्ती तीक्ष्ण होईल व त्याची निर्णयशक्ती अधिक समतोल राहील. ख्रिस्ताची सेवा करण्यास आतुर झालेला धार्मिकतेच्या सूर्याच्या जीवन देणाऱ्या शक्तीने प्रज्वलित होईल आणि देवाच्या गौरवासाठी विपूल फळे देण्यास तो समर्थ होईल. DAMar 204.1

विज्ञानामध्ये आणि कोणत्याही ज्ञानशाखेमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या लोकांनी जगाने अशिक्षीत गणलेल्या व नम्रतेचे जीवन जगणाऱ्यापासून महत्त्वाचे धडे शिकलेले आहेत. परंतु ह्या अप्रसिद्ध शिष्यांनी सर्वश्रेष्ठ पाठशाळेत शिक्षण घेतले होते. “कोणी मनुष्य त्याच्यासारिखा कधी बोलला नाही’ अशाच्या चरणी ते लागले होते. DAMar 204.2