Go to full page →

अध्याय ३२—जमादार DAMar 265

मत्तय ८:५-१३; लूक ७:१-१७.

ज्या अंमलदाराच्या मुलाला ख्रिस्ताने बरे केले होते त्या अंमलदाराला ख्रिस्त म्हणाला होता, “तुम्ही चिन्हे व उत्पात पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारच नाही.’ योहान ४:४८. येशूच्या मशीहापणावर विश्वास ठेवण्यासाठी खुद्द त्याच्याच राष्ट्राने दृष्टीस पडतील अशा चमत्काराची मागणी करावी याचे येशूला मनस्वी दुःख झाले होते. त्यांचा अविश्वास पाहून त्याला अनेक वेळा आश्चर्य वाटले. परंतु त्याच्याकडे आलेल्या जमादाराचा विश्वास पाहन येशला नवल वाटले होते. तारणाऱ्याने जातीने त्याच्या घरी जाऊन चमत्कार करावा अशी विनंती त्या जमादाराने केली नव्हती. तर “शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल.’ अशीच विश्वासपूर्ण विनंती केली होती. DAMar 265.1

अंमलदाराचा चाकर पक्षघाताने जर्जर होऊन मृत्युपथाला लागला होता. रोमी लोकांत चाकरांना गुलाम गणण्यात येत होते, त्यांची बाजारांत खरेदी व विक्री केली जात असे; त्यांना अतिशय निष्ठूरपणे वागविले जात असे; परंतु हा अंमलदार त्याच्या चाकराशी मायेच्या बंधनाने बांधला गेला होता. त्याच्यावर त्याची माया जडली होती. म्हणूनच त्याचा चाकर पूर्णपणे बरे होईल अशी त्याची बालंबाल खात्री होती. अर्थात त्याने येशूला कधीही पाहिले नव्हते, परंतु त्याने येशूविषयी ऐकलेल्या वृतांतामुळे त्याचा विश्वास द्विगुणित झाला होता व त्यामुळे तो इतका उत्तेजीत झाला होता. यहूदी कर्मठ धर्मवादी होते, असे असून सुद्धा त्या रोमी अंमलदाराची पूर्ण खात्री झाली होती की त्यांचा धर्म त्याच्या धर्मापेक्षा सरस होता. आधीच त्याने जेते व पराजित यांना विभक्त करणारा राष्ट्रीय पूर्वग्रहकलुषितपणा व द्वेष यांचा बांध तोडून टाकला होता. त्याने देवाच्या उपासनेविषयी आदर व्यक्त केला होता, आणि देवाचे उपासक म्हणून यहूदी लोकांना दयाळूपणा दाखविला होता. त्याला विदित करण्यात आले होते, त्याप्रमाणे येशूची शिकवण ही आत्म्याच्या गरजा भागविणारी शिकवण होती असे त्याला समजून चुकले होते. त्याच्या अंतःकरणात असलेल्या संपूर्ण आध्यात्मवादाने येशूच्या शब्दांना प्रतिसाद दिला होता. असे असूनही येशूच्या समीप येण्यास तो अगदीच अपात्र होता असे त्याला वाटत होते, म्हणून त्याने त्याच्या चाकराला बरे करण्यासाठी त्याच्या वतीने विनंती करण्यास यहूदी वडीलाकडे मागणी केली. त्यांना त्या थोर शिक्षकांची ओळख होती आणि त्याची कृपा मिळवण्यासाठी त्याची भेट घेणे त्यांना सहज शक्य होते असे त्याला वाटले. DAMar 265.2

येशू कपर्णहूम गावांत आला नाही तोच वडीलाच्या त्या प्रतिनिधीनी त्याची भेट घेतली, आणि त्या शतपतीची विनंती त्याच्यापुढे सादर केली, आणि आग्रहपूर्वक विनंती करून येशूला म्हटले, “त्याच्यासाठी आपण हे करावे असा तो योग्य आहे; कारण तो आपल्या राष्ट्रावर प्रेम करितो, आणि त्याने आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे.’ DAMar 266.1

येशू तत्काळ त्या अंमलदाराच्या घरी जाण्यास निघाला; परंतु लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे त्याला गजगती पावलाने चालणे भाग पडले. येशूच्या आगमनाची वार्ता त्याच्याही अगोदर पुढे गेली, आणि त्या शतपतीच्या कानावर पडली आणि स्वतःवरील अविश्वासामुळे त्याने येशूला निरोप पाठविला की, “प्रभूजी श्रम घेऊ नका; कारण आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही.’ परंतु तारणारा पुढे गेलाच, आणि शेवटी शतपतीला त्याच्या सामोरे जाण्याचे धैर्य करावेच लागले, आणि निरोपातील बाकीचा भाग “आपणाकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानिले नाही;” “तर शब्द बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत; मी एकाला जा म्हटले तो जातो; दुसऱ्याला ये म्हटले तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले तो ते करतो.’ पूर्णपणे सांगावा लागला. जसे मी रोमी साम्राज्याचे प्रतिनिधित्व करतो आणि माझे शिपाई माझ्या अधिकाराला सर्वोच्च अधिकार असे मानतात, त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा परमेश्वराचे प्रतिनिधित्व करता, आणि निर्माण केलेली सर्व उत्पत्ति तुमचा शब्द शिरोधार्य मानते. तुम्ही सोडून जाण्याची रोगाला फक्त आज्ञा दिली तर तो तुमची आज्ञा मानून निघून जाईल. तुम्ही देवदूताना फक्त आदेश दिला, तर ते रोगनिवारक शक्ती पुरवितील. शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. DAMar 266.2

“या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले; आणि तो वळून आपल्यामागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, “मी तुम्हास सांगतो, एवढा विश्वास इस्रालातही मला आढळला नाही.” येशू जमादाराला म्हणाला, “जा; तू विश्वास धरल्याप्रमाणे तुला प्राप्त होवो. त्याच घटकेस तो चाकर बरा झाला.” DAMar 266.3

ज्या यहूदी वडीलांनी जमादाराची शिफारस केली होती त्यांनी दाखवून दिले होते की ते सुवार्तेचा भावार्थ धारण करण्यापासून किती दूर होते. देवाची कृपा प्राप्त करणे ही आपली मोठी गरज आहे हेच त्यांनी समजून घेतले नव्हते. आत्मनिष्ठ सात्विकपणामुळे त्यानी तो जमादार “आपल्या राष्ट्रावर” प्रेम करतो अशीच केवळ त्याची स्तुती केली होती. परंतु जमादार स्वतःविषयी म्हणाला की, “अशी माझी योग्यता नाही.” ख्रिस्ताच्या कृपेने त्याच्या अंतःकरणावर परिणाम केला होता. त्याची अपात्रता त्याने जाणून घेतली होती; आणि म्हणूनच मदतीची याचना करण्यास तो कचवचला नाही, घाबरला नाही. त्याने स्वतःच्या थोरपणावर भरवसा ठेवला नाही; त्याच्या चाकराच्या आजारीपणाचे कारण हीच त्याची महान गरज होती. त्याच्या विश्वासाने येशूच्या अस्सल गुणवैशिष्ट्याची पक्कड घेतली. ख्रिस्त हा केवळ एक चमत्कार करणारी व्यक्ती होता म्हणून त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला होता असे नाही, तर तो सर्व मानवजातीचा एक मित्र व तारक होता असा धरला होता. DAMar 266.4

अशाच पद्धतीने प्रत्येक पापी ख्रिस्ताकडे येऊ शकतो. “आपण केलेल्या नीतीच्या कर्मानी नव्हे, तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारिले.” तीताला पत्र ३:५. जेव्हा सैतान तुम्हाला म्हणतो की तुम्ही पापी आहात, आणि म्हणून तुम्ही देवाच्या आशीर्वादाची अपेक्षा बाळगू शकत नाही, तेव्हा तुम्ही त्याला सांगा की, येशू पाप्याचे तारण करण्यासाठी जगात आला. आपण आपल्याविषयी देवाला शिफारस करावी असे कोणतेच चांगूलपण आपल्यात नाही. तथापि त्याच्या तारणदायी सामर्थ्याची गरज निर्माण करणारी आपली अत्यंत असाहाय्य परिस्थिती हेच आपले आता व सर्वदा आग्रह करण्यासाठी एक सबळ कारण असू शकते. स्वसामर्थ्यावर विसंबून राहाणाऱ्या अहंभावनेचा त्याग करून आपण आपली नजर वधस्तंभावर खिळून आपण म्हणू शकतो की, DAMar 267.1

“देण्यास तुला काहीच मोल नाही मजपाशी
फक्त राहातो मी बिलगुणी वधस्तंभ पायथ्याशी” DAMar 267.2

अगदी बालपणापासूनच यहूदी लोकाना मशीहाच्या कार्याविषयीची माहिती देण्यात आली होती. कुलाधिपती व संदेष्टे यांची प्रेरणायुक्त वचने आणि यज्ञयागाची प्रतिकात्मक सेवाकार्याची शिकवण त्यांच्याच स्वाधीन होती. परंतु त्यांनी त्या ज्ञानप्रकाशाकडे दुर्लक्ष केले होते; त्याची उपेक्षा केली होती; आणि आता त्यांना त्याच्या अपेक्षेप्रमाणे ख्रिस्तात काहीच दिसत नव्हते. परंतु यहूदेत्तर धर्मात जन्मलेल्या, साम्राज्यवादी रोमच्या उत्कट भक्तिभावात शिक्षण संपादन केलेल्या, एक योद्धा म्हणून सैनिकी प्रशिक्षण घेतलेल्या, आणि शिक्षण व परिस्थिती यामुळे आध्यात्मिक जीवनापासून विभक्त केला गेलेल्या, आणि याहीपेक्षा यहूदी लोकांच्या स्वमताच्या फाजील अभिमानामुळे दूर ठेवण्यात आलेल्या, आणि इस्राएल लोकांमुळे स्वदेशी लोकांकडून अवमानीत केला गेलेल्या तिरस्कारिलेल्या, या जमादाराला जे सत्य अब्राहामाच्या वंशजाना दिसत नव्हते ते सत्य त्याला दिसत होते. यहूदी लोक ज्याच्यावर त्यांचा मशीहा म्हणून हक्क सांगत होते, ते त्याचा स्वीकार करतात की नाही याची वाट पाहात तो थांबला नाही. “जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करितो तो जगांत येणार होता.” (योहान १:९). तो त्याच्यावर प्रकाशला होता. जरी तो यहूदेतर होता, परदेशी किंवा दूरचा होता, तरी त्याला देवाच्या पुत्राचे गौरव दिसले होते. DAMar 267.3

इतर धर्मीयात सुवार्तेची कार्यसिद्धी करण्यासाठी येशूला मिळालेली ही एक हमीच होती. सर्व राष्ट्रांतून त्याच्या राज्यात मोठा लोकसमुदाय एकत्र होणाऱ्या दिवसाची मोठ्या आनंदाने येशू वाट पाहात होता. यहूदी लोकांनी येशूच्या कृपेचा अव्हेर केल्यामुळे त्यांना भोगाव्या लागणाऱ्या परिणामाचे चित्र येशूने अतिव दुःखाने त्यांना दाखविले; “मी तुम्हास सांगतो की, पूर्वेकडून व पश्चिमेकडून बहुत लोक येतील, आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांजबरोबर स्वर्गाच्या राज्यात बसतील; परंतु राज्याचे पुत्र बाहेरच्या अंधारात टाकिले जातील, तेथे रडणे व दातखाणे चालेल.’ बाप रे बाप, अशा प्रकारच्या भयंकर निराशजनक प्रसंगासाठी अजूनही किती तरी लोक तयारी करीत आहेत! अधर्माच्या अंधकारातील किती तरी लोक येशूच्या कृपेचा स्वीकार करीत आहेत आणि त्याच समयी ज्याच्यावर प्रकाश प्रकाशीत आहे परंतु ते त्याचा अव्हेर करीत आहेत असे अनेक लोक ख्रिस्ती राष्ट्रांत आहेत. DAMar 268.1

कपर्णहमापासून २० मैलाच्या अंतरावर उंच दिसणाऱ्या डोंगरसपाटीवर विस्तीर्ण आणि निसर्गरम्य ‘इस्ड्रीलोन’ पठरावर नाईन गांव वसलेले आहे. लवकरच येशू त्या गावाला जाण्यास निघाला. त्याचे अनेक शिष्य व इतर पुष्कळ लोकही त्याच्याबरोबर होते, त्याचे प्रेमळ व दयामय संदेश ऐकण्याच्या आशेने, आणि रोग्यांना बरे करून घेण्याच्या विश्वासाने, त्याचप्रमाणे असे महासामर्थ्य धारण करणारा स्वतःला इस्राएल लोकांचा राजा म्हणून घोषणा करील या आशेने दूर दूरवरून ते आले होते. मोठा लोकसमुदाय त्याच्यापासून पाऊलभर अंतरावरून दाटीवाटीने त्या खडतर वाटेने त्या डोंगरी गावाच्या वेशीच्या दिशेने त्याच्याबरोबर चालला होता. DAMar 268.2

जेव्हा ते सर्व गावाच्या वेशीजवळ आले, तेव्हा एक प्रेतयात्रा वेशीतून बाहेर पडतांना त्यांनी पाहिली. अगदी दुःखभरीत मनाने, निशब्दपणे मंद गतिने ते कबरस्थानाकडे चालले होते. यात्रेच्या अगदी पुढच्या भागात तिरडीवर (शेवपेटी) पार्थिव होते. आजूबाजूला दुःखद आक्रोशाने आकाशातील वातावरण हेलावून टाकणारे शोकग्रस्त होते. मृताला शेवटली श्रद्धांजली आणि शोकग्रस्ताचे सांत्वन करण्यासाठी त्या गावचे बहुतेक गावकरी तेथे आले होते. DAMar 268.3

भयंकर हृदयद्रावक देखावा होता तो. मृत व्यक्ती हा त्याच्या आईचा एकुलता एक पुत्र होता, शिवाय ती विधवा होती. तिचा एकमेव आधार व सर्वस्व असलेल्या पोटच्या मुलाच्या पार्थिवामागून दुःखाने व शोकाने व्याकुळ झालेली निराश्रित माता मोठमोठ्याने हंबरडा फोडीत चालली होती. “तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला.” त्याच्या उपस्थितीची माहिती नसलेली ती माता ढळढळा अश्रू ढाळीत पुढे सरकत असतानाच तो तिच्या अगदी शेजारी गेला आणि अगदी हळूवार आवाजात कळकळीने तिला म्हणाला “रंडू नको.” येशू तिच्या दुःखाचे रूपांतर आनंदात करणार होता. तरी सुद्धा तिला सहानुभूती दाखविणारे दोन कोमल शब्द बोलण्यापासून त्याला त्याचे मन आवरता आले नाही. DAMar 268.4

“मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला.’ प्रेताला केलेला स्पर्श त्याला अशुद्ध करू शकत नव्हता. खांदेकरी तेथेच थांबले. शोकग्रस्ताचे शोक करणे बंद झाले. व्यर्थ आशेने दोन्ही बाजूचा लोकसमुदाय तिरडीसभोवती जमा झाला. त्यामध्ये असा एक होता की ज्याने रोग बरे केले होते, भूते काढली होती; अशा सत्ताधाऱ्याच्या अधिकाराखाली मृत्यू सुद्धा होता काय? DAMar 269.1

अगदी सुस्पष्टपणे व अधिकार वाणीने शब्द उच्चारले गेले, “मुला मी तुला सांगतो, ऊठ.” ते शब्द त्या प्रेताच्या कानांत घुसतात, तो तरुण आपले डोळे उघडतो. येशू त्याला आपल्या हाताने धरून उभा करतो. आतापर्यंत त्याच्या शेजारीच उभी राहून मुलाची माता ढस-ढसा रडत होती. तिच्या चेहऱ्याकडे येशू त्याची नजर फिरवितो. आनंदाने व उल्हासाने माता व पुत्र एकमेकांना अलिंगन देतात. मंत्रमुग्ध होऊन सर्व समुदाय सर्व काही शांतपणे पाहात राहातो. “तेव्हा सर्वांस भय प्राप्त झाले.” जसे काय खुद्द देवाच्या समक्षतेत उभे असल्यासारखे ते सर्व लोक अगदी स्तब्ध व आदराने उभे राहिले. मग “ते देवाला गौरवीत म्हणाले, आम्हामध्ये मोठा संदेष्टा उदय पावला आहे; आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.” प्रेतयात्रेचे रूपांतर विजयोत्सवाच्या फेरीत होऊन ती फेरी नाईन गांवात परतली. “त्याजविषयीची ही बातमी सगळ्या यहूदीयात व चहूकडल्या सर्व प्रातांत पसरली.” DAMar 269.2

नाईन गांवाच्या वेशीत शोकाकूल झालेल्या मातेजवळ उभा राहिलेला ख्रिस्त शवपेटीजवळ उभे असलेल्या प्रत्येक शोकग्रस्त व्यक्तीकडे लक्ष देतो.शोकग्रस्ताबद्दल त्याला कळवळा वाटतो. प्रेम व कृपा करणारे त्याचे अंतःकरण हे न बदलणारे अत्यंत कोमल अंतःकरण आहे. त्या मृत तरुणाला जीवदान देणारे त्याचे शब्द, नाईनमधल्या मुलासाठी बोलले गेले होते तेव्हा जितके परिणामकारक होते त्यापेक्षा आज ते शब्द कमी परिणामकारक आहेत असे नाही. तो म्हणतो, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे.’ मत्तय २८:१८. काळाच्या ओघात त्याचे सामर्थ्य कमी झाले नाही, किंवा त्याच्या कृपेच्या अखंड परिश्रमामुळे संपुष्टात आले नाही. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचा तो आजही तारणारा आहे. DAMar 269.3

जेव्हा येशूने त्या मातेला तिचा पुत्र मिळवून दिला, तेव्हा त्याने त्या मातेच्या दुःखाचे रूपांतर हर्षात केले; असे जरी असले तरी त्या तरुणाला केवळ जगिक जीवन जगण्यासाठी, जगातील दुःखे सहन करण्यासाठी, या जगात कठोर परिश्रम करण्यासाठी, जगातील धोक्यांना तोंड देण्यासाठी, आणि पुन्हा मरणाच्या अधीन होण्यासाठी पुन्हा जीवंत करण्यात आले होते. तथापि स्वकियांच्या मृत्यूमुळे झालेल्या आपल्या दुःखाचे परिमार्जन करण्यास येशू म्हणतो, “मी मेलो होतो तरी पाहा, युगानुयुग जीवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकच्या किल्ल्या मजजवळ आहेत.” “ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तामांसाचा झाला; यासाठी की मरणावर धनीपणा करणारा म्हणजे सैतान, याला आपल्या मरणाने नाहीसे करावे; आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणाने बांधलेले त्या सर्वांस मोकळे करावे.’ प्रगटी. १:१८; इब्री २:१४, १५. DAMar 269.4

जेव्हा देवाचा पुत्र मेलेल्यांना जागे होण्याची आज्ञा देतो तेव्हा सैतान त्यांना स्वतःच्या पकडीत ठेवू शकत नाही. जो आत्मा येशूच्या सामर्थ्यवान शब्दाचा विश्वासाने स्वीकार करतो अशा एकालाही सैतान आध्यात्मिक मरणांत डांबून ठेऊ शकत नाही. जे पापात मेलेले आहेत त्या सर्वांना देव म्हणतो “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ, म्हणजे ख्रिस्त तुजवर प्रकाशेल.” इफिस ५:१४. शब्द हा सार्वकालिक जीवन आहे. ज्याप्रमाणे आद्य मानवाला देवाच्या शब्दाने जीवंत होण्याची आज्ञा केली, त्याचप्रमाणे आजही तो शब्द आपल्याला जीवन देतो; जसे, “मूला मी तुला सांगतो ऊठ,’ ख्रिस्ताच्या या शब्दाने नाईन गावातील तरुण मुलाला जीवन दिले, तसेच “मेलेल्यातून ऊठ,” हे शब्द जो त्यांचा स्वीकार करतो त्याचे जीवन आहेत. देवाने “आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेविले.’ कलस्सै. १:१३. आपल्याला सर्व काही त्याच्या शब्दाद्वारे देण्यात आले आहे. आपण त्या शब्दाचा स्वीकार केला तर आपल्याला मुक्ती मिळाली आहे. DAMar 270.1

“ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करितो तर ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वास करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जीवंत करील.” “कारण, प्रभू स्वतः आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनि होत असता स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. मग जीवंत उरलेले आपण त्यांजबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सर्वदा प्रभूजवळ राहू.” रोम. ८:११; १ थेस्सल. ४:१६, १७. हे सांत्वनपर शब्द (वचन) आहेत, आणि या शब्दानेच आपण एकमेकाचे सांत्वन करावे अशी तो आम्हाला आज्ञा करतो. DAMar 270.2