Go to full page →

अध्याय ५५—दृश्य रूपात नाही DAMar 442

लूक १७:२०-२२.

काही परूशी येशूकडे येऊन “स्वर्गाचे राज्य केव्हा येणार’ असे विचारू लागले. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने तीन पेक्षा अधिक वर्षापूर्वी सर्व देशभर घोषणा केली होती की, “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’ मत्तय ३:२. परंतु राज्याची प्रतिष्ठापना करण्याची काही चिन्हे परूश्यांना दिसत नव्हती. अनेकांनी योहानाचा नाकार करून येशूला पावलो पावली विरोध केला होता ते येशूचे कार्य अपयशी झाले आहे असे अप्रत्यक्षरित्या सूचवीत होते. DAMar 442.1

येशूने उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य रूपात येत नाही, पाहा, ते येथे आहे! किंवा तेथे आहे! असे म्हणणार नाहीत, कारण पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.’ देवाच्या राज्याची सुरवात अंतःकरणात होते. त्याच्या आगमनाची खूण म्हणून जगिक सतेच्या प्रगटीकरणासाठी इकडे तिकडे पाहात बसू नका. DAMar 442.2

शिष्याकडे वळून त्याने म्हटले, “असे दिवस येणार आहेत की मनुष्याच्या पुत्राच्या दिवसापैकी एक दिवस पाहाण्याची तुम्ही इच्छा कराल पण तो तुम्हास दिसणार नाही.” कारण तो जगिक डामडोल व दिमाख यांचा असणार नाही. माझ्या कार्याचे वैभव तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही आणि हा मोठा धोका आहे. जो मनुष्याचे जीवन व प्रकाश आहे तो मानवतेचे आवरण आच्छादून तुम्हामध्ये उपस्थित आहे हा तुम्हाला लाभलेला महान प्रसंग आहे ह्याची तुम्हाला कल्पना येत नाही. देवपुत्राबरोबर बोलून चालून जो आनंद उपभोगिला त्याचे उत्सुकतेने स्मरण करण्याचे दिवस येतील. DAMar 442.3

स्वार्थीपणा व ऐहिक विचारसरणी यांच्यामुळे येशूच्या शिष्यांनासुद्धा प्रगट करण्यात येणाऱ्या आध्यात्मिक वैभवाचे आकलन झाले नाही. ख्रिस्ताचे स्वर्गारोहन झाल्यावर आणि भक्तावर पवित्र आत्म्याचा वर्षाव होईपर्यंत शिष्यांना उद्धारकाचा शीलस्वभाव व त्याचे कार्य याविषयीचे महत्त्व ओळखिता आले नव्हते. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाल्यानंतर ते वैभवी प्रभूच्या सहवासात होते ह्याची जाणीव त्यांना होत होती. ख्रिस्ताच्या वचनाचे त्यांना स्मरण करून दिल्यानंतर त्यांना भाकितांचा आणि त्याने केलेल्या चमत्कारांचा अर्थबोध होऊ लागला. त्याच्या जीवनातील अद्भते त्यांच्या डोळ्यासमोर आली आणि ते स्वप्नसृष्टीतून जागे झाले. त्यांना समजून आले की, “शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यानी परिपूर्ण होते.” योहान १:१४. पतित झालेल्या आदामाचे पुत्र व कन्या यांचा उद्धार करण्यासाठी ख्रिस्त ह्या जगात आला. हे समजल्यानंतर शिष्य स्वतःला पूर्वीपेक्षा कमी लेखू लागले, कमी महत्त्व देऊ लागले. त्याचे वचन व त्याचे कार्य याविषयी पुन्हा सांगण्यात त्यांना कधी थकवा आला नव्हता किंवा कंटाळवाणे वाटले नव्हते. अगोदर अंधूक समजलेले पाठ आता त्यांचे ताजे प्रगटीकरण झाले. पवित्र शास्त्र त्यांना नवा ग्रंथ झाला. DAMar 442.4

ख्रिस्ताविषयी साक्ष देणाऱ्या भाकीतांचा अभ्यास करीत असताना शिष्यांना त्र्येक्य देवाच्या सान्निध्यात आणण्यात आले होते आणि पृथ्वीवर सुरू केलेले काम पूर्ण करण्यासाठी जो स्वर्गात गेला त्याच्याविषयी त्यांना ज्ञान मिळाले. तो ज्ञानपूर्ण होता आणि त्याचा थांग कोणाही मनुष्य प्राण्याला लागणारा नव्हता. राजे लोक, संदेष्टे आणि धार्मिक यांनी ज्याच्याविषयी आगाऊ सांगितले होते त्याच्या मदतीची त्यांना गरज होती. त्याचे कार्य व शीलस्वभाव या विषयीच्या भविष्यसूचक आलेखनाचा त्यांनी पुन्हा पुन्हा आत्यंतिक आश्चर्याने अभ्यास केला. भविष्यात्मक शास्त्रवचनाचा अर्थ त्यांना अस्पष्ट होता. ख्रिस्ताविषयीचे महान सत्य स्वीकारण्यास ते फार मंद होते! त्याचे विनयशील जीवन व माणसांच्या बरोबरची त्याची वागणूक पाहून त्यांना त्याचे मानवी देह धारण करणे, नैसर्गिक गुणधर्माचा द्वैत स्वभाव यांचे आकलन झाले नव्हते. त्यांच्या डोळ्यांना मानवतेमध्ये देवत्व दिसले नव्हते. परंतु पवित्र आत्म्याच्याद्वारे त्यांना दिव्य दृष्टी लाभल्यावर त्याचे दर्शन घेऊन त्याच्या चरणी प्रणाम करण्यास ते फार उत्सुक होते! जे शास्त्रवचन समजले नाही ते त्याच्याद्वारे समजून घेण्यास ते किती आतुर होते! लक्षपूर्वक ऐकण्यास ते तयार होते. “मला अद्याप पुष्कळ गोष्टी तुम्हाला सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत.” योहान १६:१२ ह्या उद्गारात ख्रिस्ताला काय म्हणावयाचे होते? ते सर्व जाणण्यास ते किती उत्सुक होते! त्यांचा विश्वास फार दुर्बल होता, त्यांच्या कल्पना प्रमाणाबाहेर दूर होत्या आणि सत्य वस्तुस्थितीची जाणीव न झाल्याने त्यांच्या पदरात अपयश पडल्याबद्दल त्यांना अति दुःख झाले. DAMar 443.1

ख्रिस्तागमनाचा पुकारा करण्याकरिता आणि त्याचा स्वीकार करण्याकरिता यहूदी राष्ट्र आणि जग यांचे लक्ष वेधण्यासाठी देवाने निरोप्या पाठविला होता. योहानाने घोषीत केलेली ही महान व्यक्ती त्यांच्यासमवेत तीस पेक्षा अधिक वर्षे वावरत होती परंतु ती देवाने पाठविलेली आहे असे त्यांना समजले नव्हते. अस्तित्वात असलेल्या अविश्वासाला मनात थारा देऊन शिष्य बळी पडले आणि त्यांची ग्रहणशक्ती बोथट, गढूळ झाली. ह्या काळोखी जगाचा प्रकाश औदासिन्यावर पडत होता, परंतु त्याचे किरण कोठून येत आहेत ते त्याना समजले नव्हते. आम्ही शापाच्या मागे का लागले आहोत असा प्रश्न ते परपस्परात विचारत होते. त्याच्याबरोबर झालेल्या संभाषणाचा त्यानी पुनरुच्चार केला आणि म्हटले, आम्ही ऐहिक विचाराला आणि याजक व अधिकारी याच्या विरोधात्मक भूमिकेला स्थान देऊन आमची विचारसरणी आम्ही गोंधळून का टाकिली? त्यामुळे मोशेपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्याला आणि शलमोनापेक्षा ज्ञानी असणाऱ्याला आम्ही ओळखले नव्हते. आमचे कान किती बधीर होते! आमची ग्रहणशक्ती किती बोथट व दुबळी होती! DAMar 443.2

रोमी शिपायांनी केलेल्या जखमेत बोट घातल्याशिवाय विश्वास ठेवण्यास थोमा राजी नव्हता. त्याची नम्रता व धिक्कार अशा वेळी पेत्राने त्याचा नाकार केला. ह्या दुःखांच्या आठवणी त्यांच्या नेत्रापुढे स्पष्ट उभ्या राहिल्या. ते त्याच्याबरोबर होते परंतु त्याची त्यांना पूर्ण ओळख झाली नाही. परंतु त्यांच्या अविश्वासाची जाणीव झाल्यावर त्यांची अंतःकरणे कशी ढवळून आली! DAMar 444.1

याजक व अधिकारी मिळून त्यांच्याविरुद्ध उठले. त्यांना सल्लागार मंडळापुढे आणिले आणि शेवटी तुरुंगात डांबले. “त्या नावासाठी आपणाला अपमानास पात्र ठरविण्यात आले” म्हणून ख्रिस्ताच्या अनुयायांनी आनंद केला. प्रेषित. ५:४१. ख्रिस्ताचे वैभव त्यांनी ओळखिले आणि सर्व काही नाहीसे झाले तरी त्याच्यामागे जाण्याचा निश्चय केला हे मनुष्याच्या व देवदूतांच्यासमोर सिद्ध करण्यास त्यांना आनंद वाटत होता. DAMar 444.2

प्रेषितीय काळाप्रमाणेच आजसुद्धा हे खरे आहे की, दैवी आत्म्याद्वारे लाभलेल्या नवीन दृष्टीशिवाय मानवाला ख्रिस्ताच्या वैभवाची स्पष्ट कल्पना येणार नाही. जगावर प्रेम करणाऱ्या व त्याच्याशी तडजोड करणाऱ्या ख्रिस्ती लोकांना देवाचे सत्य व त्याचे कार्य यांचे गुणग्रहण करता येत नाही. प्रभूचे अनुयायी जगाशी समरस होऊ शकत नाहीत, जगाचा मानमहिमा, ख्यालीखुशाली यांच्या मागे लागू शकत नाहीत. त्यांचे श्रम, नम्रता याबाबतीत ते फार प्रगतशील आहेत, आणि ते “सत्ताबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर” लढण्यास सज्ज आहेत. इफिस. ६:१२. ख्रिस्ताच्या काळाप्रमाणे आता त्यांच्याविषयी गैरसमज होऊन त्यांना निष्ठरतेने वागविण्यात येते. DAMar 444.3

देवाचे राज्य दृश्य रूपात येत नाही. देवाच्या कृपेची सुवार्ता जगाशी कदापिही समरस होणार नाही. ही दोन तत्त्वे परस्परविरोधी आहेत. “स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारीत नाही; कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात; आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्याद्वारे होते.” १ करिंथ. २:१४. DAMar 444.4

परंतु आज धार्मिक जगात लाखो लोक त्यांच्या श्रद्धेप्रमाणे ख्रिस्ताचे ऐहिक व कालबाधित राज्य प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला ह्या जगाचा, न्यायालयाचा, छावणीचा, विधान सभेचा, महालांचा आणि मंडईचा सत्ताधार शास्ता बनविण्याची त्यांची अपेक्षा आहे. ज्याअर्थी व्यक्तिशः ख्रिस्त येथे हजर नाही त्याअर्थी ते स्वतः त्याच्या राज्याचे कायदेकानू अमलात आणण्याची जबाबदारी घेतात. येशूच्या काळात अशा प्रकारचे राज्यस्थापन करण्याची अपेक्षा यहुदी लोक करीत होते. ऐहिक व कालबाधित राज्याची स्थापना करण्यास, त्यांच्या मताप्रमाणे देवाचे नियम म्हणून अमलात आणण्यास आणि त्याच्या इच्छेचे स्पष्टीकरण करणारे आणि त्याच्या अधिकाराचे प्रतिनिधि म्हणून त्यांना निवडण्यास तो राजी झाला असता तर येशूचा त्यांनी स्वीकार केला असता. परंतु त्याने म्हटले, “माझे राज्य हया जगाचे नाही.” योहान १८:३६. जगीक राजासनाचा तो स्वीकार करणार नाही. DAMar 444.5

येशूच्या काळातील राज्य सरकार भ्रष्ट व जुलमी होते; पिळवणूक, असहिष्णुता आणि भरडून काढणारी निष्ठुरता सर्व थरावर दिसत होती. तथापि उद्धारकाने मुलकी नागरिक जीवनामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने राष्ट्रीय गैरवर्तणुकीवर हल्ला चढविला नाही किंवा राष्ट्रीय शजूंना दोष दिला नाही. सत्ताधिकाऱ्यांच्या कारभारात त्याने अडथळा आणिला नाही. जो आमचा उदाहरण होता तो पृथ्वीवरील राज्यांच्या कारभारापासून दूर राहिला. लोकांच्या दुःखाची पर्वा न केल्यामुळे तो दूर राहिला असे नाही तर त्याचा तोडगा मानवी व बाह्य उपायामध्ये नव्हता. परिणामकारक व्हायला पाहिजे तर उपाय व्यक्तीपर्यंत पोहंचला पाहिजे आणि अंतःकरणांत नवचैतन्य निर्माण झाले पाहिजे. DAMar 445.1

न्यायलय किंवा परिषद किंवा विधानसभा किंवा जागतिक किर्तीच्या व्यक्ती यांच्या निणर्यावर ख्रिस्ताच्या राज्याची प्रतिष्ठापना अवलंबून नाही तर पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे ख्रिस्ताच्या गुणस्वभावाचे रोपण मानवतेमध्ये केल्याने ते शक्य आहे. “परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा ह्यापासून झाला नाही; तर देवापासून झाला.” योहान १:१२, १३. केवळ ह्याच सामर्थ्याने मानवाचा उत्कर्ष होऊ शकतो. हे कार्य संपादन करण्यात मानवी साधन म्हणजे त्यांनी देवाच्या वचनाचे शिक्षण देऊन त्याचे पालन करणे होय. DAMar 445.2

दाट वस्तीचे, धनवान आणि असंस्कृत दुष्टाईने मलीन झालेले करीथ येथे आपल्या सेवाकार्याला सुरुवात केली तेव्हा पौलाने म्हटले, “येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त, ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला.” १ करिंथ. २:२. नंतर पापाने भ्रष्ट झालेल्या काहीना लिहितांना तो म्हणू लागला, “तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धूतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला.” “ख्रिस्त येशूमध्ये तुम्हावर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे मी तुम्हाविषयी देवाची उपकार स्तुती सर्वदा करितो.” १ करिंथ. ६:११; १:४. ख्रिस्ताच्या काळाप्रमाणे, जगातील अधिकाऱ्यांची आणि मानवी कायदेकानूची अधिकृत मान्यता आणि पाठिंबा मिळविण्यासाठी आरडाओरड करण्यावर देवाच्या राज्याचे कार्य अवलंबून नाही, परंतु त्याच्या नामामध्ये जे आध्यात्मिक सत्याची घोषणा करितात आणि सत्याचा स्वीकार करणाऱ्यांचा अनुभव पौलाप्रमाणे होईल त्यांच्यावर आहे. पौल म्हणतो, “मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे, आणि या पुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो.’ गलती. २:२०. त्यानंतर पौलाने जसे लोकांच्या कल्याणासाठी काम केले तसे ते काम करतील. त्याने म्हटले, “ह्यास्तव देव आम्हाकडून विनवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करितो; देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करितो.” २ करिंथ. ५:२० DAMar 445.3