Go to full page →

अध्याय ७५—हन्ना व कयफा यांच्यासमोर DAMar 607

मत्तय २६:५७-७५; २७:१; मार्क १४:५३-७२; १५:१; लूक २२:५४-७१; योहान १८:१३-२७.

किद्रोण ओहोळ, बागबगीचा आणि जैतून वृक्षांचे उपवन ओलांडून शहरातील शांत रस्त्यावरून येशूला घाई घाईने नेले. मध्यरात्र ओलांडली होती आणि त्याच्या मागून जाणाऱ्या जमावाच्या ओरडण्याने शांत वातावरण भंग पावले होते. उद्धारकाला बांधलेले असून त्याच्यावर नजर ठेवण्यात आली होती आणि तो विव्हळत हळूहळू पुढे चालला होता. परंतु घाईमध्ये त्याच्या मारेकऱ्यांनी त्याला निवृत झालेला प्रमुख याजक हन्ना ह्याच्या वाड्यात नेले. DAMar 607.1

हन्ना याजकीय कुटुंबातील प्रमुख असून त्याच्या वयावरून लोकांनी त्याला प्रमुख याजक मानले होते. त्याचा सल्ला घेऊन ती देवाची वाणी म्हणून तिचे पालन केले जात होते. याजकीय सत्ता अधिकार म्हणून त्याने प्रथम येशूला-बंदिवानाला पाहिले पाहिजे होते. त्याच्या परीक्षेच्या वेळी त्याला हजर राहायाला पाहिजे होते, नाहीतर कमी अनुभव असलेला कयफा नियोजीत उद्देश साध्य करण्यास अपयशी ठरेल. त्याची शक्कल, कावेबाजपणा व धूर्तपणा वापरण्यात आला पाहिजे होता; कारण कोणत्याही परिस्थितीत ख्रिस्ताला शिक्षा झालीच पाहिजे होती. DAMar 607.2

औपचारिकरित्या ख्रिस्ताची चौकशी धमसभेपुढे होणार होती; परंतु हन्नासमोर त्याची प्राथमिक चौकशी व्हावयाची होती. रोमी राज्याच्या अधिकाराखाली धर्मसभा मरणदंडाची शिक्षा देऊ शकत नव्हती. ती बंदिवानाची केवळ चौकशी करून निर्णय देत असे पण तो निर्णय मंजूरीसाठी रोमी अधिकाऱ्याकडे पाठवीत असत. म्हणून रोमी अधिकाऱ्याला तो गुन्हेगार आहे हे पटविण्यासाठी ख्रिस्तावरील आरोप गुन्हेगारीचे असणे आवश्यक होते. यहूद्यांच्या दृष्टीने त्याला मरणदंड झाला पाहिजे असे आरोप सादर करणे जरूरीचे होते. ख्रिस्ताच्या शिकवणीने पुष्कळ अधिकारी व याजक यांना दोषी ठरविले होते परंतु बहिष्कृत करण्याच्या भीतीने त्यांनी त्याच्यावरील श्रद्धा प्रगट केली नाही. याजकांना निकोदमाच्या प्रश्नाची आठवण झाली, “एकाद्या माणसाचे ऐकून घेतल्यावाचून व तो काय करितो ह्याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र न्याय करिते काय?’ योहान ७:५१. ह्या प्रश्नाचे सल्लागार मंडळामध्ये मतभेद झाले आणि त्यांची योजना त्यावेळी निष्फळ ठरली. निकोदिमस आणि अरिमथाईतील योसेफ यांना ते आता बोलावणार नव्हते परंतु दुसरे काहीजण न्यायाच्या बाजूने कदाचित बोलायला धजतील. चौकशीसाठी सल्लागार मंडळात ख्रिस्ताविरुद्ध एकी घडवून आणून चौकशी केली पाहिजे. त्याच्याविरुद्ध दोन आरोप याजकांच्यापुढे होते. येशू देवाची निंदा करणारा आहे हा आरोप सिद्ध केला तर त्याला यहूदी लोक शिक्षा ठोठावतील. राजद्रोहासाठी दोषी ठरविला तर रोमी सरकार त्याला शिक्षा देईल. हन्ना प्रथम दुसरा आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत होता. येशूला त्याने त्याची शिकवण व त्याचे शिष्य यांच्याविषयी प्रश्न विचारले. त्याच्या उत्तरात जे वक्तव्य होईल त्याच्या वरून तो आपली बाजू तयार करील असे त्याला वाटले होते. तो नवीन राज्याची स्थापना करण्यासाठी व तो गुप्त मंडळ स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या वक्तव्यातील एकादे विधान पकडावे असे त्याला वाटले. त्यानंतर शांती नाश करणारा व प्रस्थापित सरकारला विरोध करणारा म्हणून याजक त्याला रोमी सरकारच्या स्वाधीन करणार होते. DAMar 607.3

खुल्या पुस्तकाप्रमाणे ख्रिस्ताने याजकाचा उद्देश ओळखला. प्रश्न विचारणाऱ्याच्या अंतर्यामातील अगदी गुपीत योजना ओळखून तो व त्याचे शिष्य यांच्यामध्ये काही गुप्त खलबते चालली असल्याचे त्याने नाकारले. त्याचे हेतू किंवा शिकवण ह्या बाबतीत कसलेही गुपित नसल्याने त्याने सांगितले. त्याने म्हटले, “मी जगापुढे उघड बोलतो. यहूदी लोकांचे नेहमीचे आश्रयस्थान असलेले मंदिर आणि उपासना स्थान ह्या ठिकाणी मी सतत शिक्षण दिले.” DAMar 608.1

त्याच्यावर दोष ठेवणाऱ्यांच्या पद्धतीच्याविरुद्ध त्याची कार्यपद्धत होती हे तुलनात्मक उद्धारकाने दाखवले. गुप्त कोर्टात कित्येक महिने त्याला जाळ्यात अडकवण्यासाठी ते त्याचा पाठलाग करीत होते. सरळ मार्गाने जे साध्य होणार नाही ते खोट्या साक्षीने साध्य करून घेण्याचा खटाटोप करीत होते. आता त्या उद्दिष्टाच्या मागे ते लागले होते. मध्यरात्री जबरदस्तीने पकडणे, त्याला दोषी ठरविण्याच्या अगोदर त्याची थट्टा कुचेष्टा व शिवीगाळ, अनुचित वागणूक देणे अशी त्यांची रीत होती. परंतु तशी त्याची नव्हती. त्यांची कृती कायद्याचे उलंखन होते. जोपर्यंत एकादी व्यक्ती दोषी आहे असे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला निर्दोष समजले पाहिजे असे त्यांच्याच नियमात सांगितले होते. त्यांच्या स्वतःच्या कायद्याखाली याजक दोषी होते. DAMar 608.2

प्रश्न विचारणाऱ्याला येशूने म्हटले, “तुम्ही मला का विचारता?” माझ्या हालचालीवर पाळत ठेवण्यासाठी व माझ्या प्रत्येक शब्दाचा अहवाल देण्यासाठी याजक व अधिकारी यांनी गुप्त हेर पाठविले नव्हते काय? प्रत्येक सभेच्या वेळी हे हेर हजर राहून माझे बोल व कृती याविषयी याजकांना त्यांनी माहिती दिली नाही काय? येशूने उत्तर दिले, “मी काय बोललो हे ज्यांनी ऐकले त्यांना विचारा. मी काय बोललो हे त्यांना माहीत आहे.” DAMar 608.3

ह्या उत्तराने हन्ना निःशब्द झाला. तो करीत असलेल्या कृत्याविषयी ख्रिस्त आणखी काय बोलेल ह्या भीतीने तो ह्या वेळेस पुढे काही बोलला नाही. हन्ना स्तब्ध झालेला पाहून त्याच्या एका अधिकाऱ्याने क्रोधाविष्ठ होऊन येशूला चपडाक मारून म्हटले, “तूप्रमुख याजकाला असा जबाब देतोस काय?’ DAMar 609.1

ख्रिस्ताने शांतपणे उत्तर दिले, “मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोलले ते सिद्ध कर; योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारितोस?” बदला घेण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी त्याचे हे शब्द खरपूस नव्हते. हे शब्द त्याच्या निःष्पाप, सहिष्णु व कोमल अंतःकरणातून बाहेर पडले होते, ते चीड आणणारे नव्हते. DAMar 609.2

अपशब्द व नालस्ती यामुळे ख्रिस्ताला फार त्रास झाला. ज्यांना त्याने निर्माण केले होते आणि ज्यांच्यासाठी हा महान आत्मयज्ञ करीत होता त्यांच्या हातूनच हा त्याचा मोठा अनादर झाला. त्याच्या पावित्र्याची पूर्णता व पापाविषयीचा द्वेष ह्याच्या प्रमाणात त्याला दुःख सहन करावे लागले. क्रूर लोकांच्याद्वारे त्याची होत असलेली परीक्षा त्याला सततचा यज्ञबली वाटला. सैतानी सत्तेखालील लोकांनी त्याला गराडा घातल्याबद्दल त्याला चीड येत होती. त्याला माहीत होते की त्याच्या दैवी सामर्थ्याद्वारे त्या सर्वांना क्षणात भस्म करून टाकू शकतो. ह्यामुळे ती कसोटी सहन करण्यास कठीण झाले. DAMar 609.3

मशीहा आपला विक्रमी प्रताप बाह्यरित्या दाखवील अशी यहूद्यांची अपेक्षा होती. एका क्षणांत सर्व अंकित घेऊन लोकांची विचारसरणी बदलावी आणि त्याचे प्राबल्य मानण्यास त्यांना भाग पाडावे अशी त्यांची दाट इच्छा होती. ह्यावरून त्यांना वाटत होते की त्याने स्वतःचे उच्च पद प्रस्थापित करावे त्यांच्या महत्त्वाकांक्षी आशा पूर्ण कराव्या. म्हणून ख्रिस्ताचे जेव्हा लोक हालहाळ करीत होते तेव्हा दैवी प्रताप दाखविण्याचा मोह ख्रिस्ताला झाला होता. शब्दाद्वारे, दृष्टीद्वारे-पाहाण्याद्वारे तो राजे, अधिकारी, याजक व मंदिर यांच्यापेक्षा मोठा आहे हे त्याचा छळ करणाऱ्यांस कबूल करायला त्याने भाग पाडिले पाहिजे होते; परंतु जी मानवता त्याने धारण केली होती ते राखणे त्याला फार कठीण होते. DAMar 609.4

त्याच्या जीवलग सेनापतीविरुद्ध चाललेली प्रत्येक हालचाल स्वर्गातील देवदूतांनी पाहिली. ख्रिस्ताची सुटका करण्यास ते फार उत्सुक होते. देवाच्या नेतृत्वाखाली देवदूत अति प्रबळ असतात. एका प्रसंगी ख्रिस्ताचा हुकूम पाळण्यासाठी एका रात्रीत त्यांनी अशीरीयाच्या सैन्याचे एक लाख पंच्याऐंशी सैन्य मारले होते. ख्रिस्ताचे होत असलेले लजास्पद हाल पाहून देवाच्या शत्रूची त्यांनी कशी सहजरित्या कत्तल केली असती! परंतु तसे करण्यास त्यांना हुकूम नव्हता. शत्रूना मृत्यूच्या खाईत लोटणाऱ्याने त्यांचा निष्ठूरपणा सहन केला. पित्यावरील प्रेम, जगाच्या स्थापनेपूर्वी पाप वाहाणारा म्हणून दिलेली प्रतिज्ञा यामुळे ज्याचे तारण करण्यासाठी तो आला त्यांनीच दिलेली क्रूर वागणूक मुकाट्याने सहन केली. लोकांनी केलेली त्याची निंदा नालस्ती त्याच्या कार्याचा एक भाग म्हणून मानव या नात्याने त्याला सोसावा लागला. लोकांनी त्याच्यावर केलेल्या आघाताला सहनशिलतेने ख्रिस्ताने तोंड देणे यामध्येच मानवाची आशा होती. DAMar 609.5

त्याच्यावर आरोप करणाऱ्यांना निमित मिळेल असे विधान ख्रिस्ताने केले नव्हते; तरी त्याला दोषी ठरविण्यात आले असे समजून बांधले होते. तथापि त्यामध्ये न्याय असल्याची बतावनी होती. न्यायाने त्याची चौकशी करण्याची पद्धत असणे आवश्यक होते. ते करण्यासाठी अधिकारी घाई करीत होते. चौकशी आणि अंमलबजावणी ताबडतोब केली नाही तर वल्हांडण सणामुळे एक सप्ताहाचा विलंब होणार होता. त्यामुळे कदाचित त्यांची योजना सफळ होणार नव्हती. येशूला मरणदंडाची शिक्षा मिळण्यासाठी ते बहुअंशी जमावाच्या गोंगाटावर अवलंबून होते. त्यामध्ये बहुतेक यरुशलेमातील बाजारबुणग्यांची गर्दी होती. एक सप्ताहाचा विलंब झाला तर हा सर्व गोंगाट बंद पडेल आणि त्याची प्रतिक्रिया सुरू होईल. लोकांतील बहुतेक पुढे येऊन त्याने केलेल्या सत्कृत्यांची साक्ष देऊन त्यांचे समर्थन करतील व त्याची बाजू घेतील. त्यामुळे लोकांचा क्रोध धर्मसभेविरुद्ध भडकेल. त्यांच्या कामकाजाला दोषी ठरवून ख्रिस्ताला मुक्त करतील आणि लोकसमुदायापासून त्याची वाहवा होऊन त्याचा सत्कार होईल. त्यामुळे याजक व अधिकारी यांनी निश्चय केला की, त्यांची योजना सर्वश्रृत होण्याअगोदर येशूला रोमी अधिकाऱ्यांच्या हाती सोपविला पाहिजे. DAMar 610.1

परंतु सर्व प्रथम आरोप शोधला पाहिजे. आतापर्यंत काहीच सार्थक झाले नाही. येशूला कयफाकडे नेण्याचा हुकूम हन्नाने केला. कयफा सदोकी पंथाचा होता. त्यांच्यातील काहीजण ह्या वेळी येशूचे कट्टर वैरी होती. तो हन्नाप्रमाणेच भारी कडक, निर्दय आणि उलट्या काळजांचा होता. येशूला खलास करण्यासाठी तो काय करील हे सांगता येणार नव्हते. ही पहाटेची वेळ होती, अजून गडद अंधार होता; कंदील व मशाली यांच्या प्रकाशात जमाव मुख्य याजकाच्या वाड्याकडे बंदिवानाला घेऊन निघाला. येथे धर्मसभेचे सभासद एकत्र येण्याच्या अवधीत हन्ना व कयफा यांनी येशूला पुन्हा प्रश्न विचारले परंतु काय फायदा झाला नाही. DAMar 610.2

न्यायसभागृहात सल्लागार मंडळ एकत्र जमल्यावर कयफाने अध्यक्षस्थान स्वीकारले. त्याच्या दोन्ही बाजूला न्यायाधीश व चौकशीत गोडी असलेले बसले होते. रोमी शिपाई सिंहासनाच्याखाली व्यासपिठावर उभे केले होते. सिंहासनाच्या पायथ्याशी येशू उभा होता. त्याच्यावर सर्व समुदायाची नजर खिळली होती. खळबळ अगदी विकोपाला गेली होती. त्या समुदायात केवळ तोच तेवढा शांत व प्रसन्नचित्त होता. त्याच्या सभोवतालचे सर्व वातावरण पावित्र्याने भरलेले होते असे भासले. DAMar 610.3

येशू त्याचा कट्टर शत्रू आहे अशी कयफाची धारणा होती. उद्धारकाचे ऐकण्यास उत्सुक असलेले लोक आणि त्याची शिकवण स्वीकारण्यास त्यांची तयारी पाहून मुख्य याजक त्वेषाने जळफळू लागला. परंतु आता कयफाने बंदिवानाकडे न्याहाळून पाहिले तर त्याच्या आदरनीय व उमद्या स्वभावाची वागणूक पाहून त्याला आचंबा वाटला. हा मनुष्य देवासारखा आहे अशी त्याची खात्री झाली होती. परंतु दुसऱ्याच क्षणाला त्याने तो मनातील विचार झिडकारून टाकिला. लागलेच आढ्यतेने व उपहासाने बोलून त्याने म्हटले त्यांच्यासमोर येशूने मोठा चमत्कार करावा. परंतु त्याच्या बोलण्याकडे उद्धारकाने दुर्लक्ष केले. लोकांनी हन्ना व कयफा यांच्या खळबळजनक व अत्यंत दुष्ट बुद्धीच्या घातकी वर्तणुकीशी ख्रिस्ताच्या शांत व भव्य उदात्त वागणुकीशी तुलना केली. जमावातील निष्ठूर वृत्तीच्या लोकांच्या मनातसुद्धा असा प्रश्न उभा राहिला, ह्या देवासारख्या माणसाला गुन्हेगाऱ्यासारखी शिक्षा द्यायची काय? DAMar 611.1

लोकांमध्ये प्रवर्तन होत असलेले पाहून कयफाने चौकशी घाईत संपविली. येशूचे शत्रू मोठ्या गोंधळात पडले. त्याला दोषी ठरविण्याचा त्यांनी हिया केला होता परंतु ते कसे साध्य करून घ्यायचे हे त्यांना समजेना. सल्लागार मंडळाचे सभासद त्यांच्यात सदूकी व परूशी अशी फूट पडली. त्यांच्यामध्ये जहर वैमनस्य व वाद होता. भांडण निर्माण होऊ नये म्हणून काही वादग्रस्त प्रश्न ते उकरून काढीत नव्हते. थोड्या शब्दातच येशूने परस्परातील दुराग्रह चेतविला असता त्याच्यावरील त्यांचा क्रोध टाळला असता. कयफाला हे माहीत होते म्हणूनच तो ते भांडण विकोपाला जाऊ नये म्हणून टाळत होता. याजक व शास्त्री यांच्यावर दोषारोप करून ख्रिस्ताने त्यांना ढोंगी व खुनी म्हटले आहे हे सिद्ध करण्यासाठी तेथे बहुत साक्षीदार होते; परंतु ही साक्ष पुढे आणणे उपयुक्त ठरली नसती. अशा साक्षीचा प्रभाव रोमी अधिकाऱ्यावर बिलकूल पडला नसता. कारण परूश्यांच्या ढोंगीपणाचा त्यांना तिटकारा आला होता. यहूदी लोकांचे सांप्रदाय, व परंपरागत आचार ह्याकडे येशूने दुर्लक्ष करून उपेक्षा केली होती आणि त्यांच्या बहुत विधीसंस्काराविषयी अवमानाचे उद्गार काढिले होते याविषयी पुरावा होता. सांप्रदायाच्या बाबतीत परूशी व सदूकी यांच्यात निकरीचे मतभेद होते. हा पुरावा सुद्धा रोमी अधिकाऱ्यावर काही प्रभाव पाडू शकत नव्हता. ख्रिस्ताच्या शत्रूनी शब्बाथाच्या उलंघनाचा आरोप त्याच्यावर करू नये कारण परीक्षेअंती त्याच्या कार्याचे स्वरूप उघड झाले असते. त्याचे बरे करण्याचे चमत्कार उजेडात आणिले तर याजकांचा उद्देशच अपयशी ठरला असता. DAMar 611.2

बंड करून नवीन राज्याची प्रस्थापना करण्याचा घाट ख्रिस्ताने घातला आहे अशी साक्ष देण्यासाठी लोकांना लाच देण्यात आली होती. परंतु त्यांची साक्ष मोघम, अस्पष्ट व विसंगत होती. स्वतःच्याच विधानात फसवणूक केल्याचे बारीक सारीक तपासणीअंती आढळून आले होते. DAMar 611.3

आपल्या कार्याच्या आरंभी ख्रिस्ताने म्हटले होते, “तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसात हे उभारीन.’ भाकीताच्या लाक्षणीक भाषेत त्याने स्वतःचे मरण व पुनरुत्थान याविषयी सांगितले होते. “तो आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता.’ योहान २:१९, २१. यरुशलेमातील मंदिराविषयी त्याने हे विधान केले असे यहूद्यांना वाटले होते. ह्याच्या शिवाय ख्रिस्ताच्याविरुद्ध त्याने केलेल्या वक्तव्यातून दाखविण्यास त्यांच्याजवळ काहीच नव्हते. त्याला चुकीचा अर्थ लावून फायदा उचलण्याचा त्यांचा इरादा होता. रोमी अधिकारी ते मंदिर बांधून सुशोभीत करण्यात गुंतले होते आणि त्याचा त्यांना अभिमान वाटत होता. त्याचा जर कोणी अनादर केला तर त्याबद्दल निश्चितच त्यांचा क्रोध अनावर होत असे. ह्या वेळी रोमी अधिकारी आणि यहूदी, परूशी व सदूकी एकत्र येऊ शकले, कारण मंदिराबद्दल सर्वांच्याठायी पूज्यबुद्धी, आदरभाव होता. ह्या मुद्यावर दोन साक्षीदार काढिले आणि त्यांची साक्ष दुसऱ्यासारखी विसंगत नव्हती. येशूला दोष देण्यासाठी ज्याला लाच दिली होती त्यातील एकजण म्हणाला, “त्याने म्हटले, मी देवाचे मंदिर मोडून टाकण्यास आणि ते तीन दिवसात उभारण्यास समर्थ आहे.” अशा प्रकारे ख्रिस्ताच्या बोलण्याचा विपर्यास केला होता. त्याने काढलेले उद्गार हुबेहूब सादर केले असते तर धर्मसभेनेसुद्धा त्याला दोषी ठरविले नसते. यहद्यांना वाटले तसे येशू केवळ मानवच असता तर त्याचे वक्तव्य फुशारकीचे व अवास्तव गैरवाजवी समजले असते आणि त्याद्वारे ईश्वर निंदा झाला नसती. जरी साक्षीदारांनी खोटी साक्ष दिली तरी त्यांच्या बोलण्यात त्याला मरणदंडाची शिक्षा होईल असे काही नव्हते. DAMar 612.1

येशूने शांतपणे विरोधात्मक साक्षी ऐकल्या. स्वतःच्या समर्थनात त्याने एक शब्दही काढिला नाही. शेवटी त्याला दोष देणारे गोंधळून गेले, अडचणीत पडले व चिडले. चौकशी तेथेच थांबली होती आणि त्यांचा कट आता उधळला जाणार होता. कयफा अत्यंत निराश झाला होता. शेवटी एकच मार्ग राहिला होता. स्वतःला दोषी ठरविण्यासाठी ख्रिस्तावर दबाव आणला पाहिजे होता. प्रमुख याजक न्यायसनावर बसला होता. रागाने त्याचा चेहरा विकृत झाला होता. त्याचा आवाज व वर्तणूक दर्शवीत होते की, जर सर्व काही त्यांच्या हातात असते तर बंदिवानाला खाली आपटले असते. “तू काहीच उत्तर देत नाहीस काय हे तुझ्याविरुद्ध साक्ष देतात हे काय?’ असे त्याने म्हटले. DAMar 612.2

ख्रिस्त शांत होता. “त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोशिले, आपले तोंडसुद्धा उघडिले नाही; वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्यापुढे गप्प राहाणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला; त्याने आपले तोंड उघडिले नाही.” यशया ५३:७. DAMar 612.3

शेवटी वर स्वर्गाकडे हात करून येशूला उद्देशून म्हटले, “मी तुला जीवंत देवाची शपथ घालतो, देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हास सांग.’ DAMar 612.4

ह्या केलेल्या विनवणीकडे दुर्लक्ष करून ख्रिस्त शांत बसू शकला नाही. बोलण्याची व शांत राहाण्याची वेळ होती. प्रत्यक्ष त्याला प्रश्न विचारल्याशिवाय त्याने उत्तर दिले नाही. आता उत्तर देणे म्हणजे त्याचे मरण निश्चित करणे हे त्याला माहीत होते. परंतु राष्ट्राच्या अति श्रेष्ठपदस्थाने परात्पराच्या नावात ही विनवणी केली होती. नियमशास्त्राचा इष्ट आदर राखण्यात ख्रिस्त कमी पडणार नव्हता. याहीपेक्षा अधिक म्हणजे पित्याशी असलेले त्याचे नाते याच्याबद्दल प्रश्न निर्माण झाले होते त्याचा स्वभाव आणि त्याचे कार्य त्याने घोषीत केले पाहिजे होते. येशूने शिष्यांना म्हटले, “जो कोणी माणसासमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन.” मत्तय १०:३२. स्वतःच्या उदाहरणाने त्याने ह्या धड्याची पुनरावृत्ती केली होती. DAMar 613.1

तो उत्तर देताना प्रत्येक कान टवकारलेला होता आणि प्रत्येक नेत्र त्याच्या चेहऱ्यावर खिळिले होते. तो उद्गारला, “होय, आपण म्हटले तसेच.’ पुढे बोलत असताना दिव्य प्रकाशाने त्याचा मलूल चेहरा प्रकाशत होता. “आणखी मी तुम्हास सांगतो, ह्यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन येताना पाहाल.” DAMar 613.2

क्षणासाठी ख्रिस्ताचे देवत्व त्याच्या मानवतेमध्ये चमकले. उद्धारकाच्या नेत्रकटाक्षतेने मुख्य याजकाचे अवसान गळून गेले. त्या दृष्टिक्षेपाने जणू काय त्याच्या मनातील गुप्त विचार DAMar 613.3

ओळखले आणि त्यामुळे त्याचे अंतःकरण चर्र झाले. छळ झालेल्या देवपुत्राच्या शोधक दृष्टिक्षेपाचे त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यात कधी विस्मरण झाले नाही. DAMar 613.4

येशूने म्हटले, “ह्यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघांवर आरुढ होऊन येताना पाहाल.” ह्या बोलाद्वारे ख्रिस्ताने घडत असलेल्या घटनेच्याविरुद्ध देखावा सादर केला. जीवन व वैभव यांचा प्रभु देवाच्या उजवीकडे बसेल. तो सर्व पृथ्वीचा नायाधीश राहील आणि त्याने दिलेल्या निर्णयावर पुन्हा दाद मागता येत नव्हती. प्रत्येक गुप्त गोष्ट देवप्रकाशात उघड होईल आणि प्रत्येकाच्या करणीप्रमाणे न्याय देण्यात येईल. DAMar 613.5

ख्रिस्ताचे शब्द ऐकून मुख्य याजकाला धडकी भरली. मृतांचे पुनरुत्थान होणार आणि सर्वजण देवासमोर न्यायासाठी उभे राहाणार आणि प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे न्याय देण्यात येणार हा विचार कयफाला भीतीदायक वाटला. त्याच्या कर्माप्रमाणे त्याला पुढे शिक्षा मिळेल ह्यावर विश्वास ठेवायला तो तयार नव्हता. शेवटच्या न्यायालयातील देखावा त्याच्या डोळ्यापुढून सरकला. काही वेळ त्याने कबरेतून मृत बाहेर येत असलेला भीतीदायक देखावा पाहिला. त्याला वाटले होते की गुप्त गोष्टी कायमच्या गाढल्या गेल्या. त्याला वाटले की काही क्षण तो सनातन न्यायधिशासमोर उभा आहे आणि सर्वज्ञ नेत्र त्याच्या मनातील सर्व गोष्टी पाहात आहे आणि मृताबरोबर गाढलेल्या सर्व गोष्टी उजेडात आणीत आहे. DAMar 613.6

याजकाच्या डोळ्यासमोरून हा देखावा निघून गेला. ख्रिस्ताचे शब्द सदूकी म्हणून त्याच्या अंतःकरणाला झोंबले. पुनरुत्थानाचे, न्यायाचे व भावी जीवनाचे तत्त्व कयफाने नाकारले होते. सैतानी क्रोधाने त्याला आता चीड आली होती. मला अति प्रिय असलेल्या धर्मतत्त्वावर हल्ला करणारा हा बंदिवान माणूस आहे काय? लोकांनी त्याच्या आढ्यतेचा ढोंगीपणा पहावा म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडली आणि आणखी पुढे चौकशी करण्याशिवाय त्याला दुर्भाषण केल्याबद्दल दोषी ठरविण्याची मागणी केली. “आम्हास साक्षीदाराची आणखी काय गरज आहे?” त्याने म्हटले, “पाहा आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकिले आहे. तुम्हास काय वाटते?” आणि त्या सर्वांनी म्हटले की, हा मरणदंडास पात्र आहे. DAMar 614.1

ठाम मत व तीव्र भावना यांच्या मिश्रणाने कयफाने करायचे ते केले. ख्रिस्ताच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्याला स्वतःचाच भारी राग आला. येशू हा मशीहा आहे हे कबूल करून आणि सत्य वृत्तीबद्दल अंतःकरण विदारण्याऐवजी त्याने विरोध दर्शविण्यासाठी याजकीय वस्त्रे फाडिली. ही कृती अर्थपूर्ण होती. कयफाने त्याचा अर्थ समजून घेतला नाही. न्यायाधिशावर दबाव आणून ख्रिस्ताला शिक्षापात्र ठरविण्याच्या ह्या त्याच्या कृतीत मुख्य याजकाने स्वतःलाच दोषी ठरविले होते. देवाच्या नियमाप्रमाणे तो याजकपणास पात्र राहिला नव्हता. त्याने स्वतःवर मरणदंडाची शिक्षा ठोठावली होती. DAMar 614.2

मुख्य याजकाने आपली वस्त्रे फाडायची नव्हती. लेवीच्या नियमाखाली त्यावर बंधन असून त्याबद्दल मरणदंडाची शिक्षा होती. कोणत्याही प्रसंगी व कोणत्याही कारणामुळे याजकाने आपली वस्त्रे फाडायची नव्हती. मित्राच्या मृत्यूबद्दल वस्त्रे फाडण्याची प्रथा यहूदी लोकात होती परंतु ही प्रथा याजकाला पाळायची नव्हती. ह्या बाबतीत ख्रिस्ताने कडक शब्दात मोशेला हुकूम देण्यात आला होता. लेवी १०:६. DAMar 614.3

ज्याचा वापर याजक करीत होता ते सर्व पूर्ण व निष्कलंक असायचे होते. त्याने वापरण्यात येणारी वस्त्रे येशू ख्रिस्ताच्या स्वभावाचे दर्शक होते. पोषाख व मनोवृत्ती, उक्ती व भावना यांच्यामध्ये परिपूर्ण असलेले देवाला मान्य होते. तो पवित्र आहे आणि त्याचे वैभव व परिपूर्णता पृथ्वीवरील सेवेमध्ये आदर्शनीय असले पाहिजे. स्वर्गीय सेवेचे पावित्र्य परिपूर्णतेमध्ये दर्शविले पाहिजे. मर्यादा असलेला मनुष्य अनुतप्त व विनम्र मनाने आपले भग्न हृदय व्यक्त करू शकतो. हे देवाला समजून येईल. परंतु कोणत्याही परिस्थितीत याजकीय पोषाख फाडला नसला पाहिजे कारण त्याद्वारे स्वर्गीय निदर्शकाला कलंक लागेल. प्रमुख याजक पवित्र पद भूषवितो आणि पवित्रस्थानातील सेवेत भाग घेतो आणि आपली वस्त्रे फाडितो त्यावेळेस त्याने देवाचा संबंध तोडला आहे असे समजले जाते. वस्त्रे फाडल्याने देवाच्या स्वभावाचे दर्शक आहे हे दाखविण्यापासून तो स्वतःला तोडून टाकितो. तो सेवाकृत याजक म्हणून देव त्याचा स्वीकार करीत नाही. कयफाने या बाबतीत दाखविलेली कृती मानवी मनोवृत्ती व मानवी अपूर्णता दर्शविते. DAMar 614.4

परंपरागत मानवाचा आचार आचरण्यासाठी कयफाने वस्त्रे फाडून देवाचा नियम निरर्थक ठरविला. दुर्भाषणाच्या संदर्भात पापामुळे भेदरून जाऊन याजकाने आपली वस्त्रे फाडली तर तो निर्दोष राह शकतो असे मनुष्याने केलेल्या नियमात म्हटले होते. अशा प्रकारे माणसाच्या नियमाने देवाचे नियम निरर्थक ठरविले होते. DAMar 615.1

प्रमुख याजकाची प्रत्येक कृती लोकांनी अगदी सावधगिरीने पाहिली; आणि कयफाला आपले पावित्र्य दाखवायचे होते. परंतु ह्या कृतीत ख्रिस्तावर दोषारोप करण्याची त्याची धारणा होती. “त्याच्याठायी माझे नाम आहे.’ निर्गम २३:२१. असे उद्गार देवाने ज्याच्याविषयी काढिले त्याच्याविरुद्ध कडक अपशब्द काढून त्याची तो निंदा करीत होता. तो स्वतःच देवाविरुद्ध दुर्भाषण करीत होता. देवाच्या दोषारोपाखाली स्वतः येऊन त्याने ख्रिस्ताला दुर्भाषण करणारा असे घोषीत केले. DAMar 615.2

कयफाची वस्त्रे फाडण्याची कृती अर्थपूर्ण होती. यहूदी राष्ट्राने राष्ट्र या नात्याने देवाविषयी त्यांनी यापुढे घेतलेली भूमिका विदित करण्यात आली होती. एके काळी असलेले देवाचे प्रिय लोक देवापासून विभक्त होत होते, आणि योहानाने त्यांना सोडून दिले होते. वधस्तंभावर ख्रिस्ताने ओरडून “पूर्ण झाले आहे” (योहान १९:३०) असे म्हटले आणि मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला तेव्हा पवित्र जागल्याने घोषीत केले होते की यहूदी लोकांनी त्याचा त्याग केला होता. तो त्यांच्या विधीचे दर्शक व छायेचा सार होता. इस्राएल देवापासून विभक्त झाले होते. आता कयफा आपली वस्त्रे फाडू शकत होता कारण आता त्याच्या किंवा लोकांच्या संबंधात अर्थ राहिला नव्हता. DAMar 615.3

धर्मसभेने ख्रिस्ताला मरणदंडाची शिक्षा ठोठावली होती; परंतु यहूदी कायद्याप्रमाणे रात्रीच्या वेळी चौकशी करणे चुकीचे होते. कायद्याने सर्व गोष्टी उजेड असतांना व धर्मसभेच्या पूर्ण बैठकीत घेतलेला निर्णय कायदेशीर होता. ह्याची दिक्कत न करता उद्धारकाला आता शिक्षापात्र गुन्हेगार म्हणून वागवले जात होते, आणि अधम नीच लोक त्याला अपशब्ध वापरत होते. मुख्य याजकाच्या वाड्यासभोवती लोकांचा जमाव व शिपाई गोळा झाले होते. ह्या कोर्टातून येशूला पहारेकऱ्यांच्या खोलीकडे नेले आणि दोन्ही बाजूला असलेले लोक तो देवपुत्र असल्याचे म्हटल्याबद्दल त्याची निंदा व कुचेष्टा करीत होते. त्याने काढिलेले उद्गार “परात्पराच्या उजव्या बाजूस बसणे” आणि “आकाशातील ढगावर बसून येणे” यांचा पुनरुच्चार करून त्याची टवाळी करीत होते. चौकशीसाठी पहारेकऱ्यांच्या खोलीत असतांना त्याला संरक्षण देण्यात आले नव्हते. अडाणी बाजारबुणग्यांच्या घोळक्याने धर्मसभेपुढे त्याला दिलेली क्रूर व अनुचित वागणूक पाहिलेली होती त्यामुळे त्यांनीही त्याच्यावर त्यांच्या स्वभावातील सैतानी हल्ले चढविले. ख्रिस्ताची देवासारखी वर्तणूक व उमदा स्वभाव पाहून ते त्रस्त होऊन संतापले होते. त्याची सौम्यता, त्याची सात्त्विकता व त्याचा उदात सोशीकपणा पाहून ते सैतानी द्वेषाने तडफडत होते. त्यांनी दया व न्याय पायाखाली चिरडून टाकला होता. देवपुत्रासारखी नामुसकीची वागणूक आतापर्यंत कसल्याही गुन्हेगाराला दिली नव्हती. DAMar 615.4

तीव्र दुःख यातनेने ख्रिस्ताचे अंतःकरण भग्न पावले होते. कयफापुढे त्याची कसून चौकशी होत असतांना, त्याची निंदा कुचेष्टा चालली असतांना स्वतःच्या शिष्यांपैकी एकाने त्याचा नाकार केला होता. DAMar 616.1

आपल्या प्रभूला बागेत सोडून पळून गेल्यानंतर त्याचे दोन शिष्य दुरून येशूला धरून चाललेल्या टोळीमागून जाण्याचे धाडस करीत होते. हे शिष्य पेत्र व योहान होते. योहान याजकांच्या चांगला परिचयाचा होता म्हणून त्यांनी त्याला प्रमुख याजकाच्या वाड्यात प्रवेश दिला. हेतू हा होता की, ख्रिस्ताला दिलेली अपमानास्पद वागणूक पाहून तो देवपुत्र आहे ही विचारसरणी तुच्छ मानील. योहानाने पेत्राच्या वतीने बोलल्यावर त्यालाही प्रवेश मिळाला. DAMar 616.2

अंगणात शेकोटी पेटविली होती कारण त्यावेळी रात्री फार गारठा होता. लोक शेकोटीसभोवती शेकत होते आणि पेत्रही त्यांच्यात सामील झाला. तो येशूचा शिष्य आहे असे कोणाच्या लक्षात येऊ नये अशी त्याची अपेक्षा होती. घोळक्यात निष्काळजीपणे सामील झाल्यावर ज्यांनी येशूला वाड्यात आणिले त्यांच्यातलाच हा एक आहे असे समजावे अशी त्याची इच्छा होती. DAMar 616.3

पेत्राच्या चेहऱ्यावर जसा प्रकाश पडला तसे त्या द्वारपालिकेने त्याला निरखून पाहिले. तो योहानाबरोबर आत आला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर खिन्नतेची छटा तिने पाहिली आणि तो येशूचा शिष्य असावा असे तिला वाटले. ती कयफाच्या वाड्यातील एक नोकर होती आणि त्याच्याविषयीच्या माहितीसाठी ती उत्सुक होती. ती पेत्राला म्हणाली, “तूंही ह्या माणसाच्या शिष्यापैकी आहेस काय?’ पेत्र चकित होऊन गोंधळून गेला होता; जमावाचे लक्ष त्याच्यावर खिळिले गेले. ती काय बोलते ते समजत नाही असे त्याने दाखविले; परंतु तिने हेका धरून सभोवती असलेल्यांना म्हटले हाही येशूबरोबर होता. त्यावर पेत्राने क्रोधाविष्ट होऊन म्हटले, “त्याला मी ओळखीत नाही.” हा पहिलाच नकार होता आणि लागलेच कोंबडा आरवला. अरे पेत्रा, इतक्या लवकर तुला प्रभूची लाज वाटू लागली! इतक्या लवकर तू तुझ्या प्रभूचा नकार करीत आहेस! DAMar 616.4

न्यायालयात प्रवेश केल्यावर येशूचा तो अनुयायी असल्याचे योहानाने लपवून ठेविले नव्हते. प्रभूची थट्टा मष्करी करणाऱ्या अडदांड लोकांमध्ये तो सामील झाला नव्हता. त्याला प्रश्न विचारण्यात आला नव्हता कारण खोटा स्वभाव त्याने धारण केला नव्हता म्हणून त्याच्याविषयी संशय नव्हता. येशूच्या जितके नजीक राहाता येईल तितके राहाण्याचा प्रयत्न त्याने केला आणि एक मोकळ्या सुरक्षित कोपऱ्यात थांबला. येथून त्याच्या प्रभूची चाललेली चौकशी दिसत होती व सर्व काही ऐकूही येत होते. DAMar 616.5

त्याचा खरा स्वभाव समजावा याविषयी पेत्राने काही मनात आणिले नव्हते किंवा काही योजना आखल्या नव्हत्या. उदासीन वृत्तीमुळे तो सैतानाच्या मार्गात गेला आणि मोहपाशात अडकला. गुरूजीसाठी सामना करण्यास त्याला बोलाविले असते तर तो एक धैर्यवान सैनिक झाला असता; परंतु जेव्हा तिरस्काराचे बोट त्याच्याकडे दाखविले गेले तेव्हा तो भेकड बनला. प्रभूसाठी प्रत्यक्ष लढा देण्यास मागे न सरणारे पुष्कळजण उपहास होऊन टर उडल्याने ते आपल्या विश्वासाचा नाकार करण्यास तयार होतात. सहवास टाळणाऱ्या बरोबर संबंध ठेवल्याने ते मोहाच्या जाळ्याशी खेळत बसतात. त्यांना मोहात पाडण्यासाठी ते शत्रूला आमंत्रण करतात व जे करायला किंवा बोलायला नको ते त्यांच्या हातून घडते व ते दोषी होतात. इतर वेळी त्याच्या हातून तसे केव्हाही झाले नसते. सद्याच्या संकटाच्या व उपहासाच्या काळात आपल्या विश्वासाला छपवून टाकणारे ख्रिस्ताचे शिष्य पेत्राने प्रभूला न्यायालयात नाकारले तसे ते नाकारतात. DAMar 617.1

प्रभूची होत असलेल्या चौकशीत पेत्राने गोडी दाखविली नाही परंतु त्याची होत असलेली थट्टा मष्करी व निष्ठूर टोमणे हे पाहून त्याचे अंतःकरून पिळून जात होते. ह्यापेक्षा दुसरे म्हणजे स्वतःची व त्याच्या अनुयायांची मानखंडना व अपमानाची वागणूक करून घ्यायचे हे पाहून त्याला फार आश्चर्य वाटले व संतापही झाला. त्याची ही खरी भावना लपवण्यासाठी तो येशूचा छळ करणाऱ्यांच्यामध्ये सामील होण्याचा तो प्रयत्न करीत होता. परंतु हे त्याचे करणे अस्वाभाविक होते. त्याची वागणूक लबाडीची होती. बोलत असताना ख्रिस्ताची होत असलेली मानहानी पाहून आपला राग तो दाबून ठेऊ शकत नव्हता. DAMar 617.2

दुसऱ्या वेळेस पुन्हा त्याचे लक्ष वेधण्यात आले होते आणि तो येशूचा अनुयायी होता असा आरोप केला. ह्यावेळेस त्याने शपथ घेऊन म्हटले, “त्या माणसाला मी ओळखत नाही.” पुन्हा एक संधि त्याला दिली होती. एक तासानंतर मुख्य याजकाचा एक नोकर ज्याचा कान पेत्राने छाटला होता त्याचा तो जवळचा नातेवाईक होता तो म्हणाला, “त्याच्याबरोबर तुला मी बागेत पाहिले नव्हते काय? खरोखर, तूही त्यातला आहेस कारण तुझ्या बोलीवरून ते कोण आहेस हे दिसून येते. तू गालीली आहेस.’ हे ऐकून पेत्राचा क्रोध भडकला. येशूचे शिष्य त्यांच्या शुद्ध, पवित्र भाषेविषयी प्रख्यात होते. प्रश्न करणाऱ्याला फसविण्यासाठी आणि आपला स्वभाव सिद्ध करण्यासाठी शापोच्चारण करून व शपथा वाहून त्याने आपल्या प्रभूला नाकारिले. पुन्हा कोंबडा आरवला. पेत्राने ते ऐकिले व त्याला येशूच्या बोलाचे स्मरण झाले, “कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” मार्क १४:३०. DAMar 617.3

खालच्या पायरीवर आणलेली शपथ पेत्राच्या ओठावर अजून ताजी होती आणि कोंबड्याचा कर्कश आवाज त्याच्या कानात घुमत होता अशा वेळी कपाळाला आठ्या घातलेल्या न्यायधिशापासून वळून शिष्यावर उद्धारकाने आपली नजर केंद्रित केली. त्याच वेळी पेत्राची नजर प्रभूच्या नजरेशी भिडली. त्या कोमल व शांत चेहऱ्यावर त्याने गाढ दया व दुःख पाहिले परंतु तेथे रागाचा मागमूस नव्हता. DAMar 618.1

तो फिका दुःखी चेहरा, थरथर कापणारे ओठ, दयेची व पापक्षमेची मुद्रा ह्या दृष्याने त्याचे अंतःकरण बाणाप्रमाणे भेदले गेले. विवेक जागृत झाला होता. स्मरणशक्ती कार्यक्षम झाली. काही तासापूर्वी प्रभूबरोबर तो तुरुंगात जाईल किंवा त्याच्यासाठी मरावयास तयार होईल असे दिलेल्या आश्वसनाची पेत्राला आठवण झाली. त्याच रात्री तो प्रभूला तीनदा नाकारील असे उद्धारकाने माडीवरच्या खोलीत त्याला सांगितल्यावर त्याला झालेल्या वेदनाचे स्मरण झाले. येशू मला माहीत नाही असे पेत्राने थोड्याच वेळापूर्वी म्हटले होते, परंतु त्याला समजून आले की प्रभु त्याला किती चांगला ओळखत होता आणि अगदी अचूक त्याने त्याचे हृदय जाणले होते. त्याचा खोटेपणा त्याला स्वतःलाही माहीत नव्हता. DAMar 618.2

स्मरणशक्तीची लाट त्याच्यावर आली होती. उद्धारकाची कोमल ममता, त्याचा चांगुलपणा आणि सहिष्णुता, चुका करणाऱ्या शिष्याविषयी त्याची कुलीनता व सहनशीलता या सर्वांचे त्याला स्मरण झाले. त्याला दिलेल्या धोक्याची त्याला आठवण झाली, “शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली; परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी प्रार्थना केली आहे.लूक २२:३१, ३२. त्याचा स्वतःचा कृतघ्नपणा, खोटेपणा व खोटी शपथ यांच्या प्रतिक्षेपाने तो हालदिल झाला. पुन्हा एकदा त्याने प्रभूवर नजर टाकली आणि त्याच्या मुखात चपडाक मारण्यासाठी भ्रष्टतेचा हात वर उगारला. तो देखावा सहन न होऊन भग्न अंतःकरणाने तो वाड्यातून झपाट्याने बाहेर पडला. DAMar 618.3

तो त्या अंधारात निर्जनस्थानी कुठे जातो ह्याची पर्वा न करता निघून गेला. शेवटी गेथशेमाने बागेत आल्याचे त्याला समजून आले. थोड्या तासापूर्वीचे चित्र हुबेहूब त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. त्याच्या प्रभूचा दुःखी चेहरा रक्ताळलेल्या घामाने भरलेला आणि यातनेने आचके देणारा त्याच्यासमोर आला. अति दुःखाने ग्रस्त होऊन येशूने अश्रु ढाळीत एकट्यानेच ती वेळ काढली आणि त्या समयी त्याच्या त्या कसोटीच्या प्रसगांत सामील होणारे गाढ निद्रा घेत होते ह्याचे स्मरण त्याला झाले. “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा.’ मत्तय २६:४१. हा त्याने दिलेला आदेश ह्याची आठवण त्याला झाली. न्यायालयातील दृश्य त्याने पुन्हा पाहिले. त्याने उद्धारकाच्या दुःखात आणि त्याच्या पाणउताऱ्यात अधिकभर टाकली ह्याच्या ज्ञानाने रक्तबंबाळ झालेल्या त्याच्या अंतःकरणाला तीव्र यातना होत होत्या. ज्या स्थळी भूमीवर पडून पित्याजवळ येशूने आपले अंतःकरण मोकळे केले होते त्याच स्थळी पेत्राने पालथा तोंडावर पडून मरण्याची अपेक्षा केली. DAMar 618.4

येशूने जागृत राहून प्रार्थना करा म्हणून सांगितले त्या समयी पेत्र निद्रा घेत होता. त्या निद्रेद्वारे ह्या भारी पापाची त्याने तयारी केली होती. त्या आणीबाणीच्या प्रसंगी सर्व शिष्यांचे झोपण्याद्वारे मोठे नुकसान झाले. त्यांची सत्त्वपरीक्षा होणार होती हे ख्रिस्ताला माहीत होते. सैतान त्यांची ज्ञानेंद्रिय व संवेदना बधीर करून टाकील आणि ते ह्या कसोटीला तोंड देण्यास तयार राहाणार नाहीत हेही त्याला माहीत होते. त्यासाठीच त्यांना त्याने इशारा दिला होता. बागेमध्ये त्या घटकेला जागृत राहून प्रार्थनेमध्ये वेळ घालविला असता तर पेत्र स्वतःच्या दुर्बल शक्तीवर अवलंबून राहिला नसता; आपल्या प्रभूला त्याने नाकारले नसते. ख्रिस्ताबरोबर अति दुःखाच्यावेळी शिष्य जागृत राहिले असते तर त्याच्या वधस्तंभावरील यातना पाहण्यास त्यांच्या मनाची तयारी झाली असती. त्याच्या अपरिमित दुःखाचे स्वरूप काही अंशी त्यांना समजले असते. भाकीत केलेले त्याचे दुःख, त्याचे मरण आणि त्याचे पुनरुत्थान यांच्याविषयीच्या उद्गाराची त्यांना आठवण झाली असती. ह्या कठीण प्रसंगाच्या नैराश्यामध्ये आशेचे काही किरण चमकून अंधकार नाहीसा झाला असता व त्यांचा विश्वास ढळला नसता. DAMar 619.1

दिवस उगवल्यावर धर्मसभा पुन्हा सुरू झाली आणि ख्रिस्ताला तेथे आणण्यात आले. त्याने स्वतःला देवपुत्र म्हटले होते आणि त्याच्याविरुद्ध त्यांनी त्या शब्दांचा अर्थ लावला. परंतु त्यामुळे ते त्याला दोषी ठरवू शकले नव्हते कारण रात्रीच्या सभेच्या वेळी पुष्कळजण गैरहजर होते आणि त्यांनी ते शब्द प्रत्यक्ष ऐकले नव्हते ते त्यांना माहीत होते. परंतु त्याच्या मुखातून पुन्हा निघालेले शब्द त्यांच्या कानावर पडले तर त्यांचा उद्देश साध्य होऊ शकला असता. तो मशीहा आहे त्याचे हे उद्गार राजद्रोहाचे आहेत असा ते अर्थ लावू शकतील. DAMar 619.2

त्यांनी म्हटले, “तू ख्रिस्त आहेस काय?” परंतु ख्रिस्त शांत राहिला. त्याच्यावर एकामागून एक असा प्रश्नांचा भडीमार केला. शेवटी करुणामय आवाजात त्याने म्हटले, “मी तुम्हास सांगितले तरी मुळीच विश्वास धरणार नाही; आणि मी विचारिले तरी तुम्ही उत्तरच देणार नाही आणि मला जाऊ देणार नाही.’ परंतु त्यांना काही निमित्त आढळू नये म्हणून त्याने गंभीर इशारा दिला, “तथापि ह्यापुढे मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसेल.” DAMar 619.3

त्यानंतर त्यांनी सर्वांनी मिळून एका आवाजात विचारिले, “तू देवाचा पुत्र आहेस काय?” तो म्हणाला, “तुम्ही म्हणता की मी आहे.” त्यावर ते ओरडले, “आपल्याला साक्षीची आणखी काय गरज आहे? आपण स्वतः ह्याच्या तोंडचे ऐकले आहे.” DAMar 619.4

यहूदी अधिकाऱ्यांच्या तिसऱ्या दोषामुळे येशूला मरावे लागणार होते. रोमी अधिकाऱ्यांनी ह्या दोषाला मान्यता देऊन त्याला आमच्या स्वाधीन करावे एवढेच काय ते राहिले होते. DAMar 620.1

त्यानंतर थट्टा मष्करीचा तिसरा देखावा आला. अडाणी बाजारबुणग्यांच्यापेक्षा हा अधिक वाईट होता. याजक व अधिकारी यांच्यासमोर त्यांच्या संमतीने तो झाला. त्यामध्ये सहानुभूतीचा किंवा माणूसकीचा तीळमात्र गंध नव्हता. त्याचा आवाज बंद करण्यास त्यांची वादविवाद करण्याची पद्धत कमी ठरली तर त्यांच्याजवळ दुसरी शस्त्रे होती. सर्व युगात पाखंडी मतवाल्यांचा आवाज शांत करण्यास वापरात आणलेली शस्त्रे-छळ, दांडगाई, जबरदस्ती आणि मृत्यू ही होती. DAMar 620.2

न्यायाधिशांनी येशू दोषी असल्याचे घोषीत केल्यावर लोकांना सैतानी त्वेषाने पछाडले. लोकांचा आरडाओरडा जंगली पशूप्रमाणे होता. घोळका येशूकडे धावला आणि तो दोषी आहे त्याचा वध करा असे ओरडू लागला. रोमी शिपाई नसते तर वधस्तंभावर खिळण्यासाठी येशू जीवंत राहिला नसता. रोमन अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून जमावाची दांडगाई बळाने आवरली नसती तर त्याच्या न्यायाधिशाच्यासमोर त्याचे तुकडे तकडे झाले असते. DAMar 620.3

याजक व अधिकारी यांना त्यांच्या पदाच्या मोठेपणाचा विसर पडला व त्यांनी देवपुत्राची अपशब्द वापरून मानहानी केली. त्याच्या आईबापाच्या नावाने त्याची निंदा कुचेष्टा केली. स्वतः मशीहा असल्याचे घोषीत केल्यामुळे तो कठोर लज्जास्पद वागणुकीस पात्र आहे असे त्यांनी म्हटले. उद्धारकाला शिवीगाळ करण्यास अति कनिष्ठ दुराचारी माणसांचा उपयोग त्यांनी केला. त्याच्या डोक्यावर जूने लकतर टाकिले आणि त्याचा छळ करणाऱ्यांनी याला चपडाका मारल्या आणि म्हटले, “अरे ख्रिस्ता, आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारिले?” त्याच्या तोंडावरील कापड काढिल्यावर एक मूर्ख त्याच्या तोंडावर थुकला. DAMar 620.4

त्यांच्या प्रिय सेनापतीविरुद्ध काढलेला प्रत्येक शब्द, केलेली प्रत्येक कृती आणि निंदात्मक हेटाळणी यांची नोंदणी देवाच्या दूतांनी काटेकोरपणे करून टाकली. ज्या नीच लोकांनी ख्रिस्ताच्या शांत, निस्तेज मुखावर थुकून त्याची टर्र उडविली त्यांना ते एके दिवशी गौरवी व सूर्यापेक्षा प्रकाशीत दिसेल. DAMar 620.5