Go to full page →

अध्याय ७८—कॅलव्हरी DAMar 645

मत्तय २७:३१-५३; मार्क १५:२०-३८; लूक २३:२६-४६; योहान १९:१६-३०.

“कॅलव्हरी (गुलगुथा) म्हटलेल्या ठिकाणी ते पोहंचल्यावर तेथे त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळिले.” DAMar 645.1

“ह्यास्तव येशूने स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले.” इब्री १३:१२. देवाच्या नियमभंगासाठी आदाम व हवा यांना बागेतून हाकलून दिले होते. यरुशलेमाच्या सीमेबाहेर ख्रिस्ताला दुःख सोसायचे होते. लुटारू व अट्टल गुन्हेगारांना जेथे मरणदंडाची शिक्षा देण्यात आली तेथे वेशीबाहेर ख्रिस्त मरण पावला. पुढील वचन अर्थपूर्ण आहे, “आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले.” गलती. ३:१३. DAMar 645.2

न्यायालयापासून ते कॅलव्हरीपर्यंत मोठा समुदाय येशूच्या मागे गेला. मरणदंडाच्या शिक्षेची बातमी सर्व यरुशलेम नगरात पसरली आणि सर्व थरातले व सर्व वर्णाचे लोक वधस्तंभाच्या ठिकाणी जमा झाले. ख्रिस्ताला त्याच्या स्वाधीन केल्यावर ख्रिस्ताच्या अनुयायांना उपद्रव न देण्याचे आश्वासन याजक व अधिकारी यानी दिले होते. शिष्य आणि नगरातले व आसपासच्या भागातील श्रद्धावंत मुक्तीदात्याच्या मागे जाणाऱ्या घोळक्यात सामील झाले. DAMar 645.3

पिलाताच्या कोर्टाच्या दरवाज्यातून येशू बाहेर पडल्यावर बरब्बासाठी तयार करून ठेवलेला वधस्तंभ त्याच्या चेचलेल्या व रक्तबंबाळ झालेल्या खाद्यावर ठेवण्यात आला होता. बरब्बाचे दोन सोबती येशूबरोबर मरणदंडाची शिक्षा भोगणार होते त्यांच्यावरही वधस्तंभ ठेवण्यात आले होते. दुःखात व अशक्तपणात हे जड ओझे वाहाणे उद्धारकाला भारी कठीण होते. शिष्याबरोबर साजरा केलेल्या वल्हांडण सणापासून त्याच्या मुखात अन्नाचा कण किंवा पाण्याचा घोट गेला नव्हता. सैतानाच्या हस्तकाबरोबर बागेतील झगड्यात त्याला अति वेदना झाल्या होत्या. विश्वासघातक्यामुळे झालेले अपरिमित दुःख त्याने सहन केले होते. त्याचे शिष्य त्याला सोडून गेलेले त्याने पाहिले होते. त्याला हन्नाकडे नंतर कयफाकडे आणि पिलाताकडे नेण्यात आले होते. पिलातानंतर हेरोदाकडे नंतर पुन्हा पिलाताकडे त्याला पाठविण्यात आले होते. नालस्तीमागून नालस्ती आणि थट्टा, मस्करी उपहास चालूच होता. दोनदा चाबकाने फटके लगावले होते. रात्रभर विविध दृश्याने त्याचा जीव हैराण करून टाकिला होता. ख्रिस्त ह्यामध्ये उणे पडला नव्हता. त्याने चक्कार शब्द काढिला नव्हता त्यामध्ये देवाचे गौरव करण्याचा त्याचा कल होता. चौकशी करण्याच्या बतावनीमध्ये त्याने स्वतःला खंबीर आणि माननीय राखिले होते. दुसऱ्यांदा फटके मारल्यानंतर त्याच्यावर वधस्तंभ लादला परंतु शक्तीहीन मानवी शरीर ते वाहू शकत नव्हते. भारी ओझ्याखाली मुर्छा येऊन तो खाली पडला. DAMar 645.4

उद्धारकाच्या मागून जाणाऱ्या समुदायाने त्याचे मंद व झोकांड्या खात पडत असलेले पाऊल पाहिले परंतु त्याच्यावर कोणी दया दाखविली नव्हती. तो जड वधस्तंभ वाहू शकत नव्हता म्हणून त्याची टिंगल व मस्करी ते करीत होते. पुन्हा ते ओझे त्याच्यावर लादले आणि पुन्हा तो मुर्छित होऊन खाली जमिनीवर पडला. तो हे ओझे पुढे घेऊन जाऊ शकणार नाही हे त्याच्या मारेकऱ्यांनी पाहिले. अपमानाचे ओझे वाहून नेण्यास ते माणसाचा शोध करू लागले. यहूदी स्वतः ते करू शकत नव्हते कारण त्याद्वारे ते विटाळून त्याना वल्हांडण सणात भाग घेता येणार नव्हता. त्याच्या मागून जाणाऱ्या जमावात हा वधस्तंभ वाहाण्यास कोणीही तयार नव्हते. DAMar 646.1

ह्या वेळेस शिमोन नावाचा कोणी अनोळखी माणूस कुरेनेकर गावावरून येताना त्यास आढळला. त्याने त्यांची अभद्र व टवाळकीची भाषा ऐकिली. यहूद्यांच्या राजासाठी मार्ग मोकळा करा! असे निंदात्मक उद्गार ते काढीत होते. ते दृश्य पाहून तो आश्चर्यचकित झाला व तेथे थांबला. त्याला आलेली दया पाहून त्यांनी त्याला वधस्तंभ वाहाण्याकरिता वेठीस धरिले. DAMar 646.2

शिमोनाने येशूविषयी ऐकिले होते. उद्धारकावर त्याच्या पुत्रांचा विश्वास होता परंतु तो स्वतः येशूचा शिष्य नव्हता. कॅलव्हरीपर्यंत वधस्तंभ वाहाणे शिमोनाला कृपाप्रसाद वाटला आणि ह्या ईश्वरी कृपेबद्दल तो त्यानंतर सतत कृतज्ञ राहिला. स्वतःच्या निवडीने ख्रिस्ताचा वधस्तंभ वाहाण्याची त्याला संधि लाभली आणि त्याच्या ओझ्याखाली तो नेहमी आनंदी व समाधानी राहिला. DAMar 646.3

समुदायामध्ये पुष्कळ स्त्रिया होत्या. त्यांचे लक्ष ख्रिस्तावर केंद्रित झाले होते. त्यातील काहीनी त्याला पूर्वी पाहिले होते. काहीनी त्याच्याकडे आजारी व दुःखी कष्टी नेले होते. त्यातील काही स्वतःच आजारातून बऱ्या झाल्या होत्या. तेथील दृश्यांची गोष्ट त्यांना सांगण्यात आली. त्याच्याविरुद्ध असलेला लोकांचा द्वेष पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांची अंतःकरणे त्याच्यासाठी कनवाळू होऊन द्रवून गेली होती आणि भग्न होण्याच्या मार्गात होती. बेभान झालेल्या समुदायाची कृती आणि याजक व अधिकारी यांचे क्रोधाविष्ट बोलणे पाहून ह्या महिलांनी आपली सहानुभूती प्रकट केली. वधस्तंभाच्या ओझ्याखाली मुर्छित होऊन ख्रिस्त खाली जमिनीवर पडला तेव्हा त्या हंबरडा फोडून रडू लागल्या. DAMar 646.4

केवळ ह्याच दुश्याकडे येशूचे लक्ष वेधले गेले. जगाचे पाप वाहून नेत असताना ज्या वेदना होत होत्या तरीपण दुःख प्रदर्शित करण्याकडे त्याने बेपर्वाई वृत्ती दाखविली नव्हती. त्याने त्या महिलाकडे हळूवार दयेने पाहिले. त्याच्यावर त्यांची श्रद्धा नव्हती. देवापासून पाठविलेला तो होता म्हणून त्या विलाप करीत नव्हत्या हे त्याला माहीत होते. मानवी दयेने त्यांची अंतःकरणे हेलावली होती. त्यांच्या सहानुभूतीचा त्याने धिक्कार केला नाही परंतु त्यांच्यासाठी त्याच्या अंतःकरणात अति सहानुभूती जागृत झाली. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो यरुशलेमेच्या कन्यानो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळासाठी रडा.” यरुशलेमाचा नाश ह्या घटनेकडे त्याचे लक्ष यावेळेस लागले होते. त्या प्रसंगी आता त्याच्यासाठी ज्या विलाप करीत होत्या त्या मुलाबाळासहित नाश पावणार होत्या. DAMar 647.1

यरुशलेमच्या अंधःपातावरून येशूचे विचार मोठ्या न्यायाच्या दिवसाकडे वळले. पश्चात्ताप न पावलेल्या नगराच्या नाशामध्ये त्या जगावर येणाऱ्या अखेरच्या नाशाची त्याने खूण पाहिली. त्याने म्हटले, “त्या समयी ते पर्वतास म्हणतील आम्हावर पडा, टेकड्यास म्हणतील आम्हास झाका. ओल्या झाडाला असे करितात तर वाळल्याचे काय होईल?’ ओले झाड म्हणजे निष्कलंक उद्धारक, येशू ख्रिस्त. अधर्माविरुद्ध असलेला देवाचा क्रोध स्वतःच्या पुत्रावर येऊ दिला. लोकांच्या पापासाठी येशूला वधस्तंभावर खिळण्यात येणार होते. पाप करीतच राहाणाऱ्याला किती व्यथा भोगाव्या लागणार! निगरगट्ट व अश्रद्धावंत या सर्वांना वर्णन करता येणार नाही इतके दुःख सहन करावे लागणार. DAMar 647.2

येशू उद्धारकाच्या मागून कॅलव्हरीकडे जाणाऱ्या समुदायातील पुष्कळ जणांनी, झावळ्याच्या फाद्या घेऊन यरुशलेम नगरामध्ये तो विजयश्रीने गर्जना करीत जाणाऱ्यामध्ये भाग घेतला होता. त्यावेळेस स्तुतीच्या गर्जना करणे सोयीचे होते म्हणून त्यात भाग घेणारे आता “त्याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा’ असा आक्रोश करीत होते. ख्रिस्त यरुशलेममध्ये खेचरावर बसून गेला तेव्हा शिष्यांच्या आशा उंचावल्या होत्या. ते प्रभूला चिकटून राहाण्याचा प्रयत्न करीत होते कारण त्याच्या संबंधात राहाणे फार मानाचे होते. आता त्याला अपमानकारण वागणूक मिळत होती म्हणून ते दूर दूर राहात होते. त्यांची मने कष्टी झाली होती आणि त्यांच्या आशा मालवलेल्या होत्या. येशूच्या बोलाची सत्यता कशी पटेल: “तुम्ही सर्व ह्याच रात्री माझ्याविषयी अडखळाल. कारण अशा शास्त्रलेख आहे की, मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल.” मत्तय २६:३१. DAMar 647.3

वधस्तंभावर देण्याच्या ठिकाणी पोहंचल्यावर बंदिवानाला वेदना देण्याच्या हत्याराला जखडण्यात येत होते. वधस्तंभावर लटकवित असताना दोन लुटारू धडपडत होते; परंतु येशूने कसलाच विरोध केला नव्हता. येशूची आई जीवलग शिष्य योहान याच्याबरोबर कॅलव्हरीपर्यंत मुलाच्या मागे गेली होती. वधस्तंभाच्या ओझ्याखाली तो मुर्छित पडलेला तिने पाहिला होता. जखमा झालेल्या डोक्याखाली हाताचा आधार द्यावे आणि एकदा छातीवर टेकलेले ते कपाळ पुसून टाकावे असे तिला वाटले परंतु दुःखाची ही संधि तिला लाभणार नव्हती. शिष्यांच्या प्रमाणेच तिलाही वाटले होते की येशू स्वतःचे सामर्थ्य प्रगट करून शत्रूच्या हातून आपली सुटका करून घेईल. ज्या घटना घडत होत्या त्या दृश्यांचे त्याने अगोदरच भाकीत केले होते त्याची आठवण झाल्याने ती खचून जात होती. लुटारूंना बांधिलेले पाहून तिला फार दुःख झाले. ज्याने आपला जीव मृतांच्यासाठी दिला त्यालाही तसेच वधस्तंभावर खिळतील काय? अशा प्रकारे देवपुत्राचा निष्ठुरतेने वध करतील काय? येशू हा मशीहा होता हा विश्वास तिने सोडून द्यावा काय? त्याच्या दुःखात त्याची कसलीच सेवा न करता त्याची आपत्ती आणि लज्जास्पद वागणूक निमुटपणे पाहावी काय? वधस्तंभावर त्याचे पसरलेले हात तिने पाहिले; खिळे आणि हातोडा आणिलेला होता, त्याच्या मृदु मांसात खिळे ढोकताना पाहून दुःखात चूर झालेल्या शिष्यांनी त्या क्रूर दृश्यापासून मूर्च्छित झालेल्या येशूच्या आईला दूर नेले. DAMar 647.4

मुक्तीदात्याने काहीच कुरकूर केली नाही किंवा काही गा-हाणेही केले नाही. त्याचा चेहरा शांत व प्रसन्न होता परंतु कपाळावर घामाचे मोठे थेंब दिसत होते. त्याच्या मुद्रेवरील मृत्यु दंव पुसण्यास तेथे कनवाळू हात नव्हते. तसेच सहानुभूतीचे आणि अचल एकनिष्ठतेचे दोन शब्द काढून त्याच्या मानवी अंतःकरणाचे समाधान करण्यास कोणी नव्हते. शिपाई आपले भयंकर कार्य करीत असताना यशूने आपल्या शत्रूसाठी प्रार्थना केली, “हे पित्या, त्यांची क्षमा कर; कारण ते काय करीत आहेत ते त्यांना समजत नाही.” स्वतःच्या यातना विसरून जाऊन त्याचे लक्ष त्याच्या मारेकऱ्याच्या पापाकडे आणि त्यांच्या अपराधाबद्दल होणाऱ्या शिक्षेकडे गेले. त्याला उद्धटपणे हातळणाऱ्या शिपायावर काही शाप उच्चारिला नव्हता. कार्यसिद्धी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करणारे याजक व अधिकारी यांच्यावर सूडाची मागणी केली नाही. त्यांच्या अज्ञानपणाबद्दल व अपराधाबद्दल ख्रिस्ताने त्यांना दया दाखविली. त्यांची केवळ क्षमा होण्यासाठी त्याने प्रार्थना केली, “कारण ते काय करीत आहेत ते त्यांना समजत नाही.” DAMar 648.1

पापी मानवजातीला अनंतकालिक नाशापासून बचाव करण्यासाठी आलेल्याचे हे हालहाल करीत आहेत हे त्यांना समजले असते तर भीतीने त्यांच्या मनाला चूरचूर लागली असती. परंतु त्यांच्या अज्ञानपणामुळे त्यांचा अपराध दूर केला नसता कारण स्वतःचा मुक्तीदाता म्हणून ज्ञान करून त्याचा स्वीकार करण्याची जबाबदारी त्यांची होती. अद्याप काहीजण स्वतःचे पाप पदरी घेऊन, पश्चात्तापदग्ध होऊन मनाचे परिवर्तन करून घेऊ शकत होते. काहींच्या निगरगट्ट मनामुळे त्यांच्यासाठी ख्रिस्ताच्या प्रार्थनेचे उत्तर मिळू शकले नाही. देवाचा उद्देश मात्र साध्य होत होता. पित्याच्यासमोर मानवासाठी मध्यस्थी करण्याचा हक्क ख्रिस्ताला मिळत होता. DAMar 648.2

शत्रूसाठी केलेल्या ख्रिस्ताच्या प्रार्थनेने जगाला घट्ट मिठी मारिली होती. प्रारंभापासून ते शेवटपर्यंत जगाच्या पाठीवर जन्मास आलेल्या प्रत्येक पाप्याचा त्यामध्ये समावेश होता. देवपुत्राला वधस्तंभावर खिळल्याचा अपराध सर्वांच्या माथी स्थिरावतो. सर्वांना पापक्षमा प्रदान करण्यात आली. “ज्यांची इच्छा आहे” त्यांना देवाबरोबर शांती लाभेल आणि त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल. DAMar 649.1

येशूला वधस्तंभावर खिळल्यावर, दणकट माणसांनी तो उचलला आणि अति जोराने, तयार केलेल्या ठिकाणी तो आदळला. त्यामुळे देवपुत्राला प्राणांतिक वेदना झाल्या. त्यानंतर पिलाताने इब्री, रोमी आणि हेल्लेणी भाषेत लेख लिहिला आणि येशूच्या डोक्याच्यावर वधस्तंभावर लाविला. तो असा होताः “हा यहूद्यांचा राजा नासोरी येशू.’ ह्या लेखाने यहूद्यांचा संताप भडकला. पिलाताच्या कोर्टात “त्याला वधस्तंभावर खिळा” “कैसरावाचून आम्हाला कोणी राजा नाही.” असे म्हणून ओरडत होते. योहान १९:१५. दुसऱ्या कोणाला राजा म्हणून मान्यता दिली तर ते द्रोही होतात असे त्यानी जाहीर केले होते. प्रगट केलेल्या त्यांच्या मनातील हळवे भाव पिलाताने लिहून टाकिले होते. येशू यहूद्यांचा राजा होता ह्या शिवाय दुसरा कोणता अपराध लिहिला नव्हता. रोमी सत्तेवरील यहूद्यांच्या निष्ठेची मान्यता त्या लेखामध्ये दिसून येत होती. घोषीत केलेला इस्राएलाचा राजा मरणास पात्र होता असे त्यामध्ये जाहीर होत होते. याजकांनी त्यामध्ये अति शहाणपण दाखवून आपले इष्ट गमावले होते. ख्रिस्ताचा वध करण्याचा कट करीत असतांना राष्ट्राचा बचाव करण्यासाठी एकाने मरणे योग्य असे कयफाने घोषीत केले होते. आता त्यांचा ढोंगीपणा उघड झाला होता. ख्रिस्ताचा नाश करण्यासाठी राष्ट्राचे अस्तित्वच नाहीसे करण्यास ते तयार होते. DAMar 649.2

त्यांनी काय केले होते ते याजकांनी पाहिले आणि तो लेख बदलण्यास पिलाताला त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका, तर मी यहूद्यांचा राजा आहे असे त्याने म्हटले असे लिहा.” स्वतःच्या पूर्वीच्या कमकुवतपणाचा पिलाताला राग होता आणि द्वेषी व कावेबाज याजक व अधिकारी यांचा त्याला तिरस्कार वाटला. त्याने अनादरपणे उत्तर दिले, “मी जे लिहिले ते लिहिले.” DAMar 649.3

पिलात किंवा यहूदी यांच्यापेक्षा उच्च सत्तेने तो लेख येशूच्या डोक्याच्या वरच्या बाजूस लटकवण्यास मार्गदर्शन केले होते. ईश्वरी कृपेने पवित्र शास्त्राची पूर्ण चौकशी करण्यास मन जागृत झाले होते. ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलेले ठिकाण शहराजवळ होते. त्यावेळेस सर्व भागातून लोक यरुशलेममध्ये जमले होते आणि नासोरी येशू मशीहा हा लेख सर्वांच्या नजरेस येणार होता. देवाने मार्गदर्शन केलेल्या हाताने लिहिलेले ते जीवंत सत्य होते. DAMar 649.4

वधस्तंभावरील दुःख सोसण्याचे भाकीत पूर्ण झाले होते. वधस्तंभाच्या शेकडो वर्षे अगोदर उद्धारकाने त्याला मिळणाऱ्या वागणुकीविषयी अगोदरच सांगितले होते. त्याने म्हटले, “कुत्र्यांनी मला वेढिले आहे; दुर्जनांच्या टोळीने मला घेरिले आहे; त्यांनी माझे हातपाय विधिले आहेत. मला आपली सर्व हाडे मोजता येतात ते मजकडे टक लावून पाहातात. ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या पेहरावावर चिठ्या टाकितात.” स्तोत्र. २२:१६-१८. त्याच्या पेहरावावरील भाकीत येशूच्या मित्रांच्या किंवा शत्रूच्या सल्ल्याशिवाय किंवा अडथळ्या शिवाय पूर्ण झाले. वधस्तंभावर खिळणाऱ्या शिपायांना त्याची वस्त्रे देण्यात आली होती. त्याची वस्त्रे त्यांनी वाटून घेतल्याने त्यांचे समाधान झाल्याचे ख्रिस्ताने ऐकिले. त्याच्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता. ह्यास्तव त्यानी म्हटले, “हा आपण फाडू नये तर कोणाला मिळेल हे चिठ्या टाकून पाहावे.” DAMar 649.5

दुसऱ्या भाकीतामध्ये उद्धारकाने घोषीत केले, “निंदा होत असल्यामुळे माझे हृदय भग्न झाले आहे; मी अगदी बेजार झालो आहे; माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले, पण कोणी आढळला नाही; माझे कोणी समाधान करील म्हणून वाट पाहिली, पण कोणी दिसला नाही. त्यांनी मला खावयास अन्न म्हणून विष दिले, तहान भागविण्यास मला आंब दिली.” स्तोत्र. ६९:२०, २१. वधस्तंभावरील मरणदंडाची शिक्षा झालेल्यांना त्यांची शुद्धी बधीर करण्यासाठी गुंगी आणणाऱ्या मादक पेयाचा घोट देण्याची मुभा होती. येशूलाही ते देण्यात आले होते परंतु त्याची चव घेतल्यावर त्याने ते नाकारले. त्याने बुद्धी बधीर होण्याचे सर्व नाकारले. देवावरील त्याचा विश्वास दृढ राहावा ही त्याची इच्छा होती. केवळ हेच त्याचे सामर्थ्य होते. ज्ञानशक्ती बधीर झाल्यास सैतानाचे फावेल. DAMar 650.1

वधस्तंभावर खिळल्यावर येशूच्या शजूंनी त्याच्यावरील आपला राग काढिला. मरत असलेल्या उद्धारकाची निंदा नालस्ती करण्यात याजक, अधिकारी, शास्त्री जमावात सामील झाले. बाप्तिस्मा व रूपांतराच्या समयी ख्रिस्त देवपुत्र असल्याची देवाची वाणी त्यांनी ऐकिली होती. पुन्हा त्याला धरून देण्याच्या अगोदर त्याच्या देवत्वाची साक्ष पित्याने दिली होती. परंतु आता ती वाणी शांत होती. ख्रिस्ताच्या वतीने काही साक्ष ऐकली नव्हती. दुष्ट लोकांनी केलेली टिंगल आणि कुचेष्टा त्याने एकट्याने सहन केली. DAMar 650.2

ते म्हणाले, “तू देवपुत्र जर असलास तर वधस्तंभावरून खाली उतर.” “तो जर देवाने निवडलेला ख्रिस्त असला तर त्याला स्वतःचा बचाव करू दे.” अरण्यातील मोहाच्या समयी सैतानाने घोषीत केले होते, “तू देवाचा पुत्र असलास तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर.” “तू देवाचा पुत्र आहेस तर मंदिराच्या कंगोऱ्यावरून खाली उडी टाक.’ मत्तय ४:३, ६. मनुष्याच्या वेषात सैतान वधस्तंभाच्या स्थळी हजर होता. सैतान आणि त्याचे सैन्य याजक व अधिकारी यांना सहकार्य देत होते. ज्यांनी त्याला पूर्वी कधी पाहिले नव्हते त्याच्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी शास्त्री पुढाऱ्यांनी त्याच्यावर दोषारोप करण्यास अज्ञानी जमावाला चेतविले होते. याजक, अधिकारी, परूशी आणि निगरगट्ट बाजारबुनग्यांनी सैतानाच्या ह्या उन्मादात संगनमत केले होते. धार्मिक पुढारी सैतान व त्याचे दूत यांच्याशी मिळाले होते. ते त्याची आज्ञा मानीत होते. DAMar 650.3

वधस्तंभावर यातना भोगणाऱ्या आणि मरणावस्थेत असलेल्या येशूने याजकांनी काढलेले उद्गार ऐकिले, “त्याने दुसऱ्यांचे तारण केले, त्याला स्वतःचा बचाव करिता येत नाही; इस्राएलाचा राजा ख्रिस्त ह्याने आता वधस्तंभावरून खाली यावे म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू.” वधस्तंभावरून ख्रिस्त खाली उतरू शकला असता. परंतु पाप्यासाठी देवाजवळ पापक्षमा व कृपाप्रसाद होता म्हणून तो स्वतःचा बचाव करू शकत नव्हता. DAMar 651.1

उद्धारकाची थट्टा मस्करी करताना भाकीतावर स्पष्टीकरण देणाऱ्यांनी जे उद्गार काढीले होते त्याविषयी अगोदरच सांगण्यात आले होते. तथापि त्यांच्या अज्ञानामुळे ते भाकीताची परिपूर्तता करीत आहेत हे त्यांना उमजले नाही. उपहास करणाऱ्यांनी म्हटले, “तो देवावर भरवसा ठेवितो; तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला आता सोडवावे; कारण मी देवाचा पुत्र आहे असे तो म्हणत असे.” कुचेष्टेने हे उद्गार जरी काढिले होते तरी पूर्वीपेक्षा अधिक शास्त्र संशोधन करण्यास ह्यामुळे लोकांना अधिक उत्तेजन मिळाले. शहाण्या माणसांनी ऐकिले, संशोधन केले, चिंतन केले आणि प्रार्थना केली. पवित्र वचनाची पवित्र वचनाशी तुलना करून ख्रिस्ताच्या कार्याचा अर्थ सापडेपर्यंत शास्त्रशोध करण्यात काहीजण कमी पडले नाहीत. ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळिले तेव्हा पूर्वीपेक्षा ख्रिस्ताविषयी सामान्यज्ञान बहुत होते. वधस्तंभावरचे दृश्य पाहाणारे व ख्रिस्ताचे वचन ऐकणारे त्यांच्या अंतःकरणात सत्यदीप प्रकाशत होता. DAMar 651.2

वधस्तंभावरील अति दुःखी प्रसंगाच्या वेळी येशूला एक सुखाचे दृश्य दिसले. ते पश्चात्तापदग्ध लुटारूंची प्रार्थना. ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या दोन्ही लुटारूंनी प्रथम त्याच्यावर तोंडसुख सोडले होते. त्यातील एकजण अति छळामुळे फार निराश होऊन उर्मट व उद्घट झाला होता. परंतु त्याचा सोबती तसा नव्हता. तो अट्टल गुन्हेगार नव्हता. वाईट संगतीमुळे तो फसला होता. उद्धारकाची निंदा करीत वधस्तंभाच्या बाजूला उभे राहाणाऱ्या काहीजणापेक्षा तो कमी अपराधी होता. त्याने येशूला पाहिले होते आणि त्याचे प्रवचन ऐकिले होते आणि त्याच्या मनावर त्याच्या शिक्षणाचा चांगला परिणाम झाला होता. परंतु याजक व अधिकारी यांच्यामुळे तो येशूपासून दुरावला होता. हळूहळू तो अधिक खोल पापात अडकला, त्याला पकडण्यात आले, चौकशी अंती गुन्हेगार म्हणून वधस्तंभावरील मरणदंडाची शिक्षा दिली. न्यायालयात, कॅलव्हरीच्या मार्गावर तो ख्रिस्ताबरोबर होता. “त्याच्याठायी मला काही अपराध दिसत नाही” पिलाताने उद्गारलेले हे शब्द त्याच्या कानावर पडले होते. योहान १९:४. देवासारखी त्याची वागणूक आणि त्याचा छळ करणाऱ्यांविषयीची त्याची पापक्षमेची भावना त्याला अधिक ठळक दिसली. वधस्तंभाच्या ठिकाणी अनेक धर्मपुढाऱ्यांनी ख्रिस्ताची टर उडवून उपहास करताना त्याने पाहिले होते, नापसंतीने माना हलतांना त्याने पाहिले. त्याच्या सोबत्याने काढिलेले उपहासात्मक शब्द त्याने ऐकिले: “जर तू ख्रिस्त आहेस तर तुझा बचाव कर आणि आमचाही कर.’ रस्त्याने जाणाऱ्यात येशूच्या बाजूने निघालेले उद्गार त्याने ऐकिले. हा ख्रिस्त आहे त्याची ही खात्री पुन्हा जागृत होते. आपल्या सोबत्याकडे वळून तो म्हणतो, “तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवालासुद्धा भीत नाहीस काय?” मरणाऱ्या लुटारूंना आता माणसांची भीती कसली! परंतु एकाच्या मनाची खात्री झाली होती की देवाला भ्याले पाहिजे आणि भविष्यासाठी पाय लटपटले पाहिजेत. आता त्याच्या पापी जीवनाच्या इतिहासाचा शेवट होणार होता. तो कण्हत व्यक्त करितो, “आपली शिक्षा तर यथायोग्य आहे; कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहो; परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही.” DAMar 651.3

आता कसला प्रश्न राहिला नाही, शंका नाही आणि दूषण नाही. त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा दिल्यावर लुटारू अगदी निराश व हतबल झाला होता, परंतु आता विलक्षण, नाजूक विचारांनी उसळी घेतली. ख्रिस्ताविषयी ऐकलेले, रोग्याना बरे केलेले व पापांची क्षमा केलेले ह्या सर्वांची त्याला आठवण झाली. अश्रु ढाळीत येशू मागे जाणाऱ्याचे उद्गार त्याने ऐकिले. उद्धारकाच्या डोक्यावरील लिहिलेला मथळा त्याने पाहिला होता आणि वाचलेला होता. रस्त्याने जाणारे ते वाचत होते. काहीचे ओठ दुःखाने कंप पावत होते तर काही थट्टामस्करी व उपहास करीत होते. पवित्र आत्मा त्याचे मन प्रकाशीत करितो आणि हळूहळू पुराव्यांची शृखला पूर्ण होते. जखमी केलेला, कुचेष्टा केलेला आणि वधस्तंभावर लटकलेला येशू याच्यामध्ये जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोंकरा त्याला दिसतो. असहाय्य मरणाऱ्या जीवाच्या वाणीत दुःखमिश्रीत आशा दुणावते आणि तो मरणाऱ्या उद्धारकाशी सहभागी होतो. तो उद्गारतो, “हे येशू, तू आपल्या राजाधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर.” DAMar 652.1

लगेचच उत्तर आले. प्रेम, दया व सामर्थ्य यांनी समृद्ध असलेल्या मृदु व मंजुळ वाणीत म्हटले: मी तुला आज खचीत सांगतो, तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. DAMar 652.2

अपशब्द, थट्टामस्करी आणि अति दुःख यांचे शब्द येशूच्या कानावर फार वेळ पडत होते. वधस्तंभावर लटकलेला असताना सुद्धा टवाळीचे व शापग्रस्त शब्द त्याच्यापुढे तरंगत होते. शिष्यांच्या मुखातून निघालेले श्रद्धायुक्त बोल त्याने उत्सुकतेने ऐकिले. त्याने दुःखाने विव्हळ होऊन काढलेले फक्त शब्द ऐकले होते, “इस्राएलाचा उद्धार करणारा म्हणून त्याच्यावर आम्ही विश्वास ठेविला.” मरणाऱ्या लुटारूचे श्रद्धेचे व प्रेमाचे उद्गार उद्धारकाला किती कृतज्ञतेचे वाटले असतील! प्रमुख यहूदी पुढारी त्याचा धिक्कार करितात, त्याचे शिष्यसुद्धा त्याच्या देवत्वाविषयी साशंक होतात त्याचसमयी बिचारा लुटारू अनंतकालाच्या कड्यावर त्याला प्रभु येशू म्हणून संबोधितो. त्याने चमत्कार केले आणि कबरेतून उठला तेव्हा अनेकांनी त्याला प्रभु म्हणून संबोधिले; परंतु वधस्तंभावर लटकत असतांना त्याला कोणीही मानले नाही केवळ शेवटच्या क्षणी उद्धार पावलेल्या अनुतप्त लुटारूनेच. DAMar 652.3

लुटारूने येशूला प्रभु म्हटलेले वाटसरूंनी ऐकिले. त्या उद्गारातील त्या पश्चात्तापी माणसाच्या कळकळीच्या वाणीने त्यांच्या अंतःकरणाची पक्कड घेतली. वधस्तंभाच्या पायथ्याशी ख्रिस्ताच्या वस्त्रावर जे झगडा करीत होते आणि त्याच्या अंगरख्यावर चिठ्या टाकीत होते ते ऐकण्यासाठी थांबले. त्यांचा रागावलेला आवाज शांत झाला. श्वास अवरोधून त्यानी ख्रिस्तावर नजर टाकिली आणि त्या मरणाच्या ओठातून निघणारी वाणी ऐकण्यास ते थांबले. DAMar 653.1

आश्वासनाचे शब्द उद्गारल्याबरोबर वधस्तंभावरील अंधारी ढगाचे आवरण दूर होऊन तेथे झगझगीत प्रकाशझोत चमकला. पश्चात्तापी लुटारूला देवाच्या स्वीकारामुळे पूर्ण शांती लाभली. ख्रिस्ताच्या नम्र वागणुकीत त्याचा गौरव करण्यात आला. सर्वांच्या डोळ्यात जो जिंकला गेला तोच विजेता झाला. पापवाहक असे त्याला गणले होते. त्याच्या मानवी शरीरावर लोकांची सत्ता चालू शकली. त्याच्या पवित्र कपाळावर काट्याचा मुकुट ते दाबू शकले, ते त्याची वस्त्रे काढून त्यावर झगडा करू शकले. परंतु पापक्षमा करण्याच्या त्याच्या सामर्थ्यापासून त्याला कोणी हिरावू शकत नव्हते. मरणाद्वारे त्याने पित्याचे गौरव केले आणि त्याच्या देवत्वाविषयी साक्ष दिली. त्याचे कान ऐकण्यास मंद नव्हते आणि उद्धार करण्यास त्याचा दंड कमकुवत नव्हता. त्याच्याद्वारे देवाकडे येणाऱ्या सर्वांचा उद्धार करणे हा त्याचा राजाला शोभणारा हक्क होता. DAMar 653.2

मी तुला आज खरोखर सांगतो, तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. लुटारू त्याच्याबरोबर त्याच दिवशी सुखलोकात असेल असे आश्वासन ख्रिस्ताने दिले नव्हते. तो स्वतःच त्या दिवशी सुखलोकात गेला नव्हता. तो कबरेत झोपी गेला होता आणि पुनरुत्थानाच्या दिवशी सकाळीच त्याने म्हटले, “मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही.” योहान २०:१७. पराजयाचा व अंधाराचा गणलेल्या वधस्तंभाच्या दिवशी वचन दिले होते. गुन्हेगार म्हणून वधस्तंभावर मरणावस्थेत असणाऱ्या ख्रिस्ताने पापी लुटारूला “आज’ खात्री दिली की तू मजबरोबर सुखलोकात असशील. DAMar 653.3

ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेले लुटारू “त्याच्या एका बाजूला एक व दुसऱ्याबाजूला दुसरा आणि मध्ये तो होता.’ याजक व अधिकारी यांच्या हुकमाप्रमाणे ते केले होते. तो तिघात अधिक गुन्हेगार आहे हे दाखविण्यासाठी ख्रिस्ताला मध्ये ठेविले होते. त्याद्वारे शास्त्रवचन सिद्ध झाले, “त्याने आपणास अपराध्यात गणू दिले.” यशया ५३:१२. त्यांच्या कृतीचा त्यांना पूर्ण अर्थ उमगला नाही. दोन लुटारूंच्यामध्ये ठेवून ख्रिस्ताला वधस्तंभावर दिले त्याचप्रमाणे त्याचा वधस्तंभ पापात गुरफटलेल्या जगाच्यामध्येभागी ठेविला होता. पश्चात्तापी लुटारूच्या कानावर पडलेले पापक्षमेचे उद्गार प्रकाशाप्रमाणे पृथ्वीच्या कोणाकोपऱ्यात प्रकाशतील. DAMar 653.4

अति तीव्र दुःखाने ज्याचे मन व शरीर व्यथित झाले होते, व परोपकार वृत्तीने ज्याने पश्चात्तापदग्ध व्यक्तीला विश्वास ठेवण्यास उत्तेजन दिले त्या येशूचे अपरिमित प्रेम दिव्यदूतांनी तीव्र आश्चर्याने पाहिले. त्याची मानखंडता होत असताना संदेष्टा या नात्याने यरुशलेमेच्या कन्यांना त्याने संदेश दिला; याजक व मध्यस्थ म्हणून त्याच्या मारेकऱ्यांची पापक्षमा करण्यास त्याने पित्याजवळ विनवणी केली; कनवाळू उद्धारक म्हणून त्याने अनुतप्त लुटारूची पापक्षमा केली. DAMar 654.1

त्याच्या सभोवती असलेल्या जमावावर दृष्टिक्षेप केल्यावर एक व्यक्ती त्याच्या डोळ्यात भरली. योहानाचा आधार घेऊन वधस्तंभाच्या पायथ्याशी त्याची माता उभी होती. पुत्रापासून दूर राहाणे तिला सहन होत नव्हते, अंत जवळ आला म्हणून योहानाने तिला तेथे आणिले होते. मरणाच्यासमयी ख्रिस्ताने आपल्या मातेचे स्मरण केले. दुःखाने मलूल झालेला तिचा चेहरा पाहून त्याने योहानाकडे नजर फिरविली आणि त्याने तिला म्हटले, “बाई, तुझा हा मुलगा!” मग त्याने योहानाला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!’ योहानाला ख्रिस्ताचे बोल समजले व त्याचा त्याने स्वीकार केला. त्यावेळेस त्याने तिला आपल्या घरी नेले व तिची काळजी वाहिली. शारीरिक दुःख व मानसिक यातना ह्यामध्ये दयाळू व कनवाळू मुक्तिदात्याला आपल्या आईची फार काळजी होती! तिच्या सौख्यासाठी त्याच्याजवळ धन नव्हते; परंतु योहानाच्या अंत:करणात तो विराजमान झाला होता आणि त्याने आपल्या मातेला मृत्यूपत्राद्वारे मिळालेली देणगी किंवा अमोल्य वारसा म्हणून योहानाच्या स्वाधीन केली. अशा रितीने त्याने तिची अडचण दूर केली. तिच्यावर फार प्रेम असलेल्याची सहानुभूती तिला लाभली कारण येशूवर तिचे प्रेम होते. पवित्र ठेव म्हणून तिचा स्वीकार केल्यापासून योहानावर कृपाप्रसादाचा वर्षाव होत होता. तिच्याद्वारे त्याच्या जीवलग प्रभूची त्याला सतत आठवण राहात होती. DAMar 654.2

मातापित्यावरील निष्ठा व्यक्त करणारे ख्रिस्ताचे नेत्रदिपक उदाहरण युगानयुगामध्ये सतत चमकत राहिले. तीस वर्षे येशूने दररोज काबाडकष्ट करून घरच्या कामाचे ओझे वाहिले होते. आता शेवटच्या दुःखाच्या प्रसंगीसुद्धा आपल्या दुःखी, विधवा मातेच्या उपजीवेकेची तरतूद करण्याचे तो स्मरण करितो. आपल्या प्रभूच्या प्रत्येक शिष्यामध्ये ही भावना दृष्टोत्पत्तीस यावी. आपल्या मातापित्याचा आदर राखणे आणि त्यांच्या उपजीविकेची तरतूद करणे हा त्यांच्या धर्माचा एक भाग आहे असे ख्रिस्ताच्या प्रत्येक अनुयायाने समजून घेतले पाहिजे. ज्यांच्या अंतःकरणात ख्रिस्ताचे प्रेम वास करिते त्यांच्याकडून त्यांच्या मातापित्याची काळजी वाहाणे व त्यांना सहानुभूती दाखविणे या बाबतीत केव्हाही कमतरता दिसणार नाही. DAMar 654.3

मानव जातीच्या मुक्ततेसाठी जबर किंमत देण्यासाठी गौरवी प्रभु आता प्राण देत होता. त्याच्या अमूल्य जीवाचे बलिदान झाल्याने विजयाच्या हर्षाने ख्रिस्ताला उचलून धरले नव्हते. सर्व दडपशाहीची विषण्णता होती. त्याला मरणाची दहशत नव्हती. वधस्तंभाचे दु:खणे आणि प्रतिष्ठा यामुळे त्याला भारी व्यथा सहन कराव्या लागल्या नाहीत. दुःख भोगण्यात ख्रिस्त मुख्य होता; परंतु त्याच्या व्यथा पापाच्या तीव्रतेमुळे होत्या आणि पापी संवयीने मनुष्य त्या तीव्रतेला अंध झाला होता. मानवावर पापाची किती घट्ट पक्कड होती आणि त्या पक्कडीतून निसटण्याचा प्रयत्न किती थोडेजण करीत होते हे ख्रिस्ताने पाहिले. देवाच्या सहाय्याशिवाय मानवजात नाश पावेल हे त्याला माहीत होते. विपुल मदत उपलब्ध असताना अगणित नाश पावत आहेत हे त्याने पाहिले. DAMar 654.4

आपला बदली आणि जामीन म्हणून आमचे सर्व पाप त्याच्यावर लादले होते. निमशास्त्राच्या शिक्षेपासून तो आमची मुक्तता करील म्हणून त्याला पापी गणण्यात आले होते. आदामाच्या प्रत्येक वंशजाचे पाप त्याच्यावर भारी पडत होते. पापाविरुद्धचा देवाचा क्रोध, अधर्माविरुद्ध असलेली देवाची अवकृपा व नाराजी यामुळे त्याच्या पुत्राच्या मनात भीती भरली होती. सबंध आयुष्यभर पित्याची करुणा व पापक्षमा करण्याचे प्रेम याविषयी ख्रिस्त सर्व जगाला सांगत होता. परंतु आता लोकांच्या अपराधाचे भारी ओझे वाहात असताना तो आपल्या पित्याचा समेट करण्याचा चेहरा पाहू शकत नव्हता. अशा ह्या दुःखाच्या कठीण समयी तो दैवी चेहरा उद्धारकाला लुप्त झाला होता आणि त्यामुळे त्याला असह्य झालेल्या वेदना मनुष्याला त्या कधी उमजणार नव्हत्या. हे दुःख प्राणांतिक होते त्यामुळे शारीरिक दुःखणे भारी वाटले नाही. DAMar 655.1

तीव्र मोहाने सैतानाने येशूचे हृदय पिळून काढिले होते. कबरेच्या द्वारातून उद्धारक पाहू शकत नव्हता. कबरेतून विजेता म्हणून तो उठेल ह्याची कल्पना त्याच्या आशेने त्याला दिली नव्हती, किंवा त्याच्या यज्ञाचा स्वीकार पित्याने केल्याचे त्याला सांगण्यात आले नव्हते. देवाला पापाचा तीव्र तिटकारा होता हे त्याला माहीत होते म्हणून त्यांचा विरह-वियोग निरंतरचा असणार ह्याची त्याला धास्ती होती. त्यामुळे ख्रिस्ताला अपरिमित दुःख झाले. अपराधी पाप्यासाठी कृपा जेव्हा मध्यस्थी करणार नाही तेव्हा तसलेच दुःख पाप्यांना होईल. पापामुळे पित्याचा क्रोध मानवाचा बदली म्हणून त्याच्यावर आला, त्यामुळे त्याने प्यालेला पेला फार कडू लागला आणि देवपुत्राचे अंतःकरण भग्न झाले. DAMar 655.2

आश्चर्यचकित होऊन दिव्यदूतांनी उद्धारकाचे निराशजनक तीव्र दुःख पाहिले. भयानक दृश्यापासून स्वर्गातील गणांनी आपले चेहरे झाकून घेतले. अचेतन जड सृष्टीने त्यांच्या नालस्ती केलेल्या, मरत असलेल्या निर्माणकर्त्याला सहानुभूती दर्शविली. हे भयंकर दृश्य पाहाण्यास सूर्याने नकार दिला. भर दुपारी पृथ्वीवर कडक सूर्य किरण प्रकाशत होते आणि एकाएकी ते नाहिसे झाले. वधस्तंभावर प्रेतयात्रेप्रमाणे गडद अंधार पडला होता. “सर्व देशभर नवव्या तासापर्यंत अंधार पडला.’ त्यावेळी ह्या अंधकारासाठी ग्रहण किंवा दुसरे नैसर्गिक कारण नव्हते. हा अंधार चंद्र किंवा तारे याविना मध्यरात्रीसारखा निबिड होता. त्याद्वारे नंतरच्या पिढीचा विश्वास बळकट होईल म्हणून देवाने ही अलौकिक साक्ष दिली होती. DAMar 655.3

त्या निबिड अंधारात देवाची उपस्थिती लपलेली होती. अंधाराचा तो एक मोठा तंबू करितो आणि त्याच्यामध्ये आपले वैभव मानवी नेत्रापासून झाकून घेतो. देव आणि त्याचे पवित्र दिव्यदूत वधस्तंभाच्या बाजूला होते. पिता पुत्रासमवेत होता. तरी त्याची उपस्थिती प्रगट केली नव्हती. ढगातून त्याचे वैभव चमकले असते तर ते पाहाणारा प्रत्येक मानवप्राणी नाश पावला असता. त्या भयानक समयी पित्याच्या उपस्थितीने ख्रिस्ताने सांत्वन करायचे नव्हते. त्याने एकट्यानेच द्राक्षकुंड तुडविला, आणि लोकातले त्याच्याबरोबर कोणी नव्हते. DAMar 656.1

गडद अंधारात देवाने आपल्या पुत्राचे अखेरचे मानवी दुःख झाकून ठेवले होते. ख्रिस्ताचे दुःख पाहाणाऱ्यांना त्याच्या देवत्वाविषयी खात्री झाली होती. मानवतेने एकदा पाहिलेल्या चेहऱ्याचा कधीही विसर पडणार नव्हता. काईनाच्या चेहऱ्यावरून तो खुनी असल्याचे दिसत होते. ख्रिस्ताच्या चेहऱ्यावरून निरपराध, प्रसन्नता, दानशीलता, परोपकारबुद्धी, - देवाची प्रतिमा प्रगट होत होती. परंतु त्याचे दोष दाखविणारे स्वर्गीय शिक्क्याकडे लक्ष देत नव्हते. फार वेळ दुःखाने व्यथित झालेल्या ख्रिस्ताकडे टवाळी करणाऱ्या समुदायाने निरखून पाहिले. आता त्याला देवाच्या दयाशील आच्छादनाने आच्छादिले होते. DAMar 656.2

थडग्याची शांतता कॅलव्हरीवर पडल्याचे संभवते. बिनामी दहशतवाद्याने वधस्तंभाभोवती जमलेल्या समुदायाला ताब्यात ठेवले होते. शाप देण्यासाठी आणि अपशब्द वापरण्यासाठी उच्चारलेली अर्धवट वाक्य बंद पडली. पुरुष, स्त्रिया आणि मुलेबाळे भूमीवर पालथे पडली. अधून मधून ढगातून विजेचा लखलखाट चमकत होता आणि त्यातून वधस्तंभ व त्यावर वधलेला उद्धारक याचे दर्शन होत होते. याजक, अधिकारी, शास्त्री शिक्षा अंमलात आणणारे आणि जमाव या सर्वांना वाटले की त्यांच्या अपराधाबद्दल योग्य शिक्षेची वेळ आली होती. थोड्या वेळाने वधस्तंभावरून येशू खाली येईल असे काहीना वाटले होते. काहीनी भीतीने शोक करीत व ऊर बडवीत चाचपडत शहराकडे जाण्याचा प्रयत्न केला. DAMar 656.3

नवव्या तासाला लोकावरील अंधार निघून गेला परंतु उद्धारकावरील तसाच राहिला. दुःख व भय यांच्या ओझ्याने त्याच्या अंतःकरणावर पडलेल्या दडपणाचे ते प्रतीक होते. वधस्तंभाच्या सभोवती निर्माण झालेली विषण्णता कोणाच्याही नजरेला आली नाही आणि ख्रिस्ताच्या अंतःकरणाला झालेली उद्विग्नता कोणीही अजमावू शकत नव्हते. वधस्तंभावर लटकलेला असतांना कडाडलेली विद्युल्लता त्याच्या अंगावर कोसळल्याचा भास झाला. त्यानंतर “येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, एली, एली, लमा सबख्थनी? म्हणजे माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?’ उद्धारकासभोवतालची निराशजनक स्थिति संपताच अनेकजण उद्गारले: स्वर्गाचा कोप त्याच्यावर आहे. तो देवपुत्र आहे असे घोषीत केल्यामुळे त्याच्यावर देवाच्या क्रोधाचा वज्र फेकण्यात आला आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी त्याचा निराशजनक आक्रोश ऐकिला. आशा नाहीशी झाली. देवाने त्याचा त्याग केला होता मग त्याच्या अनुयायांनी कोणावर विश्वास ठेवावा? DAMar 656.4

खचलेल्या ख्रिस्तावरील अंधार नाहीसा झाल्यावर त्याला शारीरिक दुःखाची जाणीव झाली आणि त्याने म्हटले, “मला तहान लागली आहे.” एका रोमी शिपायाला त्याचे सुकलेले ओठ पाहून दया आली आणि त्याने एजोब झाडाच्या काठीवर बसविलेला स्पंज घेऊन आंब भरलेल्या भांड्यात बुडविला आणि त्याच्या तोंडाला तो लाविला. परंतु त्याच्या दुःखाची हेटाळणी याजकांनी केली. पृथ्वीवर गडद अंधार पडला होता तेव्हा येशू संधीचा फायदा घेऊन निसटून जाईल याची भीती त्यांना होती. त्याने काढिलेले उद्गार एली, एली, लमा सबख्थनी? याच्या अर्थाचा त्यानी विपर्यास केला. त्याची टर उडवून तीव्र तिरस्काराने ते म्हणाले, “तो एलीयाला हाक मारतो आहे.’ त्याच्या हालअपेष्टातून मुक्त करण्याची शेवटची संधी त्यांनी नाकारली. त्यांनी म्हटले, “असू द्या, एलीया त्याचा बचाव करावयास येतो की काय हे आपण पाहू या.” DAMar 657.1

निष्कलंक देवपुत्र वधस्तंभावर लटकलेला होता, फटक्यांनी त्याचे मांस फाटलेले होते. मदतीसाठी सतत पुढे येणारे हात लाकडाच्या दांड्यावर खिळीलेले होते. प्रेमाची सेवा करणाऱ्या अथक पायात खिळे ठोकले होते. राजाला शोभणाऱ्या मस्तकावर काट्यांचा मुकुट दाबून घातला होता. कंप पावणारे ओठ दुःखाच्या आरोळीसाठी सज्ज होते. त्याच्या डोक्यातून, हातापायातून रक्ताचे ओघळ थेंब ठिपकत होते. अपरिमित दुःख व असह्य यातना यांनी त्याचा जीव व्याकूळ झाला होता कारण त्याच्या पित्याचा चेहरा त्याच्यापासून लपला होता. हे सर्व त्याने सहन केले. तोच मानवतेच्या प्रत्येक मुलाला-वशंजाला म्हणतो हे सर्व तुमच्या अपराधाचे भारी ओझे उचलण्यासाठी देवपुत्रने संमती दिली. तुमच्यासाठी त्याने मृत्यूचे राज्य खराब करून टाकिले आणि सुखलोकाचे-नंदनवनाची द्वारे उघडी केली. त्याने बेफान लाटा शांत केल्या, तो खवळलेल्या समुद्रावर चालला, त्याच्यामुळे भूते थरथरली, रोग नाहिसे झाले, अंधळ्यांना दृष्टी आली, मृत जीवंत झाले. तो तुमच्यावरील प्रेमामुळे वधस्तंभावर यज्ञबली होण्यास तयार झाला. पाप वाहून नेणारा दैवी न्यायाचा रोष सहन करितो आणि तो तुमच्यासाठी पाप बनतो. DAMar 657.2

ह्या भयानक दृश्याचा शेवट काय होतो हे प्रेक्षक निमुटपणे पाहात होते. सूर्य प्रकाशला परंतु वधस्तंभावर अद्याप अंधार होता. याजक व अधिकारी यांनी आपली दृष्टी यरुशलेमाकडे वळविली आणि दाट ढग शहरावर व यहूदाच्या सपाटीवर असलेले त्यांना दिसले. धार्मिकतेचा सूर्य, जगाचा प्रकाश एकदा प्रिय असलेल्या यरुशेलम नगरीवरून आपले प्रकाशाचे किरण काढून घेत होता. देवाच्या क्रोधाची कडाडणारी वीज विधि लिखीत शहराकडे वळविली होती. DAMar 657.3

आकस्मात् वधस्तंभावरील खिन्नता, औदासिन्य नाहीसे झाले आणि स्पष्ट आणि तुतारीसारख्या आवाजात त्याने म्हटले, “पूर्ण झाले आहे. हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” प्रकाश वधस्तंभाभोवती चमकला आणि उद्धारकाचा चेहरा वैभवाने सूर्याप्रमाणे तेजोमय झाला. त्यानंतर छातीवर आपले मस्तक लववून प्राण सोडला. DAMar 658.1

पित्याने त्याग केल्याच्या भावनेने निबिड अंधकारात मानवी शोकप्याल्यात येशूच्या दुःखाचा कडेलोट झाला. त्या भयानक काळात आतापर्यंत पित्याने त्याचा स्वीकार केला होता ह्या पुराव्यावर तो भरवसा ठेवून होता. त्याच्या पित्याचा स्वभाव त्याला ज्ञात होता. त्याची न्यायबुद्धी, त्याची ममता, आणि त्याचे अपरिमित प्रेम त्याला समजले होते. विश्वासाने त्याच्यामध्ये त्याने विसावा घेतला. त्याची आज्ञा मानण्यात त्याला सतत हर्ष होत होता. पित्याची मेहरबानी त्याच्यापासून काढून घेण्यात आली होती तरी त्याने स्वतःला देवाच्या ताब्यात दिले होते. विश्वासाने ख्रिस्त विजेता झाला. DAMar 658.2

पूर्वी कधी असले दृश्य पृथ्वीवर घडले नव्हते. लोकसमुदाय हतबल होऊन उद्धारकाकडे न्याहाळून पाहात होता. पुन्हा अंधकार पृथ्वीवर पसरला आणि मोठ्या गर्जना करणाऱ्यासारखा घोगरा आणि कर्णकटु आवाज ऐकिला गेला. मोठा भूमिकंप झाला. लोकांची भीतीने गाळण उडाली. गोंधळ आणि गडबड उडाली. आजूबाजूच्या डोंगरात खडक फुटले आणि खाली गडगडत सपाट मैदानात पडले. थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठविली गेली. जणू काय सृष्टी कंप पावत होती. याजक, अधिकारी, शिपाई, शिक्षेची अंमलबजावणी करणारे आणि लोक भयाने निःशब्द होऊन भूमीवर पालथे पडले. DAMar 658.3

“पूर्ण झाले आहे” हे उद्गार ख्रिस्ताच्या मुखातून बाहेर पडले तेव्हा याजक मंदिरात विधिसंस्कार पार पाडीत होते. ही वेळ सायंकाळच्या यज्ञयागाची हती. ख्रिस्ताचे द्योतक असलेला कोकरा यज्ञासाठी आणिलेला होता. ठराविक उत्कृष्ट पोषाख घालून व हातात सुरा घेऊन, आपल्या पुत्राचा यज्ञ करण्यास तयार झालेल्या आब्राहामाप्रमाणे याजकाने हात वर केला होता. लोक भारी उत्सुकतेने ते पाहात होते. पृथ्वी कापते आणि हेलकावे खाते, कारण प्रभु स्वतः नजीक येतो. तेव्हा पवित्र स्थानांतील पडदा वरपासून खालपर्यत अदृश्य हाताने फाडून टाकिला. त्यामुळे एकाकाळी देवाच्या समक्षतेने भरलेले ठिकाण आता समुदायाच्या नजरेपुढे उघडे पडले. ह्या स्थळी शेकीन्हा वस्ती करीत होता. दयासनावर देवाने आपले गौरव प्रगट केले होते. फक्त प्रमुख याजक दोहोमध्ये असलेला पडदा बाजूला करीत होता. लोकांच्या पापासाठी प्रायश्चित करण्यासाठी वर्षातून एक वेळेस आत प्रवेश करीत होता. परंतु पाहा, हा पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला होता. पृथ्वीवरील निवासमंडपातील परम पवित्रस्थान यापुढे पवित्र राहिले नव्हते. DAMar 658.4

सर्व काही गोंधळाचे आणि भयग्रस्त होते. याजक यज्ञावर घाव घालण्याच्या तयारीत होता. परंतु लटपटणाऱ्या हातातून सुरा खाली पडला, आणि कोंकरा निसटून गेला. देवपुत्राच्या मरणामध्ये रूपक प्रतिरूपकाशी संघटीत होते. महान यज्ञ करण्यात आला. परम पवित्रस्थानाचा मार्ग उघडा पडला. नवीन आणि जीवंत मार्ग सर्वासाठी तयार केला. पापी, दुःखी मानवतेला मुख्य याजकाची यापुढे वाट पाहाण्याची जरूरी नव्हती. यापुढे वर स्वर्गात उद्धारक याजकाचे व वकीलाचे काम करणार होता. जणू काय भक्ताशी जीवंत वाणी बोलत होतीः पापाबद्दल यज्ञ आणि दान देण्याला आता संपूर्ण पूर्ण विराम. त्याच्या वचनाप्रमाणे देवपुत्र आला आहे, “(ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेविले आहे,) पाहा, हे देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” “तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परम पवित्रस्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळविली.’ इब्री. १०:७; ९:१२. DAMar 659.1