Go to full page →

येशूच्या आत्मयज्ञाचा हेतु WG 8

परंतु त्यानें जो मोठा आत्मयज्ञ केला तो बापाचे अंत:करणांत मनुष्यांबद्दल प्रेम उत्पन्न व्हावें व त्यांस वांचविण्यास राजी व्हावें म्हणून केला असें नाहीं. खरोखर नाहीं ! “देवानें जगांवर इतकी प्रीति केली, कीं त्यानें आपला एकुलता एक पुत्र दिला.”3योहान्न३:१६. ख्रिस्‍ताच्या आत्मयज्ञानें शांत होऊन तो मनुष्यांवर प्रेम करूं लागला असें नव्हें, तर त्याचें आपणां मनुष्यांवर प्रेम होतें म्हणून पापांच्या उपशमनार्थ बळी म्हणून ईश्वरानें त्याला पाठविलें. पतित अशा मर्त्य लोकांवर आपल्या अमर्याद प्रेमाचा सारखा वर्षाव ज्याच्या योगनें त्याला करितां आला तो मार्ग प्रभु ख्रिस्‍त हाच होय. “देव ख्रिस्‍तांत आपणाशीं जगाचा समेट करीत होता.”4२करिंथ५:१. पुत्राबरोबर त्यानेंहि दु:ख सोंसलें. गेथसेमनेंत भोगलेल्या यातनांनीं, व कॅलव्हरी बागांतील मृत्युनें त्याच अत्यंत प्रेमळ अंत:करणानें आपल्या तारणाची किंमत दिली. WG 8.1

प्रभु म्हणतो “परत घेण्याकरितां मी आपला जीव देतों, यास्‍तव बाप मजवर प्रीति करतो”1योहान्न१०:१७. म्हणजे माझ्या बापानें तुमच्यावर इतकी प्रिति केली आहे, कीं तुमच्या तारणासाठीं मीं आपला जीव दिला म्हणून माझ्यावर देखील त्याची जास्‍त प्रीति झाली. तुमचेऎवजी मोबदला होऊन व तुमच्याबद्दल जामीन राहून तुमचीं ऋणें व पापें आपल्या माथीं घेऊन मीं स्वतां जीव दिला त्यामुळें मी आपल्या बापाला अधिक आवडता झालों आहें. कारण माझ्या जीवयज्ञामुळें देव न्यायी ठरतो व जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास न्यायी ठरविणारा ठरतो.” WG 9.1

ईश्‍वराच्या पुत्राशिवाय दुसरा कोणीहि आपलें तारण करण्यास समर्थ झाला नाहीं. कारण बापाच्या हृदयाशीं असणार्‍या फक्त त्यानेंच बापाला प्रगट केलें आहे. बापाची प्रीति किती उदात्त व अगाध आहे हें ज्याला ठाऊक होतें त्याला मात्र तिचें स्वरुप दाखवितां आलें. पतित अशा मनुष्यप्राण्याप्रीत्यर्थ प्रभु ख्रिस्‍तानें जों अलौकिक स्वार्थत्याग केला त्याहून यत्किंचित् हि कमी स्वार्थत्यागानें बापाची नष्‍ट मनुष्यावर असलेली प्रीति व्यक्त करिता आली नसती. WG 9.2