Go to full page →

अध्याय ५९—याजकांचा कट DAMar 468

योहान ११:४७-५४.

बेथानी यरुशलेमपासून फार दूर नव्हते त्यामुळे लाजारसाला जीवंत केल्याची बातमी ताबडतोब शहाराला पोहंचली. तेथे हजर असलेल्या हेरांच्याद्वारे यहूदी पुढाऱ्यांना ही बातमी ताबडतोब मिळाली. काय करावे हे ठरविण्यासाठी धर्मसभा तत्पर बोलावली. मरण आणि कबर यांच्यावर संपूर्ण ताबा असल्याचे ख्रिस्ताने सिद्ध केले होते. देवाने आपला पुत्र जगाच्या तारणासाठी पाठविला आहे ह्याचा श्रेष्ठ पुरावा हा महान चमत्कार होता. वैचारिक मनाची खात्री करण्यासाठी आणि विवेक बुद्धीवर प्रकाश पाडण्यासाठी हे प्रत्यक्ष प्रदर्शन होते. लाजारसाला मरणातून उठविल्याचा चमत्कार पाहाणाऱ्यातील अनेकजनांनी येशूवर विश्वास ठेविला. परंतु याजकांचा त्याच्या विरुद्धचा द्वेष बळावला होता. त्याच्या देवत्वाविषयीचे इतर सर्व पुरावे त्यांनी नाकारिले होते आणि ह्या नवीन चमत्कारानेच ते संतापले होते. लोकसमुदायासमोर दिवसाढवळ्या मृतास उठविण्यात आले होते. कसलीही युक्ती किंवा शकल ह्या पुराव्याचे स्पष्टीकरण देऊ शकत नव्हती. ह्या कारणाप्रीत्यर्थ याजकांचे शत्रूत्व प्राणघातक बनले होते. कोणत्याही परिस्थितीत ख्रिस्ताच्या कार्याला पूर्ण विराम देण्याचा त्यांनी निर्धार केला. DAMar 468.1

सदूकी ख्रिस्ताला जरी एवढे अनुकूल नव्हते तरी परूश्याप्रमाणे त्याचा तीव्र मत्सर करीत नव्हते. त्यांचा द्वेष इतका तीव्र नव्हता. परंतु ते आता पूर्णपणे धास्तावून गेले होते. मृताचे पुनरुत्थान ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता. वैज्ञानिक विचाराचा आधार घेऊन ते म्हणत होते की मृत शरीराला पुन्हा जीवंत करणे हे अशक्य आहे. परंतु ख्रिस्ताच्या वक्तव्याने त्यांचे हे मत किंवा सिद्धांत उलथून टाकीले गेले. देवाचे शास्त्रवचन आणि त्याचे सामर्थ्य यांच्याविषयी ते अज्ञानी असल्याचे त्यांना दाखविण्यात आले होते. चमत्काराने लोकांच्या मनावर पडलेला पगडा काढून टाकणे अशक्य आहे असे त्यांना दिसले. कबरेतून मृत जीवंत बाहेर येतो ह्याचे वर्चस्व लोकांच्या मनावर ज्याने ठासले त्याच्यापासून लोकांना परावृत करणे कसे शक्य होते? खोट्या बातमीचा प्रसार केला, परंतु चमत्कार ते नाकारू शकत नव्हते आणि त्याच्या परिणामासाठी शत्रूवर उलट हल्ला कसा करायचा हे त्यांना समजत नव्हते. आतापर्यंत ख्रिस्तावर प्राणांतिक हल्ला करण्यास सदूकी तयार नव्हते. परंतु लाजारसाच्या पुनरुत्थानानंतर त्यानी निर्धार केला की, केवळ त्याच्या मृत्यूनेच त्यांच्याविरुद्ध करण्यात येणारे निर्भय दोषारोप बंद पडू शकतील. DAMar 468.2

परूश्यांचा विश्वास पुनरुत्थानावर होता आणि हा चमत्कार मशिहा आम्हामध्ये असल्याची खूण आहे असे ते पाहात होते. परंतु ते सतत ख्रिस्ताच्या कामाला विरोध करीत होते. त्यांचा ढोंगीपणा उघड केला म्हणून ते प्रथमपासून त्याचा द्वेष करीत होते. ज्याच्याखाली त्यांच्या आध्यात्मिक उणीवता झाकण्यात आल्या होत्या त्या कडक विधि संस्काराचा बुरखा त्याने फाडून टाकिला होता. खऱ्या धर्माच्या शिकवणीने त्यांची पोकळ धर्मनिष्ठा त्याने दोषी ठरविली. त्याने त्यांचा दोष काढिल्याबद्दल त्याचा सूड घेण्यास ते फार चिडून गेले होते. त्याची कृती व उक्ती यांच्याद्वारे त्याला दोषी ठरविण्याच्या संधीची ते वाट पाहात होते. अनेक वेळा त्याला दगडमार करण्याचा ते प्रयत्न करीत होते परंतु तो शांतपणे उठून जात असे आणि त्यांच्या दृष्टीआड होत असे. DAMar 469.1

शब्बाथ दिवशी केलेले चमत्कार पीडीतांच्या मुक्ततेसाठी होते परंतु शब्बाथाची पायमल्ली केल्याबद्दल परूशी त्याला दोष देत होते. त्याच्याविरुद्ध हेरोदियांना चेतविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो स्पर्धात्मक दुसरे राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे असे सांगून त्याला कसे नष्ट करावे याविषयी त्यांनी सल्ला मसलात केली. त्यांची सत्ता उखडून टाकण्याचा तो अटोकाट प्रयत्न करीत आहे असे सांगून रोमी लोकांना त्याच्याविरुद्ध ते उठवीत होते. लोकावर त्याचा प्रभाव पडू नये म्हणून त्याला दूर ठेवण्याची हरएक शकले त्यांनी वापरली. परंतु आतापर्यंत त्यांचे प्रयत्न फसले होते. परंतु त्याच्या दयेच्या कृती पाहिल्या होत्या आणि त्याची पवित्र व स्वच्छ शिकवण ऐकिली होती त्या समुदायाने म्हटले की ही कृती आणि उक्ती शब्बाथाचे उल्लंघन करणाऱ्याची किंवा ईश्वरनिंदा करणाऱ्याची नव्हती. परूश्यांनी काही अधिकारी पाठविले होते ते सुद्धा वचनांनी इतके मोहीत झाले होते की ते त्याच्यावर हात टाकू शकले नव्हते. शेवटी निराश होऊन अविचारी मनस्थितीत आज्ञापत्र काढून ठणकावले की, येशूवर विश्वास प्रगट करणाऱ्याला धर्मसभेतून बहिष्कृत करण्यात येईल. DAMar 469.2

ज्याने अद्भुतजन्य कार्य केले व त्याबद्दल लोकांनी त्याचे कौतुक केले त्याचा अंत करण्याचा पक्का निश्चय याजक, अधिकारी आणि वडील यांच्या सल्लागार मंडळाने केला. पूर्वीपेक्षा ह्या बाबतीत परूशी आणि सदूकी संघटीत झाले होते. आतापर्यंत ते दुभागलेले होते पण ख्रिस्ताला विरुद्ध करण्यास ते एक झाले. निकेदम आणि योसेफ यांनी येशूला दडाज्ञा करण्यास आधीच्या बैठकीत विरोध केला होता म्हणून ह्यावेळेस त्यांना बोलावले नव्हते. ह्या धर्मसभेच्या वेळेस येशूवर विश्वास ठेवणारे काही प्रतिष्ठित मनुष्य होते परंतु अत्यंत दुष्ट बुद्धीच्या परूश्यांच्यापुढे त्यांचे काही चालले नाही. DAMar 469.3

तथापि सल्लागार मंडळाच्या सभासदांचे एकमत नव्हते. ह्या वेळेची धर्मसभेची बैठक कायदेशीर नव्हती. केवळ सहिष्णुतेनेच तिचे अस्तित्व राहिले. ख्रिस्ताचा अंत करण्याविषयी काहींनी प्रश्न उपस्थित केले. काहीना वाटले की ह्याद्वारे लोकामध्ये उठाव, बंड होईल आणि त्यामुळे याजकांच्यावरील रोमी अधिकाऱ्यांची मेहरबानी कमी होऊन त्यांना दिलेली सत्ता ते काढून घेतील. ख्रिस्तावरील द्वेषामुळे सदूकी ह्यामध्ये संघटीत झाले होते तथापि रोमी अधिकारी त्यांच्या प्रतिष्ठित दर्जापासून त्यांना वंचित करतील म्हणून ते जागरूक होते. DAMar 470.1

ह्या बैठकीत येशूचा अंत करण्याची योजना आखण्यासाठी सभासद जमले होते. नबुखदनेसर राजाचे बढाईखोर उद्गार ऐकलेला, बेलशस्सरची मूर्तीपूजा करणारी मेजवानी पाहिलेला, नासरेथकर येशूने स्वतः अभिषिक्त असल्याचे घोषीत केले तेव्हा तेथे हजर असलेला साक्षीदार ह्या बैठकीच्यावेळी उपस्थित होता. ते करीत असलेल्या कामाचा छाप हा साक्षीदार अधिकाऱ्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न करीत होता. ख्रिस्ताच्या जीवनातील ठळक घटना त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिल्या त्यामुळे ते धास्तावले. येशू बारा वर्षाचा असताना मंदिरात उभा राहून विद्वान कायदे पंडितांना प्रश्न विचारत होता तेव्हा ते आचंबा करीत होते ह्या घटनेचे त्यांना स्मरण झाले. तूर्तच केलेला चमत्कार ह्यावरून स्पष्ट दिसते की येशू हा देवपुत्र होता. जुना करारामध्ये येशूविषयी जे उद्गार काढिले आहेत त्यांचा खरा अर्थ त्यांच्या मनामध्ये प्रकाशला. प्रक्षुब्ध होऊन आणि गोंधळून जाऊन अधिकाऱ्यांनी विचारिले, “आम्ही काय करावे?” बैठकीत मतभेद दिसले. ते देवाच्या विरुद्ध झगडत आहेत, पवित्र आत्म्याच्याद्वारे बिंबविलेली ही विचारसरणी याजक व अधिकारी बाजूला सारू शकत नव्हते. DAMar 470.2

बैठकीमध्ये हा गोंधळ शिगेला पोहंचला असताना मुख्य याजक कयफा उभे राहिला. कयफा अहंकारी, निष्ठर, घमेंडखोर आणि असहिष्णू होता. त्याच्या घराण्यामध्ये सद्की होते व ते गर्वीष्ठ, धीट, बेफिकीर, महत्वाकांक्षी आणि निर्दय होते आणि हे सर्व धार्मिकतेच्या बाहाण्याखाली झाकून टाकिले होते. कयफाने भाकीतांचा अभ्यास केला होता आणि जरी त्याला त्याचा खरा अर्थ कळला नव्हता तरी तो अधिकाराने आणि आत्मविश्वासाने बोललाः “तुम्हाला काहीच कळत नाही; प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश होऊ नये हे तुम्हास हितावह आहे, हे तुम्ही लक्षात आणीत नाही.’ मुख्य याजकाने आग्रह करून सांगितले की जरी येशू निरापराधी असेल तरी त्याला मार्गातून बाजूला काढिला पाहिजे. तो त्रासदायक होता, लोकांना स्वतःकडे आकर्षण करून अधिकाऱ्यांची सत्ता कमी करीत होता. अधिकाऱ्यांची सत्ता कमी होण्याऐवजी तो मरणे बरे होते. जर प्रजा अधिकाऱ्यावरील विश्वास गमावतील तर राष्ट्रीय सत्ता नष्ट पावेल. ह्या चमत्कारानंतर येशूचे अनुयायी बंड करण्याचा धोका आहे. त्यानंतर रोमी येतील आणि आमच्या मंदिराला टाळा लावतील आणि आमचे कायदेकानू रद्द करून राष्ट्र म्हणून आम्हाला नष्ट करून टाकतील असे त्याने आग्रहाने प्रतिपादिले. तुलनात्मकदृष्ट्या राष्ट्रापेक्षा ह्या गालीली माणसाची काय किंमत आहे? इस्राएल लोकांचे कल्याण होण्याच्या मार्गात हा अडखळण होत आहे तर मार्गातील अडसर काढून टाकल्याने देवाला आम्ही मदत करीत नाही काय? सबंध राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा एका माणसाने मरणे बरे आहे. DAMar 470.3

राष्ट्रासाठी एका माणसाने मरणे ह्या उद्गारावरून कयफाला भाकीताचे ज्ञान होते असे दिसून आले. परंतु ते मर्यादित होते. योहान ह्या दृश्याचे वर्णन करताना हे भाकीत घेऊन त्याचा विस्तारपूर्वक आणि खोलवर अर्थ सांगतो. तो म्हणतो, “केवळ त्या राष्ट्राकरिता असे नाही, तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांसही जमवून एकत्र करावे ह्याकरिता.” कसे अंधळेपणाने गर्विष्ठ कयफा ख्रिस्ताचे कार्य मान्य करितो! DAMar 471.1

हे अति मोल्यवान सत्य कयफाच्या मुखात असत्य बनले. असंस्कृत मूर्तिपूजक लोकापासून घेतलेल्या तत्त्वावर आधारित असलेले त्याचे ते विचार होते. मूर्तिपूजक लोकामध्ये मानवजातीसाठी एकाने मेले पाहिजे ह्या कल्पनेने मानवाचा बली देण्याची प्रथा आली. म्हणून कयफाने सूचित केले की दोषी राष्ट्राच्या उद्धारासाठी येशूने बली दिला पाहिजे. पापापासून उद्धार नाही तर पापात उद्धार, त्यामुळे ते पाप करणे पुढे चालू ठेवतील. अद्याप येशूला देहदंडाची शिक्षा देण्यासारखे काही भरीव सापडले नाही असे म्हणणाऱ्यांचे तोंड बंद करण्यासाठी हा युक्तिवाद त्याने पुढे सादर केला. DAMar 471.2

ह्या सल्लागार मंडळामध्ये ख्रिस्ताचे शत्रू पूर्ण दोषी ठरविले गेले होते. पवित्र आत्म्याने त्यांच्या मनावर तसे बिंबवून दिले होते. परंतु त्यांच्यावर वर्चस्व गाजविण्याची पराकाष्टा सैतानाने केली. ख्रिस्तामुळे त्यांना किती व्यथा सोसाव्या लागल्या ह्याकडे लक्ष द्या म्हणून त्याने सांगितले. त्याने त्यांच्या धार्मिकतेचा बिलकूल सन्मान केला नाही. देवाचे पुत्र होऊ इच्छिणाऱ्यांनी स्वीकारावयाची उच्च दर्जाची धार्मिकता त्याने सादर केली. त्यांच्या प्रथा आणि विधिसंस्कार विचारात न घेता दयावंत पिता परमेश्वर याच्याकडे सरळ जावे आणि आपल्या गरजा सादर कराव्या असे सांगितले. अशा प्रकारे त्याच्या मते त्याने याजकीय हुद्दा बाजूला सारला. धर्मगुरूंच्या शाळेतील ईश्वरविषयक ज्ञान देणारी तत्त्वे स्वीकारण्याचे त्याने नाकारिले. याजक वर्गाच्या दुष्ट प्रथा त्याने उघडकीस आणिल्या आणि त्यांचा प्रभाव पूर्णपणे हाणून पाडला. त्यांच्या प्रथा व नीतिवचने यांच्या परिणामाची हानी केली, आणि म्हटले जरी त्यांनी विधिनियम कडकरित्या अंमलात आणिले तरी त्यांनी देवाचे नियम निरर्थक ठरविले. हे सगळे सैतानाने त्यांच्या दृष्टीस आणून दिले. DAMar 471.3

त्यांची सत्ता कायम राखण्यासाठी ख्रिस्ताचा वध केलाच पाहिजे असे सैतानाने प्रतिपादिले.हा सल्ला त्यांनी अवलंबिला. असलेली त्यांची सत्ता गमावण्याची वेळ आली आहे म्हणून निश्चित निर्णय घेणे आवश्यक आहे असे त्यांना वाटले. जे स्पष्ट बोलण्यास धजत नव्हते त्यांचा अपवाद सोडून धर्मसभेतील बाकी सगळ्यांनी कयफाचे शब्द देवाचे वचन म्हणून स्वीकारिले. सल्लागार मंडळातील तीव्र मतभेद थांबला आणि मानसिक ताण निवळला. प्रथमच योग्य संधि मिळेल तेव्हा ख्रिस्ताचा अंत करण्याचा निर्धार केला. ख्रिस्ताच्या देवत्वाचे प्रमाण झिडकारून याजक व अधिकारी यांनी स्वतःला अभेद्य गडद अंधकारात कोंडून घेतले. ते संपूर्णपणे सैतानाच्या वर्चस्वाखाली आले होते आणि तो त्यांना त्वरा करून निरतंरच्या नाशाकडे नेणार होता. तथापि अशा प्रकारची त्यांची फसवणूक होत असताना ते स्वतःबद्दल धन्यता वाटून घेत होते. राष्ट्राचा उद्धार करण्याचा ते प्रयत्न करीत होते म्हणून ते स्वतःला देशभक्त म्हणून समजत होते. DAMar 472.1

तथापि येशूच्या विरुद्ध अविचारी कृती करण्यास धर्मसभेला धास्ती वाटत होती कारण लोक क्रोधाविष्ट होऊन त्याच्याविरुद्ध आयोजित केलेली हिंसामय कृती आपल्यावरच उलटेल असे त्यांना वाटले. ह्या कारणास्तव जाहीर केलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यास सल्लागार मंडळाने विलंब लावला. याजकांनी आयोजित केलेला कट उद्धारकाला समजला. त्याला दूर करण्यास ते फार उत्सुक होते आणि त्यांचा उद्देश लवकरच साध्य होईल हे त्याला माहिती होते. हा कठीण प्रसंग लवकर यावा ही त्याची इच्छा नव्हती म्हणून त्यावेळेपासून त्या भागातून DAMar 472.2

आपल्या शिष्यांना घेऊन तो दुसरीकडे गेला. अशा प्रकारे स्वतःच्या उदाहरणाने शिष्यांना दिलेली शिकवण अंमलात आणली, “जेव्हा एका गावात तुमचा छळ करितील तेव्हा दुसऱ्यात पळून जा.’ मत्तय १०:२३. लोकांच्या उद्धारासाठी कार्य करण्यास विस्तीर्ण क्षेत्र आहे; आणि त्याच्याशी एकनिष्ठ असल्याशिवाय देवाच्या दासांनी आपला जीव धोक्यात घालायचा नव्हता. DAMar 472.3

आतापर्यंत येशूने जगासाठी तीन वर्ष सेवा कार्य केले. स्वार्थत्याग आणि परोपकारबुद्धी याबाबतीत त्याचे उदाहरण त्यांच्यासमोर ताजे होते. त्याच्या जीवनातील पावित्र्य, दु:ख आणि चिंतन सर्वांना ज्ञात होते. तथापि हा तीन वर्षाचा अल्पकाळ जगात तारणाऱ्याची उपस्थिती टिकेल इतका दीर्घकाळ होता. DAMar 472.4

छळ आणि अपमान नालस्ती यांनी ख्रिस्ताचे आयुष्य भरले होते. मत्सराने भरलेल्या राजाने बेथहेलेमधून हाकलून देण्यात आलेला, नासरेथ येथे त्याच्या स्वतःच्या लोकांनी धिकारिलेला, कारणाशिवाय यरुशलेम येथे देहदंड देण्यात आलेला येशू याने आपल्या थोड्या विश्वासू शिष्यासहित अपरिचित शहरात तात्पुरता आश्रय घेतला. मनुष्यांच्या दुःखांचा ज्याला कळवळा आला, ज्याने रोग्यांना बरे केले, अंधाना दृष्टी दिली, बहिऱ्यांना श्रवणशक्ती दिली, मुक्यांना वाचा दिली, भुकेलेल्यांना खाऊ घातले आणि दुःखीतांचे समाधान केले, त्याला ज्यांच्या उद्धारासाठी त्याने कष्ट केले त्यांच्यापासून हाकलून दिले. जो मोठ्या लाटावरून चालला आणि त्यांचा खवळलेला गंभीर ध्वनि शांत केला, ज्याने भूते काढिली आणि निघून जाताना तो देवपुत्र असल्याचे त्यांनी मान्य केले, ज्याने मृताचा निद्रानाश केला, ज्याने आपल्या सूज्ञपणाच्या प्रबोधनाने हजारोंना भारावून टाकिले तो दुराग्रह आणि द्वेष यांनी अंध झालेले आणि हट्टीपणाने ज्यांनी प्रकाशाचा धिक्कार केला त्यांच्या अंतःकरणाला भिडू शकला नाही. DAMar 472.5