Go to full page →

अध्याय ६०—नवीन राज्याचा नियम DAMar 474

मत्तय २०:२०-२८; मार्क १०:३२-४५; लूक १८:३१-३४.

वल्हांडण सण लवकरच येणार होता आणि येशू पुन्हा यरुशलेमाकडे जाण्यास निघाला. पित्याच्या इच्छेशी एकरूप झाल्याची शांती त्याच्या मनात होती आणि उत्सुकतेने तो यज्ञभूमीकडे जलदीने जात होता. परंतु शिष्यांना संशय व भीती वाटून त्याचे कोडे वाटले. उद्धारक “त्यांच्यापुढे चालला होता; तेव्हा ते विस्मित झाले आणि मागोमाग जात असताना त्यांना भीती वाटली.” DAMar 474.1

पुन्हा ख्रिस्ताने बारा जणास जवळ बोलावून पूर्वीपेक्षा अगदी निश्चितपणे त्याचा विश्वासघात व छळ याविषयी विचार मांडले. त्याने म्हटले, “पाहा, आपण यरुशलेमास वर चाललो आहो, आणि मनुष्याच्या पुत्राविषयी ज्या गोष्टी संदेष्ट्यांच्याद्वारे लिहिण्यात आल्या आहेत त्या सर्व पूर्ण होतील; म्हणजे त्याला विदेश्यांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची थट्टा व विटंबना होईल, त्याजवर थुकतील; त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. त्यांस ह्या गोष्टींपैकी काहीच कळले नाही; हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नाहीत.” DAMar 474.2

“स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे’ असे त्यांनी सर्वत्र घोषित केले नव्हते काय? देवाच्या राज्यात आब्राहाम, इझाक व याकोब यांच्यासमवेत पुष्कळ बसतील असे ख्रिस्ताने स्वतः आश्वासन दिले नव्हते काय? त्याच्यासाठी ज्यांनी त्याग केला त्यांना ह्या जीवनात शंभरपट्ट व काही भाग त्याच्या राज्यात देण्यात येईल असे वचन दिले नव्हते काय? आणि बारा जणांना त्याच्या राज्यात विशेष मानाचे पद म्हणजे आसनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करण्याचे विशेष आश्वासान दिले नव्हते काय? आताच त्याने उद्गार काढिले आहेत की त्याच्याविषयी संदेष्ट्याद्वारे लिहिण्यात आले आहे. ते सर्व पूर्ण होईल. आणि मशिहाच्या राज्याच्या वैभवाविषयी संदष्ट्यांनीं भाकीत केले नव्हते काय? ह्या विचारांच्या संदर्भात, विश्वासघात, छळ, आणि मरण यांच्याविषयी त्याचे म्हणणे अंधुक, अस्पष्ट व अनिश्चित वाटले. कोणत्याही अडचणी मध्येच उद्भवल्या तरी लवकरच राज्याची स्थापना होईल असा त्यांचा विश्वास होता. DAMar 474.3

प्रथमच येशूच्या पाठीमागे जाणाऱ्या दोन शिष्यांपैकी जब्दीचा मुलगा योहान होता. त्याच्या सेवेसाठी सर्वांचा त्याग करून त्याच्या मागे जाणाऱ्या पहिल्या गटात तो आणि त्याचा भाऊ याकोब होते. त्याच्याबरोबर राहाण्यासाठी आनंदाने त्यांनी घरदार व मित्रमंडळी यांचा त्याग केला होता. ते त्याच्याबरोबर घरीदारी व जाहीर सभेत बोलत चालत होते. त्याने त्यांची भीती घालवून दिली होती, धोक्यातून त्यांना सोडविले होते, त्यांच्या दुःखाचे त्याने निराकरण केले होते, दुःखपरिहार केला होता, आणि त्यांच्या अंतःकरणाचा त्याच्याशी संयोग होईपर्यंत त्याने त्यांना सहनशिलतेने व मृदु अंतःकरणाने शिकविले होते आणि त्यांच्या प्रेमाच्या उत्कंठेने त्याच्या राज्यात त्याच्या नजीक राहाण्याची त्यांची इच्छा होती. शक्य असलेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेऊन योहानाने उद्धारकाला चिकटून जागा पटाकाविली, आणि याकोबाची तीच विचारसरणी होती. येशूच्या जितक्या जवळ बसता येईल तितक्या जवळ बसण्यास तो उत्सुक होता. DAMar 475.1

त्यांची आई ख्रिस्ताची अनुयायी होती आणि आपल्या धनदौलतीद्वारे तिने त्याची मनमोकळे सेवा केली होती. पुत्राविषयीचे मातेचे प्रेम व महत्त्वाकांक्षा यामुळे नवीन राज्यात आपल्या पूत्रांना मानाचे स्थान मिळावे याविषयी ती फार आतूर होती. त्यासाठी विनंती करण्यास तिने त्यांना प्रोत्साहन दिले. DAMar 475.2

आई आपल्या पुत्राबरोबर येशूकडे आली आणि मनातील इच्छा व्यक्त करून ती मान्य करण्याची विनंती केली. DAMar 475.3

त्याने विचारिले, “मी तुझ्यासाठी काय करावे?” DAMar 475.4

आईने उत्तर दिले, “तुमच्या या माझ्या दोघा मुलातील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा.” इतर शिष्यांच्यापेक्षा स्वार्थी सवलतीच्या मागणीसाठी त्याने त्यांची कानउघडणी न करता प्रेमाने त्यांना वागविले. त्याने त्यांची मने ओळखली. ते त्याला किती बिलगून आहेत हे त्याने पाहिले. त्यांचे प्रेम केवळ मानवाच्या भावनेतून व्यक्त केले नव्हते; जरी ते मानवाच्या जगिक भावनेने कलंकित झाले होते तरी ते त्याच्या स्वतःच्या तारणदायी प्रेम निर्झरातून बाहेर वाहात येत होते. तो त्यांना धमकावणी देणार नाही परंतु अधिक दृढ करून शुद्ध करील. त्याने म्हटले, “जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिववेल काय? व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेववेल काय?” त्याची चौकशी व व्यथा यांचा निर्देश करणारे त्याचे गूढ शब्द त्यांना आठवले, तथापि आत्मविश्वासाने त्यांनी म्हटले, “होय, घेववेल.’ प्रभूला जे काही होईल त्याचा वाटा उचलून आपली एकनिष्ठता सिद्ध करणे हा त्यांचा अत्युच्च मान आहे असे त्यांना वाटत होते. DAMar 475.5

त्याने म्हटले, “जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल.” सिंहासनाऐवजी त्याच्यासमोर वधस्तंभ व त्याचे दोन सोबती लुटारू, एक उजव्या बाजूला व दुसरा डाव्या बाजूला होते. योहान आणि याकोब त्यांच्या गुरूजीच्या दुःख व्यथाचे भागीदार होणार होते. त्यातील एक तरवारीने नाश पावणार होता आणि दुसरा सर्वापेक्षा जास्त दिवस कष्ट, निंदा नालस्ती व गांजवणूक भोगणार होता. DAMar 476.1

तो पुढे म्हणाला, “पण माझ्या उजवीकडे व डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्यांच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्यांच्यासाठी तो आहे.” देवाच्या राज्यात अधिकार पक्षपातीपणाने मिळविता येत नाही. तो कमविता येत नाही आणि जुलमाने स्वीकारिता येत नाही. तो शीलस्वभावाची फलनिष्पति आहे, मुगुट आणि सिंहासन अटी पुया केल्याची चिन्हे आहेत; प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे स्वतःवर विजय संपादन केल्याची चिन्हे आहेत. DAMar 476.2

फार दिवसानंतर त्याच्या दुःखाची भागीदारी करून शिष्य ख्रिस्ताच्या संगतीत आले, तेव्हा प्रभूने त्याचे राज्य नजीक आल्याची शर्त काय आहे ही योहानाला प्रगट केली. ख्रिस्ताने म्हटले, “जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याजवळ बसू देईन; मीही तसा विजय मिळवून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलो.” “जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन; तो तेथून कधी बाहेर जाणारच नाही;... आणि त्यावर माझे नवे नाम लिहीन.’ प्रगटी ३:२१, १२. प्रषित पौलाने लिहिले, “आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखिला आहे; आता राहिले ते हेच की, मजसाठी नीतिमत्वाचा मुकूट ठेविला आहे तो त्या दिवशी नीतिमान न्यायधीश प्रभु मला देईल.” २ तिम. ४:६-८. DAMar 476.3

ह्या पृथ्वीवरील आयुष्यात ज्याने स्वार्थत्यागी प्रीतीमध्ये आयुष्य कंठिले आहे तो ख्रिस्ताजवळ बसेल, राहील. - “तो प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही, ... स्वार्थ पाहात नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही.’ १ करिंथ. १३:४, ५. मानवतेच्या उद्धारासाठी सर्व काही देण्यासाठी, जगण्यासाठी, कष्ट करण्यासाठी आणि मरण आले तरी स्वार्थत्याग करण्यासाठी ज्या प्रीतीने आपल्या प्रभूला प्रेरणा झाली त्या प्रीतीने शिष्यांची भावना जागृत झाली पाहिजे. पौलाच्या जीवनामध्ये ही प्रवृती व्यक्त झाली होती. त्याने म्हटले, “कारण मला तर जगणे हे ख्रिस्त; कारण त्याच्या जीवनाने लोकांना ख्रिस्त प्रगट झाला: “आणि मरणे हे लाभ आहे.” - ख्रिस्ताला लाभ; मरणाद्वारे त्याचे कृपासामर्थ्य प्रगट होते आणि त्याच्या जवळ आत्मे एकत्र गोळा होतात. त्याने म्हटले, “जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्याद्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल.” फिलि. १:२१, २०. DAMar 476.4

याकोब व योहान यांच्या विनंतीविषयी बाकीच्या दहा जणांनी ऐकिले तेव्हा ते फार संतापले, नाखूष झाले. प्रत्येकजण देवाच्या राज्यात उच्च स्थान पटकावण्याच्या मनस्थितीत होता आणि ह्या दोघांनी त्या बाबतीत त्यांच्यावर मात केली असे समजून ते संतापले. DAMar 476.5

श्रेष्ठ कोण असणार हा वाद पुन्हा उपस्थित झाला, त्यानंतर संतापलेल्या शिष्यांना जवळ बोलावून येशूने म्हटले, “विदेश्यावर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात व मोठे लोकही अधिकार करितात, हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्हामध्ये तसे नसावे.’ DAMar 477.1

जगातील राज्यामध्ये अधिकार म्हणजे स्वतःचा फाजील उत्कर्ष होय. अधिकारी लोकांच्या हितासाठी लोकांचे अस्तित्व आहे अशी भावना लोकांची होती. दबाव, धनदौलत, शिक्षण अशा प्रकारे अनेक मार्गांनी पुढाऱ्यांच्या कल्याणासाठी जनसमाजावर अधिकार गाजविला जात होता. उच्च वर्णीय बुद्धिजीवी असून ते निर्णय घेत व आनंदाने अधिकार गाजवीत आणि खालच्या वर्गाचे लोक आज्ञा पाळून सेवा करीत. इतर सर्व गोष्टीप्रमाणे धर्म अधिकाराच्या कक्षेतला होता. मानव या नात्याने मनुष्याचा आचार विचाराचा हक्क मानण्यात येत नव्हता. DAMar 477.2

ख्रिस्त आपले राज्य वेगळ्या तत्त्वावर प्रस्थापित करीत होता. अधिकार गाजविण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आणि समर्थांनी दुर्बलांची निगा करण्यासाठी त्याने लोकांना पाचारण केले. अधिकार, सत्ता, कौशल्य, विद्या, शिक्षण असणाऱ्यांनी त्यांच्या बांधवाची सेवा करावी. ख्रिस्ताच्या कनिष्ठातील कनिष्ठ शिष्यांना म्हटले आहे, “सर्व काही तुम्हाकरिता आहे.” २ करिंथ. ४:१५. DAMar 477.3

“मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव द्यावयास आला.’ ख्रिस्ताने शिष्यांची काळजी वाहून त्यांचा दुःखपरिहार केला. त्यांच्या दारिद्राचा तो भागीदार झाला, त्यांच्यासाठी त्याने स्वनाकार केला, त्यांच्यासाठी पुढे जाऊन खडतर मार्ग त्याने सोपा केला आणि लवकरच या पृथ्वीवरील कार्य आपला प्राण देऊन तो पूर्ण करणार होता. ज्या तत्त्वावर ख्रिस्ताने कृती केली ते त्याच्या शरीराला म्हणजे मंडळीतील सभासदांना कृती करण्यास प्रोत्साहन देईल. तारणाचा पाया आणि संकल्पना प्रीती आहे. ख्रिस्ताच्या राज्यात, त्याने घालून दिलेले उदाहरण अवलंबविणारे व त्याच्या कळपासाठी मेंढपाळाची जबाबदारी पार पाडणारे श्रेष्ठ आहेत. DAMar 477.4

ख्रिस्ती जीवनाचे खरे मोठेपण, माननीयता व सन्मान पौलाच्या शब्दात व्यक्त करण्यात आले: “मी सर्वापासून स्वतंत्र असताही अधिक लोक प्राप्त करून घेण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे.” “त्यांचे तारण व्हावे एतदर्थ स्वहित न पाहाता बहुतांचे हित पाहातो.’ १ करिंथ. ९:१९; १०:३३. DAMar 477.5

सदसद्विवेकाच्या बाबतीत कोणावरही बंधन आणिले नसले पाहिजे. कोणीही दुसऱ्याच्या मनावर नियंत्रण आणू नये, दुसऱ्याचा न्याय करू नये किंवा त्याचे कर्तव्य काय आहे हे अधिकाराने सांगू नये. देव प्रत्येक व्यक्तीला विचार स्वातंत्र्य व स्वतःच्या खात्रीप्रमाणे वागण्याची मोकळीक देतो. “आपणातील प्रत्येकजण स्वतःचा हिशेब देवाला देईल.” स्वतःचे व्यक्तित्व दुसऱ्याच्यामध्ये विलिनीकरण करण्याचा अधिकार कोणालाही नाही. जेथे तत्त्वाचा संबंध येतो तेथे “प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खातरी करून घ्यावी.” रोम १४:१२, ५. ख्रिस्ताच्या राज्यात उमरावासारखा जुलूम नाही आणि शिष्टाचाराची सक्ती नाही. स्वर्गीय देवदूत पृथ्वीवर अधिकार गाजविण्यास आणि बळजबरीने सत्कार करून घेण्यास येत नाहीत, परंतु दयेचे संदेशवाहक म्हणून मानवतेच्या उन्नतीकार्यात मनुष्यांना सहकार्याचा हात देण्यासाठी येतात. DAMar 477.6

उद्धारकाची दिलेली शिकवण आणि तत्त्वे त्यांच्या दिव्य सौदर्यासह प्रिय शिष्यांच्या स्मरणात राहिली. अलीकडेच योहानाने मंडळीला दिलेल्या साक्षीचे ओझे असे होते की, “जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की आपण एकमेकावर प्रीती करावी.” “त्याने आपल्याकरिता स्वप्राण अर्पिला यावरून आपल्याला प्रीतीचे ज्ञान झाले आहे; म्हणून आपणही आपल्या बंधूकरिता स्वप्राण अर्पिला पाहिजे.” १ योहान ३:११, १६. DAMar 478.1

आरंभीच्या मंडळीमध्ये ही भावना सर्वत्र भिनलेली होती. पवित्र आत्म्याच्या वर्षावानंतर, “विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणी आपल्या मालमत्तेतील काही आपले आहे असे म्हणत नसे.” “त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते.” “प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभु येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वावर मोठी कृपा होती.” प्रेषित. ४:३२, ३४, ३३. DAMar 478.2