Go to full page →

अध्याय ६१—जक्कय DAMar 479

लूक १९:१-१०.

येशू यरुशलेमाला जात असताना वाटेत यरीहोला भेट देऊन पुढे गेला. यार्देनपासून काही मैलाच्या अंतरावर दरीच्या पश्चिम किनाऱ्यावर मोठे पठार पसरलेले आहे आणि त्या ठिकाणी उष्ण कटिबंधातील हिरवळीच्या नयनरम्य सौंदर्यात हे शहर वसलेले आहे. जीवंत झऱ्याच्या पाण्यावर पोषलेले वृक्ष आणि बागा चुनखडी दगडाच्या टेकड्या आणि ओसाड खिंड यांच्यामध्ये हिरव्या पाचाप्रमाणे चमकत होत्या. आणि ते यरुशलेम आणि पठारावरील शहर यांच्यामध्ये आले होते. DAMar 479.1

सणासाठी जाणाऱ्या अनेक तांड्याना यरीहो शहरातून जावे लागत असे. ते नेहमी सणाच्या वेळी येत असत परंतु आता लोकांच्या जिज्ञासा वाढल्या होत्या. लाजारसाला अलिकडेच मरणातून उठविलेला गालीली धर्मगुरू त्या जमावात होता असे समजले होते. याजकांच्या कटाविषयी कुजबुजणे नेहमीचेच जरी होते तरी लोकसमुदाय त्याचा सत्कार करण्यास फार उत्सुक होते. DAMar 479.2

प्राचीन काळामध्ये यरीहो शहर याजकांच्यासाठी राखून ठेविले होते त्यामुळे मोठ्या संख्येने याजकांनी तेथे घरे बांधिली होती. परंतु शहरात विविध प्रकारचे लोक राहात होते. ते व्यापार धंद्याचे, वहातुकीचे मोठे केंद्रस्थान होते आणि रोमी अधिकारी, आणि शिपायी परकी लोकाबरोबर तेथे दिसत असत. जकात कर गोळा करण्यासाठी तेथे पुष्कळ जकातदार राहात होते. DAMar 479.3

“मुख्य जकातदार” यहूदी असून त्याचे देशवाशीय तिरस्कार करीत होते. तो जकात अधिकारी श्रीमंत होता. तथापि तो जगाप्रमाणे निष्ठूर नव्हता. जरी तो वरून ऐहिक वृत्तीचा आणि अहंकारी वाटत होता तरी त्याचे अंतःकरण दिव्य परिणामासाठी कोमल होते. जक्कयाने येशूविषयी ऐकिले होते. ह्या निषेध केलेल्या लोकाकडे दयेने व सभ्यतेने वागणाऱ्याविषयी बातमी चोहोकडे पसरली होती. ह्या मुख्य जकातदाराच्या अंतःकरणात सात्विक जीवन जगण्याची उत्कंठा जागृत झाली. यरीहोपासून काही मैल असलेल्या यार्देन नदीवर बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने उपदेश केला होता आणि पश्चात्तापाचे पाचारण त्याने ऐकिले होते. “तुम्हास जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका” (लूक ३:१३), हा जकातदारांना दिलेला आदेश बाह्यरित्या झिडकारला होता तरी त्याचा त्याच्या मनावर परिणाम झाला होता. त्याला शास्त्रबोध ज्ञात होता आणि त्याची संवय चुकीची होती अशी त्याची खात्री झाली होती. महान गुरूपासून हे शास्त्रवचन आलेले आहे हे ऐकून तो देवासमोर पापी आहे असे त्याला वाटले. तथापि येशूविषयी जे ऐकिले होते त्याद्वारे त्याच्या अंतःकरणात आशा प्रदीप्त झाली. अनुतप्त, परिवर्तनाचे जीवन त्यालासुद्धा शक्य होते. जकातदार नवीन गुरूजीचा निष्ठावंत, भरवशाचा एक शिष्य नव्हता काय? मनाची खात्री झाली त्याप्रमाणे तत्क्षणी जक्कयाने वागण्यास सुरूवात केली आणि अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल त्यांची भरपाई करण्याचे ठरविले. DAMar 479.4

हे विचार त्याच्या मनात घोळत होते त्याचवेळी येशू शहरात प्रवेश करीत आहे ही बातमी पसरली. जक्कयाने त्याला पाहाण्याचा निश्चय केला. पापाची फळे किती कडू आहेत आणि चुकीचा मार्ग सोडून परत माघारी फिरणे किती कठीण आहे हे त्याला आता समजून येत होते. चुकांची दुरुस्ती करण्याच्या प्रयत्नाबाबत गैरसमज करून घेणे आणि संशय किंवा अविश्वास सहन करणे फार कठीण होते. ज्याच्या शब्दाद्वारे त्याच्या अंतःकरणात आशा उद्दिप्त झाली आहे त्याचे दर्शन घेण्यास मुख्य जकातदार फार उत्कंठित होता. DAMar 480.1

रस्ते गर्दीने भरून गेले होते आणि जक्कय ठेंगणा असल्यामुळे लोकांच्या डोक्यावरून तो काही पाहू शकत नव्हता. त्याला पुढे जाण्यास कोणी वाट देत नव्हते म्हणून तो समुदायाच्या पुढे धावत जाऊन रस्त्यावर दूरवर पसरलेल्या उंबराच्या झाडाच्या फांदीवर चढून बसला आणि तेथून चाललेल्या मिरवणुकीचे दर्शन त्याला चांगले होत होते. गर्दी जवळ येऊन लवकरच पुढे निघून जात होती आणि जक्कय अति उत्सुकतेने अपेक्षित व्यक्तीला निरखून पाहाण्याचा प्रयत्न करीत होता. DAMar 480.2

याजक व धर्मपुढारी यांचा गोंगाट, गलबला आणि लोकसमुदायाच्या सत्काराची गर्जना यांच्यामध्ये मुख्य जकातदाराची न उद्गारलेली तीव्र इच्छा येशूच्या अंतःकरणाला बोलली. आकस्मात उंबराच्या झाडाखाली घोळका थांबतो, पुढचे आणि मागचे लोक गतिशून्य होतात आणि एकजण वर पाहातो आणि त्याच्या नजरेत एक व्यक्ती भरते. आपल्या ज्ञानेद्रियांवर त्याचा विश्वास बसेना आणि झाडावरील मनुष्य वाणी ऐकतो, “जक्कय, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे.’ DAMar 480.3

समुदायाने त्याला वाट करून दिली आणि जक्कय स्वप्नात असल्यासारखे घरच्या रस्त्याने मार्ग काढितो. परंतु धर्मगुरू कपाळाला आट्या घालून व डोळे वटारून पाहातात आणि तिरस्काराने व असंतुष्टतेने कुरकुर करून म्हणतात, “पापी मनुष्याच्या घरी हा अतिथी म्हणून उतरावयास गेला आहे.” DAMar 480.4

ख्रिस्ताने मोठेपणा सोडून खालच्या थरावर जाऊन जे प्रेम व अनुग्रह दाखविला त्यामुळे जक्कय अगदी भारावून गेला, आश्चर्यचकित झाला आणि गप्प राहिला. आता नवीन लाभलेल्या गुरूजीवरील प्रेम व निष्ठा यामुळे त्याचे तोंड उघडले. तो त्याची पापकबुली आणि अनुतप्त वृत्ती जाहीर करील. DAMar 481.1

लोकसमुदायाच्या समोर “जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्रास देतो; आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करितो.” DAMar 481.2

“येशूने त्याला म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही आब्राहामाचा पुत्र आहे.” DAMar 481.3

श्रीमंत तरुण अधिकारी येशूपासून निघून गेल्यावर त्यांच्या गुरूजीने केलेल्या विधानामुळे शिष्यांना अचंबा वाटला. त्याने म्हटले, “देवाच्या राज्यात श्रीमंताचा प्रवेश होणे किती कठीण आहे!” ते एकमेकास विचारू लागले “तर मग कोण तारले जातील?” ख्रिस्ताने बोललेल्या सत्याचे प्रमाण त्यांच्यापुढे होते, “मनुष्यांना जे अशक्य आहे ते देवाला शक्य आहे.” मार्क १०:२४, २६; लूक १८:२७. देवाच्या कृपेने श्रीमंत मनुष्य देवाच्या राज्यात जाऊ शकतो ते त्यांनी पाहिले. DAMar 481.4

जक्कयाने ख्रिस्ताचे दर्शन घेण्याअगोदर त्याच्या अंतःकरणावर कार्याला सुरूवात झाली होती त्यामुळे तो खरा पश्चात्तापी दिसला. त्याला मनुष्यांनी दोष देण्याअगोदर त्याने आपली पापे कबूल केली होती. पवित्र आत्म्याच्याद्वारे झालेल्या खात्रीप्रमाणे तो शरण गेला होता आणि प्राचीन इस्राएल लोकांसाठी व त्यांच्यासाठी जी शिकवण देण्यात आली होती ती पाळण्यास त्याने सुरूवात केली होती. फार प्राचीन काळी देवाने म्हटले आहे, “तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याचा हात चालेना असे तुला दिसले तर तू त्यास आधार द्यावा. परदेशीयाप्रमाणे अथवा उपऱ्याप्रमाणे तो तुझ्याजवळ राहील. त्याजपासून वर्ताळा अथवा व्याज घेऊ नकाः आपल्या देवाचे भय धरून आपल्यापाशी आपल्या भाऊबंदास राहू दे. तू आपला पैसा त्याला व्याजाने देऊ नको, किंवा आपला दाणागोटा त्याला वाढी दिढीने देऊ नको.” “तुम्ही एकमेकांचा अन्याय करू नये, तर आपल्या देवाचे भय बाळगावे.” लेवी २५:३५-३७, १७. मेघस्तंभाने ख्रिस्ताला पूर्णपणे आच्छादिले होते तेव्हा हे शब्द ख्रिस्ताने काढिले होते, आणि दरिद्री व पीडिलेले यांच्यावर करुणा दाखवून ख्रिस्त प्रीतीला जक्कयाचा प्रथमच प्रतिसाद मिळाला. DAMar 481.5

जकातदारांची एक संघटना होती, त्यामुळे ते लोकांना अत्यंत निष्ठुरतेने, अन्यायाने वागवू शकत होते आणि त्यांच्या ठकबाजीच्या संवयीने एकमेकाला उचलून धरत होते. लोकांची पिळवणूक करून लुबाडणे ही त्यावेळची प्रथा सर्वत्र प्रचलित होती आणि तेही त्यामध्ये गुंतले होते. त्यांचा निषेध करणारे याजक व धर्मगुरू, पवित्र पाचारणाच्या नावाखाली, अप्रामाणिक संवयीने स्वतःला गबर करून घेत होते. परंतु जक्कय पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली ज्या क्षणाला आला त्यावेळेपासून त्याने अप्रामाणिकपणाच्या संवयी सोडून दिल्या. DAMar 481.6

सुधारणा घडवून न आणणारा पश्चात्ताप अविश्वसनीय आहे. ख्रिस्ताची धार्मिकता, कबूल न केलेले आणि त्याग न केलेले पाप झाकून ठेवणारा बुरखा नाही. ते जीवनाचे मूलभूत तत्त्व आहे. ते शीलस्वभावाचे परिवर्तन करिते आणि वर्तणुकीचे सयमन करिते. पावित्र्य म्हणजे देवासाठी समग्र, सर्वच्या सर्व अर्पण करणे होय; अंतःकरणात बसत असलेल्या स्वर्गीय मूलभूत तत्त्वांना जीवनाची व मनाची संपूर्ण शरणागति होय. DAMar 482.1

ख्रिस्त ज्या प्रकारे धंदा करील त्याप्रकारे ख्रिस्ती माणसाने आपला धंदा या जगात करावा. प्रत्येक व्यवहारात देव त्याचा गुरूजी आहे हे दाखविले पाहिजे. पावती पुस्तके, पक्की खतावणी, नोंद वही, जमाखर्चाची वही आणि व्यवहाराच्या प्रत्येक बाबीवर “परमेश्वरा प्रित्यर्थ पवित्र” हे शब्द लिहावे. जे स्वतःला ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून संबोधितात आणि अधर्माने व्यवहार करितात ते पवित्र, न्यायी व दयाळू देवाच्या शिलस्वभावाविषयी खोटी साक्ष देतात. जीवनाचे परिवर्तन झालेला प्रत्येक आत्मा, जक्कयाप्रमाणे, जीवनात ठाण मांडून बसलेल्या अधार्मिक संवयीची हक्कालपट्टी करून अंतःकरणात ख्रिस्ताने प्रवेश केल्याचे प्रसिद्ध करील. मुख्य जकातदाराप्रमाणे भरपाई करून आपल्या खरेपणाबद्दल प्रमाण देईल. प्रभु म्हणतो, “जर दुर्जन गहाण परत करील, हरण केलेले परत देईल आणि काही एक अधर्म न करिता जीवनाच्या नियमाप्रमाणे चालेल... तर त्याने केलेली सर्व पातके त्याच्या हिशोबी धरली जाणार नाहीत; ... निश्चित तो जगेलच.’ यहज्के. ३३:१५, १६. DAMar 482.2

धंदा करीत असताना एकाद्या अन्यायी व्यवहाराने कोणाला दुखवले असेल, सौदा करिताना चकविले असेल किंवा एकाद्या माणसाला, कायद्यात बसत असतांनासुद्धा, फसविले असेल तर आम्ही आमच्या चुका कबूल करून शक्तीप्रमाणे भरपाई करावी. जे घेतले त्याचीच भरपाई करावी असे नाही तर आमच्या ताब्यात असलेल्या कालावधीत त्याचा इष्ट उपयोग केला असता तर जो फायदा झाला असता त्याचाही विचार करणे क्रमप्राप्त आहे. DAMar 482.3

उद्धारकाने जक्कयाला म्हटले, “आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. केवळ जक्कयालाच कृपाप्रसाद मिळाला नव्हता तर त्याच्याबरोबर त्याच्या सर्व घराण्याला. त्याला सत्याचे धडे देण्यासाठी आणि त्याच्या राज्याच्या गोष्टीविषयी त्याच्या घराण्याचे प्रबोधन करण्यासाठी ख्रिस्त त्याच्या घरी गेला. धर्मपुढारी व भावीकजन यांच्या तिटकाऱ्यामुळे त्यांना मंदिराबाहेर ठेवण्यात आले होते; परंतु आता ते सबंध यरीहोमध्ये भरपूर कृपाप्रसाद पावलेले घराणे असून ते स्वतःच्या घरात दिव्य गुरूजीच्या चरणी बसून जीवनी वचन ऐकत होते. DAMar 482.4

व्यक्तिशः तारणारा म्हणून ख्रिस्ताचा स्वीकार केल्यावर आत्म्याला तारण लाभते. वाटसरू पाहुणा म्हणून नव्हे तर अंतःकरणरूपी मंदिरात वस्ती करणारा म्हणून जक्कयाने ख्रिस्ताचा स्वीकार केला. शास्त्री आणि परूशी यांनी पापी म्हणून त्याला दोष दिला, त्याचा तो अतिथी झाला म्हणून त्यांनी ख्रिस्ताविरुद्ध कुरकूर केली, परंतु प्रभूने त्याला आब्राहामाचा पुत्र मानिले. कारण “जे विश्वासाचे तेच आब्राहामाचे पुत्र आहेत.” गलती. ३:७. DAMar 483.1