Go to full page →

अध्याय ८०—योसेफाच्या कबरेत DAMar 667

शेवटी येशूला विश्रांति मिळाली. फार मोठा मानभंगाचा व छळाचा दिवस संपला. सूर्यास्ताच्या समयी शब्बाथाला सुरुवात झाली होती. योसेफाच्या कबरेत देवपुत्र आराम घेत होता. त्याचे काम संपले, त्याच्या मनाला शांती लाभली, शांत चित्ताने त्याने हात जोडले. शब्बाथाच्या पवित्र वेळेत त्याने विश्रांति घेतली. DAMar 667.1

प्रारंभी उत्पत्तिकार्याच्या शेवटी पिता व पुत्र यांनी शब्बाथ दिवशी विसावा घेतला. “याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व वस्तुगण ही सिद्ध झाली” (उत्पत्ति २:१) तेव्हा निर्माण कर्ता आणि स्वर्गातील सर्व गणांनी ते दृश्य पाहून हर्ष केला. “त्या समयी प्रभात नक्षत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी जयजयकार केला.” ईयोब ३८:७. आता येशूने उद्धारकार्यापासून विसावा घेतला; आणि जरी पृथ्वीवरील त्याच्या श्रद्धावंतामध्ये दुःखाची छटा होती, तथापि स्वर्गात मोठा उल्लास होता. स्वर्गीय गणाच्यापुढे भावी अभिवचन दिसत होते. उत्पत्तीची पुनर्रचना, पापावर विजयी झालेली आणि पुनरपि पतन न पावणारी उद्धारलेली मानवजात हे सर्व ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या कार्याचे फलित देव आणि दिव्यदूतांनी पाहिले. ख्रिस्ताने विश्रांती घेतलेल्या दिवसाचा ह्या दृशांशी निरंतरचा संबंध जोडलेला आहे. कारण “त्याची कृती अव्यंग आहे,” आणि “देव जे काही करितो ते सर्वकाळ राहाणार.” अनुवाद ३२:४; उपदे. ३:१४. “ज्याविषयी आरंभापासून देवाने आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितले त्या सर्वांचे यथास्थित होण्याच्या काळपर्यंत” (प्रेषित ३:२१), ज्या शब्बाथ दिवशी येशूने योसेफाच्या कबरेत विश्रांति घेतली तो सतत विसाव्याचा आणि हर्षाचा दिवस राहील. “एका शब्बाथापासून दुसऱ्या शब्बाथापर्यंत भजनपूजन करण्यासाठी स्वर्ग व पृथ्वी संघटीत होतील. (यशया ६६:२३). वधस्तंभाच्या दिवशी अखेरच्या घटनेमध्ये भाकीताच्या पूर्णतेविषयी नवीन पुरावा देण्यात आला होता आणि ख्रिस्ताच्या देवत्वाविषयी नवीन साक्ष देण्यात आली. वधस्तंभावरील अंधार काढून घेण्यात आला होता आणि उद्धारकाने प्राण सोडण्याच्या वेळी आरोळी मारल्यानंतर लगेचच दुसरी वाणी ऐकिली ती म्हणाली, “खरोखर हा देवाचा पुत्र होता.’ मत्तय २७:५४. DAMar 667.2

हे शब्द कुजबुजलेले नव्हते. ते कोठून आले हे पाहाण्यासाठी सर्व नेत्र लागले. कोणी हे उद्गार काढिले? तो रोमी जमादार होता. उद्धारकाचा दिव्य सोशिकपणा आणि त्याचे आकस्मात मरण व त्यावेळी काढलेले विजयाचे उद्गार ह्याचा छाप ह्या विधर्मी अधिकाऱ्यावर पडला होता. वधस्तंभावर लटकलेल्या जखमी व खरचटलेल्या शरीरामध्ये जमादाराने देवपुत्राचे रूप पाहिले. त्याच्यावर विश्वास प्रगट केल्याशिवाय त्याला राहावले नाही. त्याच्या मरणाच्या दिवशी, परस्परापासून भिन्न असलेल्या तीन मनुष्यांनी आपला विश्वास घोषीत केला. रोमी रखवालदाराचा जमादार, उद्धारकाचा वधस्तंभ वाहाणारा आणि त्याच्या एका बाजूला वधस्तंभावर मरण पावलेला असे ते तीन. DAMar 667.3

सायंकाळ झाल्यावर कॅलव्हरीवर फार शांतता राहिली. जमाव निघून गेला आणि सकाळच्या मनोवृत्तीत बदल झालेले अनेकजन यरुशलेमला परतले. जीज्ञासामुळे पुष्कळजण वधस्तंभाजवळ जमले होते, ख्रिस्ताविषयी त्यांच्याठायी द्वेषबुद्धी नव्हती. तरीपण याजकाच्या आरोपावर त्यांनी विश्वास ठेविला आणि ख्रिस्ताला गुन्हेगार समजले. गोंधळ गडबडीमध्ये ते त्याच्यविरुद्ध जमावामध्ये सामील झाले होते. परंतु पृथ्वीवर निबिड अंधार पडल्यावर आणि स्वतःची विवेक बुद्धी त्यांना दोष देऊ लागली तेव्हा महान चुकीबद्दल त्यांना अपराधी वाटू लागले. भयभीत झाल्यामुळे निंदा टवाळीचे शब्द त्यांच्या मुखातून निघाले नाहीत. अंधार निघून गेल्यावर अगदी शांतरित्या ते आपल्या घरी गेले. याजकांचे आरोप खोटे होते ख्रिस्त ढोंगी नव्हता अशी त्यांची खात्री झाली. काही आठवड्यानंतर पन्नासाव्या दिवशी पेत्राने उपदेश केला तेव्हा मन परिवर्तन झालेल्या हजारोमध्ये ते होते. DAMar 668.1

पाहिलेल्या घटनेद्वारे यहूदी पुढाऱ्यामध्ये कसलाही बदल झाला नाही. येशूविषयीचा त्यांचा मत्सर कमी झालेला नव्हता. वधस्तंभाच्या समयी पृथ्वीवर जो अंधकार पडलेला होता तो याजक व अधिकारी यांच्या मनावर पडलेल्या अंधकारापेक्षा निबिड नव्हता. त्याच्या जन्माच्या वेळी ताऱ्याला ख्रिस्ताचे ज्ञान होते आणि त्याने मागी लोकांना गायीच्या गोठ्याकडे नेले. स्वर्गीय गणाला त्याची माहिती होती आणि वाणी ज्ञात होती आणि त्याचा हुकूम त्याने पाळिला. रोगराई आणि मृत्यू यांनी वाणी ओळखली आणि त्याला ते वश झाले. सूर्याला त्याची ओळख होती आणि त्याच्या मृत्यूच्या समयी त्याने आपला प्रकाशीत चेहरा झाकून ठेविला. खडकांना त्याच्याविषयी ज्ञान होते आणि त्याच्या आरोळीबरोबर ते कंप पावून फुटले. निर्जीव वस्तूंना ख्रिस्ताची ओळख होती आणि त्याच्या देवत्वाविषयी त्यांनी साक्ष दिली. परंतु याजक आणि अधिकारी याना देवपुत्र माहीत नव्हता. DAMar 668.2

तथापि याजक व अधिकारी यांच्या अंतःकरणाला शांती नव्हती. ख्रिस्ताचा वध करून त्यानी आपला उद्देश साध्य करून घेतला होता; परंतु त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना यश प्राप्ती झाल्याचे वाटले नव्हते. यशप्राप्ती झाल्यावरसुद्धा पुढे काय होणार हा साशंक विचार त्यांना ग्रासीत होता. “पूर्ण झाले आहे’ ही वाणी त्यांनी ऐकिली. “हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.योहान १९:३०; लूक २३:४६. खडक फुटलेले आणि मोठा भूमिकंप झालेला त्यांनी पाहिला होता आणि त्यामुळे ते बेचैन व अस्वस्थ झाले होते. DAMar 668.3

जीवंत असतांना लोकावर ख्रिस्ताची पडलेली छाप पाहून त्यांना मत्सर वाटत होता; आणि मरणातसुद्धा त्यांना त्याचा मत्सर होता. जीवंत असलेल्या ख्रिस्तापेक्षा मरण पावलेल्या ख्रिस्ताची त्यांना तीव्र दहशत वाटत होती. वधस्तंभावर घडलेल्या गोष्टीकडे लोकांचे लक्ष वेधले गेले हे पाहून त्यांना अधिक भीती वाटली. त्या दिवशी घडलेल्या घटनेच्या परिणामाची त्यांना धास्ती वाटली. कोणत्याही कारणासाठी त्याचे शरीर वधस्तंभावर राहू नये असे त्यांना वाटत होते. शब्बाथाला सुरुवात होत होती आणि वधस्तंभावर शरीर राहाण्याने त्याचे पावित्र्य विटाळले जाईल असे त्यांना वाटत होते. हे निमित्त पुढे दाखवून यहूदी पुढाऱ्यांनी पिलाताला विनविले की शिक्षा झालेल्यांचा मृत्यू लवकर झाला पाहिजे आणि सूर्यास्ताच्या अगोदर त्यांचे शव तेथून हालविले पाहिजे. DAMar 669.1

त्यांच्याप्रमाणे पिलातालाही वाटत होते की येशूचे शव वधस्तंभावर राहू नये. त्याची संमती घेऊन लवकर मरण होण्यासाठी दोघा लुटारूंचे पाय मोडण्यात आले होते; परंतु येशू अगोदरच मृत झालेला दिसला. ख्रिस्ताचे काय झाले ते पाहून व ऐकून उद्धट शिपायांनी नरम भूमिका घेतली आणि त्याचे पाय मोडण्यापासून स्वतःला आवरले. अशा रीतीने देवाच्या कोंकऱ्याला बळी देण्यात वल्हांडण नियमाची परिपूर्ती झाली. “त्याने त्यातले सकाळपर्यंत काही राखून ठेवू नये व त्याचे हाड मोडू नये; वल्हांडणाच्या सर्व विधीप्रमाणे त्यांनी हा सण पाळावा.” गणना ९:१२. DAMar 669.2

ख्रिस्त मेलेला पाहून याजक व अधिकारी यांनी आश्चर्य केले. वधस्तंभावरील मरण रेंगाळणारे होते; जीव गेल्याशिवाय सांगणे कठीण होते. वधस्तंभावर लटकलेला सहा तासात मेलेला आतापर्यंत कधी ऐकिला नव्हता. येशूच्या मृत्यूची खात्री करून घेण्यासाठी याजकांच्या सूचनेप्रमाणे शिपायाने येशूच्या कुशीत भाला भोसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. हे सर्वांनी पाहिले आणि त्याचा उल्लेख प्रामुख्याने योहानाने केला. त्याने म्हटले, “तरी शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे, त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे ह्यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा. त्याचे हाड मोडणार नाही हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या. शिवाय दुसऱ्याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की, ज्याला त्यांनी विधिले त्याच्याकडे ते पाहातील.’ योहान १९:३४-३७. DAMar 669.3

पुनरुत्थानानंतर याजक व अधिकारी यांनी बतावणी केली आणि म्हटले ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला नाही, फक्त तो बेशुद्ध झाला आणि थोड्या वेळाने त्याला शुद्धी आली. दुसरी बातमी अशी होती की, रक्तमांस असलेले शरीर नाही परंतु त्याच्यासारखेच शरीर थडग्यात ठेवले होते. रोमी शिपायांच्या कृतीने त्यांच्या खोटेपणाचे खंडन झाले. तो अगोदरच मृत झालेला होता म्हणून त्याचे पाय मोडले नव्हते. याजकांचे समाधान होण्यासाठी त्याच्या कुशीत भाला भोसकिला होता. अगोदरच जीव गेला नसता तर ह्या जखमेने ताबडतोब मृत्यू आला असता. DAMar 669.4

भाला भोसकल्याने नाही, किंवा वधस्तंभावरील यातनेने येशूचा मृत्यू झाला नाही. मरणाच्या वेळी उच्च स्वराने ओरडून काढिलेली वाणी” (मत्तय २७:५०; लूक २३:४६), कुशीतून बाहेर पडलेले रक्त व पाणी घोषीत करितात की तो भग्न हृदयाने मरण पावला. मानसिक यातनेने, अपरिमित दुःखाने त्याचे अंतःकरण भग्न झाले होते. जगाच्या पापाने त्याचा वध केला होता. DAMar 670.1

ख्रिस्ताच्या मरणाने शिष्यांच्या आशा आकांक्षा धुळीस मिळाल्या. त्यांनी त्याचे मिटलेले डोळे, खाली वाकलेली मान, रक्ताने माखलेले केस, खिळलेले त्याचे हात आणि पाय पाहिले आणि त्याच्या मानसिक यातनेचे वर्णन करता येत नव्हते. तो मरेल असा शेवटपर्यंत त्यांचा विश्वास नव्हता; तो खरेच मेला आहे असा त्याचा विश्वास नव्हता. दुःखाने ग्रासून गेल्यामुळे ह्या दृश्यासंबंधी त्याने केलेल्या भाकीताविषयी त्यांना स्मरण झाले नाही. त्याच्या बोलामुळे आता त्यांचे समाधान झाले नाही. त्यांना फक्त वधस्तंभ व त्यावरील बळी दिसला. भविष्य त्यांना उदासीन दिसले. त्यांचा येशूवरील विश्वास नष्ट झाला होता. परंतु आतासारखी प्रभूवरील त्यांची प्रीती पूर्वी कधी दिसली नव्हती. आतासारखी त्याची किंमत व त्याच्या सहवासाची गरज पूर्वी कधी वाटली नव्हती. DAMar 670.2

मेल्यानंतर सुद्धा त्याचे शव शिष्यांना फार मोल्यवान वाटले. बहुमानाने त्याची प्रेतक्रिया करावी असे त्यांना वाटले परंतु ते कसे साध्य करावे ते त्यांना समजले नाही. रोमी सरकारविरुद्ध बंड केल्याबद्दल येशूला अपराधी ठरविले होते आणि ह्या गुन्ह्याबद्दल मरणदंडाची शिक्षा झालेल्यांना ठराविक ठिकाणी पुरण्यासाठी जागा राखून ठेविली होती. गालीलीच्या स्त्रियांच्याबरोबर शिष्य योहान वधस्तंभाजवळ थांबला होता. निष्ठूर शिष्यांनी वाटेल तसे त्याचे प्रेत हाताळून त्याला अप्रतिष्ठेने मूठमाती देऊ नये म्हणून ते प्रेताजवळ थांबले, तथापि ते थांबवू शकत नव्हते. यहूदी अधिकाऱ्याकडून त्याबाबतीत मदतीची अपेक्षा नव्हती आणि पिलाताजवळ त्यांची काही प्रतिष्ठा नव्हती. DAMar 670.3

ह्या कठीण प्रसंगी अरिमथाईतील योसेफ आणि निकदेम शिष्यांच्या मदतीसाठी आले. दोघेही धर्मसभेचे सदस्य होते आणि पिलाताचा आणि त्यांचा परिचय होता. दोघेही धनवान व प्रतिष्ठीत होते. येशूला बहुमानाची उत्तरक्रिया द्यावी असा त्यांचा दृढ निश्चय होता. योसेफाने प्रत्यक्ष पिलाताकडे जाऊन येशूचे शव मागितले. येशू खरेच मेला आहे हे प्रथमच पिलाताला समजले. वधस्तंभाच्या बाबतीत उलटसुटल बातम्या त्याच्या कानावर पडत होत्या परंतु ख्रिस्ताच्या मरणाची वार्ता मुद्दाम त्याच्यापासून लपवून ठेविली होती. येशूच्या प्रेताबद्दल शिष्य फसवणूक करतील असा इशारा पिलाताला याजक व अधिकाऱ्यांनी दिला होता. योसेफाची विनंती ऐकल्यावर त्याने वधस्तंभावर पहारा करीत असलेल्या जमादाराला बोलावून येशूच्या मरणाविषयी खात्री करून घेतली. कॅलव्हरी वरील दृश्यांची इतंभूत माहिती करून घेतल्यावर योसेफाने दिलेली माहिती पक्की करून घेतली. DAMar 670.4

योसेफाची विनंती मान्य केली. प्रभूच्या प्रेतक्रियेबद्दल योहान अगदी धास्तीत होता, येशूच्या शरीराबद्दल पिलाताचा हुकूम घेऊन योसेफ परतला होता; आणि निकदेमसने उंची आणि भारी किंमतीचा शंभर पौंड गंधरस व बोळ मृत शरीर कुजू नये म्हणून पेटीत घालण्यासाठी आणिले होते. सबंध यरुशलेममध्ये सर्वात अधिक प्रतिष्ठीत व्यक्तीचा असा मान मरणसमयी कधी मिळाला नसेल. त्यांच्या प्रभूच्या प्रेतक्रियेत हे धनवान त्यांच्याप्रमाणेच इतकी गोडी घेत असलेले पाहून शिष्यांना नवल वाटले. DAMar 671.1

उद्धारक जीवंत असताना योसेफ आणि निकदेम या दोघांनी त्याचा उघडपणे स्वीकार केला नव्हता. तसे केले असते तर ते धर्मसभेचे सदस्य म्हणून राहिले नसते हे त्यांना माहीत होते आणि धर्मसभेतील त्यांच्या वजनामुळे ते त्याला संरक्षण देण्याची आशा बाळगून होते. काही काळ ते त्यामध्ये यशस्वी झाले परंतु कपटी कावेबाज याजकांनी त्यांचा ख्रिस्ताला असलेला पाठिबा पाहून त्यांचे पुढे चालू दिले नाही. त्यांच्या गैरहजेरीत येशूला मरणदंडाची शिक्षा देऊन त्याला वधस्तंभावर खिळण्यास दिले. आता तो मरण पावला होता आणि त्याच्याशी असलेला निकटचा संबंध ते लपवू शकत नव्हते. शिष्य त्याचे उघडपणे अनुयायी असल्याचे व्यक्त करण्यास भीत होते त्याच वेळी योसेफ आणि निकदेम त्यांच्या मदतीस आले. ह्या प्रसंगी धनवान आणि प्रतिष्ठीत माणसांची मदत फार आवश्यक होती. बिचाऱ्या शिष्यांना जे करणे अशक्य होते ते हे उभयता मृत प्रभूला करू शकत होते; आणि बहुअंशी त्यांचे धन आणि मानसन्मान त्यांना याजक व अधिकारी यांच्या द्वेषबुद्धीपासून आवरू शकत होते. DAMar 671.2

वधस्तंभावरून स्वतःच्या हाताने येशूचे शरीर हळूहळू व पूज्यबुद्धीने खाली काढले. जखमांनी भरलेले व विदारक रूप पाहून सहानुभूतीने त्यांच्या डोळ्यातून अश्रु ढळले. खडकात खोदलेली नवीन कबर योसेफाच्या मालकीची होती. ती त्याने स्वतःसाठी राखून ठेविली होती; परंतु ती कॅलव्हरी नजीक होती आणि ती आता येशूसाठी तयार केली. शरीर व निकदेमसने आणलेला मसाला काळजीपूर्वक तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळिला आणि उद्धारकाला नव्या कबरेत ठेवण्यात आले. तेथे तिघा शिष्यांनी छिन्नविच्छिन्न झालेले त्याचे हातपाय सरळ केले आणि जखमी हात छातीवर ठेविले. त्यांच्या प्रिय गुरूजींच्या निर्जीव शरीराला जे करावयाचे ते केलेले पाहाण्यास गालीली स्त्रीया तेथे आल्या होत्या. नंतर मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावलेली त्यांनी पाहिली आणि उद्धारकाला विसावा घेण्यास आत ठेवलेले त्यांनी पाहिले. वधस्तंभाच्या ठिकाणी आणि ख्रिस्ताच्या कबरेजवळ ह्या स्त्रीया शेवटपर्यंत होत्या. सायंकाळ होत होती तरी मग्दालीया मरीया व दुसरी मरीया तेथेच कबरेजवळ रेंगाळत राहिल्या आणि ज्याच्यावर त्यांचे अति प्रेम होते त्याचा मृत्यू पाहून त्या दुःखाने अश्रु ढाळत होत्या. “मग त्या परत गेल्या, ... आणि शब्बाथ दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या.’ लूक २३:५६. DAMar 671.3

दुःखात असलेल्या शिष्यांना तसेच याजक, अधिकारी, शास्त्री आणि लोक यांना त्या शब्बाथाचे केव्हाही विस्मरण होणार नव्हते. तयारीच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शब्बाथाला सुरुवात झाली आहे हे सूचीत करण्यासाठी तुतारीचा नाद होत होता. अनेक शतके वल्हांडणाचा सण पाळिला जात होता, ज्याचे तो दर्शक होता त्याचा दुष्ट लोकांनी वध केला आणि त्याला योसेफाच्या कबरेत ठेविले. शब्बाथ दिवशी मंदिराचे प्रांगण भक्तगणांनी गच्च भरून गेले होते. गुलगुथा या ठिकाणचा मुख्य याजक उपाध्यायाच्या पोषाखात तेथे हजर होता. शुभ्र फेटा घातलेल्या याजकांनी आपापला विधी पार पाडला. पापाविमोचनासाठी गोह्याचे व बकऱ्याचे रक्त सांडल्याबद्दल काहींना मनस्ताप झाला. रूपक प्रति रूपकाशी संघटीत झाल्याचे काहीना भान राहिले नव्हते आणि जगाच्या पापासाठी अनंत यज्ञबली देण्यात आला होता. यापूढे हा विधिसंस्कार करण्यात आता काही अर्थ उरला नाही ह्याची जाणीव त्यांना नव्हती. त्या सोहळ्याच्या वेळी विरोधाचे वातावरण अभूतपूर्व होते. नेहमीप्रमाणे तुतारी आणि इतर वाद्य आणि गाणाऱ्यांचा आवाज मोठा आणि स्पष्ट होता. परंतु आश्चर्यकारक गोंधळ सर्वत्र दृगोचर होता. घडलेल्या अपरिचीत घटनेविषयी एकामागून एक विचारपूस करीत होते. आज तागायत परम पवित्रस्थान अतिक्रमणापासून सुरक्षित ठेविले होते. परंतु आता ते सर्वांना उघडे होते. शुद्ध तागाच्या कापडाचा बेलबुट्टीदार व नकशीदार आणि सोनेरी, जांभळा व किरमिजी रंगाने सुशोभित केलेला पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला होता. ज्या स्थळी यहोवाह प्रमुख याजकाला भेटून आपले वैभव सादर करीत होता ते देवाचे पवित्रस्थान आता सर्वांच्या डोळ्यासमोर उघडे पडले होते. यापुढे देवाने त्याला पवित्र म्हणून मान्यता दिली नव्हती. खिन्नवदनाने, उदासीनतेने व अस्पष्ट अपेक्षेने याजकांनी वेदीसमोर विधिसंस्कार केला. परम पवित्रस्थानातील पवित्र रहस्ये उघडी केल्यामुळे आगामी अरिष्टाने त्यांची अंतःकरणे भीतीने थरकाप झाली. DAMar 672.1

कॅलव्हरील दृश्याचा विचार पुष्कळांच्या मनात घोळत होता. वधस्तंभापासून पुनरुत्थानापर्यंतच्या घटनेवर अनेकजन डोळ्यात तेल घालून अहोरात्र भाकीताचा शास्त्रशोध करीत होते. साजरा करीत असलेल्या सणाचा पूर्ण अर्थ शोधून काढण्यात काहीजन मग्न होते, तर काहीजन येशूने स्वतःविषयी केलेली विधाने खोटी आहेत हे सिद्ध करण्यासाठी गुंतलेले होते. काहीजन दुःखी अंतःकरणाने तो खरा मशीहा आहे ह्याचे पुरावे शोधण्यात निमग्न होते. जरी विविध उद्देशाने शास्त्रशोध चालला होता तरी सर्वांची एकच खात्री झाली होती. ती म्हणजे घडलेल्या घटनेने वधस्तंभावर खिळिलेला जगाचा उद्धारक होता ह्याचे भाकीत प्रत्ययास आले होते. त्या यज्ञयागात भाग घेतलेल्या अनेकांनी यापुढे केव्हाही त्यात भाग न घेण्याचे ठरविले. अनेक याजकांची येशूच्या खऱ्या स्वभावाविषयी खात्री झाली होती. त्यांचे भाकीतावरील शास्त्रसंशोधन व्यर्थ नव्हते, आणि पुनरुत्थानानंतर तो देवपुत्र होता हे त्यांनी कबूल केले. DAMar 672.2

येशूला वधस्तंभावर खिळिलेले पाहिल्यावर निकदेमसला जैतूनाच्या डोंगरावर रात्रीच्या वेळी त्याने केलेल्या प्रवचनातील भाग आठवलाः “जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे; ह्यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवितो त्याला त्याच्याठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” योहान ३:१४, १५. ख्रिस्ताला कबरेत ठेवल्यानंतर त्या शब्बाथ दिवशी निकदेमसला प्रतिबिंब पाडण्याची क्रिया व्यक्त करण्याची संधी होती. त्याच्या मनावर अधिक स्पष्ट प्रकाश पडला होता आणि त्याच्याशी बोललेले ख्रिस्ताचे शब्द गुपित राहिले नव्हते. उद्धारक जीवंत असताना त्याच्याशी संबंध न ठेवल्यामुळे त्याचे भारी नुकसान झाल्याचे त्याला वाटले. कॅलव्हरीवरील घटनेचे त्याला स्मरण झाले. मारेकऱ्यासाठी केलेली ख्रिस्ताची प्रार्थना आणि मरणाच्या लुटारूना दिलेले त्याचे उत्तर धर्मसभेच्या विद्वान सदस्यांच्या अंतःकरणाला बोलत होते. प्राणांतिक दुःखात असलेल्या उद्धारकावर पुन्हा त्याने नजर फेकली; विजेत्यासारखे त्याने काढलेले शेवटचे शब्द “पूर्ण झाले आहे” हे पुन्हा त्याने ऐकिले. कंपायमान झालेली भूमि, आकाशातील गडद अंधार, फाटलेला पडदा, फुटलेले दगड त्याने पाहिले आणि त्याचा विश्वास निरंतरचा प्रस्थापित झाला होता. ज्या घटनेने शिष्यांची आशा धुळीस मिळविली त्याच घटनेद्वारे योसेफ आणि निकदेम यांची ख्रिस्ताच्या देवत्वाविषयी खात्री झाली. दृढ आणि अचल विश्वासाच्या धैर्यामुळे त्यांची भीती नाहीशी झाली. DAMar 673.1

कबरेत ठेवल्यानंतर समुदायाचे अपूर्व लक्ष ख्रिस्ताकडे लागले. नित्याच्या प्रथेप्रमाणे लोकांनी दुखणेकरी व व्याधीग्रस्तांना मंदिराच्या अंगणात आणिले आणि नासरेथकर येशूविषयी कोणी माहिती देईल काय? असे विचारू लागले. ज्याने आजाऱ्यांना बरे केले आणि मृतास जीवदान दिले त्याला शोधण्यासाठी अनकेजन फार दुरवरून आले होते. सर्व बाजूनी आवाज येत होता, रोग बरा करणारा ख्रिस्त आम्हाला पाहिजे! ह्या प्रसंगी महारोग होत असल्याची चिन्हे दिसत असणाऱ्यांना याजकांनी तपासले होते. अनेक पती, पत्नी किंवा मुले यांना तुम्हाला महारोग आहे हे ऐकण्याची पाळी आली होती आणि घरदार सोडून दूर जाऊन अशुद्ध! अशुद्ध! असे शोकग्रस्त उद्गार काढावे लागले होते. महारोग्यांना बरे करण्यासाठी नासरेथकर येशूने केव्हाही नाकार न दिलेले हात आता त्याच्या छातीवर ठेवलेले होते. विनंती मान्य करून निघालेले समाधानाचे शब्द, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो,” (मत्तय ८:३) आता शांत होते. सहानुभूती व दुःख परिहारासाठी अनेकांनी याजक व अधिकारी यांच्याकडे विनवणी केली पण काही फायदा झाला नाही. पुन्हा त्यांच्यामध्ये जीवंत ख्रिस्त असावा अशी त्यांची दृढ इच्छा होती. कळकळीने आणि चिकाटीने ते त्याची मागणी करू लागले. त्यांना हाकलून देऊ शकत नव्हते, परंतु त्यांना मंदिराच्या अंगणातून बाहेर काढिले आणि दुखणेकरी व मरणाला टेकलेल्यांना घेऊन आलेल्या मोठ्या जमावाला आत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यासाठी दरवाज्यात शिपाई ठेवण्यात आले होते. DAMar 673.2

उद्धारकाच्या हस्ते बरे होण्यासाठी आलेले दुःखणेकरी फार निराश झाले होते. शोकग्रस्तांनी रस्ते भरून गेले होते. येशूचा स्पर्श न मिळाल्यामुळे आजारी मरत होते. डॉक्टरांचा सल्ला घेतला पण व्यर्थ. योसेफाच्या कबरेत ठेवलेल्यासारखे कौशल्य राहिले नव्हते. DAMar 674.1

दुःख भोगत असलेल्या शोकग्रस्त रडण्याने, जगातून महान प्रकाश ज्योत विझून गेली होती, अशी खात्री हजारोंच्या मनाची झाली होती. ख्रिस्ताविना पृथ्वी काळीकुट आणि अंधारी होती. “त्याला वधस्तंभावर खिळा, त्याला वधस्तंभावर खिळा’ असे मोठ मोठ्याने ओरडणाऱ्यांना त्यांच्यावर आलेल्या आपत्तीची त्यांना आता जाणीव झाली आणि ज्या आवेशाने “आमच्यासाठी येशूला द्या!” असे म्हणत होते त्या आवेशाने ते आता ओरडतील काय! DAMar 674.2

याजकांनी येशूचा वध केला होता हे लोकांना कळल्यावर त्याच्या मरणाविषयी चौकशी करण्यात आली होती. त्याच्या चौकशीचा अहवाल गुप्त ठेवण्यात आला होता; परंतु तो कबरेत असताना त्याचे नाव हजारोंच्या मुखावर होते, आणि खोट्या चौकशीचा अहवाल आणि याजक व अधिकारी यांचे अमानुष कृत्ये चोहोकडे प्रसिद्ध केले होते. मशीहा विषयीच्या जुना करारातील भाकीताचे स्पष्टीकरण करण्यास विद्वानांनी याजक व अधिकारी यांना सांगितले होते आणि उत्तरादाखल लबाडीची जुळवाजुळव करीत असताना ते अक्कलशून्य वेड्या माणसासारखे बनले. ख्रिस्ताचे दुःख आणि मरण याविषयीच्या भाकीताचे त्यांना स्पष्टीकरण देता आले नाही आणि शास्त्रलेख पूर्ण झाला होता अशी खात्री अनेक विचारपूस करणाऱ्यांची झाली होती. DAMar 674.3

गोड वाटणारा सूड आता याजकांना कडू वाटू लागला होता. लोकांच्या तीव्र निर्भर्त्सनेला त्यांना तोंड द्यावे लागणार हे त्यांना माहीत होते. ख्रिस्ताच्याविरुद्ध ज्यांना त्यांनी चेतविले होते त्यांना त्यांच्या स्वतःच्या लज्जास्पद करणीने धडकी भरली होती. येशू दगलबाज होता असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या याजकांनी केलेला होता; परंतु तो व्यर्थ झाला. लाजारसाच्या कबरेजवळ काहीजन उभे राहून त्याला जीवंत केलेले त्यांनी पाहिले होते. ख्रिस्त स्वतः मरणातून उठेल आणि त्यांच्यासमोर दिसेल ह्या विचाराने त्यांचा थरकाप झाला होता. तो आपला प्राण परत घेण्याकरिता देण्याचे सामर्थ्य त्याच्याठायी आहे असे त्याने म्हटले होते ते त्यांनी ऐकिले होते. “हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसात ते उभारीन.” योहान २:२९ असे म्हटलेले त्यांना आठवले. यरुशलेमाच्या शेवटच्या प्रवासात येशूने शिष्यांना बोललेले शब्द यहूदाने त्यांना सांगितले होतेः “पाहा, आपण वर यरुशलेमेस जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्त्र्यांच्या हाती धरून देण्यात येईल; ते त्याला मरणदंड ठरवतील आणि थट्टा करावयास, फटके मारावयास व वधस्तंभावर खिळावयास त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील; आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल.’ मत्तय २०:१८, १९. हे शब्द ऐकल्यावर त्यांनी थट्टा व टवाळी केली होती. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल असे त्याने म्हटले होते आणि हे पूर्ण होणार नाही असे कोण म्हणेल? हे विचार डोक्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला परंतु ते करू शकले नव्हते. त्यांचा बाप सैतानाप्रमाणे त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेविला आणि त्यांचा कंप सुटला. DAMar 674.4

मनःक्षोभाचा उन्माद आता संपला होता आणि ख्रिस्ताची प्रतीमा त्यांच्या मनात शिरकाव करीत होती. त्यांचे अपशब्द व टवाळकी निमूटपणे सहन करीत त्याच्या शत्रूच्या समोर संथपणे कुरकूर न करता तो उभा होता. त्याची चौकशी आणि वधस्तंभावरील खिळणे या संबंधातील सर्व घटना त्यांच्यापुढे उभे राहिल्या आणि तो देवपुत्र होता अशी त्यांची दृढ खात्री झाली होती. ठरविलेला तो दुसऱ्यांना दोषी ठरविण्यासाठी, शिक्षा झालेला तो दुसऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आणि वधलेला तो त्याच्या मारेकरांच्या वधासाठी न्यायाची मागणी करणारा असा तो कोणत्याही घटकेला त्यांच्यासमोर उभा राहील असे त्यांना वाटले. DAMar 675.1

शब्बाथ दिवशी त्यांनी थोडी विश्रांति घेतली. विटाळण्याच्या भीतीने विधाचा उंबरठा ते ओलांडू शकत नव्हते तथापि ख्रिस्ताच्या शरीराविषयी त्यांनी सभा भरविली. वधस्तंभावर वधलेला मृत्यू आणि कबर यांच्या कचाट्यात राहिला पाहिजे. “मुख्य याजक व परूशी पिलाताकडे जमून म्हणाले महाराज, तो ठक जीवंत असता तीन दिवसानंतर उठेन असे म्हणाला होता ह्याची आम्हास आठवण आहे म्हणून तिसऱ्यापर्यंत कबरेचा बंदोबस्त करावयास सांगावे नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येऊन त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यातून उठला आहे असे लोकास सांगतील; मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल. पिलात त्यास म्हणाला, तुमच्याजवळ पहारा आहे; जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा.’ मत्तय २७:६२-६५. DAMar 675.2

याजकांनी कबर सुरक्षित ठेवण्याची आज्ञा दिली. एक मोठी धोंड कबरेच्या दाराला लाविली. वरून मोठा दोरखंड घेऊन त्यांचा शेवट भक्कम खडकाला मजबूत बांधिला आणि ते रोमी शिक्क्याने शिलबंद करून टाकिले. शील फोडल्याशिवाय धोंड बाजूला सारता येत नव्हती. कबरेच्या सुरक्षितेसाठी शंभर शिपाई पाहाऱ्यासाठी ठेविले होते. ख्रिस्ताचे शरीर ठेवलेल्याच ठिकाणी राखण्याचा याजकांनी अटोकाट प्रयत्न केला. जणू काय कबरेत तो कायमचा राहाणार असा कडक बंदोबस्त शीलबंद करून करण्यात आला होता. DAMar 675.3

दुबळ्या लोकांनी विचारपूस, सल्लामसलत करून योजना आखली. त्यांचे हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरणार हे मारेकऱ्यांना कळले नव्हते. त्यांच्या कृतीने देवाचे गौरव झाले. ख्रिस्ताचे पुनरुत्थान रद्द करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच ते खात्रीदायक सिद्ध करणे होय. जितके अधिक शिपाई बंदोबस्तासाठी ठेवणे म्हणजे त्याच्या पुनरुत्थानाची भक्कम साक्ष देणे होय. ख्रिस्ताच्या मरणाच्या शेकडो वर्षे अगोदर पवित्र आत्म्याने स्तोत्रकाद्वारे घोषीत केले होते, “राष्ट्रांनी दंगल कां माडिली आहे? लोक व्यर्थ योजना का करीत आहेत? परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरले राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र होऊन मसलत करीत आहेत... स्वर्गात जो सिंहासनारूढ आहे तो हसत आहे; प्रभु त्यांचा उपहास करीत आहे.” स्तोत्र. २:१-४. कबरेमध्ये जीवनाच्या प्रभूला डांबून ठेवण्यास रोमी शिपाई व रोमी शस्त्रे असमर्थ, दुर्बल ठरले. त्याच्या सुटकेचा क्षण जवळ आला होता. DAMar 676.1