Go to full page →

अध्याय ८१—“प्रभु उठला आहे” DAMar 677

मत्तय २८:२-४, ११-१५.

आठवड्याच्या पहिल्या दिवसाची रात्र मंद गतीने संपण्याच्या मार्गावर होती. सूर्योदयाच्या अगोदरची अंधारी घटिका आली होती. कबरेत ख्रिस्त अजून बंदिस्त होता. मोठा धोंडा ठेवलेल्या जागी होता; रोमी शिक्का फोडलेला नव्हता; रोमी शिपाई पहारा करीत होते. तेथे अदृश्य पहारेकरी होते. दुष्ट दूतांचे मोठे सैन्य जमा झाले होते. ज्या कबरेत देवपुत्राला ठेविले होते तेथेच ठेवण्यास शक्य असते तर अंधाराच्या सेनापतीने आपल्या भ्रष्ट सैन्याच्या साहाय्याने कबरेवरील शिका मोर्तब कायम राखले असते. परंतु स्वर्गीय सैन्याने कबरेला वेढा दिला होता. बलवान दूतांनी कबरेवर पहारा ठेविला होता आणि जीवनाच्या सेनापतीचे सुस्वागत करण्यासाठी ते थांबले होते. DAMar 677.1

“तेव्हा पाहा, मोठा भूमिकंप झाला; कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला.” देवाचे सर्वांग चिलखत घालून त्याने स्वर्गातील दरबार सोडला होता. देवाच्या वैभवाचे तेजस्वी किरण त्याच्या मार्गावर चमकत होते. “त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले.” DAMar 677.2

याजकांनो व अधिकाऱ्यांनो, आता तुमच्या पहारेकऱ्यांचे बळ कोठे आहे? माणसांच्या शक्तींना कधीही न भिणारे शूर शिपाई तरवार किंवा भाल्याशिवाय आता बंदिवान झाले होते. त्यांनी पाहिलेला चेहरा नाशवंत वीराचा नव्हता; तो प्रभूच्या बलवत्तर वीराचा होता. ज्या पदावरून सैतान च्यूत झाला ते पद भरून काढलेला हा दिव्यदूत होता. बेथलेहेमच्या पठारावर ख्रिस्त जन्माची घोषणा केलेला हा होता. तो आल्यावर भूमी कंप पावली, अंधाराचे सैन्य पळून गेले, आणि धोंड एकीकडे लोटत असताना स्वर्ग पृथ्वीवर आल्यासारखे वाटले. त्याने ती मोठी धोंड गोट्यासारखी बाजूला सारलेली शिपायांनी पाहिले. हे देवपुत्रा बाहेर ये; तुझा पिता तुला बोलावत आहे हे उद्गारही त्यांनी ऐकिले. ख्रिस्त कबरेतून बाहेर आलेला त्यांनी पाहिला आणि त्यावेळी त्याने काढलेले उद्गार, “मी पुनरुत्थान व जीवन आहे’ हे त्यांनी ऐकिले. राजवैभवाने व ऐश्वर्याने बाहेर पडल्यावर दिव्यदूतांच्या सैन्याने आदराने व पूज्यबुद्धीने उद्धारकाचे लवून नमन केले आणि गीत गाऊन स्वागत केले. DAMar 677.3

ख्रिस्ताच्या मरणसमयी भूमिकंप झाला होता आणि विजयी होऊन कबरेतून वर आला आहे तेव्हा पुन्हा भूमिकंप झाला. मरण व कबर यांना पराभूत करून भूमि हादरत असताना, विजा चकमताना आणि मेघाचा गडगडाट होत असताना. ख्रिस्त विजेता म्हणून कबरेतून वर आला. पृथ्वीवर पुन्हा तो येईल तेव्हा तो “भूमिच नाही परंतु आकाशही हालवून देईल.” “भूमि मद्यप्यासारखी झोकाड्या खात राहील व माचाळासारखी झुलत राहील.” “आकाश मोठा नाद करीत सरून जाईल आणि सृष्टितत्त्वे तप्त होऊन वितळतील.” “पृथ्वी व त्यावरील सर्व काही भस्म होऊन जाईल.’ परंतु “परमेश्वर आपल्या लोकांचा आश्रय व इस्राएल लोकांचा दुर्ग होईल.” इब्री १२:२६; यशया २४:२०; ३४:४; २ पेत्र ३:१०; योएल ३:१६. DAMar 678.1

येशूच्या मरणसमयी दुपारच्या वेळी पृथ्वी अंधारात गुंडाळलेली शिपायांनी पाहिली होती; परंतु पुनरुत्थानाच्या वेळी दूतांच्या प्रकाशाने रात्र प्रकाशीत झालेली त्यांनी पाहिली होती आणि स्वर्गातील रहिवाश्यांनी आवेशाने व आनंदाने गाईलेले गीत त्यांनी ऐकले होते. ते गीत असेः सैतान व दुष्ट शक्तीचा तू पाडाव केला आहेस; तू मरणाला विजयात ग्रासून टाकीले आहेस! DAMar 678.2

ख्रिस्त कबरेतून वैभवाने बाहेर पडला आणि रोमी शिपायांनी त्याला पाहिले. ज्याची त्यांनी नुकतेच थट्टा मस्करी केली होती त्याच्या चेहऱ्यावर त्यांचे सर्व लक्ष केंद्रित झाले होते. ह्या वैभवी व्यक्तीमध्ये, त्यांनी न्यायसभेत पाहिलेला आणि ज्याच्या मस्तकावर काट्याचा मुकुट घातलेला तो बंदिवान पाहिला. कसलाही विरोध न करता तो पिलात व हेरोद यांच्यासमोर उभा होता आणि त्याचे रूप निष्ठूर फटके मारून विद्रूप करून टाकिले होते. वधस्तंभावर खिळे मारलेला तो होता. आत्मप्रोढीने माना हालवून याजक व अधिकारी यांनी म्हटले, “त्याने दुसऱ्यांना वाचविले, त्याला स्वतःला वाचविता येत नाही.’ मत्तय २७:४२. योसेफाच्या नव्या कबरेत ठेवलेला तो होता. स्वर्गातील हुकमाने बंदिवानाला मुक्त केले होते. त्याच्या थडग्यावर डोंगरावर डोंगर रचले असते तरी त्याला बाहेर पडण्यास कसलाच अथडळा झाला नसता. DAMar 678.3

वैभवाने सुशोभीत झालेला उद्धारक आणि दिव्यदूतांचा समुदाय यांचे दर्शन झाल्यावर रोमी पहारेकरी थरथर कापून मृतप्राय झाले होते. स्वर्गीय परिवार त्याच्यापासून झाकून घेतला तेव्हा ताबडतोब ते कसे तरी उठले आणि बागेच्या दरवाज्याकडे सरकले. मद्यपीसारखे झोकांड्या देत ते शहराकडे लगबगीने गेले आणि रस्त्यात भेटणाऱ्यांना आश्चर्यकारक वार्ता त्यांनी सांगितली. ते प्रथम पिलाताकडे जात होते परंतु यहूदी अधिकाऱ्यांना हे समजल्यावर प्रमुख याजक व अधिकारी यांनी त्यांना आपल्याकडे प्रथम बोलावून घेतले. शिपायांचा चेहरा विचित्र दिसत होता. भयाने थरकाप झालेल्या व चेहरा उतरलेल्या शिपायांनी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष दिली. पाहिलेले सर्व इतंभूत शिपायांनी त्यांना सांगितले. खऱ्या गोष्टीशिवाय त्यांच्या मनात दुसरा कसलाच विचार आला नव्हता. अगदी दुःखाने त्यांनी उद्गार काढिले, देवपुत्राला वधस्तंभावर खिळिले होते; तो स्वर्गीय महाराजा, वैभवी राजा असे उद्गारलेले दुताचे शब्द आम्ही ऐकिले होते. DAMar 678.4

ते ऐकून याजकांचे चेहरे मृतप्राय झाले होते. कयफा बोलण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचे ओठ पुटपुटत होते परंतु शब्द बाहेर पडत नव्हते. शिपाई तेथून पाय काढण्याच्या विचारात होते परंतु आवाज ऐकून ते थांबले. शेवटी कयफा बोलू लागला. त्याने म्हटले, थांबा, थांबा, तुम्ही पाहिलेले कोणाला सांगू नका. DAMar 679.1

शिपायांना लबाडी करायला सांगितले. “आम्ही झोपलो असताना रात्रीच्यावेळी त्याच्या शिष्यांनी त्याला चोरून नेले,’ असे सांगायला याजकांनी सांगितले. ह्यामध्ये याजकांनी स्वतःचीच फसवणूक करून घेतली. ते झोपले असताना शिष्यांनी त्याचे शरीर चोरून नेले असे शिपाई कसे काय सांगू शकतील? जर ते झोपले होते तर त्यांना ते कसे समजले? शिष्यावरील चोरीचा आरोप सिद्ध झाला तर प्रथम याजकांनी त्यांना दोषी ठरवायला नको काय? जर पहारेकरी कबरेजवळ झोपले होते तर पिलातासमोर त्यांना दोषी ठरविण्यास याजकांनी प्रथम पुढाकार घ्यायला नको काय? DAMar 679.2

कामावर असताना झोपलो होतो ह्या आरोपाने शिपायांची धडकी भरली होती. ह्या गुन्ह्याची शिक्षा मरणदंडाची होती. लोकांची फसवणूक करून आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून ते खोटी साक्ष देतील काय? डोळ्यात तेल घालून त्यांनी पाहारा केला नव्हता काय? पैशासाठी खोटी शपथ दिली तरी ते कसोटीला कसे उतरतील? DAMar 679.3

याजकांनी त्यांना सुरक्षतेचे वचन दिले होते आणि म्हटले की अशा प्रकारची बातमी सर्वत्र पसरविण्यात पिलाताला स्वारस्य वाटणार नाही. पैशासाठी रोमी शिपायांनी आपला प्रामाणिकपणा यहूद्यांना विकला होता. याजकांच्या समोर चकित करणाऱ्या सत्य संदेशाचे ओझे घेऊन ते आले होते; आणि परत जाताना पैशाचे ओझे आणि याजकांनी भरवलेली लबाडीची बातमी ओठावर घेऊन ते बाहेर पडले. DAMar 679.4

त्या अवधीत ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची बातमी पिलाताच्या कानी पडली. मरणाच्या शिक्षेबद्दल पिलात जरी जबाबदार होता तरी तो तुलनात्मक दृष्ट्या अनुत्साह होता. मनात नसताना त्याने उद्धारकाला दोषी ठरविले होते आणि आतापर्यंत त्याचा त्याला पश्चात्ताप झाला नव्हता. भीतीने दार लावून त्याने घरातच स्वतःला कोंडून घेतले आणि कोणालाही न भेटण्याचा निश्चय केला. परंतु याजकांनी जाऊन त्याची भेट घेतली आणि बतावणी करून तयार केलेली गोष्ट त्याच्या कानावर टाकली व पहारेकऱ्यांच्या कामातील कसूरीकडे दुर्लक्ष करण्यास आग्रह केला. हे मान्य करण्याच्या अगोदर त्याने पहारेकऱ्याजवळ खाजगीरित्या विचारपूस केली होती. स्वतःच्या जीवाची त्यांना भीती वाटून काहीही न लपविता जे घडले होते त्याची सविस्तर माहिती पिलाताला सांगितली होती. त्या गोष्टीचा त्याने पुढे पिच्छा पुरविला नाही, परंतु त्या घटकेपासून त्याची शांती हरपली होती. DAMar 679.5

येशूला कबरेत ठेवल्यावर सैतानाला जय हर्ष झाला. उद्धारक पुन्हा जीवंत होईल असे त्याला वाटले नव्हते. त्याने ख्रिस्ताच्या शरीरावर हक्क सांगितला आणि प्रभूला बंदिवान म्हणून तेथेच ठेवण्यासाठी आपला पाहारा ठेविला. स्वर्गातून आलेल्या निरोप्यांना पाहून व त्याचे दूत पळून गेलेले पाहून त्याला फार राग आला होता. विजेता म्हणून ख्रिस्ताचे उत्थान झाल्यावर त्याचे साम्राज्य नष्ट पावणार व शेवटी तो मृत्यू पावणार हे त्याला माहीत होते. DAMar 680.1

ख्रिस्ताचा वध करून याजक सैतानाच्या हातातील साधन बनले होते. आता ते संपूर्ण त्याच्या आधीन होते. ते जाळ्यात गुरफटले होते आणि त्यातून निसटण्याची त्यांना आशा नव्हती परंतु ख्रिस्तविरोधाच्या लढ्यात ते सतत गुंतले होते. पुनरुत्थानाची बातमी त्यांच्या कानावर पडल्यावर त्यांना लोकाचे भय वाटले. त्यांचे स्वतःचे जीवन धोक्यात असल्याची त्यांना भीती वाटली. त्याचे पुनरुत्थान झाले नाही हे सिद्ध करून ख्रिस्त ठक होता असे म्हणण्यातच त्यांचा बचाव होता. त्यांनी शिपायांना लाच दिली आणि त्यांच्या बाबतीत पिलाताचे मौन मिळविले. त्यांच्या लबाडीची बातमी सर्वत्र पसरली. परंतु काही साक्षीदारांना ते शांत करू शकले नव्हते. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयीची शिपायांची साक्ष अनेकांनी ऐकिली होती. ख्रिस्ताबरोबर उठलेले काहीजण अनेकाना दिसले व तो पुनरुत्थित झाल्याचे त्यांनी घोषीत केले. ज्यांनी हे पाहिले होते व ऐकिले होते त्याचा अहवाल याजकांच्या कानावर टाकिला होता. याजक व अधिकारी यांना सतत दहशत वाटत होती. कदाचित रस्त्याने चालत असताना किंवा स्वतःच्या गृहामध्ये तो त्याना प्रत्यक्ष समोरासमोर भेटेल असे वाटत होते. त्यांना संरक्षण कोठेही दिसत नव्हते. “त्याचे रक्त आम्हांवर व आमच्या मुलाबाळावर असो,” (मत्तय २७:२५) न्यायसभेमध्ये त्यानी काढिलेले हे उद्गार व ते दृश्य अहोरात्र त्यांच्या नेत्रासमोर येत होते. पुन्हा कधी त्यांच्या मनातून ते दृश्य नाहीसे झाले नव्हते आणि शांतीची झोप त्यांना लागली नव्हती. DAMar 680.2

ख्रिस्ताच्या कबरेजवळ, “तुझा पिता तुला बोलावीत आहे” ही बलवान दूताची वाणी ऐकण्यात आली तेव्हा जीवंत उद्धारक कबरेतून बाहेर पडला. त्याचा वाणीतील सत्य आता पूर्ण झाले होते, “मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो... . मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे.” याजक व अधिकारी यांना बोललेले भाकीताचे शब्द आता पूर्ण झाले होते, “तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसात उभारीन.’ योहान १०:१७, १८; २:१९. DAMar 680.3

फुटलेल्या थडग्यावर ख्रिस्ताने विजयी होऊन घोषीत केले, “मी पुनरुत्थान व जीवन आहे.” असले उद्गार केवळ देवत्वाद्वारेच बोलले जातात. देवाच्या इच्छेने व सामर्थ्याने निर्माण केलेले सर्व प्राणी जीवंत राहातात. उच्च श्रेणीतील दूत सेराफ ते साधे सजीव प्राणी हे सर्वजण जीवनाच्या उगमाद्वारे समृद्ध होतात. देवाशी संबंधीत असणाराच केवळ असे उद्गार काढू शकतो. मला आपला प्राण देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. मरणाची बंधने छिन्नविच्छिन्न करण्याचा अधिकार ख्रिस्ताच्या देवत्वामध्ये होता. DAMar 681.1

निद्रावस्थेत असलेल्यातील प्रथम फळ म्हणून ख्रिस्त मेलेल्यातून उठला. ओवाळलेल्या पेंढीचा तो रूपक होता आणि ज्या दिवशी प्रभूसमोर पेंढीची ओवळणी केली त्याच दिवशी त्याचे पुनरुत्थान झाले होते. हा सांकेतिक विधी हजारोपेक्षा अधिक वर्षे पाळण्यात आला. पिकाच्या पहिल्या उपजाची पेंढी, वल्हांडण सणासाठी लोक यरुशलेमाला जात होते तेव्हा ते घेऊन जात असे आणि आभार प्रदर्शनासाठी ती परमेश्वरासमोर ओवाळण्यात येत असे. हे केल्याशिवाय शेतातील पिकाची कापणी होऊन पेंढ्या बांधल्या जात नसत. देवाला वाहिलेली पेंढी सुगीचे दर्शक होती. देवाच्या राज्यासाठी महान आध्यात्मिक सुगीसाठी गोळा करण्यात ख्रिस्त प्रथम पेंढीचे दर्शक आहे. मृत धार्मिकांच्या पुनरुत्थानाचे दर्शक त्याचे पुनरुत्थान आहे. “येशू मरण पावला व उठला, असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्याद्वारे जे महानिद्रा पावले आहेत त्यास देव त्याजबरोबर आणील.’ १ थेस्स. ४:१४. DAMar 681.2

ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले त्याच्याबरोबर मोठा मृत समुदाय कबरेतून बाहेर आला. त्याच्या मरणाच्यावेळी भूमीकंपाने थडी उघडली गेली, आणि पुनरुत्थानाच्यावेळी ते त्याच्याबरोबर बाहेर आले. ते देवाबरोबरचे सहकामदार होते आणि त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सत्याची साक्ष दिली होती. ज्याने त्यांना मरणातून उठविले त्याचे ते आता साक्षीदार होणार होते. DAMar 681.3

आपल्या सेवाकार्याच्या वेळी येशूने मृतास जीवदान दिले होते. नाईन गावाच्या विधवेचा मुलगा, अधिकाऱ्याची मुलगी आणि लाजारस ह्यांना त्याने मरणातून उठविले होते. परंतु त्यांना अमरत्व प्राप्त झाले नव्हते. उठविल्यानंतरसुद्धा ते मरणाधिन होते. परंतु ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्यावेळी जे मरणातून उठविले गेले ते अनंतकालिक जीवन जगण्यासाठी उठविले गेले. त्याने कबर व मरण यावर विजय प्राप्त केल्याचे विजय चिन्ह म्हणून ते त्याच्याबरोबर उत्थान पावले. ख्रिस्ताने म्हटले यापुढे ते सैतानाचे बंदिस्त राहिले नाहीत; त्यांना मी मुक्त केले आहे. माझ्या सामर्थ्याचे प्रथम फळ म्हणून त्यांना कबरेतून बाहेर आणिले आहे आणि मी जेथे आहे तेथे ते राहातील आणि त्यांना पुन्हा कधी मरण येणार नाही किंवा दुःखाचा अनुभव होणार नाही. DAMar 681.4

ते शहरात गेले आणि ख्रिस्त मरणातून उठला आहे व आम्ही त्याच्याबरोबर उठलो आहोत अशी घोषणा करीत असताना ते अनेकांना दिसले. अशा रीतीने पुनरुत्थानाची कीर्ती अजरामर केली. पुनरुत्थित संतानी पुढील सत्य बोलाची साक्ष दिली, “तुझे मृत जीवंत होतील, माझ्या (लोकांची) प्रेते उठतील.” त्यांचे पुनरुत्थान पुढील भाकीत पूर्ण झाल्याचे उदाहरण आहे, “मातीस मिळालेल्यांनो, जागृत व्हा, गजर कराः कारण तुजवरील दहिवर, हे प्रभाताचे जीवनदायी दहिवर आहे; भूमि प्रेते बाहेर टाकील.’ यशया २६:१९. DAMar 682.1

श्रद्धावंताना ख्रिस्त पुनरुत्थान व जीवन आहे. पापाद्वारे गमावलेले जीवन उद्धारकाद्वारे पुन्हा मिळवून दिले; कारण त्याच्याठायी जीवन आहे आणि तो ज्यास पाहिजे त्यांना देतो. अमरत्व प्रदान करण्याचा अधिकार त्याच्या ठायी आहे. मानवतेमध्ये दिलेले जीवन तो पुन्हा घेतो आणि मानवतेला देतो. त्याने म्हटले, “मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.” “परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधी तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याजमध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल.” “जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन आहे; त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन.” योहान १०:१०; ४:१४; ६:५४. DAMar 682.2

श्रद्धावंताना मरण ही क्षुल्लक बाब आहे. ख्रिस्त त्याचा उल्लेख क्षणभंगूर असा करितो. “जर कोणी माझे वचन पाळील तर तो कधीही मरणार नाही,” “त्याला कधीही मरणाचा अनुभव येणार नाही.’ ख्रिस्ती व्यक्तीला मरण ही झोप आहे, स्तब्धतेचा आणि अंधाराचा क्षण आहे. ख्रिस्ताबरोबरचे जीवन देवामध्ये लपलेले आहे, आणि “आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट होईल तेव्हा तुम्हीही त्याजबरोबर गौरवात प्रकट व्हाल.” योहान ८:५१, ५२; कलस्सै. ३:४. DAMar 682.3

“पूर्ण झाले आहे’ ही वधस्तंभावरून झालेली वाणी मृतांनी ऐकिली. ती थडग्याच्या भींतीतून आत शिरली आणि निद्रीतांना उठण्यास तिने फर्माविले. स्वर्गातून ख्रिस्ताची वाणी ऐकिली जाईल तेव्हाही अशीच स्थिति होईल. ती वाणी कबरेत शिरेल आणि थडगी उघडली जातील आणि ख्रिस्तामध्ये मेलेले जीवंत होतील. उद्धारकाच्या पुनरुत्थानाच्यावेळी थोड्या कबरा उघडल्या होत्या, परंतु द्वितियागमनाच्या समयी सर्व मोल्यवान मृत त्याची वाणी ऐकतील आणि वैभवी अनंतकालिक जीवन जगण्यास बाहेर येतील. मरणातून ज्या शक्तीने ख्रिस्ताला वर उचलले तीच शक्ती त्याच्या मंडळीला वर उचलेल आणि सर्व सामर्थ्य, सर्व मांडलिक राज्ये आणि उल्लेखिलेल्या सर्व नावापेक्षा त्याच्याबरोबर त्याच्या मंडळीचे गौरव ह्या जगातच नाही तर आगामी जगातही होईल. DAMar 682.4