सैतानाच्या देवावरील कुभांडाचें निरसन
आकाशांतील व पृथ्वीवरील असंख्य गोष्टींच्या योगानें आपलीं अंत:- करणें त्यानें स्वतांशीं संलग्न करून घेतलीं आहेत. सृष्टपदार्थाच्या योगानें व मनुष्याच्या अंत:करणाला ज्ञेय अशा इहलोकच्या अत्यंत मोठ्या प्रेममय बंधनावरून त्यानें स्वतांस प्रगट केलें आहे. तरी ह्या गोष्टीसुद्धां त्याची प्रीति पुर्णपणें व्यक्त करीत नाहींत. इतके सर्व पुरावे आपणांजवळ असतांहि त्या सर्व शुभाच्या द्वेष्ट्यानें मनुष्यांच्या अंत:करणावर अंध:काराचें पटल पसरीलें आहे, त्यामुळें त्यांना देवाकडे पाहून त्याचें भय वाटू लागलें; तो फार कडक व खुनशी आहे असें त्यांचें मन झालें. परमेश्वराविषयीं सैतानानें त्यांस असें भासविलें, कीं त्याचा मुख्य गुण म्हणजे न्यायनिष्ठुरता व तो निष्ठुर असा न्यायधीश अगर कठोर व जुलमी असा सावकारच आहे. मनुष्यें चुकतात केव्हां, व त्यांस शिक्षा करतो केव्हां, हें मत्सरबुद्धीनें शोधून काढण्यासाठीं रात्रदिवस डोळ्यांत तेल घालून बसणारी अशी एक ती व्यक्ति आहे अशाप्रकारचें सृष्टिकर्त्याचें चित्र त्यानें काढिलें आहे. हें अंध:काराचें पटल दूर करण्याकरितां व ईश्वराचें प्रेम जगाला व्यक्त करण्यासाठीं प्रभु येशू मनुष्यांत वस्ती करण्यास आला. ईश्वराचा पुत्र आपल्या पित्याला प्रकट करण्यासाठीं स्वर्गांतून खालीं आला. “जो आपल्या बापामध्यें आहे त्या त्याच्या एकुलत्या एक पुत्रानें त्याला प्रकट केलें आहे.” “पुत्रावांचून व ज्या कोणास प्रगट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्यावाचून ईश्वराला कधीहि कोणीं पाहिलेलें नाहीं.” जेव्हां प्रभूच्या एका शिष्यानें त्याला उत्तर दिलें, “हे प्रभू, बाप आम्हांला दाखव” तेव्हां येशूनें त्याला उत्तर दिलें, “हे फिलिपा, मी इतका काळ तुम्हांजवळ असतां तूं मला जाणत नाहींस काय ? ज्यानें मला पाहिलें आहे, त्यानें बापाला पाहिलें आहे; तर बाप आम्हांस दाखव हें तूं कसें म्हणतोस?”WG 6.3