Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय २८—लेवी-मत्तय

    मत्तय ९:९-१७; मार्क २:१४-२२; लूक ५:२७-३९.

    पॅलेस्ताइनमधील रोमी अधिकाऱ्यामध्ये जकातदार अधिकाऱ्यासारखा दुसऱ्या कोणाचा द्वेष करण्यात आला नव्हता. परकी सत्तेने लादलेला कर यहूदी लोकांना सतत सतावीत होता, कारण त्याद्वारे त्यांची सत्ता, त्यांचे स्वातंत्र्य निघून गेले याचे स्मरण त्यांना होत होते. जकातदार रोमी साम्राज्याचे जाचणूक करण्याचे साधन होते एवढेच नाही तर ते स्वतःच्या परीने लोकांची लुबाडणूक करून स्वतः गबर होत होते. एकाद्या यहूद्याने रोमी अधिकाऱ्याकडून हे काम घेतले तर तो त्याच्या राष्ट्राचा द्रोही समजला जात होता. त्याला भ्रष्ट समजून त्याचा उपहास करण्यात येत होता आणि समाजात अति अधम समजला गेला होता.DAMar 225.1

    ह्या वर्गातला लेवी-मत्तय होता. गनेसरेत येथील चार शिष्यानंतर ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी बोलाविलेला हा होता. त्याच्या कामावरून किंवा व्यवसायावरून परूशी लोक मत्तयाविषयी आपले मत बनवीत होते, परंतु सत्य स्वीकारण्यासाठी मोकळे मन येशूने त्याच्यामध्ये पाहिले. उद्धारकाची शिकवण मत्तयाने ऐकली होती. देवाच्या आत्म्याद्वारे त्याचा पापीष्टपणा त्याला प्रगट झाल्यावर ख्रिस्ताची मदत घेण्यास तो फार उत्कंठित होता. परंतु धर्मगुरूपासून दूर राहाण्याची त्याला संवय असल्यामुळे हा महान गुरू त्याच्याकडे लक्ष देईल किंवा नाही याविषयी त्याला खातरी नव्हती. DAMar 225.2

    एके दिवशी जकातीच्या नाक्यावर बसलेला असतांना येशू त्याच्याकडे येत असलेला त्याने पाहिले. “माझ्या मागे ये’ हे त्याला संबोधलेले शब्द ऐकून तो फार आश्चर्यचकित झाला.DAMar 225.3

    “मत्तय उठला, सर्व सोडून दिले व त्याच्या मागे गेला.” तेथे अनिश्चितता नव्हती, प्रश्न नव्हते, किफायतशीर व्यवसायाच्या जागी दारिद्र् व खडतर जीवन हा विचारही नव्हता. ख्रिस्ताच्या सहवासात राहाणे त्याला पुरेसे होते. त्याद्वारे तो त्याचे ऐकेल आणि त्याच्या कामात तो सहभागी होऊ शकेल. ह्या अगोदर बोलाविलेल्या शिष्यांची गोष्ट हीच होती. येशूने पेत्र व त्याच्या सोबत्यांना बोलावल्यावर लागलेच त्यांनी मचवे व जाळी तेथेच सोडून दिल्या व त्याच्यामागे ते गेले. ह्यातील काहींचे मित्र आधारासाठी, आश्रयासाठी त्यांच्यावर अवलंबून होते; परंतु उद्धारकाचे पाचारण झाल्यावर घुटमळत न बसता व मी कसा जगू किंवा माझ्या कुटुंबाचे संगोपन कसे करू ह्या विचारात ते गुंग झाले नव्हते. पाचारणाला ते एकनिष्ठ होते. नंतर पुढे येशूने त्यांना विचारिले, “मी तुम्हास पिशवी, झोळी व पायतणे घेतल्याशिवाय पाठविले तेव्हा तुम्हास काही उणे पडले नाही ना?” ते म्हणाले “नाही.’ लूक २२:३५.DAMar 225.4

    धनवान मत्तय आणि गरीब आंद्रिया व पेत्र यांच्यावर एकसारखीच परीक्षा आणली आणि प्रत्येकाने पवित्र कार्यासाठी एकसारखेच वाहून दिले. यशप्राप्तीच्या वेळेस जेव्हा माशांनी जाळी भरून गेली आणि जुन्या जीवनाच्या भावना-इच्छा प्रबळ झाल्या त्या वेळी येशूने शिष्यांना सर्व काही सोडून सुवार्ता कार्य करण्यास सांगितले. क्षणिक गोष्टीसाठी किंवा ख्रिस्त सहभागासाठी प्रबळ इच्छा असल्याबद्दल प्रत्येक व्यक्तीची कसोटी करण्यात येते.DAMar 226.1

    मूलतत्त्व नेहमीच कडक असते. संपूर्ण मन कामात असल्याशिवाय देवाच्या कामात कोणीही यशप्राप्ती करू शकत नाही. ख्रिस्तज्ञान संपादण्यासाठी इतर सर्व गोष्टी तो तोट्याच्या समजतो. जी व्यक्ती सर्वस्व वाहून देत नाही ती व्यक्ती ख्रिस्ताचा शिष्य होऊ शकत नाही, आणि सहाजीकच सहकामगार होऊ शकत नाही. महान उद्धाराचे महत्त्व, मोल ज्यांना समजते त्यांच्या जीवनात ख्रिस्ताच्या जीवनातील स्वार्थत्याग दिसून येईल. मार्ग दाखवील तेथे ते आनंदाने जातील.DAMar 226.2

    मत्तयाला शिष्य होण्याचे आमंत्रण देण्यावरून फार चीड निर्माण झाली. एकाद्या धर्मगुरूने जकातदाराला जवळचा शिष्य म्हणून घेणे हा धार्मिक, सामाजिक आणि राजकीय रूढीच्या विरूद्धचा गुन्हा समजला होता. अशा ह्या लोकांच्या दुराग्रही भावनेला चिथावनी देऊन येशूच्या विरूद्ध लोकमान्य सहानुभूति मिळविण्याचा प्रयत्न परूशी लोकांनी केला.DAMar 226.3

    जकातदार समाजामध्ये सर्वत्र गोडी निर्माण झाली होती. ते सर्वजन दिव्य गुरूजीकडे आकर्षिले होते. नवीन झालेला शिष्य मत्तय आनंदाच्या भरात त्याच्या पूर्वीच्या सहकामगारांची येशूशी ओळख करून देण्यास फार आतुर होता. त्यासाठी त्याने घरात मेजवानी करून नातेवाईक व मित्रमंडळीना आमंत्रण दिले होते. जकातदाराबरोबर समाजात ज्यांना प्रतिष्ठा नव्हती आणि काटेकोर जीवन जगणाऱ्या शेजाऱ्यांनी निषिद्ध मानलेल्या लोकांनाही बोलावले होते.DAMar 226.4

    येशूच्या सन्मानार्थ हा पाहुणचाराचा कार्यक्रम होता, आणि तो स्वीकारण्यात त्याने हयगय केली नाही. ह्यामुळे परूशी लोकांना फार चीड येईल आणि लोकांच्यासाठी तडजोड करण्यास ते तयार होतील हे त्याला माहीत होते. परंतु कोणत्याही धोरणाचा परिणाम त्याच्या हालचालीवर होऊ शकत नव्हता. जीवनी पाण्यासाठी तहानेने जे व्याकूळ झालेले होते त्यांच्यासाठी त्याचे अंतःकरण हळहळत होते.DAMar 226.5

    जकातदाराबरोबर सन्माननीय अतिथी म्हणून येशू मेजावर बसला होता आणि सहानुभूती व सामाजिक आदर याद्वारे त्याने मानवतेची प्रतिष्ठा ओळखली होती. ह्यामध्ये व्यक्त केलेल्या विश्वासास पात्र ठरण्यास लोक उत्सुक होते. त्यांच्या तृषित अंतःकरणावर त्याचे आदरणीय व जीवनी सामर्थ्याचे शब्द पडले. नवीन प्रेरणा जागृत झाल्या आणि समाजभ्रष्ट केलेल्या लोकांच्या समोर नवजीवनाचे दालन खुले झाले.DAMar 227.1

    अशा मेळाव्याच्या समयी उद्धारकाच्या शिकवणीचा परिणाम अगदी थोडक्यावरच झाला. त्याच्या पुनरुत्थानानंतर त्याचे महत्त्व त्यांना समजले. पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला त्यावेळी एका दिवसात तीन हजारांचा बाप्तिस्मा झाला. त्याच्यामध्ये जकातदाराच्या मेजावर बसून सत्य ऐकलेले अनेकजन होते आणि त्यांच्यातील काहीजन सुवार्ता संदेशवाहक बनले होते. मेजवानीच्या वेळचे येशूचे उदाहरण मत्तयाला सततचा धडा होता. गुरूजीच्या पावलावर पाऊल टाकून तुच्छ लेखलेला जकातदार सेवा कार्यामध्ये निष्ठावान उपदेशक बनला. DAMar 227.2

    मत्तयाच्या घरातील मेजवानीला येशू हजर होता असे धर्मगुरूंनी ऐकल्यावर त्यांनी त्याला दोष देण्याची संधि साधली. परंतु हे काम शिष्यांच्यातर्फे करण्याचे त्यांनी ठरविले. त्यांच्या कलुषित मनाला चेतना देऊन त्यांना त्यांच्या प्रभूपासून दूर करण्याची त्यांनी आशा बाळगली. शिष्यांच्या समोर ख्रिस्तावर दोषारोप करायचा आणि ख्रिस्तासमोर शिष्यांना दूषण द्यायचे हे धोरण त्यांनी अवलंबविले आणि ह्या विषयीचे आपले बाण जेथे अधिक दुखापत करतील तेथे सोडायचे ठरविले. स्वर्गातील असंतुष्टता निर्माण झाल्यापासून अशा प्रकारे सैतान कार्य करीत आला आहे; आणि जे फारकत, दुजाभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना सैतानापासून प्रेरणा मिळते.DAMar 227.3

    धर्मगुरूंनी, परूशांनी मत्सराने शिष्यास प्रश्न केला, “तुमचा गुरू जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?”DAMar 227.4

    त्याच्या शिष्यांनी उत्तर देण्याची वाट येशूने पाहिली नाही तर स्वतःच उत्तर दिले: “निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणाईताना आहे. ‘मला दया पाहिजे यज्ञ नको’ ह्याचा अर्थ काय हे जाऊन शिका; कारण नीतिमानांना नव्हे तर पापीजनाना बोलावण्यासाठी मी आलो आहे.’ परूशी आध्यात्मिकरित्या पूर्ण असल्याने त्यांना वैद्याची गरज नाही, त्याचवेळी जकातदार व विदेशी आत्म्याच्या आजाराने नाश पावत आहेत असे ते समजत होते. अशा वस्तुस्थितीत जेथे मदतीची गरज आहे तेथे जाऊन वैद्याने औषधोपचार करू नये काय?DAMar 227.5

    जरी परूश्यांना आपण उच्च, प्रतिष्ठीत आहोत असे वाटत होते तरी ज्यांचा ते उपहास करीत होते त्यांच्यापेक्षा त्यांची परिस्थिती गंभीर होती. जकातदार कमी धर्माभिमानी व कमी स्वावलंबी होते त्यामुळे सत्यासाठी त्यांचे मन मोकळे होते. येशूने परूश्यांना म्हटले, “मला दया पाहिजे यज्ञ नको; ह्याचा अर्थ काय हे जाऊन शिका.” ते देवाच्या वचनाचे स्पष्टीकरण करतात असे जरी स्वतःला संबोधीत होते तरी त्याच्या भावार्थाविषयी ते पूर्णतः अजाण होते.DAMar 227.6

    काही काळ परूशी स्तब्ध होते परंतु त्यांचे वैमनस्य अधिक तीव्र झाले. त्यानंतर योहानाच्या शिष्यांना उद्धारकाच्या विरूद्ध फितविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ह्या परूश्यांनी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या कार्याचा स्वीकार केला नव्हता. त्याचे संयमशील जीवन, त्याच्या साध्या संवयी, त्याचा ओबडधोबड पेहराव याच्याकडे ते तिरस्काराने पाहात होते व त्यांनी त्याला धर्मवेढा म्हटले होते. त्यांच्या ढोंगीपणाला त्याने दोष दिला म्हणून त्यांनी त्याच्या बोलण्याला प्रतिकार केला आणि त्याच्याविरूद्ध लोकांना फितविण्याचा प्रयत्न केला. दोष देणाऱ्यांच्या अंतःकरणावर देवाच्या आत्म्याने काम करून त्यांच्या पापांची खात्री करून दिली, परंतु त्यांनी देवाचा सल्ला धिक्कारिला आणि योहानाला सैतानाने पछाडले आहे असे त्यांनी जाहीर केले.DAMar 228.1

    येशू आता लोकांच्यात मिसळून त्यांच्याबरोबर खातपीत होता म्हणून तो खादाड आणि दारूड्या असा आरोप त्यांनी त्याच्यावर केला. त्याच्यावर असा आरोप करणारेच दोषी होते. स्वतःच्या स्वभावाप्रमाणे सैतान देवाच्या स्वभावाचा विपर्यास करून चित्र रंगवितो त्याप्रमाणेच हे दुष्ट लोक देवाच्या सेवकांविषयी खोट्या गोष्टी पसरवितात.DAMar 228.2

    अंधःकारात खितपत पडलेल्यांच्यापुढे प्रकाश आणण्यासाठी येशू जकातदार व पापी यांच्याबरोबर खातपीत होता असे पुरूशी लोक समजत नव्हते. दिव्य प्रभूच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द जीवनी बीज असून देवाच्या गौरवासाठी लवकरच त्याला अंकुर फुटून फळ येईल हे त्यांना दिसत नव्हते. प्रकाशाचा स्वीकार करायचा नाही असे त्यांनी निश्चित ठरविले होते. योहानाच्या कार्याला त्यांनी विरोध केला आणि येशूविरूद्ध त्यांचे सहकार्य मिळण्यासाठी त्याच्या शिष्याबरोबर मैत्री संपादन करण्यास ते तयार होते. येशू प्राचीन रूढी निरर्थक ठरवीत होता असा आरोप ते करीत होते आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा करारी पवित्र स्वभाव आणि जकातदार व पापी यांच्याबरोबर जेवणखाणे करणारा येशूचा स्वभाव यांची तुलना करून त्यांनी फारकत दाखविली.DAMar 228.3

    योहानाचे शिष्य ह्या समयी फार दुःखात होते. योहानाचा निरोप घेऊन ते येशूला भेटण्याच्या अगोदरची ही वेळ होती. त्यांचा प्रिय गुरूजी तुरुंगात होता आणि ते शोक करीत होते. त्याच्या सुटकेसाठी येशू काही प्रयत्न करीत नव्हता एवढेच नाहीतर त्याच्या शिकवणीवर भरवसा नसल्यासारखे त्यांना भासले. योहानाला जर देवाने पाठविले होते तर येशू व त्याच्या शिष्यांनी असा फरक का दाखविला?DAMar 228.4

    योहानाच्या शिष्यांना ख्रिस्ताच्या कार्याची खरी कल्पना नव्हती; परूशी लोकांना आरोप करण्यास काहीतरी कारण असले पाहिजे असे त्यांना वाटले. धर्मगरूंनी नेमून दिलेले अनेक नियम ते पाळत होते; आज्ञापालनाद्वारे पापमुक्त होतो असा त्यांचा विश्वासही होता. गुणवतेसाठी यहूदी लोक उपवास करीत होते आणि कडक शिस्तीने आठवड्यातून दोनदा उपवास करीत होते. “आम्ही व परूशी पुष्कळ उपवास करितो, तुमचे शिष्य उपास करीत नाहीत, हे का?” असे विचारण्यास योहानाचे शिष्य येशूकडे आले होते तेव्हा परूशी व योहानाचे शिष्य उपास करीत होते.DAMar 228.5

    मृदु अंतःकरणाने येशूने उत्तर दिले. उपवासाविषयी त्यांचे चुकीचे गैरसमज सुधारण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. परंतु त्याच्या कार्याविषयी त्यांची विचारसरणी बरोबर-यथार्थ करण्याचा प्रयत्न केला. येशूविषयी साक्ष देताना योहानाने जो भाषांलकार वापरला तोच वापरून त्याने हे केले. योहानाने म्हटले होते, “ज्याला वधू आहे तो वर; आणि वराचा मित्र जो उभे राहून त्याचे भाषण ऐकतो त्याला वराच्या शब्दावरून अति आनंद होतो; असा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.” योहान ३:२९. योहानाच्या शिष्यांना त्याच्या गुरूजीच्या शब्दांची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. हे उदाहरण घेताना येशूने म्हटले, “व-हाड्याबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना उपास करता येईल काय?’DAMar 229.1

    स्वर्गातील अधिपती लोकांच्यामध्ये होता. देवाचे अति श्रेष्ठ दान जगासाठी दिले होते. दीनास आनंद; कारण त्याच्या राज्याचे त्यांना वारस बनविण्यासाठी ख्रिस्त आला होता. श्रीमंताना आनंद; कारण अनंतकालिक जीवन संपादन करण्यास त्यांना तो प्रबोधन करील. तारणप्राप्तीसाठी त्यांना तो सुज्ञ बनवील. विद्वानाना आनंद; आतापर्यंत खऱ्या अर्थाचे आकलन झाले त्यापेक्षा अधिक गूढार्थाचा उकल त्यांना होईल. जगाचा पाया घातला त्यावेळेपासून लपलेली सत्ये उद्धारकाच्या कार्याद्वारे मनुष्याला प्रगट होतील.DAMar 229.2

    उद्धारकाचे दर्शन घेण्यासाठी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला फार हर्ष झाला होता. ज्या शिष्यांना दिव्य ऐश्वर्याबरोबर चालणे व बोलणे करण्याचा प्रसंगा मिळाला त्यांना यापेक्षा आनंदाचा दुसरा क्षण कोणता! शोक करून उपास करण्याचा हा समय नव्हता. त्याच्या वैभवाचा प्रकाश स्वीकारण्यास त्यांनी आपली अंतःकरणे खुली केली पाहिजेत. त्यामुळे अंध:कारात व मृत्यूच्या छायेत पडलेल्यावर ते प्रकाश पाडतील.DAMar 229.3

    ख्रिस्ताच्या वचनाद्वारे तेजस्वी चित्र रेखाटण्यात आले होते परंतु त्याच्यावर दाट छाया पसरली होती आणि ती केवळ त्याच्याच दृष्टीत आली. त्याने म्हटले, “असे दिवस येतील की, वर त्याच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपास करतील.” त्याच्या प्रभूला धरून देऊन वधस्तंभावर खिळलेला ते पाहातील तेव्हा शिष्य शोक करून उपास करतील. माडीवर अखेरचे शब्द उद्गारताना त्याने म्हटले, “थोड्या वेळाने मी तुम्हास दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.’ योहान १६:१९, २०.DAMar 229.4

    कबरेतून जेव्हा तो बाहेर येईल तेव्हा त्यांचे दुःख आनंद होईल. त्याच्या पुनरुत्थानानंतर त्याची व्यक्तीशः उपस्थिती असणार नाही; परंतु कैवाऱ्याच्याद्वारे तो त्यांच्या समवेत असू शकणार म्हणून शोक करीत बसण्यात ते वेळ घालविणार नव्हते. सैतानाला हे पाहिजे होते. त्यांची फसवणूक करण्यात आली आहे, ते निराश झाले आहेत असे चित्र जगाच्यापुढे त्यांनी आणावे अशी सैतानाची इच्छा होती; परंतु त्यांच्यावतीने येशू मध्यस्थी करीत असलेल्या स्वर्गीय पवित्रस्थानाकडे विश्वासाने त्यांना वर पाहावयाचे होते; त्याचा कैवारी पवित्र आत्मा याच्यापुढे त्यांना आपली अंतःकरणे खुली करून त्याच्या समक्षतेच्या प्रकाशांत आनंद करावयाचा होता. तथापि मोहाचे व कसोटीचे दिवस येतील, त्यावेळी जगाचे अंमलदार आणि अंधारी राज्याचे अधिकारी यांच्याशी त्यांचा संघर्ष होणार होता; त्यावेळी ख्रिस्त व्यक्तीशः त्यांच्याबरोबर नसणार आणि कैवाऱ्याची त्यांना खरी कल्पना येणार नव्हती अशा वेळी त्यांनी उपास करणे इष्ट होते.DAMar 230.1

    द्वेष व दुजाभाव यांनी अंतःकरणे भरली असतांना परूशी लोक विधीसंस्कार यांचे जोरदार पालन करून प्रतिष्ठा मिरविण्यात गढले होते. शास्त्रवचन म्हणते, “पाहा, तुमच्या उपासांचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्या वेळी कटकटी करिता व दुष्टपणाने ठोसाठोसी करिता; तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा याकरिता तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही. मला पसंत पडणारा असा उपास आहे काय? मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोके लवविणे व आपल्या अंगाखाली गोणताट व राख पसरणे याला उपास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय?” यशया ५८:४, ५.DAMar 230.2

    खरा उपास म्हणजे औपचारिक विधी नव्हे. देवाने निवडलेल्या उपासाविषयी शास्त्रवचनात वर्णन केले आहे. “दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यांस मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे,” तू... “आपल्या जीवास इष्ट ते भुकेलेल्यास द्यावे, दुःखग्रस्त जीवास तृप्त करावे.” यशया ५८:६, १०. ख्रिस्ताच्या कार्याचे स्वरूप आणि आशय यामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. जगाचा उद्धार करण्यासाठी त्याचे संपूर्ण जीवन स्वःनाकाराचे, स्वार्थत्यागाचे होते. अरण्यातील मोहाच्या वेळी जकातदाराबरोबर केलेल्या भोजनसमयी जे हरवलेले आहेत त्यांच्या उद्धारासाठी तो आपला जीव देत होता. विनाकारण शोक करण्यात, फक्त शारीरिक नम्रता व असंख्य यज्ञयाग करण्यात भक्तीभावाचा खरा आशय प्रगट करण्यात येत नाही तर देव व मानव यांची खुषीने सेवा करण्यासाठी आत्मत्याग करण्याद्वारे तो दर्शविण्यात येतो.DAMar 230.3

    योहानाच्या शिष्यांना उत्तर देतना येशूने एक दाखला सांगितला, “कोणी कोऱ्या वस्त्राचे ढिगळ जुन्या वस्त्राला लावीत नाही, तसे केले तर ते लावलेले नवे ठिगळ जुन्या वस्त्राला फाडते व जुने व नवे यांचा जम बसत नाही.’ बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा संदेश परंपरागत आचार व लोकभ्रम, वेडगळ समजुती यांच्याशी एकत्र मिसळू नये. योहानाचा भक्तीभाव आणि परूश्यांची बतावणी, मिष यांचे मिश्रण करणे म्हणजे त्यांच्यामधील आपसात असलेली फूट अधिक स्पष्ट करणे होय.DAMar 231.1

    परूश्यांच्या रूढ पद्धती येशूच्या शिकवणीतील तत्त्वाशी एकत्र मिसळू शकत नाहीत. योहानाच्या शिकवणीने पडलेली फूट ख्रिस्ताला मिटवायची नव्हती. जुने व नवीन यामधील फरक त्याला अधिक स्पष्ट करायचा होता. येशूने हे अधिक स्पष्ट करताना म्हटले, “कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालीत नाही; घातला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस सांडतो व बुधलेही नासतात.” नवा द्राक्षारस ठेवण्यासाठी वापरलेले चर्माचे बुधले काही काळाने शुष्क व ठिसूळ बनतात आणि पूर्वहेतू साध्य करण्यास निकामी ठरतात. ह्या परिचीत उदारणाद्वारे येशूने यहूदी पुढाऱ्यांची परिस्थिती सादर केली. याजकगण, शास्त्री व अंमलदार सर्वजण परंपरागत आचार, पद्धति व विधीसंस्कार यांच्यामध्ये गढलेले होते. त्यांची अंतःकरणे त्याने तुलना केलेल्या कोरड्या शुष्क झालेल्या चर्माप्रमाणे आकुंचित झाली होती. कायदेशीर धर्माबद्दल ते संतोषीत होते तरी स्वर्गीय जीवनी सत्याचे सुरक्षीत कोठार बनणे त्यांना अशक्य होते. स्वतःची धार्मिकता पुरेशी आहे आणि त्यांच्या धर्मात नवीन तत्त्वे आणण्याची काही आवश्यकता नाही असे त्यांना वाटले. मानवासाठी देवाची सात्विक इच्छा त्यांच्यापासून वेगळी आहे असे त्यांना वाटले नाही. स्वतःच्या सत्कृत्यामुळे त्यांनी ते स्वतःच्या गुणवतेशी जोडले होते. प्रेमावर आधारीत विश्वासाने आत्म्याचे शुद्धीकरण होते हा विचार त्यांच्यामध्ये नव्हता कारण परूश्याच्या धर्माचे संघटन विधीसंस्कार आणि मनुष्यांचा हुकूम याद्वारे झाले होते. अगोदरच प्रस्थापीत झालेल्या धर्माची ख्रिस्ताच्या शिकवणीशी सांगड घालणे निरर्थक होते. परंपरागत आचार पद्धतीने भरलेले सांगड घालणे निरर्थक होते. परंपरागत आचार पद्धतीने भरलेले परूश्यांचे जुने सडलेले बुधले द्राक्षारसाप्रमाणे फसफसणाऱ्या देवाच्या महत्त्वाच्या सत्याने फाटून जातील. DAMar 231.2

    परूश्यांना स्वतःविषयी वाटले होते की, ते सुज्ञ असल्यामुळे त्यांना आणखी शिक्षणाची जरूरी नव्हती, फार धार्मिक असल्यामुळे उद्धाराची गरज नव्हती, अति प्रतिष्ठीत असल्यामुळे ख्रिस्तापासून मिळणाऱ्या प्रतिष्ठेची त्यांना आवश्यकता नव्हती. उद्धारकाने त्यांना सोडले आणि स्वर्गीय संदेश स्वीकार करणाऱ्याकडे तो वळला. अडाणी कोळी, जकातीच्या नाक्यावरील जकातदार, शोमरोनी स्त्री, हर्षाने ऐकणारे सर्वसाधारण लोक ह्यांच्यामध्ये त्याला नवीन द्राक्षारसासाठी नवीन बुधले सापडले. देवाने पाठविलेला प्रकाश जे आनंदाने स्वीकार करितात त्यांचाच उपयोग सुवार्ता कार्यात करण्यात येतो. ह्यांच्याद्वारेच सत्याचे ज्ञान सर्व जगाला देण्यात येते. देवाच्या कृपेने त्याचे लोक नवीन बुधले बनतील तर तो ते नव्या द्राक्षारसाने भरील.DAMar 231.3

    ख्रिस्ताची शिकवण नव्या द्राक्षारसाच्या स्वरूपात सादर केली होती, ती नवी शिकवण (तत्त्व) नव्हती. परंतु प्रारंभापासून शिकविण्यात आलेल्याचे ते प्रगटीकरण होते. परंतु देवाच्या सत्याचा मूळ अर्थ व त्याचे महात्म्य परूशी लोक विसरून गेले होते. त्यांना सर्व दृष्टीने ख्रिस्ताची शिकवण नवीन वाटली म्हणून त्याची त्यांनी दखल घेतली नाही आणि मान्य केली नाही.DAMar 232.1

    सत्याची पारख व त्यासाठी असलेली आकांक्षा नष्ट करण्याचे, खोट्या शिक्षणातील सामर्थ्य येशूने दाखविले होते. त्याने म्हटले, “जुना द्राक्षारस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करीत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो.” मूळ पुरुष आणि संदेष्टे यांच्याद्वारे जगाला दिलेले सत्य ख्रिस्ताच्या शब्दात नव्या सौंदर्याने प्रकाशीत झाले. परंतु शास्त्री आणि पुरूशी यांना अमूल्य नव्या द्राक्षारसाची आवश्यकता भासली नाही. जुन्या आचार पद्धति, संवयी आणि परिपाठ काढून टाकल्याशिवाय ख्रिस्ताच्या शिकवणीसाठी त्यांच्या मनात किंवा अंतःकरणात जागा नव्हती. निर्जीव औपचारिक शिष्टाचाराला ते चिकटून राहिले आणि जीवनी सत्य व देवाचे सामर्थ्य यांच्यापासून ते दूर गेले.DAMar 232.2

    ह्याच्यामुळे यहूद्यांचा नाश झाला आणि आमच्या काळात अनेकांचा नाश ह्याच कारणामुळे होईल. मत्तयाच्या मेजवानीच्या वेळी परूश्यांनी ज्या चुका केल्या त्याच चुका आज हजारो करीत आहेत. मनात जपून ठेवलेल्या कल्पना किंवा स्वमताची मूर्ति काढून टाकण्याच्या ऐवजी प्रकाशाच्या पित्यापासून येणाऱ्या सत्याचा अनेक नाकार करितात. ते आत्मनिष्ठ असून स्वतःच्या शहाणपणावर त्यांची भीस्त भारी, आणि त्यांच्या आध्यात्मिक दारिद्याची त्यांना जाणीव नाही. काही महत्त्वाच्या सत्कृत्याद्वारे मुक्ती प्राप्त करून घेण्याचा ते खटाटोप करितात. एखाद्या कार्यामध्ये स्वहित जोडण्याचा मार्ग मोकळा नाही तर ते उपलब्ध असलेले तारण झिडकारतात. DAMar 232.3

    कायदेशीर धर्म केव्हाही एकाद्याला ख्रिस्ताचा मार्ग दाखवू शकणार नाही. आत्मसमर्थनार्थ प्रेरित झालेला उपास व प्रार्थना देवाच्या दृष्टीने घृणा आहे. भक्तीसाठी जमलेला विधियुक्त गंभीर मेळावा, धार्मिक विधिसंस्कार, बाह्यात्कारी नम्रता, भव्य यज्ञयाग, हे सर्व करणारा स्वतःला धार्मिक समजतो व स्वर्गासाठी लायक आहे असे गृहीत धरतो; परंतु ही सर्व फसवणूक आहे. आपली कृती केव्हाही तारण खरेदी करू शकत नाही.DAMar 232.4

    ख्रिस्ताच्या काळात जे होते ते आजही आहे; परूश्यांना त्यांचे संपूर्ण आध्यात्मिक दारिद्र माहीत नाही. त्यांच्यासाठी हा संदेश आहे, “मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहे, व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस; पण तू कष्टी, हीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस हे तुला कळत नाही. म्हणून मी तुला मसलत देतो की, श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे; तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे; आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यात अंजन विकत घे.” प्रगटी. ३:१७, १८. विश्वास व प्रेम अग्नीमध्ये शुद्ध केलेले सोने आहे. परंतु पुष्कळांच्या बाबतीत सोने अंधुक झाले आहे आणि मोल्यवान साठा हरवला आहे. ख्रिस्ताची धार्मिकता त्यांना न घातलेला झगा व स्पर्श न केलेला झरा आहे. त्यांना असे म्हटले आहे, “तू आपली पहिली प्रीती सोडिली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर; ते पश्चात्ताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईल आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन.’ प्रगटी. २:४, ५.DAMar 232.5

    “देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाही.” स्तोत्र. ५१:१७. येशू ख्रिस्तावरील विश्वासक, श्रद्धावंत बनण्यासाठी मनुष्याने प्रथमतः स्वार्थत्याग केला पाहिजे. स्वार्थाचा त्याग केल्यावर प्रभु त्याला नवा मनुष्य बनवितो. नव्या बुधल्यात नवा द्राक्षारस पाहू शकतो. नवजीवनाच्या श्रद्धावंताना ख्रिस्ताची प्रीती प्रोत्साहन देईल. आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत राहिल्याने त्याच्या जीवनात ख्रिस्ताचा स्वभाव प्रगट करण्यात येईल.DAMar 233.1