Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ८—वल्हांडण सणासाठी प्रवास

    लूक २:४१-५१.

    यहूदी लोकांमध्ये बालपण आणि तारुण्य दुभागणारे बारावे वर्ष होते. हे वर्ष संपल्यानंतर इब्री मुलाला धर्मपुत्र किंवा देवपुत्र म्हणत असे. धार्मिक शिक्षण घेण्यासाठी त्याला विशेष संधि देण्यात येत असे आणि पवित्र सण व विधि यांच्यामध्ये त्याने भाग घेण्याची अपेक्षा करण्यात येत असे. ह्या रिवाजाप्रमाणे येशूने आपल्या बालपणात ही वल्हांडण सणाची फेरी यरुशलेमला केली होती. भक्तीवान आईबापाप्रमाणे योसेफ आणि मरीया प्रतिवर्षी यरुशलेमाला जात असत; अपेक्षित वय झाल्यानंतर येशूला त्यांनी आपल्याबरोबर नेले.DAMar 51.1

    तीन वार्षीक सण होते, वल्हांडण, पनासाव्या दिवसाचा आणि मंडपाचा सण. ह्या वेळेस इस्राएलातील सर्व पुरुषांनी यरुशलेमात प्रभूसमोर हजर राहाण्याची आज्ञा होती. ह्यापैकी वल्हांड सणाच्या वेळी फार गर्दी असे. सर्व देशातून पांगलेले यहूदी बहुसंख्येने हजर होत असे. पॅलेस्टाईनमधील सर्व भागातून उपासक बहुसंख्येने आले होते. गालीलाहून येताना प्रवासाला बरेच दिवस लागत असे आणि लोक टोळी टोळीने सोबतीसाठी आणि संरक्षणासाठी प्रवास करीत असत. खडकाळ आणि उंचवट्याच्या रस्त्यावरून जाताना स्त्रिया आणि वृद्ध गाढवावर किंवा बैलावर बसून प्रवास करीत असत. धडधाकट माणसे व तरुण पायी जात असत. वल्हांडण सण मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या आरंभी येत असे आणि त्यावेळेस सर्व भाग फुलांनी फुललेला आणि पक्षांच्या गाण्यांनी हर्षजनक झालेला होता. प्रवासात ठिकठिकाणी इस्राएलाच्या इतिहासातील स्मारक स्थळे होती आणि माता आपल्या मुलांना त्या काळात देवाने आपल्या लोकांसाठी केलेल्या अद्भुत गोष्टी तपशीलवार कथन करीत असत. गाणे आणि संगीत यांच्या सहाय्याने ते आपला प्रवास सुखाने करीत असे आणि शेवटी यरुशलेमातील बुरूज दृष्टीस पडल्यावर ते आनंदाच्या भरात जयोत्सहाने म्हणत असे —DAMar 51.2

    “हे यरुशेलमा, तुझ्या दारात
    आमचे पाय उभे आहेत...
    तुझ्या कोटात शांती असो
    तुझ्या मंदिरात क्षेमकुशल असो.”
    DAMar 52.1

    स्तोत्र १२२:२-७.

    इब्री राष्ट्राच्या उदयापासून वल्हांडण सण पाळण्यास सुरूवात झाली. मिसर देशातील गुलामगिरीतील शेवटच्या रात्री, सुटकेचे काही चिन्ह दिसत नसताना, ताबडतोब सुटकेची तयारी करण्यास देवाने त्यांना आज्ञा केली. मिसरी लोकावर येणाऱ्या शिक्षेविषयी त्याने फारोला इशारा दिला होता आणि इब्री लोकांनी आपल्या सर्व कुटुंबियांना घरात एकत्रित करण्यात सांगितले होते. वधलेल्या कोकऱ्याचे रक्त दोन्ही दारबाह्याला व चौकटीच्या कपाळपट्टीला लावल्यावर त्याचे मांस विस्तवावर भाजून ते बेखमीर भाकरीबरोबर व कडू भाजीबरोबर त्यांना खायाचे होते. त्याने म्हटले, “ते तुम्ही या रीताने खावे तुमच्या कमरा कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे; हा परमेश्वराचा वल्हाडण सण होय.’ निर्गम १२:११. मध्यरात्री मिसर देशातील सर्व प्रथम जन्मलेल्यांचा वध करण्यात आला. त्यानंतर राजाने इस्राएलाला तातडीचा संदेश दिला, “तुम्ही व सर्व इस्राएल लोक माझ्या लोकांतून निघून जा; तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची उपासना करा.” निर्गम १२:३१. मिसर देशातून इब्री लोक स्वतंत्र राष्ट्र म्हणून बाहेर पडले. प्रतिवर्षी वल्हांडण सण पाळण्याची आज्ञा प्रभूने दिली. “तुमची मुलेबाळे ह्या सणाचा अर्थ काय आहे असे विचारतील तेव्हा त्यांना तुम्ही सांगा की, हा प्रभूच्या वल्हांडणाचा यज्ञबली आहे. मिसरी लोकांचा वध केला तेव्हा तो इस्राएल लोकांची घरे ओलांडून गेला.’ अशा प्रकारे पिढ्यानपिढ्या आश्चर्यचकित करणारी मुक्ततेची ही कथा वारंवार कथन करायची होती.DAMar 52.2

    वल्हांडण सणानंतर बेखमीर भाकरीचा सात दिवसांचा सण होता. दुसऱ्या दिवशी पिकाच्या पहिल्या उपजाची सातूची पेंढी प्रभूपुढे आणली. सणातील सर्व विधी ख्रिस्त कार्याचे प्रतीक होते. मिसर देशातून इस्राएलाची मुक्तता उद्धारकार्यावरील धडा होता, आणि वल्हांडण सणाद्वारे त्याचे स्मरण करण्यात येत असे. वधलेला कोकरा, बेखमीर भाकरी, पहिल्या उपजाची पेंढी ही सर्व ख्रिस्ताचे दर्शक होती.DAMar 52.3

    ख्रिस्ताच्या काळात बहुसंख्य लोकांमध्ये हा सण केवळ औपचारिक विधि राहिला होता. परंतु देवपुत्राला त्याचा अर्थबोध कोणता होत होता!DAMar 52.4

    प्रथमच येशू बालकाने मंदिराकडे पाहिले. शुभ्र झगे परिधान करून याजक लोक याज्ञिकेचे काम करताना त्याने पाहिले. वेदीवर अर्पण केलेला रक्तबंबाळ झालेला यज्ञबली पाहिला. सुवासिक हव्य परमेश्वरापुढे जाताना उपासकासमवेत त्याने प्रार्थनेत भाग घेतला. त्याने वल्हांडण सणाच्या विधीचे निरिक्षण केले. उत्तरोत्तर त्याला ह्या विधीचा अर्थ अधिक स्पष्ट झाला. प्रत्येक कृती त्याच्या जीवनाशी निगडीत असलेली त्याने पाहिली. त्याच्याठायी नवीन हुरूप जागृत होत होता. शांत आणि पूर्ण गुंग झालेला असा तो मोठ्या संकटाचा विचार करीत होता. त्याच्या कार्याचे रहस्य त्याच्यापुढे खुले होत होते.DAMar 52.5

    ह्या दृश्यात रमलेला असल्यामुळे तो आईबापाबरोबर राहिला नाही. त्याने एकटे राहाण्याचा प्रयत्न केला. वल्हाडण सणाचा विधि संपल्यानंतर तो मंदिराच्या आवारातच रेंगाळत होता; उपासक यरुशलेम सोडून निघून गेले तेव्हा तो मागे राहिला.DAMar 53.1

    ह्या भेटीच्या वेळेस इस्राएलामधील महान धर्मगुरूंच्या संबंधात येशूला आणण्याच्या विचारात त्याचे आईबाप होते. देवाच्या वचनाशी तो काटेकोर एकनिष्ठ असल्यामुळे यहूदी धर्मगुरूंचा विधीसंस्कार आणि वक्तव्ये त्याला पसंत नव्हते. विद्वान धर्मपुढाऱ्यांचा मानसन्मान करून त्यांच्या शिक्षणाकडे तो अधिक लक्ष देईल अशी योसेफ आणि मरीया यांची धारणा होती. परंतु मंदिरातील येशूला देवाने शिक्षण दिले होते. शिकलेले तो ताबडतोब दुसऱ्यांना उघड करून सांगू लागला.DAMar 53.2

    त्या काळात मंदिराच्या बाजूलाच एक पवित्र पाठशाळा होती आणि तिचा अभ्यासक्रम संदेष्ट्याच्या पाठशाळेप्रमाणे होता. ह्या ठिकाणी प्रमुख धर्मगुरू आपल्या चेल्याबरोबर हजर होते आणि येशू तेथे गेला. ह्या गंभीर विद्वानांच्या चरणाशी बसून त्यांचे शिक्षण त्याने लक्षपूर्वक ऐकिले. ज्ञान संपादन करण्याच्या भावनेने त्याने भाकीताविषयी आणि मशीहाच्या आगमनाकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या व त्यावेळी घडत असलेल्या घटनाविषयी त्यांना प्रश्न विचारला.DAMar 53.3

    देवाविषयी ज्ञान संपादन करण्यास तो अति आतूर आहे असे त्याने दर्शविले. तारण प्राप्तीसाठी महत्त्वाचे असलेले परंतु फार दिवसापासून दुर्बोध झालेल्या गहन सत्याविषयी त्याचे प्रश्न होते. ह्या विद्वान लोकांची विचारसरणी किती संकुचित आणि उथळ होती हे दर्शविले गेले. प्रत्येक प्रश्नामध्ये दिव्य बोध मांडून सत्याचे नवे स्वरूप पुढे ठेविले होते. धर्मगुरूंनी मशीहाच्या आगमनाने यहूदी राष्ट्राच्या होणाऱ्या उत्कर्षाविषयी सांगितले; परंतु येशूने यशयाने केलेले भाकीत पुढे मांडले आणि देवाच्या कोकऱ्याचा होणारा क्लेश व छळ आणि मरण याविषयी प्रश्न विचारले.DAMar 53.4

    विद्वानांनी त्याच्याकडे वळून प्रश्नांचा भडिमार केला परंतु त्याच्या उत्तरांनी ते आश्चर्यचकित झाले. बालकाच्या विनयशीलतेने त्याने शास्त्रवचने बोलून दाखविली आणि त्यांना ज्ञात नसलेला गर्भित अर्थ सादर केला. सत्याचे पालन केले तर सांप्रत धर्मात सुधारणा घडून येईल. आध्यात्मिक गोष्टीमध्ये जागृती निर्माण झाली असती आणि येशूने सेवाकार्याला सुरू करतेवेळी पुष्कळांनी त्याचा स्वीकार केला असता.DAMar 53.5

    धर्मगुरूंना माहीत होते की येशूचे शिक्षण त्यांच्या पाळशाळेत झाले नव्हते तरी भाकीताविषयी त्याचे ज्ञान त्यांच्यापेक्षा सरस होते. हा विचारवंत गालीली मुलगा मोठा होतकरू होईल असे त्यांना वाटले. आपल्या पाठशाळेत विद्यार्थी म्हणून त्याला घेण्याची त्यांची इच्छा होती, अशासाठी की इस्राएलमध्ये तो एक नामंकित गुरू होईल. त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यास ते तयार होते. कारण लहान मुलाच्या कोवळ्या मनावर आपल्या साच्याचा चांगला ठसा उमटविता येईल.DAMar 53.6

    आतापर्यंत मनुष्याच्या शब्दांनी त्यांचे अंतःकरण कधी हेलावले नव्हते परंतु येशूच्या बोलाने त्यांच्या मनावर चांगलाच परिणाम झाला होता. इस्राएलांतील पुढाऱ्यांना प्रकाश देण्याचा देव प्रयत्न करीत होता आणि ते साध्य करण्यासाठी उपलब्ध असलेल्या माध्यमाचा तो उपयोग करीत होता. त्यांच्या अहंपणामुळे कोणाकडूनही आम्ही शिक्षण घेऊ शकतो असे कबूल करायला त्यांना तिरस्कारणीय वाटले असते. येशू त्यांना शिकवत आहे असे दिसले असते तर त्याचे ऐकायला त्यांना तिरस्कार वाटला असता. परंतु स्वतःची खुशामत करून म्हणत होते की, ते त्याला शिक्षण देत होते किंवा त्याच्या शास्त्राच्या ज्ञानाची ते परीक्षा घेत होते. तारुण्याचे लावण्य आणि विनयशिलता यामुळे त्यांच्या दुराग्रहाचे निवारण झाले. न कळत त्यांची मने देवाच्या वचनाला खुली झाली आणि पवित्र आत्मा त्यांच्या मनाला बोलला. DAMar 54.1

    भाकीताच्या स्पष्टीकरणाने त्यांची मशीहाविषयीची अपेक्षा फोल ठरली हे स्वीकारल्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हते. ज्याद्वारे त्यांची महत्त्वाकांक्षा उंचावली होती त्या तात्त्विक भूमिकेचा ते त्याग करू शकले नव्हते. शिकवीत असताना शास्त्रवचनाचा गैर अर्थ त्यांनी लावला असे ते कबूल करीत नव्हते. ते एकमेकामध्ये कुजबुजू लागले, पाठशाळेत न शिकता त्याला एवढे ज्ञान कोठून? प्रकाश अंधारात चमकत होता, “तरी अंधाराने त्याचे ग्रहण केले नाही.’ योहान १:५.DAMar 54.2

    त्या अवधीत योसेफ आणि मरीया गोंधळून जाऊन दुःखी झाले होते. यरुशलेम सोडून माघारी प्रवासास लागल्यावर येशू हरवला होता. तो यरुशलेमात माघारी राहिला हे त्यांना कळले नाही. त्यावेळी त्या भागातील लोकसंख्या भरपूर होती आणि गालीलाकडे जाणारा तांडा फार मोठा होता. शहर सोडताना चोहोकडे गोंधळ होता. परतीच्या प्रवासात मित्रमंडळी व सोबती यांच्याबरोबर बोलण्यात ते रमले होते आणि रात्र होईपर्यंत त्यांचे लक्ष त्याच्या गैरहजेरीकडे गेले नाही. रात्री विसाव्यासाठी ते थांबले असता त्याची त्यांना आठवण झाली. आपल्या घोळक्यात तो आहे असे वाटून त्यांना त्याची चिंता वाटली नाही. जरी तो लहान होता तरी त्याच्यावर फार विश्वास होता. गरज लागेल तेव्हा तो मदतीस नेहमी तयार असे. परंतु आता ते भयभीत झाले होते. घोळक्यात त्याचा शोध केला परंतु ते सर्व व्यर्थ होते. त्यांच्या मनाचा थरकाप झाला आणि लहान असताना हेरोद राजा त्याला मारण्याचा कसा प्रयत्न करीत होता ह्याचे स्मरण त्यांना झाले. वाईट विचारांनी त्यांची मने भरली आणि स्वतःला दूषण देऊ लागले.DAMar 54.3

    यरुशलेमला परत जाऊन ते शोध करू लागले. दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये उपासकामध्ये मिसळून गेल्यावर परिचित आवाजाकडे त्यांचे लक्ष वेधिले. त्यात ते चूक करू शकत नव्हते. त्याच्यासारखा गंभीर आणि कळकळीचा मधुर आवाज दुसऱ्या कोणाचा नव्हता.DAMar 54.4

    धर्मगुरूंच्या पाठशाळेत येशू दिसला. त्याला पाहून त्यांना अत्यानंद तर झालाच परंतु त्यांची धास्ती आणि दुःख ते विसरू शकले नाहीत. त्याच्याजवळ आल्यावर आईने त्याला म्हटले, “बाळा, तू आम्हाबरोबर असा का वागलास? पाहा, बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो.”DAMar 55.1

    त्याने उत्तर दिले, “तुम्ही माझा शोध केला हे कसे? जे माझ्या बापाचे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?’ परंतु तो हे जे शब्द बोलला ते ती समजली नाहीत असे समजून त्याने वर हात करून दाखविले. त्याच्या मुखावर प्रकाश चमकल्याचे पाहून ते चकित झाले. मानवतेमध्ये देवत्त्व चमकत होते. मंदिरामध्ये धर्मगुरू आणि त्याच्यामध्ये चाललेला संवाद ते ऐकत होते. त्याची प्रश्नोत्तरे ऐकून त्यांनी आश्चर्य केले. त्याच्या शब्दांनी मनात चाललेल्या विचारमालिकेचा केव्हाही विसर पडणार नव्हता.DAMar 55.2

    त्याने विचारलेल्या प्रश्नात बोध होता. “जे माझ्या बापाचे आहे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?’ ह्या पृथ्वीवर करावयाच्या कामात येशू गुंतला होता; परंतु योसेफ आणि मरीया यांनी आपल्या कामाकडे दुर्लक्ष केले होते. पुत्र देऊन देवाने त्यांचा मोठा सन्मान केला होता. येशूचा जीव सुरक्षीत ठेवण्यासाठी पवित्र दिव्यदूतांनी योसेफाला दिशा दाखविली होती. क्षणाचाही त्यांना त्याचा विसर पडायला नको होता. परंतु ते तर संबध दिवस त्याच्याविषयी बेफिकीर होते. त्यांची चिंतापरिहार केल्यानंतर ते त्यामध्ये स्वतःला दोष देण्याऐवजी त्याला दोष देऊ लागले.DAMar 55.3

    येशू हा स्वतःचा मुलगा आहे असे समजणे आईबापाच्या दृष्टीने सहाजिकच आहे. प्रतिदिनी तो त्यांच्याबरोबर असे पुष्कळ बाबतीत त्याचे जीवन इतर मुलांच्यासारखे होते. तो देवपुत्र आहे असे समजायला त्यांना कठीण जात होते. जगाच्या उद्धारकाराच्या सहवासात लाभणाऱ्या आशीर्वादाचे महत्त्व मानण्यास कसूर करण्याचा धोका त्यांच्यापुढे होता. त्याच्यापासून विभक्त झाल्याचे दुःख आणि त्याच्या बोलाने बसलेला हलका ठपका याद्वारे त्यांच्या मनावर त्यांच्या श्रद्धेचे पावित्र्य ठसविले होते.DAMar 55.4

    मातेला उत्तर देत असताना देवाशी असलेले त्याचे नाते प्रथमच त्याने दर्शविले. त्याच्या जन्माअगोदर दिव्यदूताने मरीयेले म्हटले, “तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा बाप दावीद याचे राजासन देईल, तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील.’ लूक १:३२, ३३. मरीयेने हे शब्द आपल्या मनात ठेविले; आपला मुलगा इस्राएलचा मशीहा होणार असा तिचा विश्वास होता तरी त्याच्या कार्याचा तिला उमज झाला नव्हता. आता तिला त्याच्या बोलाचा अर्थ समजला नव्हता. परंतु तिला माहीत होते की त्याने योसेफाचा नातेसंबंध तोडला होता व देवपुत्र असल्याचे त्याने स्पष्ट सांगितले होते.DAMar 55.5

    येशूने जगातील आईबापाकडे दुर्लक्ष केले नव्हते. यरुशलेमापासून तो त्यांच्याबरोबर घरी परतला आणि त्यांच्या कष्टाच्या जीवनात त्याने हातभार लाविला. त्याच्या कार्याचे रहस्य त्याने आपल्या मनात झाकून ठेविले आणि नम्रतेने ते सुरू करण्याच्या ठरावीक वेळेची तो वाट पाहात होता. तो देवपुत्र असल्याचे समजल्यानंतर आठरा वर्षे त्याने नासरेथशी असलेला घनिष्ठ संबंध ओळखला आणि पुत्र, बंधु, स्नेही आणि नागरिक या नात्याने कार्यभाग उरकला. DAMar 56.1

    मंदिरामध्ये येशूचे कार्य स्पष्ट झाल्यावर त्याने समुदयाशी आपला संबंध कमी केला. त्याच्या जीवनाचे गुपित जाणणाऱ्याबरोबर यरुशलेमवरून गाजावाजा न करता शांतपणे परत जाण्याचे त्याने ठरविले. वल्हांडण सणाच्याद्वारे जगिक चिंतेपासून दूर राहाण्यास देव आपल्या लोकास पाचारण करीत होता आणि मिसरातून अद्भुत रीतीने केलेल्या सुटकेची त्यांना तो आठवण करून देत होता. पापमुक्ततेचे आश्वासन हा कामामध्ये अंतर्भूत असलेले त्यांनी पाहावे अशी त्याची इच्छा होती. वधलेल्या कोकऱ्याच्या रक्ताने इस्राएल लोकांना आसरा लाभला तसेच ख्रिस्तरूधिराने त्यांना मुक्तिलाभ होणार होता. परंतु त्याचे जीवन विश्वासाने आपले स्वतःचे केल्यामुळेच केवळ ख्रिस्ताद्वारे त्यांचे तारण होणार होते. ख्रिस्त हा वैयक्तिक उद्धारक आहे असे प्रतिकात्मक विधीद्वारे उपासकाला दर्शविल्यावरच त्याचा प्रभाव पडत होता. ख्रिस्ताच्या कार्याविषयी लोकांनी प्रार्थनापूर्वक अभ्यास करून त्यावर मनन करावे अशी देवाची इच्छा होती. परंतु यरुशलेम सोडल्यानंतर प्रवासातील गजबज आणि समाज व्यवहारातील बातचित यामध्ये लोकांची मने रंगून गेली आणि पाहिलेला विधि ते विसरून गेले. उद्धारक त्या घोळक्याकडे आकर्षिला गेला नाही.DAMar 56.2

    यरुशलेमाहून योसेफ आणि मरीया यांच्याबरोबर येशू येत असताना त्यांची मने त्याच्या दुःखाच्या भाकीताकडे वेधावी अशी त्याची इच्छा होती. वधस्तंभावर आपल्या आईचे दुःख कमी करण्याचा त्याने प्रयत्न केला. तिचा तो आता विचार करीत होता. त्याचे शेवटचे प्राणांतिक दुःख, व्यथा मरीयेला पाहावे लागणार होते आणि त्याचे सेवाकार्य तिने समजून घ्यावे असे येशूला वाटत होते. कारण जेव्हा तिच्या जीवात तरवार भोसकली जाईल तेव्हा ती सहन करण्यास ती खंबीर राहील. येशू तिच्यापासून विभक्त झाल्यावर त्याचा शोध करण्यास तिला दुःखाचे तीन दिवस घालवावे लागले, तसेच जगाच्या पापासाठी त्याला वाहून दिल्यावर पुन्हा तो तिच्यापासून तीन दिवस हरवला जाईल. तो समजावून देत असलेला शास्त्रभाग तिने समजून घेतला असता तर त्याच्या मरणाबद्दल होणारे प्राणांतिक दुःख सहन करण्यास तिला किती सोपे गेले असते!DAMar 56.3

    जर योसेफ आणि मरीयेने प्रार्थना व चिंतन याद्वारे त्यांचे मन देवावर केंद्रित केले असते तर त्यांच्या श्रद्धेचे पावित्र्य त्यांना उमगले असते आणि येशूकडे त्यांचे दुर्लक्ष झाले नसते. एक दिवस दुर्लक्ष झाल्याने त्यांचा उद्धारक हरविला; परंतु त्याचा शोध करण्यास त्यांना तीन दिवस चिंतेत घालवावे लागले. तीच गोष्ट आमची आहे. दुर्भाषण, निरर्थक बोल, किंवा प्रार्थनेत हलगर्जीपणा यामुळे कदाचित उद्धारकाच्या समक्षतेला पारखे होऊ आणि पुनश्च त्याचा शोध करण्यास आणि हरपलेली शांती पुन्हा मिळविण्यास दुःखाचे बरेच दिवस घालवावे लागतील.DAMar 56.4

    एकमेकांच्या सहवासात आम्ही दक्षता घेतली पाहिजे नाहीतर आम्हाला येशूचा विसर पडेल, आणि तो नसताना बेपर्वाईने दिवस काढू. जगिक गोष्टीत रमून गेल्यावर ज्याच्यामध्ये निरंतर जीवनाची आशा केंद्रित झाली आहे त्याचा विचारही मनात येत नाही. येशू आणि दिव्यदूत याच्यापासून आम्ही विभक्त होतो व आपापल्या मार्गाने निघून जातो. ख्रिस्त वास्तव्य नसलेल्या ठिकाणी पवित्र देवदूत हजर राहू शकत नाहीत, आणि तो नसला तरी काही फरक पडत नाही. ह्या कारणामुळे ख्रिस्त अनुयायामध्ये वारंवार निराशा निर्माण होते.DAMar 57.1

    पुष्कळजण धार्मिक सभांना हजर राहातात आणि देवाच्या वचनाने ते ताजतवाने होतात, समाधान पावतात; परंतु चिंतन, मनन आणि प्रार्थना या बाबतीत हलगर्जीपणा केल्यामुळे आशीर्वादाला मुकतात, आणि पूर्वीपेक्षा ते अधिक निराधार होतात. त्यांच्याशी देव अधिक निष्ठुरतेने वागत आहे असे ते समजतात. त्यांत त्यांचा दोष आहे हे त्यांना दिसत नाही. येशूपासून विभक्त राहिल्याने त्याच्या वास्तव्याच्या प्रकाशाला ते मुकले जातात.DAMar 57.2

    ख्रिस्त जीवनावर प्रतिदिनी एक तास चिंतनपर विचार केल्यास हितकारक होईल. एकेक मुद्दा घेऊन प्रत्येक दृश्याचे कल्पनाशक्तीने आकलन करून घ्या, विशेषतः अंतिम दृश्याचे. आम्हासाठी त्याने केलेल्या यज्ञबलीवर विचार केला तर त्याच्यावरील आमची श्रद्धा स्थिर राहील, आमचे प्रेम प्रज्वलित होईल आणि त्याच्या आत्म्याने आम्ही अधिक भरून जाऊ. शेवटी जर आमचा उद्धार व्हायला पाहिजे तर वधस्तंभ चरणी आम्ही पश्चात्तापाचा आणि विनम्रतेचा धडा शिकला पाहिजे.DAMar 57.3

    परस्परांच्या सहवासात आम्ही परस्पराला आशीर्वाद होऊ या. आम्ही ख्रिस्ताचे झाल्यास त्याचाच विचार आम्हाला प्रिय राहील. त्याच्याविषयी बोलण्यास आम्हाला आनंद वाटेल; आणि त्याच्या प्रेमाविषयी दुसऱ्याशी बोलत असता दिव्य प्रभावाने आमची अंतःकरणे मृदु होतील. त्याच्या स्वभावातील सौंदर्य पाहून “तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता त्याच्याशी समरस होऊ.” २ करिंथ. ३:१८.DAMar 57.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents