Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ३८—चला थोडा विसावा घ्या

    मत्तय १४:१, २, १२, १३; मार्क ६:३०-३२; लूक ९:७-१०.

    शिष्य त्यांच्या सेवाकार्याच्या फेरीहून परतल्यानंतर “येशूजवळ जमा होऊन आपण जे जे केले व शिकविले ते ते सांगितले. तो त्यास म्हणाला अरण्यस्थळी एकांती चला व थोडा विसावा घ्या; कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांस जेवावयास देखील अवकाश मिळेना.”DAMar 309.1

    शिष्य येशूकडे आले आणि घडलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या. येशूबरोबर असलेल्या त्यांच्या घनिष्ठ संबंधामुळे त्यांना आलेले अनुकूल व प्रतिकूल अनुभव, त्यांच्या कार्याच्यामुळे झालेल्या फलप्राप्तीचा आनंद, आणि अपयशामुळे झालेले दुःख, त्यांच्या चुका, आणि त्यांची असमर्थता याविषयी त्याला अहवाल देण्यास त्यांना हुरूप आला होता. सुवार्तीक म्हणून प्रथमच कार्य करताना त्यांनी चुका केल्या होत्या, आणि त्याविषयी अगदी मनमोकळेपणाने येशूला सांगितले तेव्हाच त्यांना अधिक मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमामुळे ते थकून गेले होते हे सुद्धा त्याला कळून चुकले होते.DAMar 309.2

    परंतु ज्या ठिकाणी ते जमा झाले होते त्या ठिकाणी त्यांना म्हणावा तसा एकांतवास मिळाला नसता; “कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यास जेवावयास देखील अवकाश मिळत नसे.’ येशूची वचने ऐकण्यास व रोगमुक्त होण्यास उत्सुक असलेले लोक त्याच्याभोवती गर्दी करीत होते. अनेकाना तो सर्व आशीर्वादाचा झरा आहे असे वाटल्यामुळे ते त्याच्याकडे ओढले गेले होते. आरोग्याचे वरदान प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्याभोवती गर्दी केलेल्या लोकांतून अनेकांनी त्याला त्यांचा तारणारा म्हणून स्वीकार केला. इतर अनेकजन, परूशामुळे त्याचा स्वीकार करण्यास घाबरले होते, ते सर्व पवित्र आत्मा उतरला तेव्हा परिवर्तित झाले होते, आणि त्यांनी रागावलेले याजक व अधिकारी यांच्यासमोर त्याला देवाचा पुत्र म्हणून मान्य केले होते.DAMar 309.3

    परंतु आता शिष्यासंगती राहता यावे म्हणून ख्रिस्ताला कोठेतरी एकांत स्थळी जावे असे वाटत होते, कारण त्याला शिष्यांना अनेक गोष्टी सांगावयाच्या होत्या. ते कार्य करीत असतांना त्यांना अनेक अडचणीतून जावे लागले होते आणि अनेक प्रकारच्या विरोधाना तोंड द्यावे लागले होते. आता पावेतो ते सर्व बाबतीत ख्रिस्ताचा सल्ला घेत आले होते; तथापि काही वेळ ते ख्रिस्ताशिवाय स्वतंत्रपणे कार्य करीत होते, आणि कित्येक वेळा काय करावे हे जाणून घेण्यासाठी त्याना फार त्रास होत होता. त्यांना त्यांच्या कामात फारच उत्साह वाटत होता, कारण ख्रिस्ताने त्यांना त्याच्या पवित्र आत्म्याशिवाय पाठविले नव्हते आणि त्याच्यावरील विश्वासामुळे त्यांनी अनेक चमत्कार केले; परंतु त्यांना स्वतःला आता जीवनी भाकरीवर स्वतःचे पोषण करावयाचे होते. ज्या ठिकाणी येशूबरोबर सुसंवाद साधता येईल, आणि भविष्य काळातील कार्यासाठी सूचना-मार्गदर्शन मिळविण्यासाठी त्यांना एकांत स्थळी जाणे आवश्यक होते.DAMar 309.4

    तो त्यास म्हणाला, “अरण्यास्थली एकांती चला व थोडा विसावा घ्या.” जे ख्रिस्ताची सेवा करतात त्यांच्याबरोबर तो अतिशय दयाळूपणाने, प्रेमळपणाने वागतो. तो शिष्यांना दाखवून देत होता की देव यज्ञाचा नव्हे तर दयेचा भोक्ता आहे. लोकांसाठी कार्य करण्यासाठी ते त्यांची सर्व शक्ती पणाला लावत होते, आणि त्यामुळे त्यांची शारीरिक व मानसिक शक्ती क्षीण होत होती, थकून जात होती. म्हणून त्यांनी विसावा घेणे हे त्यांचे कर्तव्य होते.DAMar 310.1

    शिष्यांना त्यांच्या कार्याचे यश अनुभवावयास मिळाले असतांना त्यांनी त्याचे श्रेय स्वतःच्या पदरात बांधणे यात धोका होता, आध्यात्मिक गर्व बाळगणे यात धोका होता, आणि अशाप्रकारे ते सैतानाच्या मोहात पडण्याच्या धोक्यात होते. त्यांच्यापुढे फार महान कार्य होते, म्हणून प्रथम त्यांना हे शिकावयाचे होते की, सामर्थ्य हे मीपणात नसते तर देवामध्ये असते. जसा मोशे सिनाय अरण्यात, जसा दावीद यहदीयातील डोंगराळ भागात, किंवा जसा एलीया करीथ ओहळाजवळ एकांतात गेला होता, तसेच शिष्यांनीसुद्धा, ख्रिस्ताबरोबर, निसर्गाबरोबर व स्वतःबरोबर सुसंवाद साधण्यासाठी एकांतात जाणे आवश्यक होते.DAMar 310.2

    शिष्य त्यांच्या सेवाकार्यावर गेल्यामुळे गैरहजर असतांना, येशूने गावोगावी, खेडोपाडी राज्याची सूवार्ता सांगत भेटी दिल्या. जवळ जवळ याच वेळी त्याला बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या मृत्यूची दु:खद बातमी समजली. या घटनने खुद्द त्याचा अंत त्याला दिसत होता आणि त्या मार्गाने त्याची वाटचाल चालू होती. त्याच्या मार्गावर गडद अंधारी छाया पसरत होती. याजक व धर्मगुरू त्याला जिवे मारण्याची वाट पाहत होते, गुप्त-हेर त्याच्या हालचालीवर डोळ्यांत ते घालून लक्ष ठेवीत होते. सर्व बाजूने त्याला ठार मारण्याच्या योजना वाढत होत्या. सर्व गालील प्रांतात शिष्यांनी केलेल्या सुवार्ताप्रसाराची बातमी हेरोदापर्यंत पोहचली, त्यामुळे येशूकडे त्याचे लक्ष वेधले. तो म्हणाला, “हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे; हा मेलेल्यातून उठला आहे म्हणून त्याच्या ठायी हे पराक्रम चालू आहेत.” म्हणून येशूला भेटण्याची इच्छा तो प्रगट करीत होता. हेरोदाला पदच्युत करण्याच्या व यहूदी राज्यातून रोमी राज्याचे जू मोडून काढण्याच्या हेतूने बंडाळी माजविली जाण्याची त्याला सतत भीती वाटत होती, लोकांमध्ये नाखुषीची व बंडाची वृत्ती विपुल दिसत होती. म्हणून गालील प्रांतात येशूचे कार्य फार काळ पुढे चालणार नाही हे अगदी उघड होते. त्याच्यावर ओढवणाऱ्या दुःखाचे क्षण जवळ येते होते, आणि म्हणून लोकसमुदायाच्या गोंधळातून काही काळ अलग होण्याची त्याची इच्छा होती.DAMar 310.3

    बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य, दुःखी अंतःकरणाने त्याचे छिन्नविच्छिन्न झालेले शव, दफनक्रियेसाठी घेऊन आले होते. नंतर ते येशूकडे गेले व त्याला सांगितले. येशू योहानापासून लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो असे वाटल्यामुळे योहोनाचे शिष्य ख्रिस्ताचा द्वेष करीत होते. मत्तयाच्या घरी मेजवाणीच्या वेळी येशू जकातदाराबरोबर पंक्तीला बसला होता तेव्हा येशूला दोष देण्याबाबत ते परूशाबरोबर सहमत झाले होते. त्याने योहानाची सुटका केली नव्हती म्हणून ते येशूच्या सेवाकार्याबाबत साशंक झाले होते. परंतु आता त्यांचा गुरू मरण पावला होता. त्यांच्या दुःखात त्यांना सांत्वन हवे होते, आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना मार्गदर्शन हवे होते, म्हणून ते ख्रिस्ताकडे आले, आणि त्यांनी त्यांच्या निष्ठा त्याच्या निष्ठेमध्ये एकरूप केल्या. तारणाऱ्याबरोबर सुसंवाद साधण्यासाठी त्यांनासुद्धा एकांतवासाची गरज होती. DAMar 311.1

    बेथसेदाजवळील सरोवराच्या उत्तरेकडील टोकाला, एक शांत निवांत प्रदेश होता. शरद ऋतुतील हवामानामुळे टवटवीत हिरवळीने नटलेल्या नयनरम्य प्रदेशाने, विसाव्यासाठी येशूचे व त्याच्या शिष्यांचे स्वागत केले. त्या स्थळाकडे जाण्यासाठी ते त्यांच्या मचव्यातून निघाले. या ठिकाणी ते भरगच्च रहदारीच्या महामार्गापासून व शहरी गडबड-गोंधळापासून दूर राहाणार होते. निसर्गदत्त सौंदर्य हेच खुद्द विसावा होते. येथे शास्त्री परूशांचे क्रोधयुक्त, हरकतीचे, टोमणेयुक्त आणि निंदक शब्द त्यांच्या कानावर पडणार नव्हते, तर केवळ येशूची मधुर वचनेच त्यांच्या कानी पडणार होती. येथे त्यांना त्यांच्या प्रभूच्या सहवासाचा आनंदमय अनुभव या अल्पशा काळांत उपभोगता येणार होता.DAMar 311.2

    येशूने व त्याच्या शिष्यांनी घेतलेला विसावा हा काही चैनबाजीचा किंवा विषयलोलुप नव्हता. एकांतवासात घालविलेला हा काळ त्यांच्या आंनदोत्सवासाठी वाहीलेला काळ नव्हता. तेथे त्या सर्वांनी मिळून देवाच्या कार्याबाबत अधिक क्षमता आणण्याच्या शक्यतेबाबत विचार विनिमय केला होता. शिष्य ख्रिस्ताबरोबर वावरले होते म्हणून ते त्याचा शब्द न शब्द समजून घेऊ शकत होते; म्हणून त्याला दृष्टांताद्वारे बोलण्याची काहीच गरज नव्हती. त्याने चका दुरूस्त केल्या, आणि लोकांना भेटण्याची योग्य पद्धत दाखवून दिली. त्यांने त्यांना स्वर्गीय सत्याचे मौल्यवान भांडार अधिक उघडून दाखविले. त्यामुळे ते दैवी सामर्थ्याने भारले गेले व आशा आणि धैर्य यांनी प्रेरित झाले.DAMar 311.3

    जरी येशू चमत्कार करू शकत होता, आणि त्याने त्याच्या शिष्यांनाही चमत्कार करण्याचे सामर्थ्य दिले होते, तरीही त्याने थकलेल्या सेवकांना शहरापासून ग्रामीण भागांत जाण्यास व विसावा घेण्यास सांगितले, “पीक फार, पण कामकरी थोडे आहे.’ असे जेव्हा तो म्हणाला, तेव्हा त्याने त्याच्या शिष्यांना अविश्रांत श्रम करण्याचा आग्रह केला नव्हता. तथापि तो म्हणाला, “यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा.” मत्तय ९:३८. देवाने प्रत्येक मनुष्याला काम नेमून दिलेले आहे. तेही ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे (इफिस. ४:११-१३), तो काही थोडक्या लोकांवर जबाबदारीचा अधिक भार टाकतो आणि इतरावर आत्म्यासाठी काहीच ओझे टाकीत नाही असे होऊ देत नाही.DAMar 311.4

    येशूने त्यावेळी त्याच्या शिष्यासाठी जे करूणायुक्त शब्द वापरले, तेच करुणायुक्त शब्द आजही त्याच्या सेवकासाठी वापरतो, “अरण्यस्थली एकांती चला व थोडा विसावा घ्या.” मानवाच्या आध्यात्मिक गरजा भागवत असतांनासुद्धा, नेहमी कामाच्या दडपणाखाली व क्षुब्ध मनःस्थितीत कार्य करणे शहाणपणाचे नाही. कारण असे करण्यामुळे व्यक्तिगत धर्मानिष्ठेकडे दुर्लक्ष केले जाते, आणि मन, आत्मा, आणि शरीर यांच्या क्षमतेवर अधिक भार पडतो. ख्रिस्ताच्या शिष्यांकडून स्वनाकार अपेक्षीत आहे, आणि मग त्याग हा केलाच पाहिजे तथापि दक्षताही घेतलीच पाहिजे नाहीतर, त्यांच्या वाजवीपेक्षा अधिक औत्सुक्याद्वारे सैतान मानवी अशक्तपणाचा फायदा घेईल आणि देवाचे कार्य भ्रष्ट होईल.DAMar 312.1

    धर्मगुरूंच्या मताप्रमाणे सातत्याने कार्य करीत राहाणे हा धर्माचा सारांश आहे. धार्मिकतेची श्रेष्ठता प्रगट करण्यासाठी ते काही बाह्यात्कारी कर्मकांडावर विसंबून राहत होते. अशा त-हेने त्यांनी त्यांच्या आत्म्यांना देवापासून अलग केले होते, आणि त्यांनी स्वतःभोवती आत्मसंतुष्टता तयार केली होती. आजही तोच धोका अस्तित्वात आहे. जेव्हा बाह्य कृत्यात वाढ होते आणि जेव्हा लोक देवासाठी कोणतेही कार्य करण्यात यशस्वी होतात, तेव्हा मानवी योजना व पद्धत यावर विश्वास ठेवणे धोक्याचे होते. क्वचितच प्रार्थना करणे आणि अल्प विश्वास बाळगणे हा मानवी वृतीचा कल होत चालला आहे. शिष्याप्रमाणेच, देवच आपला खरा आधार आहे याकडे आपलेही दुर्लक्ष होण्याचा धोका निर्माण झाला आहे, आणि आपण आपल्या कर्मकांडालाच आपला तारणारा बनविण्याचा प्रयत्न होत आहे. जे सामर्थ्य कार्य करते ते त्याचेच आहे हे समजून घेऊन, आपण सतत येशूवर आपली दृष्टी खिळली पाहिजे. पतित मानवाच्या तारणासाठी आपण मनोभावे कार्य करीत असताना, आपले चिंतन, प्रार्थना, आणि शास्त्राभ्यास यासाठी वेळ कामी लावला पाहिजे. जास्तीत जास्त प्रार्थना करून, ख्रिस्ताच्या गुणवैशिष्ट्याद्वारे पूर्ण केलेले कार्य कल्याणकारी आहे हे शेवटी सिद्ध होईल.DAMar 312.2

    कार्याची व जबाबदारीची गर्दी असलेली येशूपेक्षा इतर दुसरी व्यक्ती कधीच नव्हती; तरीसुद्धा किती तरी वेळा तो प्रार्थना करताना आढळत असे! किती सातत्याने तो देवाबरोबर संपर्क साधत होता! या जगातील त्याच्या जीवनातील इतिहासात पुन्हा न पुन्हा खालीलप्रमाणे उल्लेख आढळतात, “मग तो सकाळी उठून बाहेर गेला, व अरण्यात जाऊन त्याने तेथे प्रार्थना केली.” “पुष्कळ लोकसमुदाय ऐकावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास जमले. तो तर अरण्यांत एकांती जाऊन प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला.’ मार्क १:३५; लूक ५:१५, १६; ६:१२.DAMar 312.3

    इतरांच्या कल्याणार्थ संपूर्णपणे वाहून घेतलेल्या जीवनांत, प्रवास करण्यापासून व दररोज त्याच्या मागे अलोट गर्दी करणाऱ्यापासून उद्धारकाला दूर राहाणे अगत्याचे वाटले. विसावा घेण्यासाठी आणि त्याच्या पित्याबरोबर अखंड संबंध साधण्यासाठी त्याला न संपणाऱ्या दररोजच्या हालचाली आणि मानवी गरजा यांच्याकडे पाठ फिरवणे आवश्यक होते. आमच्यातील एक या नात्याने, आमच्या गरजा व दुर्बलता यातील एक भागीदार असा तो देवावर पूर्णपणे विसंबून होता, आणि एकांत ठिकाणी प्रार्थना करून त्याने दैवी सामर्थ्य मिळविण्याचा प्रयत्न केला, यासाठी की खंबीरपणे कार्याच्या व संकटाच्या सामोरे जाता यावे. या पापी जगांत येशूने जीवनातील झगड्यांना तोंड दिले आणि शारीरिक यातना सहन केल्या. देवाबरोबर संपर्क साधतांना तो त्याला चिरडून टाकणाऱ्या दुःखाचे ओझे हलके करू शकत होता. देवाच्या सानिध्यात त्याला समाधान व संतोष लाभत असे.DAMar 313.1

    ख्रिस्ताद्वारे मानवाची आरोळी अमर्याद दयाळू देवापर्यंत पोहचली. स्वर्गीय प्रवृत्तीने मानवता प्रेरित होऊन मानवता व देवत्व यांचा सांधा एकत्र जोडला जाईपर्यंत मानव या नात्याने देवाच्या सिंहासनासमोर त्याने प्रार्थना केली. देवाबरोबर सतत संपर्क ठेवून त्याने देवाकडून जीवन मिळविले, यासाठी की ते जीवन त्याला जगाला देता यावे. त्याचा अनुभव तोच आपलाही असला पाहिजे.DAMar 313.2

    तो आम्हाला आज्ञा करतो, “अरण्यास्थली एकांती चला.” आपण जर त्याचे सांगणे मनावर घेतले तर आपण अधिक प्रबळ व उपयुक्त व हुशार होऊं. शिष्यांनी येशूचा शोध केला आणि ते त्याच्याकडे गेले व त्याला सर्व काही सांगितले, त्याने त्यांना प्रोत्साहन व शिक्षण दिले. जर आपणही आज थोडा वेळ काढून त्याच्याकडे जाऊन, त्याला आपल्या गरजा सांगितल्या तर आपली निराशा होणार नाही; आपल्याला मदत करण्यास तो आमच्या उजव्या बाजूला उभा राहील. आपल्यात अधिक भाविकपणा असणे गरजेचे आहे, आपल्या तारणाऱ्यावर आपला अधिक भरवसा असला पाहिजे. ज्याला समर्थ देव, सनातन पिता शांतीचा अधिपती’ संबोधिले आहे “त्याच्या खांद्यावर सत्ता राहील,’ असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो अद्भूत मंत्री आहे. त्याच्याकडे आम्ही ज्ञान मागावे असे आम्हाला सांगण्यात आले आहे. तो “कोणास दोष न लाविता सर्वांस दातृत्वाने देतो.’ यशया ९:६; याकोब. १:५.DAMar 313.3

    या सर्वांचा सारांश असा की, जे देवाच्या हाताखाली प्रशिक्षिण घेत आहेत त्यांचे जीवन जगाशी सदृश्य नसावे म्हणजे त्याच्या परंपरा, रूढीप्रमाणे नाही असे जीवन त्यांनी प्रगट करावे. प्रत्येकाने देवाच्या इच्छेचे ज्ञान संपादन केल्याचा व्यक्तिगत अनुभव घेणे आवश्यक आहे. तो अंतःकरणाशी बोलत असताना आम्ही व्यक्तिशः त्याचे ऐकले पाहिजे. जेव्हा इतर सर्व गडबड गोंधळ शांत झालेला असतो, आणि तशा निःशब्द प्रशांत वातावरणांत आपण त्याच्यापुढे जातो तेव्हा आत्म्याचा मुग्धतेत देवाचा ध्वनी अधिक सुस्पष्ट होतो. तो आम्हाला सांगतो, “शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे.” स्तोत्र. ४६:१०. देवाजवळ खरा विसावा मिळू शकतो. जे देवासाठी कार्य करतात त्यांच्यासाठी ही फलदायी तयारी आहे. धावधाव धावणाऱ्या प्रचंड गर्दीमध्ये आणि जीवनातील जबरदस्त उद्योगधंद्याच्या व्यापाच्या तणावामध्ये अशा प्रकारे तरतरीत झालेला आत्मा आनंदी व शांत वातावरणाने घेरला जाईल. त्याचे जीवन सुगंध दरवळेल आणि लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहचणारे सामर्थ्य प्रगट करील.DAMar 314.1