Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय २१—बेथेस्दा तळे व धर्मसभा

    योहान ५.

    “यरुशलेमात मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात; त्याजवळ पांच पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, अंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे; तो पाणी हालण्याची वाट पाहात असे.”DAMar 158.1

    ठराविक वेळी या तळ्यातील पाणी ढवळले जात होते, आणि सामान्यतः असा विश्वास बाळगण्यात येत होता की तळ्यातील पाणी ढवळण्याचा प्रकार हा दिव्य शक्तीच्या कार्याचा परिणाम होता. पाणी ढवळले गेल्यानंतर जो सर्वांत प्रथम पाण्यात उतरील तो कसल्याही रोगापासून मुक्त होईल. शेकडो रुग्ण त्या तळ्याला भेट देत होते; परंतु त्यांची गर्दी इतकी प्रचंड होत होती की जेव्हा पाणी ढवळले जाई तेव्हा सर्व प्रथम उडी टाकण्यासाठी रोगी शीघ्र गतीने पुढे सरसावत होते आणि त्यांच्या पायाखाली, स्त्रीया, पुरुष व लेकरे अक्षरशः तुडविले जात होते. अनेक रुग्णांना तळ्याच्या काटापर्यंत पोहंचणे अशक्य प्राय झाले होते. अनेकजन कसे तरी काठापर्यंत पोहचण्यास यशस्वी होत होते. परंतु ते तेथेच गतप्राण होत होते. दिवसा उन्हापासून आणि रात्री थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून रोग्यासाठी तळ्याच्या आसपास छप्परे (पडव्या) उभारण्यात आली होती. दिवसाचे दिवस बरे होण्याच्या निरर्थक आशेने तळ्याच्या काठापर्यंत सरपटत गेलेले कांही रोगी त्या पडव्यात रात्र काढीत होते.DAMar 158.2

    त्यावेळी येशू पुन्हा यरुशलेमाला आला होता. एके दिवशी चालता चालता चिंतन व देवाची प्रार्थना करीत तो त्या तळ्यावर आला, तेव्हा, त्यांच्या एकमेव समजल्या जाणाऱ्या संधीची वाट पाहाणारे भयंकर दुःखी रोगी त्याच्या दृष्टीस पडले. त्यावेळी तो त्याच्या आरोग्यदायी सामर्थ्याचा उपयोग करण्यास व त्या प्रत्येक दुःखी रोग्यास बरे करण्याची इच्छा बाळगीत होता. परंतु तो शब्बाथ दिवस होता. अनेक लोक उपासनेसाठी मंदिराला चालले होते, आणि तो हे जाणून होता की रोग बरा करण्याच्या कृतीने यहूदी लोकांचे प्रतिकूल मत चेतविले जाईल आणि त्यामुळे त्याचे कार्य थोड्या वेळातच बंद पडेल.DAMar 158.3

    परंतु अतिशय भयंकर अशी एक वस्तुस्थिती तारणाऱ्याच्या दृष्टीस पडली. ती म्हणजे एक असहाय, पंगू मनुष्य सलग अडतीस वर्ष आजारी होता. त्याचा रोग मुख्यतः त्याच्या स्वतःच्या पापाचा परिणाम होता, आणि देवाने त्याला दिलेली शिक्षा होती या भावनेने त्याकडे पाहिले जात होते. अगदी एकटा कोणीही मित्र नसलेला, त्याला असे वाटत होते की देवाचीच त्याच्यावर कृपादृष्टी नव्हती. तो अनेक वर्षे दुःख सोसीत पडला होता. जेव्हा पाण्याची हालचाल होण्याची शक्यता असे, तेव्हा त्यांच्या असहायपणाची कीव करणारे त्याला पडवीकडे नेण्यास मदत करीत होते. परंतु गरजेच्या वेळी त्याला कोणीच मदत करण्यास पुढे येत नव्हते. पाण्याची ढवळा ढवळ त्याच्या दृष्टीस पडत होती, परंतु तळ्याच्या काठाच्या पलीकडे जाण्यास त्याला कधीच शक्य झाले नव्हते. त्याच्यापेक्षा सशक्त असलेले त्याच्याअगोदरच उडी मारत होते. तो स्वार्थी, झोंबा झोबी करणाऱ्या समुदायाच्या गर्दीबरोबर यशस्वीरित्या स्पर्धा करू शकत नव्हता. मुख्य उद्देशाबाबतचे त्याचे चिकाटीचे प्रयत्न, त्याची अस्वस्थता व नैराश्य यामुळे त्याची शेष शक्ती झीजत चालली होती.DAMar 158.4

    बिचारा आजारी आपल्या बाजेवर पडून राहिला होता आणि अधून मधून तळ्याकडे पाहण्यासाठी स्वतःचे माथे वर उचलत होता, आणि अशाच वेळी एक कोमल दयामय चेहरा त्याच्याकडे ओनवून पाहू लागला, आणि “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय’ या शब्दांनी त्याचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या अंतःकरणात आशेचा अंकुर उगवला होता. त्याला वाटले होते की कोणत्यातरी मार्गाने त्याला मदत मिळवावयाची होती. परंतु प्रोत्साहनाचा फुलोरा तत्काळ कोमेजून गेला होता. तळ्यावर पोहंचण्याचा त्याने कित्येकदा प्रयत्न केला होता याची त्याला आठवण झाली, आणि आता पाणी पुन्हा हालवले जाण्यापूर्वी त्याला जगण्याची फारच थोडी आशा होती. हताश झालेला चेहरा, येशूकडे वळून तो म्हणाला, “महाराज, पाणी उसळले असता मला तळ्यात सोडवावयास माझा मनुष्य नाही; आणि मी जात आहे इतक्यात दुसरा कोणी माझ्यापुढे उतरतो.”DAMar 159.1

    या दुःखणाईताला येशू त्याच्यावर विश्वास ठेवण्यास सांगत नाही तर साध्या सरळ शब्दात त्याला म्हणतो, “ऊठ, आपली बाज उचलून चालावयास लाग.” आणि ते शब्द कानी पडताच त्या माणसाचा विश्वास त्या वचनावर बसतो व त्याच्या नसानसातून नवीन जीवन सळसळू लागते. त्याच्या पंगू अवयवात शक्ती संचार करते. तो येशूची आज्ञा पाळण्यासाठी सज्ज होतो. त्याचे सर्वांग त्या इच्छा-शक्तीला साथ देते. स्वतःच्या पायावर तडकन उभा राहून, तो एक धडधाकट व्यक्ती बनल्याचे त्याला आढळून येते.DAMar 159.2

    येशूने त्याला दैवी मदत देण्याचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते. त्यामुळे त्याने संशय धरला नसता, आणि बरे होण्याच्या त्याच्या एकमेव संधीला तो मुकला असता. परंतु त्याने ख्रिस्ताच्या शब्दावर विश्वास ठेवला, आणि त्याप्रमाणे कृती केल्यामुळे त्याला शक्ती मिळाली.DAMar 159.3

    त्याच प्रकारच्या विश्वासाद्वारे आम्हालासुद्धा आध्यात्मिक आरोग्य प्राप्त होऊ शकते. पापाद्वारे आम्हाला दैवी जीवनापासून दूर ठेवण्यात आले आहे. आपले आत्मे पंगू करण्यात आले आहेत. तो दुर्बल मनुष्य स्वतःहून चालण्यास समर्थ नव्हता तसेच आपणही स्वतःहून सात्विक जीवन जगण्यास कधीच समर्थ असू शकत नाही. असे अनेक लोक आहेत की ते त्यांची असमर्थता जाणतात, आणि ते आध्यात्मिक जीवनाची अपेक्षा करतात की ते जीवन देवाबरोबर ऐक्य साधेल. निराश होऊन ते म्हणतात, “किती मी कष्टी मनुष्य! मला या मरणाच्या देहापासून कोण सोडवील?” रोम ७:२४. धडपड करणाऱ्या आणि विषण्ण लोकांनी आपली दृष्टी वर करून पाहावे. तारणारा, त्याने स्वतःच्या रक्ताने खरेदी केलेल्या लोकांवर पाखर घालून आणि शब्दाने सांगता येणार नाही अशा कोमलपणाने व दयाळूपणाने म्हणतो, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?” तो तुम्हाला आज्ञा करतो. आरोग्य सपन्न व्हा, शाती संपन्न व्हा. तुम्ही बरे झाला नाही याची चौकशी करीत बसू नका. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवा, आणि त्याची पूर्तता होईल. तुमची इच्छा त्याच्या स्वाधीन करा. त्याची सेवा करण्यास आणि त्याच्या शब्दाप्रमाणे कृती करण्यास राजी व्हाल तर तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. कोणत्याही प्रकारची भ्रष्ट चालचालणूक फार काळ कुरवाळल्यामुळे शरीर व आत्मा बंदिस्थ झाला आहे, अशा रोगाला बरे करण्यास ख्रिस्त सक्षम आहे, आणि तशी अपेक्षाही बाळगीत आहे. यामुळे मृत झालेल्या लोकांना तो जीवन देईल. इफिस. २:१. दौर्बल्य व दुर्दैव आणि पापाच्या श्रृखंलेत अडकून पडलेल्यांना तो मुक्त करील.DAMar 160.1

    रोगमुक्त झालेला पंगू मनुष्य आपला बिछाना म्हणजे केवळ चटई व चादर उचलून घेण्यासाठी खाली वाकला आणि आनंदी भावनेने उभे राहून त्याच्या तारणाऱ्याला पाहण्यासाठी सभोवर नजर फिरवली; पण तेवढ्यात येशू गर्दीत गडप झाला होता. त्याला अशी भीती वाटली की जर येशू त्याला पुन्हा भेटलाच असता तर तो त्याला ओळखू शकला नसता. जेव्हा तो निग्रही व निश्चयी पावलानी देवाची स्तुती करीत आणि मिळालेल्या नव्या देहबळासाठी हर्ष करीत चालला असता, त्याला रस्त्यात अनेक परुशी भेटले. तत्काळ त्याने त्यांना त्याच्या रोगनिवारणाची गोष्ट सांगितली. ती गोष्ट ऐकत असताना त्यांनी जो थंडपणा दाखविला त्याबद्दल त्याला आश्चर्य वाटले.DAMar 160.2

    त्यांनी त्याला रागाने विचारले की तो त्याचा बिच्छाना शब्बाथ दिवशी का वाहून नेत होता. त्यानी त्याला निश्चितपणे आठवण करून दिली की, शब्बाथ दिवशी आझे वाहणे कायदेशीर नव्हते. त्याच्या झालेल्या आनंदाच्या भरात तो शब्बाथ दिवस होता हेच तो विसरला होता; तरीपण ज्याला देवाकडून इतके मोठे सामर्थ्य मिळाले होते त्याची आज्ञा पाळणे हा गुन्हा होता असे त्याला वाटले नव्हते. म्हणून तो धैर्याने म्हणाला, “ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की आपली बाज उचलून चाल.” त्यावर त्यांनी त्याला विचारले तुला असे सांगणारा तो कोण होता, परंतु तो त्यांना काहीच सांगू शकला नाही. पण त्या अधिकऱ्यांना पूर्णपणे माहीत होते की तसा चमत्कार फक्त तोच करू शकतो असे स्वतःला प्रदर्शित केले होते, परंतु तो येशूच होता अशा स्पष्ट पुराव्याची ते अपेक्षा करीत होते, यासाठी की ते त्याच्यावर शब्बाथ उलंघन करणारा म्हणून दोषारोप ठेवू शकले असते. त्यांच्या मताप्रमाणे त्याने रोग्याला बरे करण्याद्वारे केवळ नियमशास्त्राचा भंग केला होता एवढेच नव्हते तर त्या रोग्याला त्याची बाज वाहून नेण्यास सांगून पवित्र दिवस भ्रष्ट करण्यात स्वतःला गुंतवून घेतले होते.DAMar 160.3

    यहूदी लोकांनी देवाच्या नियमशास्त्राचा इतका विपर्यास केला होता की त्यांनी त्याला (नियमशास्त्राला) गुलामगिरीचे जू बनवून टाकले होते. त्यांचे अर्थहीन कायदे इतर राष्ट्रामध्ये एक विनोद ठरले होते. विशेषतः निरर्थक बंधनाच्या (कायद्याच्या) कुंपणात कोंडलेला शब्बाथ दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा, प्रभूचा पवित्र दिवस, आणि आशीर्वादाचा दिवस नव्हता. शास्त्री व परुशी लोकांनी शब्बाथ पालन हे एक भयंकर जड ओझे केले होते. इतके की यहूदी लोकांना चूल शिलगविण्यास किंवा मेणबत्ती लावण्यास परवानगी नव्हती. परिणाम असा झाला होता, की लोकांना अनेक सेवेसाठी विदेशी लोकांवर विसंबून राहावे लागत होते कारण की त्या सेवेमध्ये भाग घेण्यास कायद्यांनी प्रतिबंध केला होता. त्यांनी हा विचार केला नव्हता की, जर त्या सेवा करणे पाप होते, तर जे लोक त्या सेवा करण्यासाठी इतरांचा उपयोग करीत होते ते तितकेच दोषपात्र होते. त्यांना वाटले होते की, तारण फक्त यहूदी लोकांपुरतेच मर्यादित केले होते, आणि इतरांची स्थिती आदीच निराशजनक असल्यामुळे, अधिक वाईट असे काही झाले नसते. परंतु सर्वांना पाळता येणार नाही अशी कोणतीच आज्ञा दिलेली नाही. त्याचे नियम कोणतीच अयोग्य आणि स्वार्थी बंधने यांना मंजूरी (मान्यता) देत नाहीत.DAMar 161.1

    आजारातून बरे झालेल्या मनुष्याला येशू मंदिरात भेटला. त्याच्यावर करण्यात आलेल्या दयेसाठी तो पापार्पण व उपकारस्तुतीचे अर्पण घेऊन आला होता. उपासना करणाऱ्या लोकांत त्याला पाहिल्यानंतर, येशूने त्याला आपली ओळख पटवून दिली, आणि इशारेवजा शब्दात म्हटले, “तू बरा झाला आहेस; आतापासून पाप करू नको; करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”DAMar 161.2

    बरे केलेल्या मनुष्याला त्याचा तारणारा मंदिरात भेटल्यामुळे अतिशय आनंद झाला. परुशांच्या मनात येशूविरूद्ध वैरभाव होता याविषयी तो अजाण असल्यामुळे त्याला प्रश्न विचारलेल्या त्या परुशाला त्याने सांगितले ज्याने मला बरे केले होते तो हाच होता. “यामुळे यहूदी येशूच्या पाठीस लागले, व त्याचा छळ करून त्याचा वध करण्याचा त्यांनी निर्धार केला कारण तो शब्बाथ दिवशी अशी कामे करीत असे.”DAMar 161.3

    शब्बाथ मोडलेल्या आरोपाचे उत्तर देण्यासाठी येशूला धर्मसभेपुढे आणण्यात आले होते. या घटकेला यहूदी लोकांचे स्वतंत्र राष्ट्र असते, तर अशा प्रकारचा आरोप त्याला ठार मारण्याच्या त्यांच्या उद्देशपूर्तिच्या कामासाठी उपयोगी पडला असता. परंतु त्याच्यावर रोमी लोकांच्या सत्तेचा अंमल असल्यामुळे त्यांच्या उदिष्टपूर्तीला प्रतिबंध झाला होता. देहान्ताची शिक्षा करण्याचा यहूदी लोकांना अधिकार नव्हता, आणि येशूवर ठेवण्यात आलेले ठपके रोमी न्यायालयात टिकाव धरू शकले नसते. तथापि, इतर काही गोष्टी निश्चित करण्याचे त्यांचे प्रयत्न चालू होते. तरीसुद्धा लोकापेक्षाही ख्रिस्ताचा अधिक प्रभाव पडत होता. जे लोक धर्मगुरूच्या बडबडीबाबत आस्थेवाईक नव्हते; तेच लोक त्याच्या शिकवणीकडे आकर्षित झाले होते. ते त्याचे शब्द समजू शकत होते आणि त्यांची अंतःकरणे चेतविली जात होती आणि समाधान पावत होती. तो देवाविषयी एकाद्या सूड घेणाऱ्या न्यायाधिशासारखा बोलत नव्हता, तर कोमल प्रेमळ पित्याप्रमाणे आणि त्याने देवाची प्रतिमा आरशाप्रमाणे स्वतःमध्ये बिंबवली होती तशीच ती प्रगट केली होती. जखमी आत्म्याना त्याचे शब्द उपशामक औषधासारखे होते. त्याचे शब्द (संदेश) व त्याचे कार्य या दोन्हीद्वारे तो कर्मट प्रथा व मानवीकृत जुलमी नियम याची सत्ता मोडून काढीत होता आणि चिरकाळ टिकणारे देवाचे प्रेम सादर करीत होता. DAMar 162.1

    अगदी अगोदरच्या अनेक भाकीतापैकी एका भाकीतात ख्रिस्ताविषयी, “यहूदाकडेच राजवेत्र ज्याचे आहे तो येईतोवर ते त्याजकडून जाणार नाही, शासनदंड त्याच्या पायामधून ढळणार नाही; राष्ट्रे त्याची आज्ञाकित होतील.” असे लिहिले आहे. उत्पत्ति ४९:१०.DAMar 162.2

    लोक येशूजवळ जमा होत असत. समुदायातील लोकांनी, याजकाद्वारे लादलेल्या कर्मठ विधिच्या ऐवजी प्रेम व उपकारबुद्धी यांचे पाठ स्वीकारले. याजक व धर्मगुरू यांनी जर अडथळा आणला नसता तर त्याच्या शिकवणीने अशी सुधारणा घडवून आणली असती की जगाने तशी कधीच पाहिली नव्हती. परंतु त्यांची सत्ता ठिकवून ठेवण्यासाठी त्या अधिकाऱ्यांनी येशूच्या प्रभावात बिघाड करण्याचा निर्धार केला होता. धर्मसभेपुढे त्याच्यावरील दोषारोप आणि त्याच्या शिकवणीवरील उघड उघड निंदाव्यजक हल्ला यांच्यामुळे ते घडू शकले असते. कारण लोकामध्ये अजूनही त्यांच्या धर्मपुढाऱ्याबद्दल मोठा आदरभाव होता. जो कोणी धर्मगुरूच्या नियमाना निरुपयोगी ठरविण्याचे धाडस करीत होता, किंवा त्यांनी लोकांवर लादलेले वजनदार ओझे हलके करण्याचा प्रयत्न करीत होता त्याला केवळ देवनिंदकच म्हणून नव्हे तर राष्ट्रद्रोहीही म्हणून गुन्हेगार गणण्यात येत होते. याच्याच आधारे धर्मगुरूंनी येशूविषयी संशय चेतविण्याची आशा बाळगली होती. तो प्रस्थापित परंपरा उखडून टाकण्याचा प्रयत्न करून लोकांत फूट पाडत होता आणि रोमी सत्तेसाठी पूर्णपणे मार्ग तयार करून देते होता असे त्याचे चित्र उभे करण्यात आले होते.DAMar 162.3

    परंतु गुरूजन (रब्बी) ज्या योजना पूर्ण करण्यासाठी उत्कंठापूर्वक कार्य करीत होते त्या योजनाचा उगम धर्मसभेऐवजी इतर दुसऱ्या सभेत झाला होता. अरण्यामध्ये सैतान येशूवर विजय मिळविण्यात अयशस्वी झाल्यानंतर, त्याच्या कार्याला विरोध करण्यासाठी, आणि शक्य झाले तर त्याचे कार्य निष्फळ करण्यासाठी त्याने त्याचे सर्व सैन्य एकत्र केले होते. तो जे काम अगदी सरळ मार्गाने व्यक्तिगत प्रयत्नाद्वारे करू शकला नव्हता ते काम डावपेचाच्या मार्गाने करण्याचा त्याने निर्धार केला होता. अरण्यातील संघर्षातून माघार घेतल्यानंतर लगेचच एकत्र झालेल्या त्याच्या दूताच्या सभेत त्याने, यहूदी लोक त्यांच्या तारणाऱ्याचा स्वीकार करू शकणार नाहीत अशी त्यांची मने अंधळी करण्याचा ठाम बेत करवून घेतला होता. धार्मिक जगतातील त्याच्या मानवी मध्यस्थाद्वारे सत्याच्या सेनाधिशाविरूद्ध त्याच्या (सैतानाच्या) मनात असलेल्या वैरभावनाना चेतवून कार्य करण्याची त्याने योजना केली होती. ख्रिस्ताला त्याच्या जीवनात निराश करण्याच्या विश्वासाने, तो त्यांना ख्रिस्ताचा नाकार करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणार होता, आणि त्याचे जीवन जास्तीत जास्त कटू करणार होता. इस्राएलाचे अधिकारी तारणाऱ्याविरूद्ध लढाई करण्यासाठी सैतानाची शस्त्रे बनले होते.DAMar 163.1

    येशू “धर्मशास्त्राची महती व थोरवी’ वाढविण्यासाठी आला होता. तो त्याचा मोठेपणा कमी करणार नव्हता तर उन्नत करणार होता. पवित्र शास्त्र निवेदन करते की, “पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही व भंगणार नाही;” यशया ४२:२१, ४. तो शब्बाथाला अशा जाचक गोष्टीपासून मुक्त करण्यास आला होता. त्यांनी त्याला आशीर्वादाऐवजी शापीत बनविले होते.DAMar 163.2

    त्याच हेतूस्तव त्याने बेथेसदा तळ्यावर रोग निवारण्याची कृती करण्यासाठी शब्बाथाची निवड केली होती. येशू, त्या मनुष्याला आठवड्याच्या इतर कोणत्याही दिवशी बरे करू शकला असता किंवा त्याला त्याची बाज घेऊन जाण्यास सांगण्याऐवजी फक्त बरे करू शकला असता. परंतु तो ज्या संधीची अपेक्षा करीत होता ती त्याला मिळाली नसती. या पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या जीवनातील प्रत्येक कृती कोणत्यातरी सुज्ञ हेतूचा आधार होती. त्याने केलेली प्रत्येक गोष्ट ही तिच्या शिकवणीइतकी महत्वाची होती. आरोग्यदायी सामर्थ्याचा उपयोग करण्यासाठी त्याने तळ्यावरील रोग्यापैकी अगदी जर्जर रोग्याची निवड केली होती, आणि त्याच्यासाठी केलेल्या महान कृत्याची प्रसिद्धी व्हावी म्हणून त्याला शहरातून त्याची बाज वाहून नेण्यास सांगितले होते. यामुळे शब्बाथ दिवशी काय करणे कायदेशीर होते असा प्रश्न विचारला जाईल, आणि यहूदी लोकांनी प्रभूवारावर लादलेल्या बंधनाबाबत दोष लावण्यास त्याचा मार्ग मोकळा होईल, आणि त्यांच्या रुढी निरुपयोगी होत्या असे स्पष्टपणे त्याला सांगता येईल.DAMar 163.3

    येशूने प्रति पाहिले की दुःखीतांना व्याधीमुक्त करण्याचे काम शब्बाथाच्या नियमाशी जुळणारे आहे. दुःखीतांचे सांत्वन करण्यासाठी स्वर्गीय देवदूत स्वर्ग व पृथ्वी याच्यामध्ये सतत फेऱ्या मारीत आहेत त्यांच्या कामाशीही ते जुळणारे आहे. येशूने म्हटले, “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे.” मानवजातीसाठी देवाचे संकल्प अंमलात आणण्यासाठी सर्व दिवस देवाचे आहेत. यहूदी लोकांनी देवाच्या नियमाचे केलेले स्पष्टीकरण बरोबर होते तर यहोवाह दोषी होता. परंतु पृथ्वीचा पाया घातला त्यावेळेपासून प्रत्येक सजीव प्राणी गतीमय होऊन उचलून धरलेला होता. त्यानंतर ज्याने त्याचे काम चांगले आहे असे उद्गार काढिले आणि उत्पत्तीकार्याचे स्मारक म्हणून शब्बाथ प्रस्थापिला त्याने त्याच्या कामाला पूर्णविराम दिला पाहिजे आणि विश्वातील कधीही संपुष्टात न येणारा नित्यक्रम थांबविला पाहिजे.DAMar 163.4

    देवाने शब्बाथ दिवशी सूर्याला त्याचे काम करण्यास, पृथ्वीला उब देणारी उबदार आणि वृक्षवल्लीचे पोषण करणारी पोषक किरणे देण्यास मनाई करावी का? त्या पवित्र दिवशी सर्व विश्वाचा नित्यक्रम दिवसभर गतिशून्य करावा का? शिवारे व वनराई याना पाण्याचा पाझर न देण्यास त्याने ओढे नाले याना आज्ञा करावी का? समुद्राच्या लाटांना त्याने भरती ओहोटीपासून परावृत होण्यास सांगावे का? गहू मक्याच्या पिकांनी तरारून वाढण्याचे थांबावे का? फळांनी आपले पाडावर येणे पुढे ढकलावे का? वृक्षांनी व फुलांनी स्वतःचे अंकुरणे किंवा उमलणे शब्बाथ दिवशी थांबवावे का?DAMar 164.1

    असे घडलेच तर, माणसे, पृथ्वीच्या रसाळ, पौष्टिक फळाना व जीवनाला आनंदाचा आस्वाद देणाऱ्या आशीर्वादाला मुकतील. निसर्गाने त्याचा न बदलणारा नित्यक्रम सातत्याने चालू ठेवलाच पाहिजे. देव क्षणभरही त्याचा हात आवरू शकत नाही, आणि आवरला तर मानव दुबळा होईल व मरून जाईल. या दिवशी मानवानेही काही कामे करायची आहेत. जीवनावश्यक बाबीकडे लक्ष पुरविले पाहिजे. आजाऱ्याची शुश्रूषा केली पाहिजे. गरजूंच्या गरजा भागविल्या पाहिजेत. जो दुःखीताचे दुःख हरण करण्यास मदत करीत नाही त्याला निर्दोषी गणले जाणार नाही. देवाचा विश्रांतीचा पवित्र दिवस मनुष्यासाठी झाला (निर्माण केला गेला) आणि त्या दिवशी केलेली दयेची कामे त्या दिवसाच्या हेतूशी सुसंगत आहेत. देवाच्या लोकांना घटकाभरही दुःख भोगायला लागू नये अशी देव इच्छा बाळगतो, मग ते शब्बाथ दिवशी शमविलेले दुःख असो किंवा इतर दिवसाचे असो.DAMar 164.2

    इतर दिवसापेक्षा शब्बाथ दिवशी देवाकडे हक्काच्या याचना अधिक असतात. त्याचे लोक त्यांच्या नित्याच्या कामापासून रजा घेतात, आणि त्याचे देवाचे स्मरण (चिंतन) व देवाची उपासना करण्यासाठी त्यांचा वेळ कामी लावतात. ते शब्बाथ दिवशी त्याच्याकडे इतर दिवसापेक्षा अधिक उपकाराची याचना करतात. त्यांचे खास लक्ष असावे म्हणून ते हक्काने मागतात. ते त्याच्या उत्कृष्ट आशीर्वादाची कळकळीने विनंती करतात. देव त्या विनंत्या मान्य करण्यासाठी शब्बाथाची वाट पाहात नाही. देवाच्या कामात कधीच खंड पडत नाही. मानवानेसुद्धा कल्याणकारक काम करण्यात कधीच खंड पडू देऊ नये. शब्बाथ दिवस हा निरुपयोगी कार्याचा उद्देशपूर्ति कालावधी नाही. प्रभूच्या विश्रामवारी ऐहिक कामाला देवाची आज्ञा प्रतिबंध करते; चरितार्थासाठी अर्थार्जनार्थ करण्यात येणारे श्रम थांबलेच पाहिजे. ऐहिक अभिलाषासाठी किंवा लाभासाठी त्या दिवशी केलेले कोणतेच काम नियमाला धरून नाही. तथापि देवाने उत्पत्तीचे त्याचे काम थांबविले, आणि शब्बाथ दिवशी विश्रांति घेतली आणि त्याला आशीर्वादीत केले, तसेच मानवाने त्याच्या उपजीविकेचे काम थांबविले पाहिजे, आणि तो पवित्र कालावधि आरोग्यदायक विसाव्यासाठी, उपासना करण्यासाठी आणि सत्कृत्ये करण्यासाठी अर्पण केला पाहिजे. रोग्याला बरे करण्याची ख्रिस्ताची कृती नियम शास्त्राशी मिळती जुळती होती. तिने शब्बाथाचा सन्मानच केला.DAMar 164.3

    स्वर्गामध्ये पिता ज्या प्रकारच्या कार्यात गुंतला आहे आणि जे पवित्र कार्य करीत आहे ते करण्यास त्याला सारखाच हक्क आहे असे येशू प्रतिपादितो. परंतु परूशी त्यामुळे अधिक संतापले. त्यांच्या समजुतीप्रमाणे त्याने फक्त आज्ञाभंग केला नाही परंतु “देवाला स्वतःचा पिता’ म्हणून देवासम असल्याचे तो घोषीत करीतो. योहान ५:१८.DAMar 165.1

    यहूदी लोकांचे सर्व राष्ट्र देवाला त्यांचा पिता म्हणत होते, आणि म्हणून ख्रिस्ताने स्वतःला देवाबरोबर त्याच नात्यात प्रदर्शित केले असते तर ते इतके भडकून गेले नसते. परंतु तो स्वतःला सर्व अर्थाने देवासमान मानतो असे त्यांना वाटले होते म्हणून त्यांनी त्याच्यावर दुर्भाषणाचा दोष ठेवला.DAMar 165.2

    ख्रिस्ताच्या त्या शत्रूना त्याने पटविलेल्या सत्याला सामोरे जाण्यास काहीच सबबी (कारणे) उरल्या नव्हत्या, वाद उरले नव्हते. परंतु ते सर्व वाद येशूने पवित्र शास्त्र व अव्याहतपणे चालणारा निसर्ग यांच्या आधारे काढलेल्या विचाराशी तुलनात्मक दृष्ट्या कमी पडले होते. त्या गुरूंजनानी त्या ज्ञानाचा स्वीकार करण्याची इच्छा बाळगली असती तर, येशूने जे सांगितले होते ते सत्य होते असे त्यांना पटले असते. परंतु त्याने शब्बाथविषयी मांडलेल्या मुद्याना त्यांनी फाटा दिला, आणि तो स्वतःला देवासमान लेखतो असे कारण पुढे करून त्याच्याविरूद्ध संताप भडकविण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांच्या संतापाला काहीच सीमा राहिली नव्हती. जर त्यांना लोकांची भीती वाटली नसती, तर याजकानी व गुरूजनानी येशूला तेथेच कंठस्नान दिला असता. परंतु येशूच्या बाजूचे लोकमत फारच भक्कम होते. अनेकांनी ख्रिस्ताला त्यांचा रोग निवारक व दुःखपरिहारक मित्र असेच मानले होते, आणि म्हणून बेथेसदावरील रोग बरे करण्याच्या त्याच्या कृतीचे समर्थन केले होते. त्यामुळे अधिकारी वर्गाला त्यांच्या द्वेषमूलक भावनेला आवर घालणे भाग पडले होते.DAMar 165.3

    परंतु येशूने त्याच्यावरील दुर्भाषणाच्या आरोपाचे खंडण केले (प्रतिकार केला). तो म्हणाला, काम करण्याच्या ज्या अधिकाराबद्दल तुम्ही मला दोष देता तो अधिकार मी देवाचा पुत्र आहे म्हणून आहे. मी त्याच्या समस्वभावाचा, समविचाराचा व समहेतूचा आहे. मी त्याला त्याच्या सर्व उत्पत्तिकार्यांत व देवी साहाय्यात सहकार्य करतो. “पुत्र जे काही पित्याला करिताना पाहतो त्यावांचून त्याला स्वतः होऊन काही करिता येत नाही’ देवाच्या पुत्राला जे काम करण्यास या जगांत पाठविण्यात आले होते त्याच कामासाठी याजक व गुरूजन त्याची खरडपटी करत होते. त्यांच्या पापाद्वारे त्यांनी स्वतःहून देवापासून स्वतःला अलग करून घेतले होते, आणि त्यांच्या अहंभावीपणामुळे ते त्याच्याशिवाय स्वतंत्रपणे पुढे सरकत होते. सर्व गोष्टीसाठी ते समर्थ होते असे ते स्वतःविषयी समजत होते, आणि त्यांच्या कृत्याना मार्गदर्शन करण्यासाठी वरील दैवी ज्ञान प्राप्त करून घेण्याची गरज त्यांना वाटली नव्हती. परंतु देवाचा पुत्र देवाच्या इच्छेच्या अधीन होता, आणि सर्वस्वी त्याच्या सामर्थ्यावर विसंबून होता. इतक्या निखालसपणे त्याने त्याच्यातील ‘स्व’ ला रिक्त केले होते की त्याने स्वतःसाठी स्वतःच्या इच्छेने कोणत्याच योजना केल्या नव्हत्या. त्याने देवाच्या सर्व योजनाचा स्वीकार केला, आणि प्रत्येक दिवशी पित्याने त्याच्या योजना उघड केल्या. अगदी तसेच आपणसुद्धा देवावरच विसंबून राहिले पाहिजे, यासाठी की आपली जिविते त्याच्या इच्छा पूर्ण करणारी जिविते होऊ शकतील.DAMar 166.1

    जेव्हा मोशे देवासाठी वस्तीस्थान म्हणून निवास मंडप बांधणार होता तेव्हा त्याला पर्वतावर दाखवून दिलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व गोष्टी तंतोतत करण्यास सांगण्यात आले होते. देवाचे काम करण्यासाठी मोशे औत्सुक्याने पूर्णपणे भारावून गेला होता; त्याच्या सर्व सूचना अंमलात आणण्यासाठी त्याच्या हाताखाली अति कुशल व निपुण कारागीर होते. तरी सुद्धा त्याने पुंगरू डाळिंब, गोंडा, किंवा निवास मंडपातील इतर पात्रे सर्व वस्तु दाखविलेल्या नमुन्याला सोडून करावयाच्या नव्हत्या. देवाने त्याला डोंगरावर बोलविले, आणि स्वर्गीय वस्तु दाखविल्या. देवाने स्वतःच्या तेजाचे त्याच्यावर आच्छादन घातले, यासाठी त्याला तो नमुना पाहता यावा व त्याप्रमाणे सर्व वस्तु त्याला करता याव्या, आणि सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी करण्यात आल्या. अगदी असेच इस्राएल लोकांना सांगितले होते, त्याने त्याचे वस्तीस्थान बनविण्याची इच्छा बाळगली होती. त्यांना त्याच्या शीलाचा नमूना प्रगट केला होता. हा नमुना जेव्हा सिनाय पर्वतावर दहा आज्ञा देण्यात आल्या होत्या तेव्हा दाखविण्यात आला होता. जेव्हा परमेश्वर मोशेसमोर उभा राहिला तेव्हा त्याने घोषणा केली. “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कनवाळू देव, मंदक्रोध दयेचा व सत्याचा सागर, हजारों जणांवर दया करणारा, अधर्म व अपराध व पाप याची क्षमा करणारा.” निर्गम ३४:६, ७.DAMar 166.2

    इस्राएल लोकांनी आपापले मार्ग पसंत केले. त्याने दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे बांधले नव्हते; परंतु ख्रिस्तच, देवाच्या वस्तीस्थानाचे खरे मंदिर होता, त्याने पृथ्वीवरील त्याचे जीवन अगदी तंतोतंत देवाच्या नमुन्याप्रमाणे घडविले होते. तो म्हणाला, “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे; तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” स्तोत्र. ४०:८. त्यानुसार त्याच्या “आत्म्याच्याद्वारे देवाच्या वस्तीसाठी’ आमचा स्वभाव घडविला पाहिजे. इफिस २:२२. अगदी “नमुन्याप्रमाणे सर्व गोष्टी घडविल्या पाहिजेत, “कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख सोशिले; तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुम्हाकरिता कित्ता घालून ठेविला आहे.” इब्री. ८:५; १ पेत्र २:२१.DAMar 166.3

    ख्रिस्ताचे शब्द अगदी स्पष्ट सांगतात की आपण आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर अतुट बांधले गेले आहोत असे स्वतःच मानले पाहिजे. आपण कोणत्याही पदावर असू; जो देव सर्वांचाच भविष्यकाळ स्वतःच्या हाती धरून ठेवतो, त्याच्यावरच आपण विसंबून आहोत. त्यानेच आपल्याला आपल्या कार्यावर नेमणूक केली आहे, आणि त्यानेच आपल्याला त्या कार्यासाठी लागणारे बुद्धिचातुर्य व साहाय्य पुरविले आहे. जोवर आपली इच्छा देवाच्या अधीन करू, आणि त्याचे बळ व बुद्धिज्ञान यावर विसंबून राहू, तोवर आपल्याला नेमून दिलेल्या कार्यातील आपला भाग पूर्ण करण्यासाठी आपल्याला सुरक्षित मार्गाने मार्गदर्शन केले जाईल. परंतु जो स्वबुद्धिचातुर्यावर व स्वबळावर विसंबून राहतो तो स्वतःला देवापासून अलग करून घेतो, आणि ख्रिस्ताबरोबर ऐक्याने कार्य करीत राहाण्याऐवजी देवाच्या शत्रूचा व मानवाचा हेतू सिद्धीस नेत राहतो.DAMar 167.1

    पुढे ख्रिस्त म्हणाला, “जे काही तो करितो ते पुत्रही तसेच करितो... जसा पिता मेलेल्यास उठवून जीवंत करितो तसा पुत्रही पाहिजे त्यास जीवंत करितो.” सदूकी लोकांचा विश्वास होता की पुनरुत्थानात शरीराचे पुनरुत्थान होत नाही; तथापि येशू त्यांना सांगतो की मृताना उठविणे हे त्याच्या पित्याच्या अनेक कामापैकी एक मोठ्यात मोठे काम आहे, आणि ते काम करण्यासाठी त्याला स्वतःला सामर्थ्य आहे. “असा समय येत आहे किंबहुना आता आला आहे की, त्यांत मेलेले लोक देवाच्या पूत्राची वाणी ऐकतील; व जे ऐकतील ते जीवंत होतील.” परुशी लोकांचा मृताच्या पुनरुत्थानावर विश्वास होता. ख्रिस्ताने घोषणा केली की जे सामर्थ्य मृताना जीवन देते ते त्यांच्यामध्ये अस्तित्वात आहे, आणि त्या सामर्थ्याचे प्रगटीकरण त्यांनी पाहिले पाहिजे. त्याच पुनरुत्थानाचे सामर्थ्य “पातके यामुळे मृत’ झालेल्या आत्म्याला जीवन देणारे सामर्थ्य आहे. इफिस २:१. ते जीवनाचे सामर्थ्य येशू ख्रिस्तात आहे, आणि “त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य’ मानवाला “पाप व मरण याच्या नियमापासून मुक्त’ करते. फिलिपै. ३:१०; रोम ८:२. पापाची सत्ता मोडून काढण्यात आलेली आहे, आणि विश्वासाद्वारे आत्मा पापापासून दूर ठेवण्यात येतो. जो कोणी ख्रिस्ताच्या सामर्थ्यासाठी आपले अंतःकरण उघडतो तो त्या सामर्थ्याचा भागीदार होतो, आणि ते सामर्थ्य त्यांचे शरीर कबरेतून बाहेर आणते.DAMar 167.2

    नम्र नासरेथकर त्याच्या खऱ्या मोठेपणाविषयी स्पष्टपणे व निश्चितपणे सांगतो. तो सर्वसाधारण मानवी स्वभावाच्या वरच्या पातळीवर जातो, पापी व लज्जास्पद बाह्यस्वरूप फेकून देतो, आणि देवदूताकडून सन्मान पावलेला, देवाचा पुत्र, सर्व विश्वाच्या उत्पन्नकर्त्यांत एक झालेला असा स्वतःला प्रगट करितो. त्याने श्रोते मंत्रमुग्ध होतात. आजवर त्याच्यासारखा कोणीच बोलला नाही किंवा त्याच्यासारखा राजाच्या वैभवात दुसरा कोणी जन्माला आला नाही. याचे बोलणे सरळ, स्वच्छ, त्याच्या सेवाकार्याचे व जगाबाबतच्या कर्तव्याविषयी स्पष्ट कल्पना देणारे होते. “पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर सर्व न्याय करण्याचे काम त्याने पुत्राकडे सोपून दिले आहे; यासाठी की जसा पित्याचा सन्मान करितात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो, ज्याने मला पाठविले, त्या पित्याचा सन्मान करीत नाही... कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायाही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्याला दिले; आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, यास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकार त्याला दिला.”DAMar 168.1

    याजक व अधिकारी यांनी ख्रिस्ताच्या कार्याला दोषी ठरविण्यासाठी स्वतःलाच न्यायधीश म्हणून नेमून घेतले होते, परंतु तो स्वतःच त्यांचा व जगातील सर्व न्यायाधीशांचा न्यायाधीश आहे असे त्याने जाहीर केले. या जगाला ख्रिस्ताच्या हवाली करण्यात आलेले आहे. पतित मानवाला त्याच्याद्वारेच देवाचे सर्व आशीर्वाद देऊ केले आहेत. तो देहधारणेपूर्वी तारणारा होता तसाच नंतरही आहे. जेव्हा पापाचा प्रादुर्भाव झाला होता तेव्हाच तारणारा अस्तित्वात होता. त्याने सर्वांना प्रकाश व जीवन दिले आहे. दिलेल्या प्रकाशाच्या प्रमाणातच प्रत्येकाचा न्याय केला जावयाचा आहे. ज्याने प्रकाश दिला आहे आणि जो एकाद्याला पापातून पावित्र्यात आणण्यासाठी सातत्याने कळकळीची प्रार्थना करितो तो त्याचा वकील व न्यायाधीश असा एकच आहे. स्वर्गातील महासंघर्षाला सुरूवात झालेल्या क्षणापासून, फसवणूकीद्वारे सैतानाने त्याचे कार्य चालू ठेवले आहे; आणि ख्रिस्त सैतानाची कारस्थाने उघड करण्याचे आणि त्याची सत्ता मोडून काढण्याचे कार्य करीत आला आहे. ख्रिस्तच दगलबाज सैतानाशी सतत मुकाबला करीत आला आहे, आणि युगादि काळापासून बंदिवानाना त्याच्या पकडीतून सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आला आहे. तो प्रत्येकाचा नायनिवाडा करणार आहे. DAMar 168.2

    देवाने “तो मनुष्याचा पुत्र आहे, यास्तव नायनिवाडा करण्याचा अधिकार त्याला दिला.” कारण त्याने मानवाच्या दुःखाचा व मोहाचा आस्वाद चाखला होता, मानवाचे मनोदौर्बल्य व पापे त्याने जाणून घेतले होते; शिवाय त्याने आमच्यासाठी यशस्वीरित्या सैतानाच्या मोहाना तोंड दिले होते, आणि ज्याच्या तारणासाठी त्याने स्वतःचे रक्त सांडले त्याना तो न्यायीपणाने व सौम्य दृष्टीने वागवील; या कारणामुळे, मनुष्याच्या पुत्राला नायनिवाडा करण्याचा अधिकार दिला आहे. DAMar 168.3

    परंतु ख्रिस्ताचे कार्य न्याय करण्यासाठी नव्हते, तर तारणासाठी होते. “देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नाही, तर त्याच्या द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले.” योहान ३:१७. धर्मसभेपुढे ख्रिस्ताने जाहीरपणे स्पष्ट केले, “जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याजवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि त्याजवर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे.” योहान ५:२४.DAMar 169.1

    ख्रिस्ताने त्याच्या श्रोत्यांना आश्चर्यचकित न होण्याची आज्ञा करून, त्यांना त्याहीपेक्षा प्रगल्भ देखावा दाखविला, तो देखावा म्हणजे भविष्य काळातील गूढ घटना. तो म्हणाला “असा समय येत आहे की, त्यात कबरेतली सर्व मनुष्ये त्याची वाणी ऐकतील; ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, आणि ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील.’ योहान ५:२८, २९. DAMar 169.2

    ज्याची इस्राएल लोक प्रदीर्घ काळापासून अपेक्षा करीत होते, आणि ज्याची ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी प्राप्त होण्याची आशा बाळगीत होते त्या भविष्यकाळातील जीवनाची ती खात्री होती. कबरेतील खिन्नता नाहिसा करणारा एकमेव प्रकाश त्यांच्यावर तेजस्वीपणे चमकत होता. स्वच्छंदी मन परंतु अंधळे आहे येशूने धर्मगुरूंच्या परंपरा मोडून काढल्या होत्या, आणि त्यांचा अधिकार अवमानला होता, तरीही ते विश्वास ठेवत नव्हते.DAMar 169.3

    वेळ, प्रसंग, स्थळ, आणि सभेतील तणावपूर्ण वातावरण या गोष्टी येशूचे धर्मसभेत उच्चारलेले शब्द अधिक मनोवेधक करण्यास एक झाल्या होत्या. राष्ट्राच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी, ज्याने स्वतःला इस्राएलाची पुनर्स्थापना करणारा अशी घोषणा केली होती त्याचाच प्राण घेण्याचा घाट घातला होता. शब्बाथाच्या धन्याला शब्बाथाच्या आज्ञेची पायमल्ली केल्याच्या आरोपाचा जबाब देण्यासाठी जगिक न्यायालयात एक कायदेशीर आरोपी म्हणून उभे करण्यात आले होते. जेव्हा त्याने त्याच्या कार्याचे न डगमगता स्पष्टीकरण केले, तेव्हा त्याच्या न्यायाधीशानी मोठ्या आश्चर्याने व संतापाने त्याच्याकडे पाहिले, तथापि त्याचे शब्द सर्वांची तोंडे बंद करणारे होते. ते अधिकारी त्याला दोषी ठरवू शकले नव्हते. त्याची चौकशी करण्याचा व त्याच्या कामांत अडथळा आणण्याचा, याजक व धर्मगुरू यांचा अधिकार (हक्क) त्याने नाकबूल केला. त्यांना अशा प्रकारचा हक्क दिलेलाच नव्हता. त्यांचा अधिकार त्यांचा स्वतःचा अहंभाव व मगरूरी यावर आधारलेला होता. गुन्हा कबूल करण्यास किंवा प्रश्नोत्तराच्या रूपाने त्यांच्याकडून चौकशी करून घेण्यास त्याने नकार दिला.DAMar 169.4

    ज्या कृत्यामुळे त्यांनी त्याच्यावर दोषारोप केले होते त्या कृत्याबद्दल क्षमायाचना करण्याऐवजी किंवा ती कृत्ये करण्यामागच्या उद्देशांची स्पष्टीकरणे देण्याऐवजी येशू त्या अधिकाऱ्यावर उलटला होता, आरोपी फिर्यादी बनला होता. त्याने त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरपणाबद्दल व शास्त्रवचनाच्या अज्ञानाबद्दल दटावले होते. त्याने त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले होते की त्यांनी देवाच्या वचनाला झिडकारले होते, म्हणूनच त्यांनी देवाने ज्याला पाठविले होते त्यालाही नाकारले होते. “तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता; कारण त्यांत सार्वकालिक जीवन आपणास प्राप्त होईल असे तुम्ही समजता; तेच मजविषयी साक्ष देणारे आहेत.” योहान ५:३९.DAMar 169.5

    प्रत्येक पानावर, मग ते इतिहासाचे असो किंवा पवित्र शास्त्राचे असो, किंवा भविष्यवादाचे असो, जुन्या करारातील वचने देवपुत्राच्या वैभवी तेजाने उजाळून निघालेली आहेत. दैवी संस्था या नात्याने यहूदी धर्माची संपूर्ण व्यवस्थापना सुवार्तेच्या भाकिताने भरगच्च होती. ख्रिस्ताविषयी “सर्व संदेष्टे साक्ष देतात.” प्रेषित. १०:४३. आदामाला अभिवचन दिल्यापासून ते कलाधिपतीची वंशावळ, आणि कायदेशीर अर्थव्यवस्था यामधील उद्धारकाच्या पाऊलखुणा दैवी प्रकाशाने अगदी स्पष्टपणे दाखवून दिलेल्या आहेत. मागी लोकांनी बेथलेहेमचा तारा पाहिला. प्रत्येक यज्ञार्पणात ख्रिस्ताचे मरण प्रदर्शित केले जाते होते. धूपाच्या प्रत्येक मेघामध्ये त्याचे नित्तीमत्त्व उत्थान पावत होते. प्रत्येक वार्षिकोत्सवाच्या वेळी शिंगाद्वारे त्याच्या नांवाचा नाद निनादत होता. परमपवित्रस्थानातील दरारक गूढ वातावरणात त्याचे गौरव वास करीत होते.DAMar 170.1

    देवाचे पवित्र वचन यहूदी लोकांच्या ताब्यात होते, आणि म्हणून, ते असे समजत होते की, पवित्र वचनाच्या केवळ वरकरणी ज्ञानामुळे त्याना सार्वकालिक जीवन प्राप्त झाले होते. परंतु ख्रिस्त म्हणाला, “त्याचे वचन तुम्हामध्ये तुम्ही राखिले नाही.” त्याचे वचन नाकारल्यामुळे तुम्ही त्याचा व्यक्तीशः नाकार केला आहे. त्याने म्हटले, “तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी म्हणून मजकडे येण्याची तुमची इच्छा नाही.”DAMar 170.2

    यहूदी अधिकाऱ्यांनी मशीहाच्या राज्याविषयी संदेष्ट्याच्या शिकवणीचा अभ्यास केला होता; परंतु त्यांनी तो अभ्यास, सत्य जाणून घेण्याच्या प्रामाणिक हेतूने केला नव्हता, तर त्यांच्या महत्वाकांक्षी आशेला एक पुरावा शोधून काढण्याच्या हेतूने केला होता. जेव्हा येशू त्यानी अपेक्षिलेल्या पद्धतीने न येता वेगळ्या पद्धतीने आला होता तेव्हा त्यांनी त्याचा स्वीकार केला नव्हता; आणि स्वतःचे समर्थन करण्यासाठी, तो एक फसव्या आहे असे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करीत होते. एकदा का त्यांनी या मार्गात पाऊल टाकले की त्याना ख्रिस्ताला विरोध करण्यासाठी भक्कम करणे सैतानाला सुलभ होणार होते. त्याच्या देवत्वाचा पुरावा म्हणून जे शब्द स्वीकारले जावयास पाहिजे होते तेच शब्द त्याच्या विरूद्ध वापरले गेले होते. अशा प्रकारे त्यांनी देवाच्या सत्याला असत्याचे स्वरूप दिले होते. जेव्हा तारणारा त्याच्या दयेच्या कायाद्वारे त्यांच्याशी अधिक स्पष्टपणे बोलला, तेव्हा ते प्रकाशाला प्रतिकार करण्यास अधिक निश्चयी झाले होते.DAMar 170.3

    पुढे तो म्हणाला, “मी मनुष्यांच्या हातून मान करून घेत नाही.” त्याला त्या धर्मसभेच्या मान्यतेची, किंवा त्यांच्या पसंतीची अपेक्षा नव्हती. त्यांच्या पसंतीमुळे त्याला कोणत्याच प्रकारचा मान मिळणार नव्हता. त्याची त्याने अपेक्षा केली नव्हती. त्याला देवाकडूनच सन्मान आणि अधिकार मिळाला होता. त्याने तशी इच्छा दाखविली असती सर्व देवदूत त्याला मानसन्मान द्यायला खाली आले असते; आणि पित्यानेही त्याच्या देवत्वाबद्दल साक्ष दिली असती. परंतु त्यांच्या स्वतःकरिता ज्या राष्ट्राचे ते नेते होते, त्या राष्ट्राकरिता यहूदी लोकांनी त्याचे शील लक्षात घ्यावे, आणि जे आशीर्वाद देण्यासाठी तो आला होता ते त्यानी स्वीकारावेत अशी तो मनस्वी इच्छा बाळगीत होता. DAMar 171.1

    “मी जो आपल्या पित्याच्या नामाने आलो, त्या माझा स्वीकार तुम्ही करीत नाही; दुसरा कोणी स्वतःच्या नामाने आला तर त्याचा स्वीकार कराल.’ येशू देवाकडून मिळालेल्या अधिकाराने, त्याचे स्वरूप धारण करून त्याचे वचन पूर्ण करून, त्याचे गौरव करण्यासाठी आला होता; असे असून सुद्धा इस्राएलातील अधिकाऱ्याकडून त्याचा स्वीकार केला गेला नव्हता. परंतु इतर दुसरे कोणी ख्रिस्ताच्या शीलाचा बहाणा करून परंतु स्वतःच प्रभावित होऊन, आणि स्वतःलाच गौरव प्राप्त करून घेण्यास आले असते तर त्याचा स्वीकार करून घेण्यात आला असता. पण असे का? कारण जो स्वतःचे गौरव करून घेण्याची अपेक्षा बाळगतो तो इतरांनी त्याचे गौरव करावे अशी मागणी करतो. अशा त-हेच्या मागण्याना यहूदी लोक प्रतिसाद देत होते. ते खोट्या शिक्षकाचा स्वीकार करीत होते. याचे कारण असे की. तो त्यांच्या अहंपणाच्या प्रवृतीमुळे, त्यांनी कवटाळलेल्या रुढीना व मताना पसंती दर्शवित होता. परंतु ख्रिस्ताची मते (शिकवणी) त्यांच्या कल्पनाशी जुळत नव्हती. ख्रिस्ताची शिकवण आध्यात्मिक स्वरूपाची होती आणि स्वार्थत्यागाची मागणी करणारी होती; त्यामुळे ख्रिस्ताची शिकवण (धर्ममते) ते लोक स्वीकारू शकत नव्हते. त्यांना देवाचा परिचय झाला नव्हता, आणि म्हणून ख्रिस्ताद्वारे आलेला त्याचा आवाज त्यांना एकाद्या अनोळखी परदेशी व्यक्तीसारखा वाटत होता.DAMar 171.2

    आपल्या काळातही त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होत नाही काय? आजही असे अनेक लोक, अनेक धर्मपुढारीसुद्धा नाहीत काय की जे पवित्र आत्म्याविरूद्ध त्यांची अतःकरणे कठोर करीत आहेत, आणि त्यामुळे त्यांना देवाचा आवाज ओळखणे अशक्य होऊन बसले आहे?” त्यांना स्वतःच्या परंपराना कवटाळून ठेवता यावे, म्हणून ते पवित्र शास्त्राचा आव्हेर करीत नाहीत काय?DAMar 171.3

    “तुम्ही मोशाचा विश्वास धरिला असता तर माझा विश्वास धरिला असता; कारण मजविषयी त्याने लिहिले; तुम्ही त्याच्या लेखाचा विश्वास धरीत नाही, तर माझ्या वचनाचा विश्वास कसा धराल?” असे येशू म्हणाला. मोशेद्वारे इस्राएल लोकांशी बोलला होता तो ख्रिस्तच होता. जर त्यांनी त्यांच्या महान पुढाऱ्याद्वारे काढलेला देवाचा आवाज श्रवण केला असता, तर तोच आवाज त्याना ख्रिस्ताच्या शिकणीद्वारे ऐकू आला असता, आणि त्यानी तो ओळखला असता. त्यांनी मोशेवर विश्वास ठेवला असता, तर मोशेने ज्याच्याविषयी लिहिले होते त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला असता.DAMar 171.4

    याजक व धर्मगुरू यानी येशूचा घात करण्याचा निर्धार केला होता याची त्याला कल्पना होती; तरीसुद्धा त्याने त्याना त्याचे पित्याशी असलेले संघटन आणि त्याचे व जगाचे नाते याविषयी स्वच्छ शब्दात स्पष्टीकरण केले. त्यानी पाहिले की, त्यांचा त्याला असलेला विरोध हा निष्कारण होती, तरी सुद्धा त्यांचा खूनी द्वेष शमला नव्हता. खात्री पटविणारी दिव्य शक्ती त्याच्या सेवेला साथ देताना पाहून ते भीतीने गांगरून गेले. तथापि त्यांनी त्याच्या विनवणीचा प्रतिकार केला, आणि स्वतःला अंधकारात कोंडून घेतले.DAMar 172.1

    येशूचा अधिकार उलथून पाडण्यात किंवा त्याच्याविषयी लोकामध्ये असलेला आदर यामध्ये फारकत करण्यात ते अपयशी झाले होते.त्याच्या वचनाविषयी अनेकांची खात्री होती. त्यांचा दोष त्यांच्यापुढे मांडल्यानंतर अधिकारी वर्गाची विवेकबुद्धीसुद्धा निंद्य झाली होती. परंतु त्यामुळे ते त्याच्यावर अधिकच क्रोधविष्ट झाले होते. त्यांनी त्याला गतप्राण करण्याचा निर्धार केला. येशू भोंदू-तोतया आहे असे लोकांना सांगण्यासाठी त्यांनी निरोपे सर्व देशभर पाठविले. त्याची टेहळणी करण्यासाठी हेर पाठविण्यात आले होते, आणि त्याची कृती व वक्तव्ये याविषयी ते अहवाल देत होते. ह्यावेळी बहुमोल उद्धारक खात्रीने वधस्तंभाच्या छायेत उभा ठाकलेला होता.DAMar 172.2