Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ८५—पुन्हा समुद्रकिनारी

    योहान २१:१-२२.

    गालीली येथे शिष्यांना भेटण्याचे येशूने ठरविले होते. वल्हांडण सणाचा आठवडा संपल्याबरोबर ते तिकडे गेले. सणाच्या वेळी यरुशलेममध्ये ते दिसले नसते तर ते पाखंडी, असंतुष्ट असा त्याचा अर्थ त्यांनी लावला असता, म्हणून तेथे ते सण संपेपर्यंत राहिले. त्यानंतर पूर्वी ठरल्याप्रमाणे उद्धारकाला भेटण्यासाठी त्यांनी घरचा रस्ता धरिला.DAMar 700.1

    त्यांच्या टोळीत सात शिष्य होते. कोळ्याचा साधा पोषाख त्यांनी घातला होता. जगीक संपत्तीच्या बाबतीत ते रंक होते परंतु सत्याचे ज्ञान व जीवन या बाबतीत ते राव होते. त्यामुळे स्वर्गाच्या दृष्टीने त्यांना शिक्षकाचा सर्वश्रेष्ठ दर्जा दिला होता. संदेष्ट्यांच्या विद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले नव्हते परंतु तीन वर्षे जगातील महान शिक्षणतज्ञाने त्यांना परिपाठ दिले होते. त्याच्या प्रबोधनामुळे ते प्रगमनशील, विद्वान आणि सुसंस्कृत झाले होते आणि त्यांच्याद्वारे लोकांना सत्याचे ज्ञान होणार होते.DAMar 700.2

    बहुतांशी ख्रिस्ताचे सेवाकार्य गालीली समुद्राच्या आसपास झाले. शिष्य एकांत, प्रशांत स्थळी जमलेले असतांना येशूने केलेल्या महान कार्याचे आणि स्वतः त्याचे त्यांना स्मरण झाले. ह्या समुद्रावर त्यांची भीतीने जेव्हा गाळण उडाली होती आणि मोठ्या वादळाने त्यांचा नाश होणार होता तेव्हा त्यांच्या मुक्ततेसाठी येशू अफाट लाटेवरून चालत गेला. त्याच्या शब्दाने वादळ शांत झाले. थोड्याच अंतरावर किनारा होता तेथे थोड्या भाकरी व मासळीने दहा हजारापेक्षा अधिक लोकांना भोजन दिले होते. कफर्णहूमपासून थोड्या अंतरावर पुष्कळ चमत्कार केले होते. शिष्यांनी हे दृश्य पाहिल्यावर त्यांच्या उद्धारकाच्या कार्याविषयी त्यांच्या मनात पुष्कळ विचार घोळू लागले.DAMar 700.3

    सायंकाळ रमणीय होती, बोट व मासे धरण्यात पारंगत असलेल्या पेत्राने मासे धरण्यासाठी समुद्रावर जाण्याचे सुचविले. हा विचार सर्वांना संमत झाला कारण त्या सर्वांना अन्न आणि कपडा यांची गरज होती, आणि रात्रभर केलेले काम यशस्वी झाले तर त्यांची गरज भागली जाईल, म्हणून ते आपल्या मचव्यात बसून गेले. परंतु त्यांना काही मिळाले नाही. रात्रभर कष्ट केले पण सर्व व्यर्थ. थकलेल्या अवस्थेत उपस्थित नसलेल्या प्रभूविषयी ते बोलत होते आणि समुद्रकिनाऱ्यावर केलेल्या त्याच्या अद्भुत कार्याचे त्यांना स्मरण झाले. त्यांच्या भवितव्याचा प्रश्न त्यांच्या डोक्यात घोळू लागला आणि पुढे आलेले पाहून ते फार खिन्न झाले. DAMar 700.4

    त्या अवधीत किनाऱ्यावर प्रभु एकटाच त्यांच्यामागे चालला होता परंतु तो त्यांना दिसला नाही. शेवटी प्रभात झाली. मचवा किनाऱ्यापासून थोडा आत होता आणि शिष्यांनी कोणीतरी तिहाईत किनाऱ्यावर उभा असलेला पाहिला. त्याने विचारले, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय?” त्यांनी नाही म्हटल्यावर त्याने म्हटले, “मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हाला सांपडेल. म्हणून त्यांनी ते टाकिले, तेहा माशांचा घोळका लागल्याने ते त्यांना ओढवेना.”DAMar 701.1

    योहानाने तिहाईताला ओळखले आणि त्याने पेत्राला म्हटले, “तो प्रभु आहे.” पेत्र हर्षभरीत होऊन त्या आवेशात त्याने पाण्यात उडी मारली आणि प्रभूजवळ जाऊन त्याच्या बाजूला तो उभा राहिला. दुसरे शिष्य माशांनी भरलेले जाळे घेऊन मचव्यातून आले. “मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशांचा विस्तव व त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली.”DAMar 701.2

    चकित होऊन त्यांनी हा विस्तव व हे जेवण कोठून आले असा प्रश्न केला. “येशूने त्यांना म्हटले, तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा.’ शिमोन पेत्राने मध्येच टाकलेल्या जाळ्याकडे धाव घेतली आणि किनाऱ्याला ओढून आणण्यात त्याने आपल्या साथीदारांना मदत केली. काम संपल्यावर व तयारी झाल्यावर येशूने शिष्यांना जेवण करण्यास सांगितले. त्याने भाकर घेऊन मोडली व जेवण सर्वांना वाटून दिले. त्यानंतर सातजनांनी त्याला ओळखले. डोंगराच्या पायथ्याशी पाच हजारांना जेवण घातलेल्या चमत्काराची त्यांना आठवण झाली; परंतु विलक्षण वचक त्यांच्यावर होती आणि शांतपणे उद्धारकाकडे त्यांनी टक लावून पाहिले. DAMar 701.3

    माझ्या मागे या असे येशूने शिष्यांना सांगितले तेव्हा समुद्रकिनाऱ्यावरचा देखावा याची स्पष्ट कल्पना त्यांना आली होती. खोल पाण्यात जाळे टाका असे सांगितल्याप्रमाणे केल्यानंतर जाळे फाटून जाईपर्यंत मासे मिळाले होते ह्याचे स्मरणही त्यांना झाले. नंतर येशूने त्याना मचवे सोडून द्या आणि मी तुम्हाला माणसे धरणारे करीन असे आश्वासन दिले. हे दृश्य पुन्हा डोळ्यापुढे आणून त्यांच्या मनावर त्याचा खोल परिणाम होण्यासाठी त्याने हा चमत्कार पुन्हा केला होता. हे कृत्य शिष्यांना दिलेल्या सनदेचे नवीकरण होते. प्रभूच्या मरणामुळे त्यांना नेमून दिलेले काम करण्यापासून त्यांची जबाबदारी कमी झालेली नव्हती हे त्यामुळे दर्शविले होते. जरी त्याची वैयक्तिक उपस्थिति त्यांच्याबरोबर नसणार होती आणि पूर्वीच्या मालकाकडून उपजीविकेचे साधन मिळणार नव्हते तरी पुनरुत्थित उद्धारक त्यांची काळजी वाहाणार होता. ते कामात असतांना त्यांची नड तो भागवील. मचव्याच्या उजव्या बाजूला जाळे टाकण्यास सांगण्यामध्ये येशूचा उद्देश होता. किनाऱ्यावर तो त्या बाजूला उभा होता. ती श्रद्धेची बाजू होती. त्याच्याबरोबर मिळून त्यांनी काम केल्यास-त्याच्या दैवी सामर्थ्याशी मानवी प्रयत्न संघटीत झाल्यास-ते पराभूत होण्याची शक्यता नव्हती.DAMar 701.4

    पेत्राला उद्देशून दुसरा एक धडा ख्रिस्ताला द्यायचा होता. पेत्राची आरंभीची एकनिष्ठता आणि नंतरचा त्याचा नाकार तुलनात्मक दृष्ट्या लज्जास्पद तफावत होती. त्याद्वारे त्याने ख्रिस्ताचा अपमान केला होता व बांधवांचा विश्वास गमावला होता. ह्याला त्यांच्यामध्ये पूर्वीचे स्थान मिळणार नाही असे त्यांना वाटले होते आणि त्याला स्वतःला वाटले की त्याने त्यांचा विश्वास गमावला होता. प्रेषितीय कार्याची जबाबदारी पुन्हा घेण्याच्या अगोदर त्याने त्यांच्यासमोर पश्चात्तापदग्ध झाल्याचा पुरावा दिला पाहिजे. पापाबद्दल पश्चात्ताप जरी केला तरी हे केल्याशिवाय ख्रिस्ताचा सेवक ह्या नात्याने त्याचे वजन निकामी ठरले असते. बांधवांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी आणि शुभसंदेशावर, सुवार्तेवर आणलेले दूषण काढून टाकण्यासाठी उद्धारकाने त्याला संधि दिली.DAMar 702.1

    ख्रिस्ताच्या सर्व अनुयायांसाठी येथे एक धडा दिला आहे. सुवार्ता दुष्टतेशी तडजोड करीत नाही. ती पापाबद्दल सबब सांगत नाही किंवा समर्थन करीत नाही. गुप्त पापे गुप्तपणे देवाजवळ कबूल केली पाहिजेत; परंतु उघड पापे उघडपणे कबूल केली पाहिजेत. शिष्यांच्या पापाबद्दल ख्रिस्तावर ठपका ठेवण्यात आला. त्याद्वारे सैतान विजयोत्सव करितो आणि हेलकावे खाणारा माणूस अडखळतो. पश्चात्तापाचा पुरावा देऊन शिष्याने शक्य तो आपल्या शक्तीप्रमाणे त्या ठपक्याचे निवारण करावे.DAMar 702.2

    समुद्रकिनारी ख्रिस्त आणि शिष्य एकत्रित भोजन करीत असतांना उद्धारकाने पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करितोस काय? (त्यांच्या बांधवाना उद्देशून). पेत्राने एकदा म्हटले होते, “आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही.’ मत्तय २६:३३. परंतु त्याने आता स्वतःचे खरे मोजमाप केले होते. त्याने म्हटले, “होय, प्रभु, आपणावर मी प्रेम करितो, हे आपणाला ठाऊक आहे.” त्याच्या सोबत्यापेक्षा त्याचे प्रेम अधिक आहे याविषयी तीव्र, जोरदार खात्रीचे उद्गार नव्हते. आपल्या एकनिष्ठ प्रेमाचे, भक्तीचे तो स्वतःचे विचार प्रगट करीत नव्हता. आपल्या मनातील सर्व हेतु जाणणाऱ्याला आपल्या खरेपणाबद्दल चौकशी करण्यास तो विनवितो, “आपणावर मी प्रेम करितो हे आपणाला ठाऊक आहे.” येशूने म्हटले, “माझी कोंकरे चार.” DAMar 702.3

    पूर्वीच्या शब्दांचा पुनरुच्चार करून येशूने पेत्राची कसोटी केलीः “योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करितोस काय?’ ह्या वेळेस त्याच्या सोबत्यापेक्षा अधिक प्रेम करतोस काय असे त्याने पेत्राला विचारिले नाही. दुसऱ्या वेळेचे उत्तर पहिल्यासारखेच होते. त्यामध्ये अतिशयोक्तीची अथवा अवास्तव खात्री नव्हतीः “होय, प्रभु, मी आपणावर प्रेम करितो हे आपणाला ठाऊक आहे.’ येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे पाळ.” पुन्हा एकदा उद्धारकाने सत्त्वपरीक्षेचा प्रश्न विचारलाः “योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करितोस काय?” पेत्र मनात फार दुःखी झाला ओशाळला. त्याच्या प्रेमाविषयी येशू साशंक आहे असे त्याला वाटले. त्याच्याविषयी शंका घेण्यास प्रभूला कारण आहे हे त्याला माहीत होते आणि अगदी तळमळून म्हणाला, “प्रभु आपणाला सर्व ठाऊक आहे; मी आपणावर प्रेम करितो हे आपण ओळखिले आहे.” येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार.”DAMar 702.4

    तीन वेळेस उघडपणे पेत्राने त्याच्या प्रभूचा नाकार केला आणि त्याच्या दुःखावलेल्या मनाला टोचण्या देणारे प्रश्न विचारून तीन वेळेस त्याचे प्रेम व मनापासून केलेला पश्चात्ताप येशूने प्रगट करून घेतला. एकेकाळी फुशारकी मारणारा किती नम्र झालेला आहे हे त्याने दर्शविले.DAMar 703.1

    स्वभावताच पेत्र निर्भिड व भावनावश होता आणि त्याच्या ह्या गुणानेच सैतानाने त्याला उलथून टाकण्याचा फायदा घेतला. पेत्राचे पतन होण्याच्या अगोदर येशूने त्याला म्हटले होते, “शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली; परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावास स्थिर कर.’ लूक २२:३१, ३२. आता ती वेळ आली होती आणि पेत्राचे परिवर्तन झाल्याचे उघड होते. त्याला विचारलेल्या प्रश्नाच्या एकाही उत्तरात निर्भिडपणा आणि स्वयंपूर्णता दिसली नाही. त्याची विनम्र वृत्ती आणि अनुताप यामुळे पेत्र पूर्वीपेक्षा आता कळपाची चांगली काळजी घेण्यास सिद्ध होता.DAMar 703.2

    सेवाकार्यासाठी पेत्राची पुनर्स्थापना केल्यावर येशूने त्याला पहिले काम मेंढराची निगा राखण्याचे दिले. ह्या कार्यात पेत्राला अल्पसा अनुभव होता. त्यासाठी काळजी, आस्था, मायाळूपणा, सहनशीलता आणि चिकाटी ह्या गुणांची आवश्यकता होती. विश्वासात नवखे असलेले व अडाण्यांना शिक्षण देणे, शास्त्रपाठ देणे आणि ख्रिस्तसेवेच्या कार्यासाठी त्यांची उपयुक्तता वाढविणे हे काम त्याला करावयाचे होते. आतापर्यंत हे काम करण्यास पेत्र पात्र नव्हता किंवा त्याचे महत्त्वही त्याला उमजले नव्हते. परंतु आता हे काम करण्यास येशूने त्याला सांगितले होते. त्याला आलेला दुःख व्यथा यांचा अनुभव व पश्चात्ताप ह्याद्वारे तो ह्या कामासाठी सज्ज झाला होता.DAMar 703.3

    पतनापूर्वी भावनाविवश होऊन उतावीळपणे पेत्र नेहमी बोलत असे. दुसऱ्यांना सुधारण्यासाठी तो नेहमी बोलण्यात पुढाकार घेत होता, परंतु जे काही बोलत होता त्याचे व स्वतःचे संपूर्ण ज्ञान त्याला नसे. परंतु मन परिवर्तन झालेला पेत्र वेगळा होता. पूर्वीचा त्याचा उत्साह व कळकळ कायम राहिली परंतु त्याची उमेद आणि आस्था यांना ख्रिस्त कृपेने शिस्त लावली होती. तो अत्यंत उतावीळ, आत्मविश्वासू आणि स्वतःची प्रशंसा मिरविणारा राहिला नव्हता परंतु तो शांत, अविचल आणि शिकाऊ बनला होता. त्यामुळे तो ख्रिस्ताच्या कळपातील कोंकरे व मेंढरे यांची निगा घेऊ शकत होता.DAMar 703.4

    उद्धारकाने पेत्राला दिलेल्या वागणुकीत पेत्र व त्याच्या बांधवासाठी चांगला धडा होता. सहिष्णुता, सहानुभूती व क्षमावृत्ती दाखवून चुका करणाऱ्यांचा समाचार घेण्यास त्याने त्यांना शिकविले. पेत्राने येशूचा नाकार केल्यावरसुद्धा येशूचे त्याच्यावरील प्रेम केव्हाही कमी झाले नाही. अशा प्रकारे हाताखालच्या मेंढपाळांनी आपल्या कोकरा मेंढराची काळजी घेतली पाहिजे. स्वतःचा दुर्बलपणा व अपयश ह्यांची जाणीव ठेऊन, पेत्राला जशी ख्रिस्ताने वागणूक दिली, तशी पेत्राने आपल्या कळपाला कळकळीने वागणूक द्यावी.DAMar 704.1

    ख्रिस्ताने पेत्राला विचारलेला प्रश्न अर्थपूर्ण होता. शिष्यत्व व सेवा ह्या संदर्भात त्याने फक्त एकाच अटीचा उल्लेख केला. “त्याने म्हटले, “तू माझ्यावर प्रीती करितोस काय?’ हा गुण महत्त्वाचा आहे. पेत्राच्याठायी दुसरे गुण असू शकतील परंतु ख्रिस्तप्रेमाशिवाय तो आपल्या कळपावर श्रद्धावंत मेंढपाळ होऊ शकणार नव्हता. उत्तम काम करण्यात ज्ञान, परोपकारबुद्धी, वक्तृत्व, कृतज्ञता आणि आवेश यांचा वाटा असतो परंतु ख्रिस्तप्रेम अंतःकरणात नसले तर ख्रिस्ताच्या सेवकाचे कार्य अपयशी ठरते.DAMar 704.2

    येशूला महत्त्वाचे काही पेत्राला सांगावयाचे होते म्हणून तो एकट्यालाच घेऊन जात असे. आपल्या मरणाअगोदर येशूने त्याला म्हटले, “मी जेथे जातो तेथे तुला आता माझ्या मागे येता येणार नाही; पण तू नंतर येशील.’ पेत्र त्याला म्हणाला, “प्रभुजी, मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही? आपल्यासाठी मी माझा प्राण देईन.” योहान १३:३६, ३७. हे भाष्य करीत असताना ख्रिस्त त्याला कोणत्या थराला घेऊन जाईल ह्याची त्याला थोडीशीही कल्पना नव्हती. कसोटी झाल्यावर पेत्र उतीर्ण झाला नाही, परंतु ख्रिस्तासाठी असलेली त्याची प्रीती सिद्ध करण्यासाठी त्याला पुन्हा संधि देण्यात येणार होती. शेवटच्या कसोटीसाठी त्याचा विश्वास भक्कम होण्यासाठी उद्धारकाने त्याचे भविष्य उघडे केले. त्याने त्याला म्हटले उपयुक्त जीवन जगल्यावर, वयोमानाने शक्तीहीन होत असताना तो प्रभूच्या मागे जाईल. येशूने म्हटले, “तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात होतास; परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करिशील आणि दुसरा माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल. तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचे गौरव करील हे सुचविण्याकरिता तो हे बोलला.”DAMar 704.3

    त्याचे मरण कोणत्या त-हेचे होणार हे येशूने पेत्राला सांगितले; वधस्तंभावर त्याचे हात पसरण्यास येतील हे सुद्धा त्याने त्याला सांगितले. पुन्हा त्याने त्याला म्हटले, “तू माझ्यामागे ये.” पेत्राला हे प्रगट केल्यामुळे तो निराश झाला नाही. प्रभूसाठी कोणतेही मरण पत्करण्यास तो राजी होता.DAMar 705.1

    आज ख्रिस्ताला ओळखतात त्याप्रमाणे त्यावेळेपर्यंत पेत्र ख्रिस्ताला मानवी दृष्टीकोनातून ओळखत होता परंतु त्याला आता मर्यादा राहिली नव्हती. मानव असताना आलेल्या सहवासात त्याला जी ओळख होती त्याच्यापेक्षा अधिक ओळख त्याला नव्हती. मनुष्य, स्वर्गातून आलेला शिक्षक म्हणून त्याने त्याच्यावर प्रेम केले होते आणि आता देव म्हणून त्याच्यावर प्रेम केले. सर्व काही ख्रिस्त असा धडा तो शिकत होता. आता तो प्रभूच्या समर्पणाच्या कार्यात भाग घेण्यास सज्ज झाला होता. वधस्तंभाजवळ त्याला नेण्यात आल्यावर त्याच्या विनंतीवरून त्याला डोके खाली व पाय वर करून खिळण्यात आले होते. गुरुजीप्रमाणे प्राणांतिक दुःख भोगणे हा मोठा सन्मान आहे असे त्याला वाटले.DAMar 705.2

    “तू माझ्यामागे ये’ हे शब्द पेत्राला अफाट प्रबोधनाचे वाटले. त्यामध्ये मरणाच्या संदर्भातच नाही तर जीवनाच्या प्रत्येक पावलागणिक त्याला अनुभवायचा पाठ होता. आतापर्यंत पेत्राची वागणूक स्वतंत्र बाण्याची होती. कार्यासाठी देवाच्या योजना कार्यान्वीत करण्याऐवजी देवाचे कार्य करण्यास स्वतःच्या योजना तो आखीत होता. परंतु प्रभूला सोडून पुढे धावून कार्य करण्यात सफलता प्राप्त होत नव्हती. येशूने म्हटले, “माझ्या मागे ये.” माझ्या पुढे पळू नकोस. तसे केल्यास सैतानाचे सैन्य तुझा एकट्याचा पिच्छा पुरविणार नाहीत. तुझ्या पुढे मला जाऊ दे आणि शत्रू तुझ्यावर मात करू शकणार नाही.DAMar 705.3

    पेत्र येशूबरोबर चालला असताना योहान मागून येत असलेला त्याने पाहिले. त्याचे भवितव्य जाणून घेण्याची त्याला इच्छा झाली व त्याने “येशूला म्हटले, प्रभु, ह्याचे काय? येशूने त्याला म्हटले, मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय? तूं माझ्या मागे ये.” त्याच्या कल्याणासाठी उचीत असलेले सर्व काही प्रभु त्याला प्रगट करील हे पेत्राने समजून घ्यायला पाहिजे होते. दुसऱ्यांना दिलेल्या कार्याविषयी धास्ती न घेता ख्रिस्ताच्यामागे जाणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. “मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली’ योहानाविषयी काढलेल्या ह्या विधानात प्रभूच्या द्वितियागमनापर्यंत तो जीवंत राहील ही शाश्वती येशूने दिली नव्हती. त्यामध्ये आपली सर्वश्रेष्ठ सत्ता, अधिकार त्याने व्यक्त केला होता आणि तसे घडलेच तर त्याचा परिणाम पेत्राच्या कामावर होणार नव्हता. पेत्र व योहान यांचे भवितव्य प्रभूच्या हातात होते. त्याच्या मागे जाऊन आज्ञापालन करणे ह्याची प्रत्येकाकडून अपेक्षा केली होती.DAMar 705.4

    पेत्रासारखे आज कितीजन आहेत? ते दुसऱ्यांच्या कामात फार रस घेऊन त्यांच्या कामाबद्दल विचारपूस करीत बसतात आणि त्याच वेळी स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष करतात. ख्रिस्तावर दृष्टी केंद्रीत करून त्याच्यामागे जाणे आमचे कर्तव्य आहे. दुसऱ्यांच्या जीवनातील चुका व स्वभावातील उणीवा आम्हाला दिसतील. मानवता नैतिक दुर्बलतेने गांजलेली आहे. परंतु ख्रिस्तामध्ये पूर्णावस्था, निर्दोषता लाभेल. त्याच्यावर मन केंद्रित केल्यास आमचे रूपांतर होईल.DAMar 706.1

    वृद्धापकाळापर्यंत योहानाला आयुष्य लाभले. यरुशलेम उध्वस्त झालेले त्याने पाहिले आणि जगाच्या नाशाची निशाणी-भव्य मंदिराचा नाश झालेला त्याने पाहिला. शेवटपर्यंत योहानाने येशूचे अनुकरण केले. मंडळीविषयी असलेल्या त्याच्या साक्षीत त्याने म्हटले, “प्रियजनहो, आपण एकमेकावर प्रीती करू.” “जो प्रीतीमध्ये राहातो तो देवामध्ये राहातो व देव त्यामध्ये राहातो.” १ योहान ४:७, १६.DAMar 706.2

    पेत्राला त्याचा प्रेषितीय हुद्दा देण्यात आला होता पण ख्रिस्ताकडून त्याला मिळालेला सन्मान व अधिकार यामध्ये त्याच्या बांधवावर प्रभुत्व चालविण्याचा अधिकार दिला नव्हता. “प्रभु, ह्याचे काय?” असा प्रश्न पेत्राने विचारल्यावर उत्तर देताना ख्रिस्ताने पेत्राला स्पष्ट केले होते. त्याने म्हटले, “तुला त्याचे काय? तू माझ्यामागे ये.’ पेत्राला मंडळीचा प्रमुख म्हणून मान देण्यात आला नव्हता. त्याच्या धर्मभ्रष्टतेची क्षमा करून, त्याच्यावर कळपास चारण्याची जबाबदारी टाकून ख्रिस्ताने त्याच्यावर उपकार केले होते आणि ख्रिस्ताचे अनुकरण करण्यातील पेत्राची एकनिष्ठता व निसिम श्रद्धा यामुळे त्याच्या बांधवाचा विश्वास त्याने संपादिला होता. मंडळीमध्ये त्याचे वजन भारी होते. गालीली समुद्र किनारी पेत्राला दिलेला धडा त्याने आपल्या आयुष्यभर पाळिला. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मंडळींना लिहीत असताना त्याने म्हटले:DAMar 706.3

    “तुम्हातील वडिलांना, जो मी सोबतीचा वडील, ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी व प्रगट होणाऱ्या गौरवाचा वाटेकरी तो मी असा बोध करितोः तुम्हांमधील देवाच्या कळपाचे पालन करा; करावे लागते म्हणून नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा; द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा; तुमच्या हाती सोपविलेल्या लोकावर धनीपण करणारे असे नव्हे तर कळपाला कित्ते व्हा. मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल.’ १ पेत्र ५:१-४.DAMar 706.4