Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय १६—त्याच्या मंदिरात

    योहान २:१२-२२.

    “त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कपर्णहूनमास गेले; परंतु तेथे ते फार दिवस राहिले नाहीत. यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू वर यरुशलेमेस गेला.”DAMar 117.1

    राजधानी नगरीकडे जात असलेल्या फार मोठ्या लोकसमुदायात येशू ह्या प्रवासाच्या वेळी सामील झाला. आपल्या कार्याविषयी जाहीर घोषणा आतापर्यंत केली नव्हती. आणि कोणी न बघता तो लोकात मिसळून गेला होता. योहानाने आपल्या सेवाकार्यामध्ये मशीहाच्या आगमनाला जे अपूर्व महत्त्व दिले होते त्याचा उहापोह अशा प्रसंगी करण्यात येत होता. प्रज्वलित आवेशाने राष्ट्राच्या थोरवीची आशा यावर विचार विनिमय होत होता. ह्यांचा आशाभंग होणार होता हे येशूला माहीत होते कारण ते शास्त्रवचनाच्या चुकीच्या अर्थावर आधारलेले होते. अति कळकळीने त्याने भाकीताचे स्पष्टीकरण करून शास्त्रवचनाचा अभ्यास बारकाईने मनापासून करण्यास त्याने लोकांना उत्तेजन दिले.DAMar 117.2

    देवाची आराधना करण्याचे शिक्षण यरुशलेमात देण्यात येईल असे यहूदी पुढाऱ्यांनी लोकांना सांगितले होते. वल्हांडण सणाचा सप्ताह साजरा करण्यासाठी पॅलेस्ताईनच्या सर्व भागातून व दूरच्या देशातून मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. सरमिसळ झालेल्या समुदायाने मंदिरातील अंगण भरून गेले होते. महान यज्ञाच्या नमुन्याखातर आणावयाचा यज्ञ पुष्कळांनी येताना आपल्याबरोबर आणिला नव्हता. अशा लोकांच्या सोयीसाठी मंदिराच्या प्रांगणात क्रयविक्रय करण्यासाठी जनावरे आणली होती. ते विकत घेण्यासाठी सर्व थरातील लोक तेथे जमले होते. परकीय नाणे तेथील नाण्यामध्ये बदलून देण्यासाठी सराफ खुर्दा घेऊन बसले होते.DAMar 117.3

    प्रत्येक यहूदी व्यक्तीने स्वतःच्या जीवासाठी वर्षाला अर्धा शकेल खंडणी द्यावी अशी मागणी होती, आणि अशा प्रकारे मिळालेल्या पैशाचा उपयोग मंदिरासाठी करण्यात येत असे. निर्मग ३०:१२-१६. ह्या शिवाय स्वखुषीने आणलेली मोठी रक्कम मंदिराच्या खजिन्यात जमा करीत असे. सर्व परकीय नाणे मंदिराच्या शकेल नाण्यामध्ये बदलून घेण्याची मागणी होती. मंदिराच्या सेवाकार्यासाठी त्याचा स्वीकार करण्यात येत होता. पैसे बदलण्याच्या व्यवहारात भ्रष्टाचार व पिळवणूकीला संधि मिळाली आणि तिचा भरमसाठ बेकायदेशीर व्यापार वाढला आणि ही सर्व याजकांची मिळकत होती. DAMar 117.4

    जनावरे विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी भरमसाठ किंमतीना आपली जनावरे विकली आणि आलेला नफा याजक व अधिकारी यांच्यात वाटून घेतला. अशा रीतीने लोकांच्या जीवावर ते गबर झाले. उपासकांच्या मनाची अशी खात्री करून दिली होती की जर यज्ञार्पण केले नाही तर देवाचा आशीर्वाद त्यांच्या मुलाबाळावर व शेतीभातीवर येणार नाही. अशा प्रकारे पशुंची मोठी किंमत ते घेत असत; कारण इतक्या दूर येऊन ज्या कार्यासाठी ते आले होते ते आराधनेचे कार्य समाप्त केल्याशिवाय परत जाणार नव्हते.DAMar 118.1

    वल्हांडण सणाच्या वेळी विविध प्रकारची मोठ्या प्रमाणात यज्ञार्पण करण्यात येत होती, आणि मंदिरातील त्यांची विक्री मोठी होती. परिणामी त्या स्थळी निर्माण झालेला गोंधळ व गोंगाट यामुळे ते देवाचे पवित्र मंदिर नसून जनावरांचा बाजार आहे असे दिसत होते. जोरात चाललेला सौदा, गुरेढोरांचे हंबरणे, मेंढींचे बेंबावणे, कबूतरांचे घुमणे यांच्यात नाण्याचा आवाज आणि वादळी वादविवाद मिसळलेला ऐकू येत होता. इतका गोंधळ माजलेला होता की उपासकांचा शांतताभंग होत होता, आणि महान देवाला उद्देशून काढलेले शब्द मंदिरातील गोंगाटात विरून जात होते. यहूदी आपल्या पावित्र्याबद्दल फार अभिमानी होते. मंदिराबद्दल त्यांना फार समाधान होते आणि त्याच्याविरूद्ध काढलेले उद्गार म्हणजे ईश्वराची निंदा करणे होय असे त्यास वाटत होते. मंदिरासंबंधीचे यज्ञयाग अगदी काटेकोरपणे ते पाळत होते; परंतु त्या सद्सदविवेक बुद्धीवर पैशाच्या अनावर लोभाने मात केली होती. देवाने स्वतः प्रस्थापित केलेल्या विधीच्या मूळ उद्देशापासून ते किती इतस्ततः भटकले ह्याची त्यांना किंचितही जाणीव राहिली नव्हती.DAMar 118.2

    सिनाय पर्वतावर प्रभु उतरल्यावर त्याच्या समक्षतेने ते ठिकाण पवित्र झाले होते. पर्वतासभोवती मर्यादा घालून नजीक येण्यास लोकांना बंधन घाल व ते पवित्र कर असा हुकूम मोशेला देण्यात आला होता. इशाऱ्याचा शब्द त्यांनी ऐकलाः “तू लोकासाठी सभोवताली मर्यादा आखून लोकास सांग, सांभाळा, पर्वतावर चढू नका, त्याच्या सीमेला शिवू देखील नका, जो कोणी पर्वतास स्पर्श करील तो खास आपल्या जीवास मुकेल; कोणी आपला हात त्यास लावू नये. लावला तर त्याला दगडमार करावा किंवा बाणांनी विंधावे; तो पशु असो किंवा मनुष्य असो, त्याला जीवंत ठेवू नये.” निर्गम १९:१२, १३. ज्या ज्या ठिकाणी देवाची समक्षता असते ते ते ठिकाण पवित्र होते हा धडा शिकविण्यात आला. मंदिराच्या आसपासची जागा पवित्र समजली जावी. परंतु स्वहित साधण्याच्या झगड्यात हे सर्व दृष्टीआड केले होते.DAMar 118.3

    राष्ट्रापुढे देवाचे प्रतिनिधी म्हणून याजक व अधिकारी यांना बोलण्यात आले. मंदिरातील अंगणाचा गैर वापर करण्यात त्यांनी लक्ष घालून दुरूस्ती करायला पाहिजे होती. प्रामाणिकपणा व करुणा यामध्ये त्यांनी लोकांना आदर्श दाखवायला पाहिजे होता. स्वतःचाच फायदा पाहाण्याऐवजी परिस्थिती आणि उपासकांच्या गरजा लक्षात घ्यायला पाहिजे होते. आवश्यक यज्ञबलि विकत घेण्यास असमर्थ असलेल्यांना सहाय्याचा हात देण्यात ते तयार असले पाहिजे होते. परंतु हे त्यांनी केले नाही. द्रव्यलोभामुळे त्यांची अंतःकरणे निष्ठूर झाली.DAMar 118.4

    ह्या सणासाठी आपदग्रस्त, गरजू, दुःखणाईत आले होते. आंधळे, पांगळे, बहिरे तेथे होते. काहींना खाटेवर आणले होते. काहीजण स्वतःची उपासमार टाळण्यास समर्थ नसलेले व प्रभुसाठी धड साधे यज्ञ घेण्यास लायक नसलेले गरीब तेथे आले होते. याजकांच्या विधानामुळे त्यांना फार मानसिक दुःख झाले होते. याजक लोक आपल्या पावित्र्याची बढ़ाई मारीत होते; ते लोकांचे पालक असल्याचे मिरवीत होते. परंतु त्यांच्याठायी सहानुभूती व दया नव्हती. दरिद्री, आजारी, मृत्यूपथावर असलेले, यांनी केलेली मदतीची विनवणी व्यर्थ गेली. त्यांना होत असलेल्या क्लेशांनी याजकांच्या अंतःकरणात दयेचा पाझर फुटला नाही.DAMar 119.1

    येशूने मंदिरात प्रवेश केल्यावर त्याने तेथील सर्व दृश्याचे निरिक्षण केले. तेथे गैरव्यवहार चाललेले त्याने पाहिले. रक्ताविना पापविमोचन नाही ह्या विचाराने त्रस्त झालेले लोक त्याने पाहिले. मंदिराच्या अंवती भोवती अधार्मिक व्यवहाराने बाजाराचे स्वरूप आलेले त्याने पाहिले. पवित्र आवार सराफ बाजार बनल्याचे त्याने पाहिले.DAMar 119.2

    ह्या संबधी निश्चित काही तरी केलेच पाहिजे असे ख्रिस्ताला वाटले. अनेक विधींचा इष्ट अर्थ न सांगता लोकावर ते लादले होते. परिपूर्ण यज्ञाचे ते दर्शक आहे असे न समजता उपासक यज्ञ आणीत होते. ह्या सर्व यज्ञयागाचे द्योतक असलेला अपरिचीत, असन्मानीत असा त्यांच्यामध्ये आता उभा होता. यज्ञाच्या बाबतीत त्याने योग्य दिशा दिली होती. त्यांचे सांकेतिक - लाक्षणिक मोल त्याला समजले होते, परंतु आता त्यांचा गैरसमज करून त्यांचा विपर्यास केलेला त्याने पाहिला. आध्यात्मिक उपासना द्रूतगतीने लूप्तप्राय होत होती. अधिकारी व याजक यांनी त्यामध्ये देवाशी संबंध राखला नव्हता. नवीनच उपासना पद्धत प्रस्थापित करणे हे ख्रिस्ताचे काम होते.DAMar 119.3

    मंदिराच्या आवारात पायरीवर उभे राहून भेदक दृष्टिक्षेपाने त्याच्या समोरील दृश्याचे त्याने अवलोकन केले. भविष्यात्मक दृष्टीकोनातून तो भविष्यातील वर्षच नाही तर शतक व युग यावर दृष्टी केंद्रित करितो. अधिकारी व याजक लोक गरंजूना त्यांच्या हक्कापासून कसे दूर ठेवीत आहेत आणि गरीबांना सुवार्ता सांगण्यामध्ये ते कसे अडथळे निर्माण करीत आहेत हे त्याने हेरले. पाप्यांच्यापासून देवाची प्रीती कशी लपविली जाईल आणि लोक त्याची कृपा विक्रीच्या मालासारखे वापरतील हे ही त्याच्या लक्षात आले. तेथील दृश्याचे निरिक्षण करीत असतांना त्याच्या चेहऱ्यावर संताप, चीड, अधिकार, सामर्थ्य दृश्यमान होत होते. लोकांचे लक्ष त्याच्याकडे आकर्षीत झाले. अनैतिक, अधार्मिक सौद्यात गुंतलेल्याचे लक्ष त्याच्या मुखचर्येवर खिळले होते. त्यांचे टक लावून पाहाणे ते विचलीत होऊ देत नव्हते. त्यांना वाटले की हा मनुष्य आमच्या अंतर्यामातील विचार जाणतो आणि आमचे गुप्त उद्देश शोधून काढतो. जणू काय मुखावर लिहिलेल्या दुष्कृत्यांचे शोधक नेत्राने बारकाईने निरीक्षण करण्यात येईल म्हणून काहीजण चेहरे झाकण्याचा प्रयत्न करीत होते.DAMar 119.4

    गोंधळ शांत करण्यात आला. व्यापार धंद्याचा व सौदा करण्याचा आवाज थांबला. स्तब्धता दुःखदायक, अवघड वाटत होती. जमावावर भीतीयुक्त दरारा बसलेला होता. त्यांच्या कर्माबद्दल उत्तर देण्यास जणू काय त्यांना देवाच्या कोर्टापुढे खेचण्यात आले होते. ख्रिस्ताकडे पाहिल्यावर मानवतेच्या पेहराव्यामधून देवत्वाची चमक त्यांना दिसली. शेवटच्या दिवसात न्यायाधीश जसा उभा राहील तसे स्वर्गीय राजा उभे राहातो. त्यावेळेस जे गौरव त्याच्याभोवती असणार ते आता नव्हते, परंतु आत्म्याचे अंतःकरण जाणणारे तेच सामर्थ्य होते. प्रत्येकाकडे लक्ष लावून त्याने आपली नजर सर्व लोकसमुदायावर फिरविली. मोठेपणाची अपेक्षा करणारा त्याचा औपचारिक शिष्टाचार त्यांच्यापेक्षा वरच्या दर्जाचा होता, आणि दिव्य प्रकाशाने त्याची मुद्रा प्रकाशित झाली होती. सिनाय पर्वतावरून घोषीत केलेला नियम आता याजक व अधिकारी भंग करीत होते. त्याच आवाजात तो आता बोलतो, त्याचा स्पष्ट व खणखणीत आवाज मंदिराच्या कामानीतून ऐकला जातोः “ही येथून काढून घ्या; माझ्या पित्याचे घर व्यापाराचे घर करूं नका.”DAMar 120.1

    हळूच पायरीवरून खाली उतरून आवाऱ्यात प्रवेश केला व हातातील दोऱ्यांचा कोरडा वर करून सौदा करणाऱ्यांना मंदिरातून निघून जाण्यास सांगितले. आतापर्यंत कधी दर्शविले नाही अशा आवेशाने व कडकरीतीने त्याने सराफांचा खुर्दा ओतून टाकिला व चौरंग पालथे केले. संगमरवरी दगडावर नाणे पडतात व खणखणीत आवाज होतो. कोणीही त्याच्या अधिकाराविषयी तोंड उघडीत नव्हते. गैर व्यवहाराने मिळविलेला पैसा उचलण्यास कोणीही धजत नव्हते. दोऱ्यांच्या कोरड्याने येशू त्यांना फटकारे देत नाही, परंतु त्याच्या हातातील तो साधा कोरडा झगझगीत ज्वलंत समशेर अशी वाटते. मंदिरातील अंमलदार, सट्टेबाज याजक, दलाल, गुरांचे व्यापारी या सर्वांनी आपली गुरे मेंढरे घेऊन त्याच्या नजरेतील नापसंतीपासून सुटका करून घेण्यासाठी तेथून तत्काळ पाय काढिला.DAMar 120.2

    सर्व लोकावर तीव्र घबराट पसरला व त्याचे देवत्व अधिक तेजस्वी दिसले. फिकट पडलेल्या ओठांतून भीतीच्या आरोळ्या बाहेर पडत होत्या. शिष्यांचीसुद्धा घबराट गाळण उडाली. त्याच्या उच्चाराने व असामान्य आचरणाने त्यांना धाक बसला. त्याच्याविषयी केलेल्या लिखाणाचे त्यांना स्मरण झाले, “तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकिले आहे.” स्तोत्र. ६१:९. तत्काळ गोंधळलेला जमाव देवाच्या मंदिरापासून आपल्या विक्रीच्या मालासहित दूर निघून गेला. अपवित्र सौदा व्यवहारापासून मंदिराचे आवार मुक्त झाले होते, आणि गोंधळ व गोंगाट यांच्या जागी शांतता व गांभीर्य पसरले होते. पूर्वी पर्वताला पवित्र केल्याप्रमाणे , देवाच्या सहवासाने, त्याच्या सन्मानार्थ उभारलेले मंदिर आता पवित्र, अत्यंत आदरणीय केले होते.DAMar 120.3

    मंदिराचे शुद्धीकरण करून येशूने मशीहा या नात्याने आपल्या कार्यास सुरूवात करीत असल्याचे घोषीत केले. दैवी निवासासाठी उभारलेले मंदिर इस्राएलासाठी व जगासाठी आदर्श राहावे अशी योजना होती. सनातन काळापासून निर्माण केलेली प्रत्येक व्यक्ती, तेजस्वी व पवित्र देवदूत असो किंवा मनुष्य असो, निर्माणकर्त्याला आंत वसति करण्याचे मंदिर असले पाहिजे. दुष्टाईने भ्रष्ट व काळेकुट्ट झालेले माणसाचे अंतःकरण कदापि देवाचे गौरव प्रगट करू शकत नाही. परंतु देवपुत्राने मानवी अवतार धारण केल्यामुळे स्वर्गाचा उद्देश साध्य झाला. मानवतेमध्ये देव वसति करितो, आणि तारणदायी कृपेने मनुष्याचे अंतःकरण पुनश्च त्याचे मंदिर बनते. यरुशलेम नगरीतील मंदिर प्रत्येक व्यक्तीपुढे ठेवलेल्या अंतिम स्थानाची सतत साक्ष राहावी अशी देवाची योजना होती. परंतु यहूदी लोकांना मंदिराविषयी एवढा अभिमान होता तरी त्यातील गर्भित अर्थ त्यांना समजला नाही. पवित्र मंदिर या नात्याने स्वतः ते पवित्र आत्म्याला शरण गेले नाहीत. यरुशलेमातील मंदिराच्या आवार अमंगल व्यवहाराने निर्माण झालेला प्रचंड गोंधळ व गलबला यांनी भरून गेला होता, त्याचप्रमाणे त्यांची अंतःकरणे, देवाचे मंदिर, अमंगल विचारांनी व विषयासक्त वासनेने भ्रष्ट झाली होती. जगातील मालाचा क्रयविक्रय करणाऱ्यापासून मंदिराची शुद्धी करण्याद्वारे येशूने जाहीर केले की, कलंकीत करणाऱ्या जगिक आकांक्षा, स्वार्थी वासना, दुष्ट संवयी ह्याच्या पापाने मलीन झालेली अंतःकरणे शुद्ध करणे हे त्याचे काम आहे. “ज्या प्रभूला तुम्ही शोधिता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पाहा, करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करीत आहा तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल? कारण तो धातू गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे; रूपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल, लेवीच्या वंशजास शुद्ध करील; त्यांस सोन्यारूप्यासारखे शुद्ध करील.” मलाखी ३:१-३.DAMar 121.1

    “तुम्ही देवाचे मंदिर आहा, आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वसतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करितो तर देव त्याचा नाश करील; कारण देवाचे मंदिर पवित्र असते, तसेच तुम्ही आहा.” १ करिंथ ३:१६, १७. अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या दुष्टाईला कोणीही मनुष्य स्वसामर्थ्याने काढून टाकू शकत नाही. केवळ ख्रिस्ताच व्यक्तीच्या अंतःकरण मंदिराची शुद्धी करू शकतो. परंतु प्रवेश मिळविण्यासाठी तो जबरदस्ती करीत नाही. जुन्या मंदिराप्रमाणे तो अंतःकरणात प्रवेश करीत नाही; परंतु तो म्हणतो, “पाहा, मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याजबरोबर जेवीन आणि तो मजबरोबर जेवील.’ प्रगटी. ३:२०. फक्त एक दिवसासाठी तो येणार नाही कारण तो म्हणतो, “मी त्यात निवास करीन व चालेन; ... ते माझे लोक होतील.” “तो आमचे अपराध पायाखाली तुडवील, तूं त्याची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील.’ २ करिंथ. ६:१६; मीखा ७:१९. त्याच्या वास्तव्याने आत्म्याची शुद्धी होऊन पावित्र्य लाभेल; त्यामुळे प्रभूसाठी ते पवित्र मंदिर आणि “आत्म्याच्याद्वारे देवाचे निवासस्थान” होईल. इफिस. २:२१, २२.DAMar 121.2

    ज्यांची अंतःकरणे ज्याच्या नेत्रकटाक्षाने ओळखून घेतली त्याच्यापासून व मंदिराच्या आवारातून भयभीत होऊन याजक व अधिकारी यांनी तेथून पलायन केले. पळ काढून जाणाऱ्यांना मंदिराकडे जाणारे काही भेटले. तेथे घडलेले व पाहिलेले सर्व काही सांगून परत जाण्यास त्यांना सांगितले. पळणारे पाहून त्यांच्या भीतीविषयी आणि खऱ्या आराधनेच्या त्यांच्या अज्ञानाविषयी ख्रिस्ताला दया आली. ह्या दृशामध्ये सांकेतिक दृष्ट्या सबंध यहदी राष्ट्राची, त्यांची दृष्टाई, निगरट्टपणा व अपश्चात्तापी वृत्ती यांच्यामुळे कशी पांगापांग झाली ह्याचे वर्णन केले आहे.DAMar 122.1

    खरे पाहिले तर याजक मंदिरातून का पळाले? ते आपल्या भूमिकेला धरून ठाम का राहिले नाहीत? ज्याने जाण्याचा हुकूम दिला होता तो तर केवळ सुताराचा मुलगा, गरीब गालीली, कसला हद्दा किंवा अधिकार नसलेला होता. त्याला त्यांनी विरोध का केला नाही? गैरमार्गाने मिळत असलेला मोठा नफा सोडून व ज्याचे बाह्य स्वरूप फार विनम्र होते त्याच्या हकमाने त्यांनी का पळ काढला?DAMar 122.2

    ख्रिस्त राजाच्या अधिकार वाणीने बोलत होता, आणि त्याच्या दिसण्यात व त्याच्या वाणीत जे होते त्याला विरोध करण्यास त्यांच्यात सामर्थ्य नव्हते. त्यांच्या आयुष्यात पूर्वी कधी त्यांना जाणवले नाही ते त्याच्या हुकमातील वाणीद्वारे ते ढोंगी, लुटारू व डाकू असल्याचे जाणवले. जेव्हा देवत्व मानवतेमध्ये चमकले तेव्हा ख्रिस्ताच्या चेहऱ्यावर संताप व चीड एवढेच दिसले नाही तर त्याच्या उद्गारलेल्या शब्दातील महत्त्वपूर्ण अर्थ समजला. त्यांना वाटले की सनातन न्यायधिशाच्या सिंहासनासमोर त्यांना एकदाची कायमची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. काही काळ ख्रिस्त संदेष्टा असल्याची त्यांची खात्री झाली होती; आणि अनेकांचा तो मशीहा असल्याचा विश्वास होता. ख्रिस्ताविषयी संदेष्ट्यांनी काढलेले उद्गार पवित्र आत्म्याने त्यांच्या मनात आकस्मात सुचविले. ह्या खात्रीचा ते स्वीकार करतील काय?DAMar 122.3

    पश्चात्ताप करायला ते तयार नव्हते. ख्रिस्ताची सहानुभूती गरीबासाठी जागृत झालेली त्यांना समजली. लोकांशी व्यवहार करताना ते लोकांची पिळवणूक करण्यामध्ये अपराधी होते हे ही त्यांना समजले. ख्रिस्ताने त्यांची अंतःकरणे ओळखली म्हणून ते त्याचा द्वेष करू लागले. जाहीररित्या त्यांचा मानमरातब ठेवला नाही त्यामुळे त्यांचा अभिमान दुःखावला होता आणि लोकांमध्ये त्याचा लौकिक वाढत असलेला पाहून त्यांना हेवा वाटत होता. ज्या अधिकाराने त्याने त्यांना पिटाळून लावले आणि हा अधिकार त्यांना कोणी दिला ह्या संदर्भात त्याला आवाहन देण्याचा त्यांनी निश्चय केला.DAMar 122.4

    मनात द्वेषबुद्धी धरून सावधगिरीने हळूच ते मंदिराकडे वळले. परंतु त्यांच्या गैरहजेरीत काय बदल घडून आला होता! जेव्हा ते पळून गेले तेव्हा गरीब लोक पाठीमागे राहिले होते; ज्याच्या मुखावर प्रेम व दया यांची छटा दृगोचर होत होती ते त्याच्याकडे आशेने पाहात होते. डोळ्यात अश्रू आणून कंपायमान झालेल्यांना त्याने म्हटले: भिऊ नका; मी तुमची सूटका करीन, आणि तुम्ही माझे गौरव कराल. कारण ह्याच कारणासाठी मी जगात आलो आहे.DAMar 123.1

    तातडीची करुणामय विनंती करून लोक ख्रिस्ताच्या समीप जाण्यासाठी धडपडत होते आणि ते म्हणाले: प्रभु, आम्हाला कृपाप्रसाद द्या. प्रत्येक विनवणी त्याने ऐकिली. मातेपेक्षा अधिक ममतेने आपदग्रस्त बालकांची त्याने खाली वाकून चौकशी केली. सर्वांची चौकशी केली. प्रत्येकांचा असलेला आजार बरा झाला. मुके तोंड उघडून स्तुती करू लागले; आंधळ्यांनी डोळे उघडून त्यांच्या मुक्तिदात्याचे दर्शन घेतले. आपदग्रस्तांची अंतःकरणे आनंदीत झाली.DAMar 123.2

    याजक व मंदिरातील अंमलदारांनी हे महान कार्य प्रत्यक्ष पाहिल्यावर त्यांच्या कानावर पडलेल्या वाणीद्वारे त्याचे किती मोठे प्रगटीकरण झाले! शरीराला होणाऱ्या वेदना, आशेची झालेली निराशा, न झोपता दुःखात काढलेल्या रात्री या विषयी लोक आपल्या गोष्टी सांगत होते. आशेची शेवटची ठिणगी विझणार तोच ख्रिस्ताने त्याने बरे केले. एकाने म्हटले, ओझे फार जड होते परंतु मला सहाय्यक लाभला. तो ख्रिस्त आहे आणि त्याच्या सेवेसाठी मी माझे आयुष्य वाहून देईन. मातापित्यांनी आपल्या मुलांना म्हटले, त्याने तुमचा जीव वाचविला आहे; मोठ्याने त्याची स्तुती करा. मुले, तरुण, आई, बाप, स्नेही, प्रेक्षक या सर्वांनी उपकारस्तुती करण्यात आपला आवाज एकजीव केला. त्यांची अंतःकरणे आशेने व आनंदाने भरून गेली. त्यांच्या मनाला शांती लाभली. त्यांचा आत्मा व शरीर यांना पूर्वारोग्य लाभले आणि येशूच्या अतुल्य प्रेमाची सर्वत्र घोषणा करीत ते आनंदाने घरी परतले.DAMar 123.3

    अशा प्रकारे बरे झालेले लोक येशू ख्रिस्ताला वधस्तंभी दिले तेव्हा “त्याला वधस्तंभी द्या, वधस्तंभी द्या’ असे ओरडणाऱ्या बाजारबुणग्यांच्या जमावात सामील झाले नव्हते. त्यांची सहानुभूती येशूला होती कारण त्याची सहानुभूती व शक्ती त्यांना लाभली होती. तो त्यांचा उद्धारक होता हे त्यांना समजले होते कारण त्याने त्यांना शरीराचे व आत्म्याचे आरोग्य दिले होते. प्रेषितांचा उपदेश त्यांनी ऐकिला आणि मनांत शिरलेल्या त्याच्या शब्दांचा त्यांना अर्थ बोध झाला. ते देवाच्या दयेचे प्रतिनिधी व त्याच्या उद्धाराचे साधन बनले. DAMar 123.4

    मंदिरातून पळून गेलेला जमाव काही दिवसांनी हळूहळू परत आला. पळून जाताना जी धडकी भरली होती त्यातून ते हळूहळू काही अंशी निभावले होते परंतु त्यांच्या चेहऱ्यावर अनिश्चितता व घबराट दिसत होती. आश्चर्यचकित होऊन ते येशूच्या कार्याचे अवलोकन करीत होते, आणि मशीहासंबंधी केलेली भाकीते त्याच्यामध्ये पूर्ण होत आहेत ह्या विषयी त्यांची खात्री झाली होती. मंदिर विटाळण्याचे पाप बहुतांशी याजकांच्या माथी जाते. त्यांच्या समेटामुळे मंदिराच्या आवाराला बाजाराचे रूप आले होते. तुलनात्मकदृष्ट्या लोक निरापराधी होते. येशूच्या दिव्य अधिकाराचा पगडा त्यांच्यावर पडला होता परंतु याजक व अधिकारी यांचे वजन त्यांच्यावर सर्वश्रेष्ठ होते. ख्रिस्ताचे कार्य हा नवा उपक्रम आहे अशी त्यांची समजूत झाली परंतु मंदिराच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत जे अंमलात आणिले होते त्यात अडथळा आणण्यास त्याला कोणी अधिकार दिला याविषयी त्यांच्या मनात प्रश्न उद्भवला. बेकायदेशीर चाललेल्या व्यापारात अडथळा आल्यामुळे त्यांची मने दुखावली होती. अशा रीतीने त्यांच्यावर पडलेली पवित्र आत्म्याची छाप त्यांनी दडपून टाकिली.DAMar 123.5

    इतर सर्व लोकांपेक्षा याजक व अधिकारी वर्ग यांना प्रभूचा अभिषिक्त येशू आहे ह्याची समज झाली पाहिजे होता; कारण त्याच्या कार्याची माहिती ज्याच्यामध्ये लिहून ठेविली होती ती पवित्र गुंडाळी त्यांच्या हातात होती आणि मंदिराचे शुद्धीकरण मानवी अधिकाराच्या कक्षेबाहेरचे होते ते त्यांना माहीत होते. येशूविषयी त्यांच्या मनात द्वेष मत्सर असल्यामुळे मंदिराचे पावित्र्य पुनर्स्थापित करण्यासाठी देवाने पाठविलेला हा संदेष्टा असावा हाच विचार त्यांच्या मनात घोळत होता. हा विचार मनात ठेवून ते त्याच्याकडे गेले व त्यांनी त्याला विचारिले, “तुम्ही हे करिता तर आम्हाला काय चिन्ह दाखविता?” DAMar 124.1

    येशूने त्यांना चिन्ह दाखविले. त्यांच्या अंतःकरणावर प्रकाश पाडून आणि मशीहाला करावयाचे काम त्याच्यासमोर करून दाखवून त्याने आपल्या स्वभावाची निश्चित पटणारी चिन्हे दाखविली. त्यांनी जेव्हा त्याला प्रश्न केला तेव्हा त्यांच्या मनातील कलुषितपणा कोणत्या थराला जाईल हे ओळखून त्याने दाखल्याद्वारे उत्तर दिले. त्याने म्हटले, “तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसात हे उभारीन.”DAMar 124.2

    ह्या उद्गाराचा अर्थ दुहेरी होता. यहूदी मंदिर व तिची उपासना पद्धत आणि त्याचे स्वतःचे मरण-त्याच्या शरीर-मंदिराचा नाश ह्यांचा उल्लेख त्यामध्ये होता. अगोदरच यहूद्यांनी कट रचला होता. याजक व अधिकारी मंदिराकडे परतल्यावर त्यांनी येशूला मारून टाकून लोकात असंतोष निर्माण करणाऱ्यांचा नायनाट करायचे ठरविले. तथापि त्यांचा उद्देश त्यांच्यापुढे मांडल्यावर त्याचे ज्ञान त्यांना झाले नाही. तो यरुशलेमातील मंदिरालाच उद्देशून बोलत आहे असे समजून ते क्रोधाविष्ठ होऊन उद्गारले, “हे मंदिर बांधण्यास शेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय?’ ह्या वेळेस त्यांनी येशूवरील आपल्या अविश्वासाचे समर्थन केले आणि नापसंती दर्शवून त्याचा नाकार कायम केला.DAMar 124.3

    अश्रद्धावंत यहूद्यांना व त्याच्या शिष्यांना सुद्धा त्याचे बोल पूर्णपणे समजेल असे येशूला वाटले नव्हते. त्या शब्दांना ते चुकीचा अर्थ लावून त्याच्याविरूद्ध ते कारस्थान करतील हे त्याला माहीत होते. त्याच्या चौकशीच्या वेळी त्याविषयी त्याच्यावर दोषारोप केला जाईल व वधस्तंभाच्या वेळी त्याविषयी टोमणा मारून त्याची निर्भर्त्सना केली जाईल. परंतु आता त्याचे स्पष्टीकरण केल्याने त्याच्या शिष्यांना त्याच्या क्लेशाचे ज्ञान होईल आणि असह्य होणारे दुःख त्यांच्यावर ओढवेल. तसेच स्पष्टीकरणाद्वारे यहूदी लोकांची अश्रद्धा व पूर्वग्रह कलुषितपणा यांच्या अकालिक परिणाम उघड होईल. अगोदरच त्यांनी अवलंबलेला मार्ग पुढे रेटीत नेला तर त्याचा शेवट वधावयास नेत असलेल्या कोकऱ्यामध्ये होईल.DAMar 124.4

    ख्रिस्ताचे हे शब्द त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यासाठी उद्गारले होते. त्याची पुनरावृती होईल हे त्याला माहीत होते. वल्हांडण सणाच्या समयी जाहीररित्या काढलेले हे शब्द हजारोंच्या कानावर पडले होते व जगाच्या सर्व भागामध्ये पसरले होते. मरणातून त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्याचा अर्थ अधिक स्पष्ट करण्यात येईल. अनेकांना तो त्याच्या देवत्वाचा निर्णायक पुरावा होईल.DAMar 125.1

    आध्यात्मिक दृष्ट्या अंधार असल्यामुळे येशूच्या शिष्यांनासुद्धा त्याचे धडे घेता आले नाही. परंतु त्यातील पुष्कळ धड्यांचे स्पष्टीकरण पुढे घडणाऱ्या घटनेवरून झाले. जेव्हा तो त्यांच्यामधून निघून गेला तेव्हा त्याचे बोल त्यांच्या अंतःकरणात होते त्या स्थितीतच राहिले.DAMar 125.2

    यरुशलेमातील मंदिराला उद्देशून काढिलेल्या उद्धारकाच्या शब्दात, “तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसात हे उभारीन’ ऐकणाऱ्यांना जे समजले त्यापेक्षा त्यात खोल अर्थ होता. ख्रिस्त मंदिराचा पाया व जीवन होता. त्यांतील विधि देवपुत्राच्या यज्ञाबलीचे वैशिष्ठ्यपूर्ण नमने होते. ख्रिस्ताची मध्यस्थीचे कार्य दर्शविण्यासाठी याज्ञिकी सेवा प्रस्थापीत करण्यात आली होती. संपूर्ण यज्ञबली संस्काराची योजना जगाच्या उद्धारासाठी उद्धारकाचे होणारे मरण दर्शवीत होती. सर्व युगामध्ये ज्या महान घटनेचे ते दर्शक होते ती घटना पूर्ण झाल्यावर ह्या विधि संस्काराला काही अर्थ राहाणार नव्हता.DAMar 125.3

    ज्या अर्थी सबंध विधि संस्कार ख्रिस्तकार्याचे दर्शक होते त्याअर्थी त्याच्याविना त्याला कधी काही महत्त्व नव्हते. त्याला जेव्हा मरणाची शिक्षा देऊन यहूद्यांनी त्याचा नाकार निश्चित केला तेव्हा त्यांनी मंदिर व त्यातील सर्व विधिसंस्कार यांचा महत्त्वाचा अर्थ झिडकारून दिला. त्याचे पावित्र्य नाहिसे झाले होते. त्याचा समूळ विध्वंस होणार होता. त्या दिवसापासून यज्ञयाग व त्या संबंधातील विधिसंस्कार अर्थहीन झाले होते. काईनाच्या अर्पणाप्रमाणे त्यांनी उद्धारकावरील आपली श्रद्धा व्यक्त केली नाही. ख्रिस्ताचा वध करून प्रत्यक्षात यहूद्यांनी आपले मंदिर उध्वस्त केले. जेव्हा ख्रिस्ताला वधस्तंभावर दिले तेव्हा मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला, आणि त्याद्वारे शेवटचा महान यज्ञयाग करण्यात आला व यापुढे अशा प्रकारची यज्ञयागाची पद्धत कायमची संपुष्टात आली असे सूचीत केले.DAMar 125.4

    “मी ते तीन दिवसात उभारी.” उद्धारकाच्या मरणामध्ये अंधाराची सत्ता वरचढ झाल्याचे भासते आणि त्यांना ह्या यशाबद्दल अतिशय आनंद झाला. परंतु योसेफाची कबर फोडून येशू विजेता म्हणून बाहेर आला. “त्याने सताधिशास व अधिकाऱ्यांस नाडून त्याजविरूद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले.’ कलस्सै. २:१५. त्याचे मरण व पुनरुत्थान याद्वारे “तो पवित्रस्थानाचा व मनुष्याने नव्हे तर प्रभूने घातलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक झाला.” इब्री. ८:२. यहूद्यांचा मंडप माणसांनी उभारला; यहूद्यांचे मंदिरही माणसानी बांधिले. परंतु ज्याचा नमुना पृथ्वीवरील मंदिर होते ते स्वर्गीय निवासस्थान मानवी शिल्पकाराने बांधिले नव्हते. “पाहा, एक पुरुष, ज्याचे नाव कोंब असे आहे... तोच परमेश्वराचे मंदिर बांधील; तो वैभवशाली होईल व आपल्या सिंहासनावर बसून सत्ता चालवील; तो आपल्या सिंहासनावर याजकही होईल.” जखऱ्या ६:१२, १३.DAMar 125.5

    ख्रिस्ताचे द्योतक असलेली यज्ञयाग पद्धत नाहीशी झाली; परंतु जगाचे पाप हरण करणाऱ्या खऱ्या यज्ञाकडे लोकांची मने वेधली गेली. जगातील याजकत्व-याज्ञिकी सेवा संपुष्टात आली; परंतु नवीन कराराचा मध्यस्थ ख्रिस्त आणि “शिंपडण्याचे रक्त याजवळ आला आहा; त्या रक्ताचे बोलणे हाबेलापेक्षा उत्तम आहे.” “जोपर्यंत पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्रस्थानची वाट प्रगट होत नाही... ख्रिस्त हा भावी चांगल्या गोष्टीसंबंधी प्रमुख याजक असा येऊन हातांनी केलेला नाही, म्हणजे या सृष्टीतला नाही अशा अधिक मोठ्या व पूर्ण मंडपातून... आपले रक्त घेऊन एकदाच परमपवित्रस्थानात गेला, आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळविली.’ इब्री १२:२४; ९:८-१२.DAMar 126.1

    ह्यामुळे याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यास हा पूर्णपणे तारण्यास समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जीवंत आहे.” इब्री. ७:२५. जरी याज्ञिकी सेवा पृथ्वीवरील मंदिरातून स्वर्गीय मंदिरात स्थलांतर झाली; आणि जरी पवित्रस्थान व प्रमुख याजक मानवी दृष्टीपासून अदृश्य झाले तरी त्याद्वारे शिष्यांचे काही नुकसान होणार नव्हते. त्यांच्या दळणवळणात व सख्यसंबंधात काही खंड पडणार नव्हता व ख्रिस्ताची उपस्थिती नसल्यामुळे त्याच्या सामर्थ्याची कमतरता भासणार नव्हती. स्वर्गातील पवित्रस्थानात ख्रिस्त आपल्या सेवेचे काम उरकतो त्याच वेळी तो आपल्या आत्म्याच्याद्वारे पृथ्वीवरील मंडळीची सवा करितो. तो डोळ्यांच्या दृष्टीआड जरी झाला आहे तरी त्याने वियोगाच्या समयी दिलेले आश्वासन पूर्ण झाले आहे, “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे.” मत्तय २८:२०. जरी तो कमी दर्जाच्या सेवकावर आपले सामर्थ्य सुपूर्द करितो तरी त्याचा जागृत करणारा सहवास अद्याप त्याच्या मंडळीबरोबर आहे.DAMar 126.2

    “तर मग... देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे म्हणून आपण जो स्वीकार केला तो दृढ धरून राहू. कारण ज्याला आपल्या अशक्तपणाचे दुःख होत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला. आपल्याला दया प्राप्त व्हावी आणि गरजेच्यावेळी साहाय्य होण्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.” इब्री. ४:१४-१६.DAMar 126.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents