Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ८२—“बाई, का रडतेस?”

    मत्तय २८:१, ५-८; मार्क १६:१-८; लूक २४:१-१२; योहान २०:१-१८.

    वधस्तंभाजवळ ज्या स्त्रीया उभे राहिल्या होत्या त्या शब्बाथ संपण्याची वाट पाहात होत्या. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस उठून आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये प्रभूच्या अंगास लावण्यास घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो मरणातून उठेल याचा त्यांनी विचार केला नव्हता. त्यांच्या आशेचा सूर्य अस्त पावला होता आणि त्यांचा अंतःकरणावर अंधार स्थिरावलेला होता. जात असतांना ख्रिस्ताच्या दयेच्या कार्याची व समाधानाच्या बोलाची ते सविस्तर आठवण करीत होते. परंतु “मी तुम्हास पुन्हा पाहीन’ योहान १६:२२ हे त्याचे बोल त्यांना आठवले नव्हते.DAMar 683.1

    त्यावेळी घडत असलेल्या गोष्टीविषयी अजाण राहून त्या बागेजवळ आल्या आणि एकमेकीस म्हणत होत्या की “कबरेच्या तोंडावरील धोंड आपल्या करिता कोण लोटील?’ ती धोंड लोटण्यास असमर्थ आहेत हे माहीत असतानासुद्धा त्या पुढे चालल्या होत्या. आणि पाहा, आकाश आकस्मात वैभवाने प्रकाशीत झाले होते आणि तो प्रकाश सूर्योदयाचा नव्हता. भूमिकंप पावली. कबरेवरील धोंड एकीकडे लोटलेली त्यांच्या दृष्टीस पडली. कबर रिकामी होती.DAMar 683.2

    सर्व स्त्रीया एकाच दिशेने आल्या नव्हत्या. मग्दालीया मरीया तेथे प्रथम पोहंचली; कबरेवरून धोंड लोटलेली पाहिल्यावर ती ताबडतोब ते शिष्यांना सांगण्यासाठी निघून गेली. त्या अवधीत दुसऱ्या स्त्रीया आल्या. कबरेसभोवती प्रकाश चमकत होता परंतु येशूचे शरीर तेथे नव्हते. तेथे रेंगाळत असता शुभ्र वस्त्रे परिधान केलेला एक तरुण मनुष्य कबरेजवळ त्यांना दिसला. धोंड लोटून बाजूला सारलेला तो दिव्यदूत होता. येशूच्या स्नेह्यांना भीती वाटू नये म्हणून त्याने मनुष्याचे रूप घेतले होते. तथापि दिव्य प्रकाश त्याच्या भोवती अजून चमकत होता आणि त्या स्त्रीयांना भय वाटले. ते वळून पळून जाण्याच्या बेतात होते परंतु दूताचे शब्द ऐकून त्या थांबल्या. त्याने म्हटले, “तुम्ही भिऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा शोध तुम्ही करीत आहा हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही; कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, तो निजला होता ते हे स्थळ पाहा; आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यास सांगा की, तो मेलेल्यातून उठला आहे.” पुन्हा तो कबरेत पाहातात आणि पुन्हा त्यांच्या कानावर चकित करणारी वार्ता पडते. मनुष्याच्या वेषात दुसरा देवदूत आला आणि त्याने म्हटले, “तुम्ही जीवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करीता? ते येथे नाही, तर उठला आहे; तो गालीलात होता तेव्हाच त्याने तुम्हास काय सांगितले ह्याची आठवण कराः ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे.’ DAMar 683.3

    तो उठला आहे, तो उठला आहे! हे उद्गार स्त्रीयांच्या मुखातून पुन्हा पुन्हा निघाले. आता सुगंधी द्रव्याची काही गरज नव्हती. उद्धारक मृत नाही तो जीवंत आहे. पुन्हा उठेल, त्याचे हे शब्द त्यांना आठवले. जगाच्या दृष्टीने किती महान दिन हा होता! लागलेच त्या स्त्रीया कबरेपासून निघाल्या. “त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या आणि पळत जाऊन ही वार्ता शिष्यांना दिली.”DAMar 684.1

    मरीयेने ही आनंदाची वार्ता ऐकली नव्हती. ती दुःखाचा संदेश घेऊन पेत्र व योहान यांच्याकडे गेली आणि म्हटले, “त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेविले हे आम्हास ठाऊक नाही.” शिष्य कबरेकडे गेले आणि मरीयेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी पाहिले. त्यांनी त्याची वस्त्रे व रूमाल पाहिले पण त्यांच्या प्रभूला पाहिले नाही. तो उठल्याची ही एक साक्ष होती. प्रेतवस्त्रे अस्ताव्यस्त टाकलेली नव्हती तर घडी घालून व्यवस्थित ठेविली होती. योहानाने ते “पहिले आणि विश्वास ठेविला.” मरणातून ख्रिस्त उठणार हे शास्त्रवचन अजून त्याला समजले नव्हते; परंतु पुनरुत्थानाविषयी त्याने केलेल्या भाकीताची त्याला आठवण झाली.DAMar 684.2

    स्वतः ख्रिस्तानेच ती प्रेतवस्त्रे घडी घालून व्यवस्थित ठेविली होती. बलवान दूत खाली उतरल्यावर त्याला दुसरा दूत मिळाला आणि दोघांनी मिळून प्रभूच्या शरीरावर पहारा ठेविला होता. स्वर्गातून आलेल्या देवदूताने धोंड बाजूला लोटून दिली आणि दुसऱ्या देवदूताने कबरेतून जाऊन येशूच्या सभोवती गुंडाळलेले वस्त्र काढून टाकिले. परंतु ती वस्त्रे येशूने स्वतः घडी घालून व्यवस्थित जागच्या जागी ठेविली होती. जो तारे व परमाणू यांना मार्गदर्शन करीतो त्याच्या दृष्टीने सर्व काही महत्त्वाचे आहे. शिस्तबद्धता व परिपूर्णता त्याच्या सगळ्या कामात दिसते. DAMar 684.3

    मरीया, योहान व पेत्र यांच्याबरोबर कबरेकडे गेली होती. ते यरुशलेमाला परतल्यावर ती तेथेच राहिली. रिकामी कबर पाहिल्यावर तिचे अंतःकरण दुःखाने भरून आले. आंत पाहिल्यावर तिला दोन देवदूत, एक उशाजवळ व दुसरा पायथ्याशी बसलेले दिसले. ते तिला म्हणाले, “बाई, का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेविले हे मला ठाऊक नाही म्हणून.”DAMar 684.4

    नंतर येशूचे शरीर कोठे ठेविले आहे हे नक्की सांगणाऱ्याच्या शोधार्थ ती पाठमोरी फिरली. दुसरी वाणी तिच्या कानावर पडली, “बाई, का रडतेस? कोणाचा शोध करितेस?’ डोळ्यात अश्रु असताना तिने मनुष्याचे रूप पाहिले आणि तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, “दादा, तू त्याला येथून नेले असेल तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.” श्रीमंत माणसाची ही कबर ख्रिस्ताच्या प्रेतक्रियेसाठी फार मानाची आहे असे वाटत असेल तर मी त्यासाठी स्थळ देईन. ख्रिस्ताने स्वतः रिकामी केलेली लाजारसाला ठेवण्यात आलेली कबर मोकळी आहे. तेथे तिच्या प्रभूची प्रेतक्रिया होऊ शकणार नाही काय? त्याच्या मोल्यवान शरीराची योग्यरित्या काळजी घेतल्याने तिच्या दुःखी मनाचे सांत्वन होईल असे तिला वाटले होते. DAMar 685.1

    परंतु आता त्याच्या परिचित आवाजात येशूने म्हटले, “मरीये!” तिच्याशी बोलत असलेला कोणी परका नाही हे तिने ओळखिले, आणि वळून पाहातो तो तिला जीवंत ख्रिस्त दिसला. आनंदाच्या भरात त्याला वधस्तंभावर दिले होते ती विसरली. त्याच्या चरणाला हात लावण्याच्या इराद्याने ती वळली असता तिने म्हटले, “रब्बूनी (म्हणजे गुरूजी).” येशूने तिला म्हटले, मला थांबवू नकोस “कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही; तर माझ्या बांधवाकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.” आनंदाची बातमी घेऊन मरीया तडक शिष्यांच्याकडे गेली.DAMar 685.2

    त्याने अर्पिलेला यज्ञबली पित्याने स्वीकारला होता ह्याची खात्री झाल्याशिवाय सत्कार स्वीकारण्यास येश राजी नव्हता. तो स्वर्गात गेला आणि मानवाच्या पापासाठी त्याने केलेले प्रायश्चित्त पुरेसे आहे आणि त्याच्या रक्ताद्वारे सर्वांना सार्वकालिक जीवन मिळेल ह्याची खात्री प्रत्यक्ष देवाने दिलेली त्याने ऐकिली. आज्ञांकित व अनुतप्त लोकांचा तो स्वीकार करून आपल्या पुत्राप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करील अशा केलेल्या करारनाम्याला पित्याने मंजूरी दिली होती. ख्रिस्ताला त्याचे कार्य पूर्ण करावयाचे होते आणि त्याने केलेली प्रतिज्ञाः “पुरुष उत्कृष्ट सोन्याहून दुर्मिळ करीन, मानव ओफारीच्या शुद्ध सोन्याहून दुर्मिळ करीन,” यशया १३:१२, सिद्धीस न्यावयाची होती. स्वर्गात व पृथ्वीवर सर्व सामर्थ्य जीवनाच्या सेनापतीला देण्यात आले होते आणि आपले सामर्थ्य व गौरव आपल्या अनुयायांना देण्यासाठी तो पापी जगात त्यांच्याकडे परत गेला.DAMar 685.3

    उद्धारक, पित्याच्या सहवासात त्याच्या मंडळीसाठी देणगी स्वीकारीत होता त्याच समयी शिष्य रिकाम्या कबरेचा विचार करून विलाप करीत होते. जो दिवस स्वर्गात सर्वांना हर्षाचा होता तोच दिवस शिष्यांना अनिश्चिततेचा, गोंधळाचा आणि गुंतागुतीचा वाटला. स्त्रीयांनी दिलेल्या साक्षीवर त्यांनी विश्वास न ठेवल्यावरून त्यांच्या श्रद्धेची पातळी किती खालच्या थराला गेली होती हे सिद्ध होते. त्याच्या पुनरुत्थानाची वार्ता त्यांच्या अपेक्षेपेक्षा अगदीच वेगळी असल्यामुळे त्यांचा त्यावर विश्वास बसला नव्हता. त्यांना वाटले की ते खरे असणे अगदी अशक्य आहे. सदूकी लोकांची धर्मशिकवण व शास्त्रीय तात्त्विक भूमिका त्यांनी इतकी ग्रहन केली होती की त्यामुळे पुनरुत्थानाचा विचार त्यांना असंदिग्ध-अस्पष्ट होता. मरणातून पुनरुत्थान होणे म्हणजे काय ह्याचा अर्थच त्यांना समजत नव्हता. ह्या महान विषयाचे ग्रहन करून घेण्यास ते असमर्थ होते.DAMar 685.4

    देवदूतांनी स्त्रीयांना म्हटले, “जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्या पुढे गालीलात जात आहे. त्याने तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल.’ येशूच्या पृथ्वीवरील जीवनात सर्वकाळ हे देवदूत त्याचे पहारेकरी होते. त्याची झालेली चौकशी व वधस्तंभावरील मरण हे प्रत्यक्ष त्यांनी पाहिले होते. शिष्यांना बोललेले शब्द त्यांनी ऐकिले होते. शिष्यांना दिलेल्या संदेशाद्वारे त्याच्या सत्येची त्यांची खात्री व्हायला पाहिजे होती. पुनरुत्थीत झालेल्या प्रभूच्या देवदूताशिवाय असले उद्गार निघणार नव्हते.DAMar 686.1

    दूतांनी म्हटले, “त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा.” ख्रिस्ताच्या मरणापासून पेत्र अति दुःखाने खजील झाला होता. प्रभूचा लज्जास्पद नाकार आणि उद्धारकाचा दृष्टिक्षेप व यातना सतत त्याच्यासमोर होते आणि सर्व शिष्यांच्यामध्ये त्याला अधिक व्यथा भोगाव्या लागल्या. त्याचा पश्चात्ताप स्वीकारून त्याला पापक्षमा दिल्याची खात्री त्याला देण्यात आली होती. म्हणून त्याने नाव घेण्यात आले.DAMar 686.2

    “त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्या पुढे गालीलात जात आहे. तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल.’ सर्व शिष्य त्याला सोडून गेले होते आणि त्याला भेटण्यासाठी सर्वांना बोलाविले होते. त्याने त्यांचा धिक्कार केला नव्हता. मग्दालीया मरीयेने त्याला पाहिल्याचे सांगितले तेव्हा गालीलामध्ये भेटण्याच्या आमंत्रणाचा पुनरुच्चार केला. तिसऱ्या वेळेस संदेश त्यांच्याकडे पाठविला होता. पित्याकडे गेल्यानंतर येशूने दुसऱ्या स्त्रीयांना दर्शन दिले आणि म्हटले, “कल्याण असो. त्यांनी येऊन त्याचे चरण धरले आणि त्याची आराधना केली. नंतर येशू त्यांना म्हणाला, भीऊ नका; जाऊन माझ्या बांधवाना सांगा की त्यांनी गालीलात जावे आणि तेथे ते मला पाहातील.”DAMar 686.3

    पुनरुत्थानानंतर त्याच्या शिष्यांवरील प्रेम व आदर थोडाही कमी झाला नाही याविषयी त्यांची खात्री करून देण्याचे पृथ्वीवरील ख्रिस्ताचे पहिले काम होते. त्याने कबरेचे प्रतिबंध मोडून टाकून शत्रूच्या मरणाखाली तो दबून राहू शकला नव्हता; पृथ्वीवर अगदी प्रिय जीवलग गुरू असताना त्यांच्यासाठी प्रेममय जे अंतःकरण होते तेच आताही आहे हे प्रगट करण्यासाठी त्याने त्यांना वारंवार दर्शन दिले, हे सर्व पुरावे तो त्यांचा जीवंत त्राता, उद्धारक होता हे सिद्ध करण्यासाठी दिले होते. तो त्यांच्यावर अजूनसुद्धा प्रेमाची भावना दाखवीत होता. त्याने म्हटले, गालीलामध्ये मला भेटण्यास माझ्या बांधवाना सांगा.DAMar 686.4

    त्यांना दिलेल्या ह्या निश्चित कामगिरीविषयी शिष्यांनी ऐकल्यावर पुनरुत्थानाविषयी ख्रिस्ताने भाकीत केलेल्या बोलावर ते विचार करू लागले. तरी आतासुद्धा ते आनंदित नव्हते. आपला संशय व मनाचा गोंधळ ते सोडू शकत नव्हते. प्रभूला पाहिले होते असे स्त्रीयांनी घोषीत केले होते तरी त्यांचा त्यावर विश्वास नव्हता. ते भ्रामक कल्पनेच्या आहारी गेले होते असे त्यांना वाटले.DAMar 687.1

    संकटामागून संकटे येत होती. आठवड्याच्या सहाव्या दिवशी त्यांचा प्रभु मेलेला त्यांनी पाहिला होता; सप्ताहाच्या पहिल्या दिवशी त्याचे प्रेत गहाळ झाल्याचे निदर्शनास आले आणि लोकांना फसविण्यासाठी ते त्यांनी चोरून नेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांच्याविरुद्ध दिवसेंदिवस होत असलेल्या खोट्या समजुतीचे निराकरण करतांना ते निराश झाले होते. याजकांचे वैमनश्य व लोकांचा क्रोध यांची त्यांना धास्ती वाटत होती. हरएक गोंधळामध्ये त्यांना मदतीचा हात दिलेल्या येशूच्या सहवासासाठी ते उत्सुक होते.DAMar 687.2

    “परंतु इस्राएलाची मुक्ती करणारा तो हाच असा आमचा विश्वास होता’ हे शब्द ते वारंवार उच्चारत होते. उदास व त्रस्त अंतःकरण झाले असताना त्यांना त्याचे शब्द आठवले, “ओल्या झाडाला असे करितात तर वाळलेल्याचे काय होईल?” लूक २४:२१; २३:३१. ते माडीवर एकत्र जमले आणि दार लावून आतून कडी लावून घेतली कारण त्यांना वाटले की त्याच्या प्रीय गुरुजीसारखीच त्यांची स्थिती होईल. DAMar 687.3

    उद्धारकाचे पुनरुत्थान झाले आहे ह्या समजुतीने त्यांनी सतत आनंद करायला पाहिजे होता. बागेत येशू जवळ असताना मरीया रडत उभी राहिली होती. डोळ्यातील अश्रुने तिची दृष्टी मंद झाल्यामुळे तिला तो ओळखता आला नाही. अति तीव्र शोकग्रस्ताने शिष्यांची अंतःकरणे इतकी व्यापली होती की देवदूतांच्या संदेशावर किंवा स्वतः खिस्ताच्या वचनावर त्यांनी विश्वास ठेविला नाही.DAMar 687.4

    शिष्यांनी जे केले तेच आज कितीजण करीत आहेत! मरीयेने उद्गारलेले निराशेचे शब्द कितीजण काढीत आहेत, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेविले हे मला ठाऊक नाही!” उद्धारकाचे शब्द किती जणांच्या कानी पडतील, “बाई. तू का रडतेस? कोणाचा शोध करतेस?” तो त्यांच्या लगतच उभा आहे परंतु अश्रुने भरलेल्या त्यांच्या डोळ्यांना तो दिसत नाही. तो त्यांच्याशी संवाद करितो परंतु त्याचा उमज त्यांना होत नाही. DAMar 687.5

    नमलेले डोके वर करता येईल, त्याचे दर्शन घेण्यासाठी नेत्र उघडले जातील, त्याची वाणी कान ऐकू शकतील! “तत्पर जा, आणि तो उठला आहे ते त्याच्या शिष्यांना सांगा.” रोमी शिक्क्याने शीलबंद केलेल्या योसेफाच्या नव्या रिकाम्या कबरेकडे न पाहाण्यास त्यांना सांगा. ख्रिस्त तेथे नाही. रिकाम्या थडग्याकडे पाहात बसू नका. असहाय्य व आशाहिनासारखे शोक करीत बसू नका. येशू जीवंत आहे आणि तो जीवंत आहे म्हणून आम्हीही जीवंत होऊ. कृतज्ञ अंतःकरणातून, पवित्र अग्नीचा स्पर्श झालेल्या ओठातून हर्षाचे गीत बाहेर पडो, ख्रिस्त उठला आहे! आमच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो जीवंत आहे. ही आशा दृढ ठेवा आणि गलबताच्या नांगराप्रमाणे तुमचा जीव भक्कम राहील. विश्वास धरा आणि तुम्ही देवाचे गौरव पाहाल.DAMar 687.6