Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ३३—“माझे भाऊ कोण?”

    येशूच्या कार्याबद्दल योसेफाचे पुत्र यातकिंचितही सहानुभूती व्यक्त करीत नव्हते. त्याचे दैनंदिन जीवन व कार्ये याविषयी त्यांच्या कानावर येणाऱ्या बातम्यामुळे ते निराश व आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी ऐकले होते की तो रात्रच्या रात्र प्रार्थना करतो आणि संपूर्ण दिवस त्याच्या सभोवती जमा झालेल्या लोकांच्या प्रचंड गर्दीत काम करण्यात व्यग्र असतो, आणि त्यामुळे अन्नाचे दोन घास घेण्यासही तो सवड काढीत नव्हता. तो अविश्रांत श्रम करून स्वतःची बेसुमार झीज करून घेत होता असे त्याच्या मित्रमंडळीला वाटत होते; परूशी लोकांबद्दल त्याचे काय धोरण किंवा कल होता याचा पत्ता त्याच्या मित्राना लागत नव्हता, आणि काहीना अशी भीति वाटत होती की परूशी लोकाबद्दल त्याचे मत अस्थिर-चंचल होत चालले होते.DAMar 271.1

    ही गोष्ट त्याच्या भावांनी ऐकली होती, त्याचप्रमाणे तो सैतानाच्या साह्याने भूते काढतो असा परूशी लोकांनी त्याच्यावर लादलेल्या आरोपाविषयीसुद्धा त्यांनी ऐकले होते. येशूच्या नातेसंबंधामुळे त्यांच्यावर ठपका आला होता याबद्दल त्यांना अतिशय वाईट वाटत होते. त्याचे शब्द व कार्य यामुळे किती गोधळग्रस्त परिस्थिती उत्पन्न झाली होती हे त्यांना समजून आले होते. आणि ते त्याच्या निर्भिड वक्तव्यामुळे भयभीत झाले होते, इतकेच नाही, तर तो शास्त्री व परूशी यांच्यावर दोषारोप करीत होता म्हणून उद्विग्न झाले होते. त्यांनी असा निश्चय केला की तशा प्रकारचे कार्य करण्याचे थांबविण्यासाठी येशूची समजूत काढावयाची किंवा अटकाव करायाचा, आणि आईवरील त्याच्या प्रेमाद्वारे त्याला सावधगिरीने वागण्याबाबत ती त्याच्यावर प्रभाव पाडू शकेल असा विचार करून त्यांनी मरीयेला त्यांच्यात सहभागी होण्यास प्रवृत्त केले.DAMar 271.2

    याच्या थोडेसे अगोदर येशूने दुसऱ्यांदा एका अंधळ्या व मुक्या भूतग्रस्ताला बरे करण्याचा चमत्कार केला होता, शास्त्री व परूश्यांनी “हा भूताच्या अधिपतीच्या साह्याने भूते काढतो.” मत्तय ९:३४. असा त्याच्यावर फिरून ठपका ठेवला होता. ख्रिस्ताने त्यांना अगदी स्पष्ट शब्दात सांगितले की, पवित्र आत्म्याच्या कार्याचा सैतानाशी संबंध जोडून ते स्वतःला आशीर्वादाच्या झऱ्यापासून तोडून टाकत होते. जे ख्रिस्ताचा दैवी गुणधर्म लक्षात न घेता त्याच्या विरूद्ध बोलत होते त्यांना पापक्षमा कदाचित मिळू शकेल, कारण पवित्र आत्म्याद्वारे त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देण्यात येईल, आणि पश्चाताप करण्यास प्रवृत केले जाईल. कसलेही पाप असो, जेव्हा पापी मनुष्य पश्चाताप करतो आणि येशूवर विश्वास ठेवतो, तेव्हा ख्रिस्ताच्या रक्ताने त्याचे पाप धुवून काढले जाते; परंतु जो कोणी पवित्र आत्म्याच्या कार्याचा अव्हेर करतो तो स्वतःला ज्या ठिकाणी पश्चाताप व विश्वास पोहचू शकत नाही अशा ठिकाणी ठेवतो. देव पवित्र आत्म्याच्याद्वारे अंतरात्म्यावर कार्य करतो; लोक जेव्हा स्वतःच्या इच्छेने पवित्र आत्म्याचा नाकार करतात आणि ते कार्य सैतानापासून किंवा सैतानाचे आहे असे सांगतात तेव्हा देव त्यांच्याशी ज्या वाहिनीद्वारे संपर्क साधू शकतो ती वाहीनीच ते तोडून टाकतात. जेव्हा पवित्र आत्म्याचा पूर्णपणे नाकार करण्यांत येतो, तेव्हा देवाला मनुष्यासाठी काहीच करता येत नाही.DAMar 271.3

    ज्या परूशांना येशूने हा इशारा दिला होता त्या परूशांचाच, त्यांनी त्याच्यावर केलेल्या आरोपावर विश्वास नव्हता. त्यांच्यामध्ये असा एकही अधिकारी नव्हता की तो येशूकडे ओढला गेला नव्हता किंवा आकर्षित झाला नव्हता. येशू इस्राएल लोकांचा अभिषिक्त होता ही पवित्र आत्म्याची घोषणा त्यांनी ऐकली होती, आणि त्याच्या शिष्यांचा त्यांनी स्वीकार करावा अशी तो त्यांना विनवणी करीत होता. येशूच्या समक्षतेमुळे त्यांना त्यांच्या अपवित्रपणाची जाणीव झाली होती. ते स्वतःहन जे नीतिमत्त्व उत्पन्न करू शकत नव्हते त्या नीतिमत्त्वाची ते उत्कट इच्छा बाळगीत होते. परंतु त्याचा अव्हेर केल्यानंतर त्याचा मशीहा म्हणून स्वीकार करणे हा त्यांचा मानभंग ठरला असता. अविश्वासाच्या मार्गाचा अवलंब केल्यामुळे, ते त्यांची चूक कबूल किंवा मान्य करण्यास अधिकच ताठर बनले होते. सत्याच्या कबूलिची टाळा टाळा करण्यासाठी, त्यानी तारणाऱ्याच्या शिकवणीविषयी वाद उत्पन्न करण्याचा अविचारी धोकादायक प्रयत्न केला. त्याची दया व सामर्थ्य यांच्या साक्षात पुराव्याने त्यांना प्रक्षुब्ध बनविले होते. ते तारणाऱ्याला चमत्कार करण्यापासून रोखू शकले नव्हते, ते त्याला त्याची शिकवण देण्यास प्रतिबंध करू शकले नव्हते; तथापि त्याचे विपर्यस्त चित्र उभे करण्यास व त्याच्या शिकवणीचा विपर्यास करण्यास त्यांना त्यांच्या सर्वशक्तीनिशी जे काही करता येण्यासारखे होते ते त्यांनी केले. तरी सुद्धा मनाची खात्री पटविणारा पवित्र आत्मा त्यांचा पाठलाग करीतच होता, आणि पवित्र आत्म्याच्या शक्तीला विरोध करण्यासाठी त्याना अनेक अडथळे उभे करावे लागले होते.DAMar 272.1

    परमेश्वर माणसाचे डोळे अंधळे करतो किंवा त्यांची मने कठीण करतो असे नाही. त्यांच्या चुका दुरूस्त करण्यासाठी व त्यांना सुरक्षित मार्गाने नेण्यासाठी तो त्यांच्याकरिता प्रकाश पाठवितो; या प्रकाशाचा नाकार केल्यामुळे डोळे अंधळे केले जातात आणि अंतःकरण कठीण केले जाते. अनेकदा ही प्रक्रिया हळूहळू व अदृश्य रीतीने होते. मानवाला हा प्रकाश देवाच्या वचनाद्वारे, त्यांच्या सेवकाद्वारे, किंवा सरळ मार्गाने त्याच्या पवित्र आत्म्याकडून मिळतो; परंतु जर प्रकाशाच्या एका किरण झोताकडे दुर्लक्ष केले गेले, तर प्रथम थोड्याप्रमाणात आध्यात्मिक ग्रहणशक्ती नाहीशी होते. दुसरे हे की, प्रगट केलेला प्रकाश अगदी पुसट किंवा अस्पष्ट दिसू लागतो आणि अशाप्रकारे अंधार गर्द होऊ लागतो व शेवटी माणसाच्या जीवनात काळोखी रात्र निर्माण होते. अगदी असेच यहूदी अधिकाऱ्यांच्याबाबत घडले होते. दैवी सामर्थ्य ख्रिस्ताला साहाय्य करीत होते याची त्यांना पूर्णपणे खात्री पटली होती, परंतु सत्याला विरोध करण्यासाठी त्यांनी पवित्र आत्म्याच्या कार्याचा संबंध सैतानाशी जोडला होता. असे करण्यासाठी त्यांनी बुद्धीपूरस्सरपणे फसवणूकीची निवड केली; त्यांनी स्वतःला सैतानाच्या अधीन करून घेतले, आणि त्यानंतर ते त्याच्याच सत्तेखाली नियंत्रित केले गेले होते. DAMar 272.2

    पवित्र आत्म्याविरूद्ध केलेल्या पापाबद्दल येशूने दिलेला इशारा आणि दुष्ट व व्यर्थ भाष्य करण्याविरुद्ध दिलेला इशारा यांचा निकटचा सबंध आहे. शब्द हे अंतःकरणात काय भरलेले असते ते दाखवून देणारी दर्शके असतात. “कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.’ परंतु शब्द स्वभावगुणाच्या दर्शकापेक्षा अधिक आहेत. स्वभावगुणावर उलटा परिणाम करण्याचे त्यांच्यात सामर्थ्य आहे. लोकांनी वापरलेल्या त्यांच्या शब्दांचा त्यांच्यावर परिणाम केला जातो. सैतानाने पुरविलेल्या तात्पुरत्या आवेशामुळे, अनेकदां ते त्यांचा खरोखर विश्वास नसलेली वक्तव्ये विचारावर उलटा परिणाम करतात. त्यांच्या शब्दाद्वारे तेच फसविले जातात आणि ते सैतानाच्या चेतावणीमुळे बोलले गेले होते असा विश्वास ठेवतात. एकदा व्यक्त केलेले मत किंवा घेतलेला निर्णय यापासून माघार घेण्यास ते ताठर वृती धारण करतात त्याचेच खरे आहे असा त्याचाच विश्वास बसेपर्यंत ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. संशयास्पद भाष्य करणे धोकादायक आहे, दैवी प्रकाशाच्या ज्ञानाविषयी मनात शंका बाळगणे आणि टिका करणे धोक्याचे आहे. अविचारी व अनादरयुक्त टीका करण्याच्या संवयीमुळे शीलस्वभावावर प्रतिकूल परिणाम होतो आणि मनात अनादर व अविश्वास बाळगण्यास उत्तेजन येते. अशा संवयीची जोपासना करणारे अनेक लोक अजाणपणे धोक्यात पडतात, इतके की ते पवित्र आत्म्यावर टीका करण्यास व त्याचा नाकार करण्यास सिद्ध होतात. येशूने सांगितले की “मनुष्ये जो प्रत्येक व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यास न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोष ठरशील, आणि आपल्या बोलण्यावरून सदोष ठरशील.” DAMar 273.1

    त्यानंतर त्याने, ज्यांना त्याची वचने मनोमन पटली होती त्यांना, ज्यांनी त्याची वचने आनंदाने ऐकून घेतली होती त्याना, परंतु ज्यांनी पवित्र आत्म्याला त्याच्या अंतःकरणात वास करता यावा म्हणून स्वतःला वाहून घेतले नव्हते त्यांना एक इशारा दिला. फक्त प्रतिकार केल्यामुळेच आत्म्याचा (मनुष्याचा) नाश होतो असे नाही तर दुर्लक्ष केल्यामुळेही होतो. येशूने सांगितले “मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जन स्थळी विश्रांतीचा शोध करीत हिंडतो; आणि ती न मिळाली म्हणजे म्हणतो, ज्या माझ्या घरांतून मी निघालो त्यात परत जाईन; आणि तो आल्यावर ते झाडलेले व सुशोभित केलेले असे पाहतो. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे सात आत्मे बरोबर घेतो; आणि ते आंत शिरून तेथे राहतात.”DAMar 273.2

    काही काळासाठी सैतानाच्या तावडीतून सुटले आहेत असे वाटणारे काही लोक आज आहेत तसे ख्रिस्ताच्या काळातही होते. ज्या दुष्टात्म्यानी त्यांना स्वतःच्या अंमलाखाली डांबून ठेवले होते, त्यातून त्यांची सुटका करण्यात आली होती. देवाच्या प्रीतीमध्ये ते आनंद करीत होते; परंतु दाखल्यातील खडकाळ जमिनीसारख्या श्रोत्याप्रमाणे ते फार काळ ख्रिस्ताच्या प्रीतीत टिकाव धरू शकले नव्हते. ख्रिस्ताला त्यांच्या अंतःकरणात राहता यावे म्हणून, त्यांनी स्वतःला प्रतिदिनी देवाला वाहून घेतले नव्हते; आणि जेव्हा दुष्टात्मा “आपणापेक्षा दुष्ट असे सात आत्मे’ घेऊन त्यांच्याकडे आला तेव्हा त्याने पूर्णपणे त्यांच्यावर ताबा मिळविला. DAMar 274.1

    जेव्हा मनुष्य स्वतःहून ख्रिस्ताला वाहून घेतो, तेव्हा त्याच्या नव्या अंतःकरणाचा ताबा नवे सामर्थ्य घेते. मनुष्याला स्वबळाने साध्य करता येत नाही असा बदल घडून येतो. हे दैवी शक्तीचे काम आहे. ती दैवी शक्ती मानवी स्वभावात दैवी घटाकांचा उपयोग करून कार्य करते. ख्रिस्ताधिन झालेला आत्मा खुद्द ख्रिस्ताचा गड होतो, ख्रिस्ताशिवाय इतर कोणाचाही अधिकार चालविला जाऊ नये अशी तो इच्छा बाळगतो. अशाप्रकारे स्वर्गीय शक्तीच्या ताब्यात असलेला गड (आत्मा) सैतानी हल्ल्यात अजिंक्य ठरतो. परंतु आपण स्वतःहून ख्रिस्ताच्या सत्तेचा स्वीकार केला नाही, तर दुष्ट सैतान आम्हावर सत्ता गाजविल्याशिवाय राहाणार नाही. या जगातील वर्चस्वासाठी झगडणाऱ्या दोन महासत्तेपैकी आपण कोणत्या तरी एका महासत्तेच्या अंमलाखाली असणे अगदी अनिवार्य आहे. अंधकारमय राज्याच्या अंमलाखाली येण्यासाठी आपल्याला पूर्ण विचारपूर्वक त्या राज्याची सेवा करण्याची निवड करण्याची आवश्यकता नाही. तर आपल्याला प्रकाशाच्या राज्यसत्तेशी संबध जोडण्याकडे फक्त दुर्लक्ष केले की पुरे होते. आपण जर स्वर्गातील देवदूताबरोबर सहकार्य करणार नाही तर सैतान आपल्या अंतःकरणाचा निश्चित ताबा घेईल व तेथेच तो त्याचे निवासस्थान करील. येशूच्या नीतिमत्त्वावरील विश्वासाद्वारे अंतःकरणातील त्याचे वास्तव्य हीच केवळ दुष्टाईच्या विरूद्ध संरक्षक तटबंदी आहे. आपण देवाबरोबर निश्चित सबंध जोडल्याशिवाय आपण कधीच अहंमन्यतेचा अपवित्र परिणाम, चैनबाजी, स्वार्थ, पाप करण्याचा मोह यांना प्रतिबंध करू शकणार नाही. आपण अनिष्ट संवयी सोडू शकू, काही काळ सैतानाची संगत सोडू; तथापि क्षणोक्षणी आपण देवाला आपले समर्पण करण्याद्वारे, त्याच्याबरोबर आवश्यक संबंध जोडल्याशिवाय आपण विजय मिळवू शकणार नाही. ख्रिस्ताचा व्यक्तिगत परिचय व सतत सुसंबंध यांच्या अभावी आपण शत्रू सैतानाच्या हातात सापडू आणि शेवटी त्याची हुकमत मान्य करू.DAMar 274.2

    येशू म्हणाला, “मग त्या मनुष्याची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते; तसेच या दुष्ट पिढीचेही होईल.” ज्याने दयेच्या आमंत्रणाला क्षुल्लक लेखिले आहे, आणि दयेच्या वृतीचा अवमान किंवा तिरस्कार केला आहे त्याच्याइतका निष्ठुर कोणीही नाही. पश्चाताप करण्यास देवाने दिलेल्या आमंत्रणाचा सतत अनादर करणे हेच पवित्र आत्म्याविरूद्ध केलेल्या पापाचे अतिशय सर्वसामान्य प्रदर्शन आहे. ख्रिस्ताचा अव्हेर करण्यासाठी उचललेले प्रत्येक पाऊल हे तारणाचा नाकार करण्यासाठी उचललेले पाऊल आहे, त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याविरूद्ध केलेले पाप आहे.DAMar 274.3

    ख्रिस्ताचा अव्हेर करण्याद्वारे यहूदी लोकांनी अक्षम्य पाप केले होते; त्याचप्रमाणे दयेच्या आमंत्रणाचा अव्हेर करून आपणही तीच चूक करू शकतो. आपण जेव्हा त्याच्या निवडलेल्या सेवकाचे म्हणणे ऐकून घेण्यास नाकारतो पण त्याऐवजी लोकांना ख्रिस्तापासून दूर लोटणाऱ्या सैतानाच्या मध्यस्थाचे आपण ऐकून घेतो, तेव्हा जीवनाचा राजपुत्र ख्रिस्त याचा अपमान करतो आणि सैतानाच्या सभेपुढे व स्वर्गीय विश्वासमोर त्याची लाज घालवितो. जोपर्यंत एकादा असेच करीत राहतो त्याला कसलीच आशा मिळवता येणार नाही किंवा त्याच्या पापाची क्षमा होणार नाही, आणि शेवटी त्याची देवाबरोबर समेट करण्याची इच्छा नाहीशी होईल.DAMar 275.1

    तो लोकसमुदायाला शिक्षण देत असतानाच त्याच्या शिष्यांनी निरोप आणला की, त्याची आई व त्याचे भाऊ बाहेर उभे राहिले होते आणि ते भेटू इच्छीत होते. त्यांच्या मनात काय होते हे तो जाणून होता, म्हणून “त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, माझी आई कोण, व माझे भाऊ कोण?” आणि त्याने त्याच्या शिष्याकडे आपले हात करून तो म्हणाला, “पाहा माझी आई व माझे भाऊ! कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करितो तोच माझा भाऊ, बहीण व आई.’DAMar 275.2

    ज्यांनी विश्वासाद्वारे येशूचा स्वीकार केला होता ते सर्व मानवी नात्याच्या बंधनापेक्षा अधिक जवळच्या नातेसंबंधाच्या बधनाने येशूबरोबर एकत्र बांधले गेले होते. जसा तो पित्याबरोबर एक होता तसे ते त्याच्याबरोबर एक होतील. एक विश्वासक व त्याच्या वचनाप्रमाणे वर्तन करणारी म्हणून, त्याची आई त्याला नैसर्गिक नातेसंबंधापेक्षाही अधिक जवळची होती. येशूच्या भावांनी येशू हा त्यांचा वैयक्तिक तारणारा आहे असा त्याचा स्वीकार केल्याशिवाय त्याच्याशी असलेल्या नातेसंबंधामुळे त्याना कसलाच फायदा मिळणार नव्हता.DAMar 275.3

    ख्रिस्ताच्या जगीक आप्तांनी तो स्वर्गातून पाठविलेला असा त्याच्यावर विश्वास ठेवला असता, आणि देवाचे कार्य करण्यात त्याला सहकार्य केले असते तर त्यांच्याद्वारे त्याला किती तरी पाठबळ मिळाले असते! त्यांच्या अविश्वासामुळे ख्रिस्ताचे या जगातील जीवन गर्द छायेने झाकाळले गेले होते आणि ते जीवन म्हणजे त्याने आमच्यासाठी त्या दुःखाच्या प्याल्यातून घेतलेल्या कडवट घोटाचा एक भाग होता. DAMar 275.4

    मानवी मनात देवाच्या कार्याविरूद्ध चेतविलेल्या द्वेषाची कल्पना देवाच्या पुत्राला पूर्णपणे आली होती आणि त्याच्या घरातून तसेच घडत होते याबदल त्याला तीव्र वेदना होत होत्या; कारण खुद्द त्याचे अंतःकरण प्रेमाने व दयाळूपणाने ओतप्रेत भरले होते आणि कौटुंबिक नातेसंबंधातील प्रेमभावाचे मोल आणि महत्त्व त्याने जाणून घेतले होते. त्याच्या भावांची इच्छा होती की त्याने त्यांचे विचार मान्य करावेत. असा मार्ग पत्करणे त्याच्या दैवी कार्याच्या दृष्टीने अगदीच असंबंधित ठरले असते. त्याला त्यांच्या सल्ल्याची गरज आहे असे त्यांना वाटत होते. ते त्यांच्या मानवी दृष्टीकोनातून त्याच्याविषयी त्यांचे मत बनवीत होते आणि त्यांना असे वाटत होते की, जर तो शास्त्री व परूशी यांना मान्य होणाऱ्याच केवळ गोष्टी बोलला, तर त्याच्या बोलण्यामुळे उद्भवलेला अप्रिय वितंडवाद तो टाळू शकला असता. त्यांना वाटत होते की स्वर्गीय अधिकारावर हक्क सांगणे व धर्मगुरुंची त्यांच्या पापाबद्दल खरडपट्टी काढण्यास स्वतःला त्यांच्यापेक्षा उच्च दर्जाचे समजणे याबाबत त्याचा वैचारिक तोल ढासळत होता. त्याच्यावर ठपका ठेवण्यासाठी परूशी निमित्त शोधण्याच्या प्रयत्नात होते हे त्यांना माहिती होते. त्याने त्यांना अनेक निमित्ते दिली होती असे त्यांना वाटले होते.DAMar 275.5

    त्यांच्या अतिशय संकुचित दृष्टीकोनातून तो जे कार्य पूर्ण करण्यासाठी आला होता त्याच्या ते थांग लावू शकत नव्हते; म्हणून ते त्याच्या संकटात त्याला सहानुभूती दाखवित नव्हते. त्याची असभ्य अप्रिय भाषा हे दाखवून देत होती की त्यांना त्याच्या स्वभावगुणाचे खरे ज्ञान मिळाले नव्हते आणि मानवी स्वरूपात एकजीव झालेले दैवीस्वरूप त्यांना दिसले नव्हते. तो अतिशय दुःखी होत होता असे वेळोवेळी त्यानी पाहिले होते, परंतु अशा प्रसंगी त्याचे सांत्वन करण्याचे सोडून ते त्यांच्या वृतीने व वाचेने त्याच्या अंतःकरणावर घाव घालून ते केवळ त्याला जखमीच करीत होते. त्याच्या हळव्या-कोमल स्वभावाला यातना देण्यात येत होत्या. त्याच्या उदिष्टांना विपरीत स्वरूप देण्यात येत होते. त्याच्या कार्याचे स्वरूप समजून घेतले गेले नव्हते.DAMar 276.1

    अनेक वेळा त्याचे भाऊ काळाच्या ओघात जीर्ण व पुसट झालेले परूशांचे तत्त्वज्ञान पुढे करीत होते आणि असे गृहीत धरीत होते की, ज्याला सर्व सत्य समजले होते, व सर्व गूढ गोष्टीचे आकलन झाले होते त्याला ते शिकवू शकत होते. त्यांना ज्या गोष्टी समजत नव्हत्या त्यांना ते सर्रासपणे निरूपयोगी ठरवीत होते. त्यांचे निंदायुक्त वक्तव्य त्याला घायाळ करीत होते, आणि त्याचा आत्मा त्रस्त झाला होता, जेरीस आला होता. त्यांचा देवावर विश्वास होता असे ते उघडपणे कबूल करीत होते, आणि ते देवाचे समर्थन करीत होते असे त्यांना वाटत होते, जेव्हा देव शरीराने त्यांच्यात होता, आणि ते त्याला ओळखत नव्हते.DAMar 276.2

    या गोष्टीनी पुढे जाण्याचा त्याचा मार्ग काटेरी बनविला होता. त्याच्या स्वतःच्या कुटुंबियातील गैरसमजुतीमुळे तो उद्विग्न झाला होता आणि म्हणून ज्या ठिकाणी अशी परिस्थिती नव्हती अशा ठिकाणी जाणे त्याला दुःखपरिहारक वाटले होते. असे एक कुटुंब होते की त्याला त्यांच्या घरी जाणे आवडत होते. लाजारस, मरीया व मार्था यांचे ते घर; कारण तेथे प्रेमळ व श्रद्धानिष्ठ वातावरण होते आणि तेथे त्याला पूर्ण आराम मिळत होता. असे असूनही त्याच्या दैवी कार्याचे आकलन झालेले व मानवासाठी असलेली त्याची आस्था जाणणारे या भूतलावर कोणी नव्हते म्हणूनच त्याला एकांतवासांत अधिक आराम मिळत होता, आणि त्यासोबत त्याला त्याच्या स्वर्गातील पित्याशी समन्वय साधता येत होता.DAMar 276.3

    ज्यांना ख्रिस्तासाठी दुःख सोसण्यास बोलावण्यात आले आहे, ज्यांना स्वतःच्या घरातील कुटुंबियातही गैरसमजूत व अविश्वास यांना तोंड द्यावे लागत आहे, त्यांना येशूलाही अशीच दुःखे सोसावी लागली होती हा विचार समाधान देऊ शकतो. येशूला त्यांचा कळवळा येतो. तो त्यांना त्याच्याशी मैत्रीचे सबंध ठेवण्यास, त्याला जेथे पूर्ण आराम मिळाला तेथे जाण्यास आणि देवाशी समन्वय साधण्यास आज्ञा देतो.DAMar 277.1

    जे ख्रिस्ताला त्यांचा व्यक्तिवाचक तारणारा म्हणून स्वीकारतात त्यांना जीवनातील संकटाना तोंड देण्यास पोरके असे सोडण्यात येत नाही. तो त्यांचा स्वर्गातील कुटुंबाचा घटक म्हणून स्वीकार करतो; तो त्यांना त्याच्या पित्याला त्यांचा पिता संबोधण्याचे आव्हान करतो. तो त्याच्याबरोबर अत्यंत कनवाळूपणे वागतो, इतके की आपला बाप किंवा आई आपल्या असहाय परिस्थितीत आपल्याला ज्या ममतेने वागवितात त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने तो आमच्यावर माया करतो. याचे कारण दैवी माया ही मानवी मायेपेक्षा अधिक आहे.DAMar 277.2

    ख्रिस्त व त्याचे लोक यांच्यातील नातेसंबंधाविषयीचे उत्कृष्ट उदाहरण इस्राएल लोकांना दिलेल्या नियमशास्त्रांत आढळते. गरीबीमुळे जेव्हा इब्री तरुणाला त्याची वाडवडिलोपार्जित मालमत्ता सोडणे भाग पडत होते आणि स्वतःला दास म्हणून विकावे लागत होते तेव्हा त्याला व त्याच्या वतनाला सोडविण्याची जबाबदारी त्याच्या जवळच्या आप्तावर पडत होती. लेवी २५:२५, ४७-४९; रूथ २:२० वाचा. तद्वत पापाद्वारे विकले गेलेले आपण व आपले वतन सोडवण्याची जबाबदारी आपल्या “जवळच्या आप्ता’ वर पडली आहे. केवळ आम्हाला सोडवण्यासाठी तो आमचा जवळचा आप्त झाला. पिता, माता, बंधु, मित्र, किंवा प्रियकर या सर्वांपेक्षा तारणारा प्रभु आपला जवळचा आप्त आहे. तो म्हणतो, “भिऊ नको; कारण मी तुला सोडविले आहे; मी तुला तुझ्या नावाने हाक मारिली आहे; तू माझा आहेस.” “तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस; तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुजवर प्रेम करितो, म्हणून तुजबद्दल, तुझ्या जिवाबद्दल, मनुष्ये, राष्ट्र, मी देईन.’ यशया ४३:१, ४.DAMar 277.3

    स्वर्गातील आसनासभोवती असलेल्या सर्वांवर ख्रिस्त प्रेम करतो. परंतु त्याने आम्हावर जे अपरिमित प्रेम केले ते कशासाठी? ते आम्हाला समजू शकत नाही, परंतु ते खरे आहे हे आम्हाला आमच्या अनुभवावरून समजून येऊ शकते. आपण त्याचे आप्त आहोत असे जर आपण मानतो, तर आपल्या प्रभूचे जे बंधु आहेत, प्रभूच्या ज्या बहीणी आहेत त्यांच्याबरोबर आपण किती दयाळूपणे वागले पाहिजे! आपण आपल्या स्वर्गीय नातेसंबंधाचे हक्क मान्य करण्यास घाई करू नये काय? देवाच्या कुटुंबात आपला स्वीकार करण्यात आल्यानंतर आपण आपल्या पित्याचा व नातेवाईकांचा मान राखू नये काय?DAMar 278.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents