Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ४१—गालीलातील आणीबाणी

    योहान ६:२२-७१.

    त्याला राजा म्हणून घोषीत करण्यास ख्रिस्ताने लोकांस मनाई केली तेव्हा त्याच्या जीवनात तो महत्त्वाच्या क्षणी पोहचला आहे हे त्याला समजले होते. आज त्याला सिंहासनारूढ करण्यास ते संमत होते तेच उद्या त्याच्या विरुद्ध होणार होते. त्यांच्या स्वार्थी महत्कांक्षाची निराशा झाल्यामुळे त्यांच्या प्रेमाचे रूपांतर द्वेषात आणि त्यांच्या स्तुतीचे रूपांतर शापात होईल. हे माहीत असून हा पेचप्रसंग टाळण्यासाठी त्याने काही उपाय योजले नव्हते. प्रारंभापासून त्याने आपल्या अनुयायांना ऐहिक पारितोषीकाचे आमिष दाखविले नव्हते. त्याचा शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांतील एकाला त्याने म्हटले, “खोकडास बिळे व आकाशातील पाखरांस कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.’ मत्तय ८:२०. ख्रिस्ताबरोबर जगाची दौलत लोकांना लाभली असती तर लोकांचा मोठा समुदाय स्वतः होऊन निष्ठा दाखविण्यास पुढे सरसावला असता; परंतु अशी सेवा त्याला मान्य नव्हती. आता त्याच्याशी संबंध आलेल्यांतील अनेकजन जगिक राज्याच्या आशेने आकर्षित झाले होते. त्यांना फसवणूकीतून मुक्त केले पाहिजे. भाकरीच्या चमत्कारातील खोल आध्यात्मिक अर्थाचे त्यांना आकलन झाले नव्हते. ते स्पष्ट केले पाहिजे होते. ह्या नवीन प्रगटीकरणाबरोबर कडक कसोटी होणार होती.DAMar 329.1

    भाकरीच्या चमत्काराची बातमी सर्वत्र पसरली आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी येशूला पाहाण्यासाठी बेथसैदा येथे लोकांनी गर्दी केली. ते बहुसंख्येने समुद्रावरून व जमिनीवरून प्रवास करून आले होते. आदल्या रात्री जे तेथे होते ते त्याला पुन्हा तेथेच पाहाण्यासाठी आले होते; कारण पलीकडच्या किनारी जाण्यासाठी तेथे मचवा नव्हता. परंतु त्यांचा शोध निष्फळ झाला आणि त्याच्या शोधार्थ पुष्कळजन कपर्णहमला गेले.DAMar 329.2

    एक दिवसाच्या गैरहजरीनंतर तो गनेसरेत येथे येऊन पोहंचला. तो तेथे पोहंचल्याबरोबर “लोक आसपासच्या सर्व भागात चोहोकडे धावपळ करीत फिरले व जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले, तेथे तेथे ते दुखणेकऱ्यांस बाजेवर घालून नेऊ लागले.” मार्क ६:५५.DAMar 329.3

    थोड्या वेळाने तो त्यांच्या उपासना मंदिरात गेला आणि बेथसैदाहून आलेल्यांच्या नजरेस पडला. तो समुद्र ओलांडून कसा आला हे त्याच्या शिष्याकडून त्यांना समजले. खवळलेला समुद्र, वाऱ्याच्या विरोधात केलेले कष्टदायक निष्फळ वल्हविणे, पाण्यावरून येशूचे चालणे, त्यामुळे उद्भवलेली भीती, त्याचे खात्रीचे उद्गार, पेत्राचे धाडस व त्याचा परिणाम, आकस्मात तुफान शांत होणे आणि सुखरूप मचवा किनारी लागणे हे सगळे आश्चर्य करणाऱ्या समुदायाला तपशीलवार कथन केले. ह्याद्वारे समाधान न झाल्यामुळे पुष्कळांनी येशूला गराडा केला आणि विचारिले, “गुरूजी येथे कधी आला?’ चमत्काराविषयी त्याच्यापासून अधिक ऐकण्याची त्यांची इच्छा होती.DAMar 330.1

    येशूने त्यांची जिज्ञासा तृप्त केली नव्हती. त्याने दुःखाने म्हटले, “तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करिता.” इष्ट उद्देश्याने त्यांनी त्याचा शोध केला नव्हता; परंतु ज्या अर्थी भाकरीच्या मेजवानीने ते तृप्त झाले होते त्या अर्थी त्याच्या संबंधात ऐहिक लाभ होईल असे त्यांना वाटले होते. उद्धारकाने त्यांना सांगितले, “नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, परंतु सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे जे अन्न त्यासाठी श्रम करा.” निवळ भौतिक लाभाच्या मागे लागू नका. सांप्रत जीवनाच्या उपजीविकेसाठीच मुख्य प्रयत्न असू नयेत तर आध्यात्मिक अन्नाचा शोध करा, आणि अनंत कालासाठी टिकून राहील त्या सुज्ञपणाचा पाठलाग करा. हे केवळ देवपुत्रच देईल; “पिता जो देव ह्याने त्याच्यावर शिक्का मारिला आहे.”DAMar 330.2

    त्यावेळेस श्रोतेजनाचे कुतुहल जागृत झाले होते. ते उद्गारले, “देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे?’ देवाजवळ त्यांची हजेरी लागण्यासाठी ते विविध प्रकारची असह्य कठीण कामे करीत होते; आणि त्यांची कृती अधिक लायक होण्यासाठी आणखी कशाचे पालन करायचे ते ऐकण्यास ते आतुर होते. स्वर्गासाठी लायक होण्यास आम्ही काय करावे असा त्यांच्या प्रश्नाचा आशय होता. आगामी जीवन प्राप्तीसाठी आम्हाला कोणती किंमत भरायची आहे?DAMar 330.3

    “येशूने त्यांस उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.” स्वर्गाचे मोल येशू आहे. “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोंकरा” (योहान १:२९) ह्याच्याद्वारे स्वर्गाचा मार्ग विश्वासाने आहे.DAMar 330.4

    दिव्य सत्याविषयीचे विधान स्वीकारायचे लोकांनी निवडीले नव्हते. भाकीतामध्ये मशीहाच्या कामाविषयी जे वर्तविले होते ते ख्रिस्ताने केले; परंतु त्याचे काम कोणते होते ते त्यांनी प्रत्यक्ष पाहिले नव्हते. ख्रिस्ताने एकदा लोकसमुदायाला सातूच्या भाकरीचे भोजन दिले होते; परंतु मोशेच्या काळात इस्रायल लोकांना चाळीस वर्षे मान्ना देण्यात आला होता आणि मशीहापासून उत्कृष्ट कृपाप्रसादाची अपेक्षा केली होती. असंतोषी मनांची विचारणा होती की, त्यांच्या माहितीप्रमाणे येशूने जर महत्त्वाची इतकी कार्ये केली आहेत तर त्याने आपल्या सर्व लोकांना आरोग्य, धनदौलत आणि सामर्थ्य देऊ नये काय? जुलुमशहापासून सुटका करू नये काय? आणि सत्ता व मानाच्या पदास त्यांचा उत्कर्ष करू नये काय? देवाने त्याला पाठविले आहे असे तो घोषीत करीतो तथापि इस्राएलाचा राजा बनण्यास नकार देतो. हे गूढ त्यांना काय उकलत नव्हते. त्याच्या नकाराला चुकीचा अर्थ लावला. पुष्कळांनी असा निष्कर्ष काढला की, त्याच्या कार्याच्या दिव्य वैशिष्ट्याविषयी तोच साशंक असल्यामुळे त्याने हक्काचा अधिकार सांगू नये. अशा प्रकारे त्यांनी आपल्या अंतःकरणात अविश्वासाला स्थान दिले आणि सैतानाने पेरलेल्या बीयाण्याला त्याच जातीचे फळ म्हणजे गैरसमज आणि पक्ष बदलण्यात आले.DAMar 330.5

    आता उपहासाने, धर्मगुरूने विचारिले, “असे कोणते चिन्ह आपण दाखविता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करिता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला; असे लिहिले आहे की त्याने त्यास स्वर्गातून भाकर खावयाला दिली.”DAMar 331.1

    मान्ना देणारा म्हणून मोशेचा यहूद्यांनी सन्मान केला, ज्याच्याद्वारे ते कार्य साध्य झाले होते त्याच्याकडे दुर्लक्ष करून साधनाची स्तुती स्तोत्रे गाईली. त्यांच्या कुलपतीनी मोशेविरुद्ध कुरकूर केली आणि त्याच्या दैवी कार्याचा संशय घेऊन त्याचा त्याग केला. आता त्याच मनस्थितीत देवाचा संदेश देणाऱ्याचा लोकांनी नाकार केला होता. “ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही.’ मान्ना देणारा त्यांच्यामध्ये उपस्थित होता. इस्राएल लोकांना अरण्यातून मार्गदर्शन करणारा व दररोज स्वर्गातील मान्न्याद्वारे त्यांची उपजीविका करणारा ख्रिस्त स्वतः होता. देवाच्या अनंत समृद्धीतून वाहात येणारा, जीवन देणारा आत्मा खरा मान्ना होता. येशूने म्हटले, “जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय.” योहान ६:३३.DAMar 331.2

    येशू सांसारिक भाकरीविषयी बोलत आहे असे समजून काहीजन उद्गारले, “प्रभूजी, ही भाकर आम्हास नित्य दे.” येशूने स्पष्ट सांगितले, “मीच जीवनाची भाकर आहे.”DAMar 331.3

    या ठिकाणी वापरलेले रूपक यहूदी लोकांच्या परिचयाचे होते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मोशेने म्हटले होते, “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल.” यिर्मया संदेष्टाने लिहिले आहे, “मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली; तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्लास अशी होती.” अनुवाद ८:३; यिर्मया १५:१६. धर्मगुरू स्वतः म्हणत होते की, आध्यात्मिक दृष्ट्या भाकरी खाणे म्हणजे कायद्याचे अध्ययन करणे आणि सत्कृत्ये जीवनात आणणे; आणि असेही म्हटले जात होते की, मशीहाच्या आगमनाच्यावेळी सर्व इस्राएल लोकांना अन्न देण्यात येईल. भाकरीच्या चमत्कारातील आध्यात्मिक खोल अर्थ संदेष्ट्यांच्या शिकवणीत स्पष्ट करण्यात आला होता. उपासना मंदिरामध्ये श्रोतृवर्गापुढे हा धडा मांडण्याचा प्रयत्न ख्रिस्त करीत होता. त्यांना धर्मशास्त्र समजले असते तर त्याने म्हटलेले “मी जीवनाची भाकर आहे” त्याचा अर्थबोध झाला असता. एक दिवस अगोदरच, थकल्या भागलेल्या समुदायाला त्याने अन्न देऊन त्यांचे पोषण केले होते. त्या भाकरीद्वारे शारीरिक शक्ती येऊन ते ताजेतवाने झाले तसेच अनंत जीवनासाठी त्यांना ख्रिस्तापासून आध्यात्मिक शक्ती लाभेल. त्याने म्हटले, “जो मजकडे येतो त्याला भूक लागणार नाही. आणि जो मजवर विश्वास ठेवितो त्याला कधीही तहान लागणार नाही.’ परंतु त्याने पुढे म्हटले, “तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवीत नाही.”DAMar 331.4

    पवित्र आत्म्याच्या साक्षीने आणि देवाच्या प्रगटीकरणाद्वारे त्यांनी ख्रिस्ताला पाहिले होते. त्याच्या सामर्थ्याचा प्रत्यक्ष पुरावा त्यांच्यासमोर नित्य होता, तथापि त्यांनी आणखी पुराव्याची मागणी केली. हा जरी दिला असता तरी ते पूर्वीसारखेच अश्रद्धाळु राहिले असते. अगोदरच जे त्यांनी पाहिले व ऐकिले त्याद्वारे त्यांची खात्री झाली नव्हती तर आणखी चमत्कारिक कृत्य दाखविणे निरर्थक झाले असते. अश्रद्धेला नेहमीच शंकेचे निमित्त सापडेल आणि असंदिग्ध पुराव्याची मनातून हकालपटी करील.DAMar 332.1

    हट्टी, दुराग्रही लोकांना ख्रिस्ताने पुन्हा विनवणी केली. “जो मजकडे येतो त्याला मी घालविणारच नाही.” त्याने म्हटले, श्रद्धेने त्याचा स्वीकार करणाऱ्याला सार्वकालिक जीवन लाभेल. एकही नाश पावू शकत नाही. भावी जीवनासाठी सदूकी आणि परूशी यांना वादविवाद करण्याची जरूरी नाही. त्यांच्या कृतीबद्दल दुःख करीत बसण्याची काही आवश्यकता नाही. “ज्याने मला पाठविले त्याची हीच इच्छा आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याजवर विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन.”DAMar 332.2

    परंतु लोकनायकांचे मन दुखविले गेले, “आणि त्यांनी म्हटले, योसेफाचा पुत्र येशू, ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत, तोच हा आहे ना? तर तो आता कसे म्हणतो की मी स्वर्गातून उतरलो आहे?” येशूच्या हलक्या नम्र कुळाचा अवहेलनेने नामनिर्देश करून लोकांमध्ये त्याच्याविषयी दुराग्रह निर्माण करण्याचा त्यांनी खटाटोप केला. त्याला तो गालीली मजूर आणि त्याच्या कुटुंबाला साधे व दरिद्री असा ते तुच्छतेने उल्लेख करीत होते. ह्या अडाणी, अशिक्षित सुताराच्या बोलण्याकडे लक्ष देणे इष्ट नाही असे ते म्हणाले. त्याच्या जन्माची कथा गूढ असल्यामुळे त्याच्या मातापित्याविषयी अप्रत्यक्षरित्या संशय सूचविला आणि अशा रीतीने त्याच्या जन्माला कलंक लाविला.DAMar 332.3

    आपल्या जन्माच्या रहस्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न येशूने केला नाही. समुद्र ओलांडून कसा आला ह्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जशी त्याने दिली नव्हती तसेच तो स्वर्गातून खाली आला ह्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याने दिली नव्हती. त्याच्या जीवनात ठळक दिसणाऱ्या चमत्काराकडे त्याने लक्ष वेधून घेतले नव्हते. स्वखुषीने त्याने स्वतःची प्रतिष्ठा मिरविली नाही आणि दासाचे रूप त्याने घेतले. परंतु त्याची उक्ती व कृती याद्वारे त्याचा शीलस्वभाव प्रगट झाला. ज्यांची अंतःकरणे दिव्य प्रकाशासाठी उघडी होती ते त्याला “पित्यापासून आलेला एकुलता एक, अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण’ असा ओळखिला. योहान १:१४.DAMar 332.4

    प्रश्नामध्ये दर्शविल्यापेक्षा परूश्यांचा दुराग्रह गंभीर होता; त्याचे मूळ त्यांच्या विपर्यस्त (तिढी वागणूक) अंतःकरणामध्ये होते. येशूच्या हरएक उक्तीने व कृतीने त्यांच्यामध्ये विरोध जागृत होत होता; कारण त्यांच्या विकृत मनोवृतीला त्याच्याजवळ उत्तर नव्हते.DAMar 333.1

    “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही; त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे की, ते सर्व देवाने शिकविलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला तो माझ्याकडे येतो.” पित्याच्या आकर्षक प्रेमाला प्रतिसाद दिल्याशिवाय कोणीही ख्रिस्ताकडे येणार नाही. देव सर्वांची अंतःकरणे आपल्याकडे आकृष्ट करून घेतो, आणि जे त्याला प्रतिबंध करतील केवळ तेच ख्रिस्ताकडे येण्यास नकार देतील.DAMar 333.2

    “ते सर्व देवाने शिकविलेले असतील,’ ह्या विधानाद्वारे येशूने यशयाच्या भाकीताचा संदर्भ दिलाः “तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल.’ यशया ५४:१३. हे शास्त्रवचन यहूद्यांनी स्वतःला लावून घेतले. देव त्यांचा अध्यापक आहे अशी ते बढाई करीत होते. परंतु हे प्रतिपादन कसे निरर्थक आहे हे ख्रिस्ताने दर्शविले, कारण त्याने म्हटले, “जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो.’ केवळ ख्रिस्ताद्वारे पित्याविषयीचे ज्ञान ते संपादन करू शकत होते. मानवता पित्याचे दर्शन सहन करू शकत नव्हती. त्याच्या पुत्राची वाणी ऐकल्यामुळे ते पित्याविषयी ज्ञान संपादन करू शकले, आणि निसर्ग व प्रगटीकरण यांच्यामध्ये ज्याने स्वतःला पिता म्हणून घोषीत केले त्याची ओळख त्यांना ख्रिस्ताद्वारे झाली.DAMar 333.3

    “मी खचीत खचीत सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जीवन आहे.” ज्यांनी हे उद्गार ऐकिले त्यांच्या मंडळ्यांना जीवलग योहानाच्याद्वारे घोषीत केले की, “ती साक्ष हीच आहे की, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्याठायी आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे.” १ योहान ५:११, १२. येशूने म्हटले, “त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन.” आम्ही त्याच्याबरोबर एका आत्म्यात राहावे म्हणून ख्रिस्त आम्हाबरोबर एक देह झाला. ह्या एकीकरणामुळे आम्ही कबरेतून बाहेर येतो, - केवळ ख्रिस्ताच्या सामर्थ्याचे प्रगटीकरण करण्यासाठी परंतु श्रद्धेद्वारे त्याचे जीवन आमचे बनले आहे. ख्रिस्ताच्या खऱ्या स्वरूपात त्याचे दर्शन घेणाऱ्यांना आणि अंतर्यामात त्याचा स्वीकार करणाऱ्यांना सार्वकालिक जीवन लाभते. आत्म्याच्याद्वारे ख्रिस्त आम्हामध्ये वस्ती करितो; आणि श्रद्धेद्वारे देवाचा आत्मा अंतःकरणात स्वीकारल्यास अनंतकालिक जीवनाला सुरूवात होते. DAMar 333.4

    अरण्यामध्ये त्यांच्या मातापित्यांनी खालेल्या मान्न्याची उपमा ख्रिस्ताशी केली होती, आणि जणू काय ख्रिस्ताने केलेल्या चमत्कारापेक्षा तो मोठा चमत्कार समजला होता. परंतु जे कृपाप्रसाद बहाल करण्यासाठी तो आला होता त्यांच्यापेक्षा ते दान किती अपुरे होते हे तो दाखवीत होता. जगिक जीवनाच्या पोषणासाठी मान्ना होता, तो मरण टाळू शकत नव्हता किंवा अमरत्वाची खात्री देऊ शकत नव्हता; परंतु स्वर्गातील भाकर अनंतकालिक जीवनासाठी आत्म्याचे पोषण करीत होती. उद्धारकाने म्हटले, “मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर कोणी मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जीवंत भाकर मीच आहे; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.” ह्या वक्तव्यावर ख्रिस्त आणखी एक विचार सादर करितो. केवळ मरणाद्वारे तो मनुष्याना जीवन देऊ शकतो, आणि त्याचे मरण तारणाचे साधन आहे हे पुढील वचनावरून तो दर्शवितो. तो म्हणतो, “जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”DAMar 334.1

    मिसर देशातून इस्राएल लोकांची सुटका होण्याच्या वेळी रात्री दुताने मिसरी लोकांच्या घरात हाहाकार उडविला होता त्याच्या स्मरणार्थ यहूदी लोक यरुशलेमात वल्हांडण सण पाळण्याच्या तयारीत होते. ह्या सणाच्यासमयी अर्पिण्यात येणार कोकरा जगासाठी वाहिलेल्या देवाच्या कोकऱ्याचे दर्शक समजून त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी देवाची अपेक्षा होती. यहूदी लोकांनी त्याच्या प्रतीकाला फार महत्त्व दिले परंतु त्यातील अर्थ, अभिप्राय याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. प्रभूच्या शरीराचा भेदभाव त्यांच्या ध्यानात आला नाही. वल्हांडण सणाच्या विधिसंस्कारामध्ये जे सत्य विदित केले आहे ते ख्रिस्ताने शिकविले होते. परंतु अद्याप त्याचा अर्थबोध झाला नव्हता.DAMar 334.2

    धर्मपुढारी क्रोधाने उद्गारले, “हा आपला देह आम्हास खावयास कसा देऊ शकतो?” “म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल?” योहान ३:४. हा प्रश्न निकदेमाने जसा विचारिला होता तसेच त्यांनी ख्रिस्ताचे हे बोल शब्दशः घेतले होते. काही अंशी येशूच्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला होता परंतु तसे त्यांनी कबूल केले नव्हते. त्याच्या बोलण्याला चुकीचा अर्थ लावून त्याच्याविरुद्ध लोकांचा दुराग्रह करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.DAMar 334.3

    ख्रिस्ताने आपले लाक्षणिक प्रतिपादन सौम्य केले नव्हते. कडक भाषेत त्या सत्याचा पुनरुच्चार केलाः “मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही; जो माझा देह खातो व रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहातो व मी त्याच्यामध्ये राहातो.”DAMar 335.1

    ख्रिस्ताचा देह खाणे व त्याचे रक्त पिणे म्हणजे त्याचा वैयक्तिक उद्धारक म्हणून स्वीकार करणे आणि तो आमची पापक्षमा करून त्याच्यामध्ये आम्ही परिपूर्ण होतो असा विश्वास धरणे होय. त्याच्या प्रेमाचे निरीक्षण करून, त्यावर चिंतन मनन करून, व ते आत्मसात करून आम्हाला त्याच्या स्वभावाचे सहभागी व्हावयाचे आहे. शरीराला अन्नाची जशी गरज आहे तसे आत्म्याला ख्रिस्ताची गरज आहे. अन्न खाऊन त्याचे चर्वण झाल्यावर, ते शरीराचा भाग बनल्याशिवाय त्याचा फायदा आम्हाला होऊ शकत नाही. तसेच ख्रिस्त आमचा व्यक्तिवाचक उद्धारक आहे अशी जाणीव झाल्याशिवाय त्याचा लाभ आम्हाला होऊ शकत नाही. तत्त्वावर आधारलेल्या ज्ञानाचा आम्हाला काही लाभ होत नाही. आमचे त्याच्यावर संगोपन झाले पाहिजे, अंतर्यामी आम्ही त्याचा स्वीकार केला पाहिजे असे केल्याने त्याचे जीवन आमचे जीवन बनते. त्याची प्रीती, त्याची कृपा एकरूप झाली पाहिजे. DAMar 335.2

    श्रद्धावंतांचा ख्रिस्ताशी असलेला संबंध व्यक्त करण्यास ह्या उपमासुद्धा कमी पडतात. येशूने म्हटले, “जसे जिवंत पित्याने मला पाठविले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल.” देवपुत्र जसा पित्यावरील विश्वासाने जगला तसेच आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने जगतो. देवाच्या आज्ञेला ख्रिस्त संपूर्णपणे शरण गेला होता म्हणून त्याच्या जीवनात केवळ पिताच दृश्यमान होत होता. जरी तो आम्हासारखाच सर्व बाबतीत मोहाने पच्छाडला होता तरी तो अधर्माने भरलेल्या जगात निष्कलंक राहिला. म्हणून ख्रिस्ताने जसा विजय मिळविला तसे आम्हाला विजयी व्हायचे आहे.DAMar 335.3

    आपण ख्रिस्तानुयायी आहे काय? तेव्हा आध्यात्मिक जीवनासाठी लिहिलेले सर्व तुमच्यासाठी आहे आणि ख्रिस्ताशी संघटित झाल्याने ते तुम्हाला साध्य करता येईल. तुमचा उत्साह मंदावत आहे काय? तुमची पहिली प्रीती थंडावत आहे काय? आपणहून देऊ केलेल्या ख्रिस्ताच्या प्रेमाचा स्वीकार पुनरपि करा. त्याचा देह खा व त्याचे रक्त प्या म्हणजे तुम्ही पित्याशी व पुत्राशी एकरूप व्हाल.DAMar 335.4

    उद्धारकाच्या वचनातील अक्षरशः अर्थाला चिकटून राहून दुसरा अर्थ घेण्याचे अविश्वासू यहूद्यांनी नाकारिले. विधि नियमाप्रमाणे रक्ताची चव घेणे मना होते. त्यांनी आता ख्रिस्ताची भाषा पवित्र वस्तु भ्रष्ट करणारी होती असे समजून ते आपसात वादविवाद करू लागले. शिष्यांतीलसुद्धा काहीनी म्हटले, “हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?’DAMar 335.5

    येशूने उत्तर दिले: “ह्यामुळे तुम्ही अडखळता काय? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर? आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही; मी जी वचने तुम्हास सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत.’DAMar 336.1

    ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे जगाला लाभणारे जीवन त्याच्या वचनात आहे. त्याने आपल्या शब्दाद्वारे-वचनाद्वारे आजाऱ्यांना बरे केले, भुते काढिली; शब्दाद्वारे त्याने खवळलेला समुद्र शांत केला आणि मृतास उठविले; त्याचे शब्द सामर्थ्ययुक्त होते अशी साक्ष लोकांनी दिली. देवाचे वचन त्याने सांगितले आणि ते त्याने जुना करारातील शिक्षक आणि संदेष्टे यांच्याद्वारे प्रगट केले होते. संपूर्ण बायबल ख्रिस्ताचे प्रगटीकरण आहे आणि ह्या वचनावर-शब्दावर त्याच्या अनुयायांनी भाव, श्रद्धा ठेवावी अशी उद्धारकाची अपेक्षा होती. त्याची दृश्य उपस्थिती काढून घेतल्यावर त्याचे वचन त्यांच्या सामर्थ्याचा उगम झाला पाहिजे. त्यांच्या प्रभूप्रमाणे “परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने ते जगले पाहिजेत.” मत्तय ४:४.DAMar 336.2

    आमचे शारीरिक जीवन अन्नाद्वारे पोषले जाते, तसेच आमचे आध्यात्मिक जीवन देवाच्या वचनाद्वारे उचलून धरले पाहिजे. प्रत्येक आत्म्याने स्वतःसाठी देवाच्या वचनातून जीवनाचा स्वीकार केला पाहिजे. शक्तीसंवर्धनासाठी आम्ही स्वतः आहार घेतला पाहिजे तसेच आम्ही स्वतः त्याचे वचन ग्रहण केले पाहिजे. दुसऱ्याच्या विचारसरणीतून ते आम्हाला प्राप्त करून घ्यावयाचे नाही. आम्ही स्वतः बायबलचे प्रामाणिकपणे अध्ययन केले पाहिजे आणि ते समजण्यासाठी पवित्र आत्म्याच्या साहाय्यासाठी देवाजवळ याचना केली पाहिजे. विचारासाठी एक ओवी घ्यावी आणि त्यातील देवप्रणीत अर्थबोध करून घेण्यासाठी मन एकाग्र करून चिंतन करावे. त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या विचारावर, तो स्वतःचा होईपर्यंत, खूप मनन करा आणि “प्रभु काय म्हणतो” ते आम्हाला कळेल.DAMar 336.3

    मला’ उद्देशून येशूने अभिवचने आणि इशारे दिले आहेत. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जेव्हा मी त्याच्यावर विश्वास ठेवितो तेव्हा माझा नाश होऊ नये तर मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देववचनातील अनुभव माझा झाला पाहिजे. प्रार्थना, आश्वासन, नियम आणि इशारे ही सर्व माझी आहेत. “मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जिवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्याने माझ्यावरप्रीती केली व स्वतःला माझ्याकरितादिले.” गलती. २:२०. विश्वासाने सत्य तत्त्वांचा स्वीकार करून आत्मसात केल्यावर ते जीवनाचा भाग होऊन प्रेरक शक्ती बनते. देवाच्या वचनाचा अंगिकार केल्यावर त्याने विचाराला आकार येतो आणि त्याद्वारे शीलसंवर्धन होते.DAMar 336.4

    श्रद्धेने ख्रिस्तावर दृष्टी सतत केंद्रित केल्याने आम्ही सामर्थ्यवान होऊ. भूक तहान लागलेल्या लोकांना देव मोल्यवान प्रगटीकरण करील. ख्रिस्त वैयक्तिक उद्धारक असल्याचे त्यांना कळून येईल. जसे ते त्याच्या वचनाचा अभ्यास करून पोषण करून घेतील तसे त्यांना ते आत्मा व जीवन असल्याचे दिसून येईल. वचनाद्वारे स्वाभाविक ऐहिक स्वभावाचा -हास होतो आणि ख्रिस्तामध्ये नवीन जीवन लाभते. पवित्र आत्मा तुमच्याकडे कैवारी म्हणून येईल. त्याच्या कृपेच्या परिवर्तन साधनाद्वारे देवाची प्रतीमा शिष्यामध्ये पुनरुत्पादन करण्यात येते. तो नवी उत्पत्ति बनतो. द्वेषाच्या जागी प्रेम येते आणि अंतःकरणात दिव्य सारखेपणा समाविष्ट होतो. “देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल” ह्याचा अर्थ हाच आहे. स्वर्गातून येणारी भाकर खाणे हा त्याचा अर्थ आहे.DAMar 337.1

    ख्रिस्त स्वतः आणि त्याचे अनुयायी यांच्यामधील नातेसंबंधाविषयी त्याने पवित्र आणि सनातन सत्य सांगितले. त्याचे अनुयायी असल्याचे घोषीत करणाऱ्यांचा स्वभाव त्याला माहीत होता आणि त्याच्या वचनांनी त्यांच्या श्रद्धेची कसोटी केली. त्याच्या शिकवणी प्रमाणे विश्वास ठेवून वागले पाहिजे असे त्याने विदित केले. त्याचा अंगिकार करणारे सर्वजण त्याच्या स्वभावाचे सहभागी होतील आणि त्याच्या शीलस्वभावाशी अनुरूप होतील. त्यामुळे मनात बाळगलेल्या महत्वाकांक्षेचा त्याग करणे होईल. येशूला संपूर्ण शरण जाण्याची त्याने मागणी होती. स्वार्थत्यागी, सौम्य आणि अंतःकरणाचे नम्र बनण्यास त्यांना पाचारण करण्यात आले होते. जर त्यांना जीवनाचे दान आणि स्वर्गाचे वैभव यांच्यात भागीदार व्हायचे तर कॅलव्हरीवरील मनुष्याने मार्गक्रमण केलेल्या अरूंद मार्गावरून त्यांना मार्गस्थ व्हावयाचे होते. DAMar 337.2

    परीक्षा कठोर होती. जबरदस्तीने त्याला राजा करणाऱ्यांचा उत्साह थंडावला होता. उपासना मंदिरामध्ये दिलेल्या प्रवचनाद्वारे त्यांचे डोळे उघडले असे ते म्हणाले. ह्यात त्यांची फसवणूक नव्हती. त्याच्या शब्दावरून तो मशीहा नव्हता व त्याच्याशी संबंध ठेवून काही ऐहिक फायदा होणार नव्हता अशी त्यांच्या मनाची खात्री झाली होती. त्यांनी त्याची अद्भुत चमत्कार शक्ती मान्य केली; आजार आणि दुःखे यांच्यापासून मुक्त होण्यास ते उत्कंठित होते; परंतु त्याच्या स्वार्थत्यागी जीवनात सहभागी होण्यास ते संमत नव्हते. अगम्य आध्यात्मिक राज्याविषयी त्याने काढलेल्या उद्गाराची त्यांनी पर्वा केली नाही. ढोंगी, स्वार्थी लोकांनी प्रथम त्याचा आश्रय घेतला होता आता त्यांना त्याची गरज भासली नाही. रोमी साम्राज्याच्या तावडीतून सोडवून आम्हाला मुक्त करण्यास तो जर आपल्या सामर्थ्याचा उपयोग करणार नाही तर त्याच्याशी आमचे काही कर्तव्य नाही असे ते म्हणाले.DAMar 337.3

    येशूने स्पष्ट शब्दात सांगितले, “विश्वास ठेवीत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत;. . . ह्याच कारणास्वत मी तुम्हास सांगितले की, पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्यावाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही.” पवित्र आत्म्यासाठी त्यांचे अंतःकरण खुले नसल्यामुळे ते त्याच्याकडे आकर्षिले गेले नव्हते हे त्याला सांगावयाचे होते. “स्वाभाविक वृत्तीचा मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात; आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्याद्वारे होते.’ १ करिंथ. २:१४. आत्मा विश्वासाने येशूचे गौरव पाहातो. पवित्र आत्म्याच्याद्वारे आत्म्याच्याठायी विश्वास जागृत होईपर्यंत हे गौरव दृष्टीआढ राखलेले आहे.DAMar 337.4

    त्यांच्या अश्रद्धेबद्दल त्यांचा जाहीर निषेध केल्यानंतर हे शिष्य येशूपासून फारच दूर गेले. ते फार नाखूष झाले आणि उद्धारकाचे मन दुखवून परूश्यांच्या द्वेषयुक्त कृतीचे समर्थन करण्यासाठी तिरस्काराने त्याला सोडून ते निघून गेले. त्यांचा त्यांची निर्णय घेतला, शुद्ध चैतन्य सोडून रूप घेतले, गर सोडून टरफल घेतले. त्यानंतर त्यांच्या निर्णयामध्ये बदल झाला नाही; कारण त्यानंतर ते ख्रिस्ताबरोबर राहिले नाहीत. DAMar 338.1

    “त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील.’ मत्तय ३:१२. स्वच्छ करण्याची ही एक वेळ होती. सत्य वचनाद्वारे गव्हापासून भूस वेगळे करण्यात आले होते. कारण ते फार गर्विष्ठ आणि ढोंगी, जगिक प्रेमाची हाव असलेले होते. नम्रतेचे जीवन स्वीकारण्यास ते नाखूष होते त्यामुळे अनेकजन ख्रिस्ताला सोडून गेले. आजसुद्धा अनेकजन तेच करीत आहेत. कफर्णहम येथील उपासना मंदिरात शिष्यांची जशी परीक्षा झाली तशीच परीक्षा आज होत आहे. अंतःकरणावर सत्याचा प्रभाव झाल्यावर त्यांचे जीवन देवाच्या इच्छेप्रमाणे नाही असे त्यांना दिसून येते. संपूर्ण परिवर्तन होण्याची गरज त्यांना दिसते; परंतु ते स्वार्थत्यागाचे काम करण्यास तयार होत नाहीत. म्हणून त्यांचे पाप उघडकीस आल्यावर ते क्रोधाविष्ट होतात. “हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?” असे म्हणून शिष्य जसे कुरकुर करीत निघून गेले तसेच मन दुखल्यामुळे चिडून ते निघून जातात.DAMar 338.2

    स्तुतीपर उद्गार आणि खुशामत ऐकण्यास त्यांना फार आल्हादायक वाटत असे; परंतु सत्यवचन ऐकण्यास ते राजी नव्हते. जेव्हा घोळका मागे लागतो, आणि मोठ्या समुदायाला भोजन देण्यात येते आणि विजयोत्सवाच्या घोषणा ऐकण्यात येतात तेव्हा त्यांचा स्तुतीपर आवाज मोठा असतो; परंतु देवाच्या आत्म्याद्वारे त्यांचे पाप उघड करून त्याचा त्याग करण्यास सांगण्यात येते तेव्हा ते सत्याला पाठमोरे होतात आणि या उपर ख्रिस्ताबरोबर राहात नाहीत.DAMar 338.3

    असंतुष्ट शिष्य ख्रिस्ताला सोडून गेल्यावर दुसऱ्या शक्तीने त्यांचा ताबा घेतला. एके वेळी जो त्यांना आकर्षण होता त्याच्यामध्ये आता काही मोहक दिसत नव्हते. त्यांची मनोवृती आणि कृती यांचा जम शत्रूशी बसत होता म्हणून ते शत्रूशी मिळाले. त्यांनी त्याच्या वचनाचा गैरअर्थ लावला, त्याच्या विधानांचा विपर्यास केला आणि त्याच्या उद्देशाला दूषण दिले. त्याच्या विरूद्ध जाणारे सगळे मुद्दे गोळा करून खोट्या अहवालाने लोकामध्ये क्रोध भडकविला आणि त्यामुळे त्याचे जीवन धोक्यात आले होते.DAMar 338.4

    स्वतःच्या कबुलीवरून नासरेथकर येशू मशीहा नाही ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. एक वर्षापूर्वी यहूदामध्ये त्याच्याविरूद्ध लोकांची भावना जशी होती तशीच आता गालीलामध्ये झाली. हाय हाय इस्राएल! त्यांनी उद्धारकाला नापसंत केला, नाकारला, कारण त्यांना ऐहिक अधिकार देणारा विजेता पाहिजे होता. त्याना नाशवंत खाद्य पाहिजे होते आणि टिकाऊ शाश्वत अन्न नको होते.DAMar 339.1

    लोकांचा प्रकाश आणि जीवन होणारे शिष्य त्याला सोडून जाताना त्याने त्यांच्याकडे उत्कंठतेने पाहिले. त्याने दाखविलेली दया ओळखली नाही, प्रतिसाद न मिळालेले त्याचे प्रेम, तुच्छ मानलेली त्याची करुणा, त्याग केलेले त्याचे तारण ही सर्व पाहून त्याला अवर्णनीय प्राणांतिक दुःख झाले. ह्यामुळे तो क्लेशांनी व्यापिलेला व व्याधिशी परिचित असा मनुष्य झाला.DAMar 339.2

    त्याला सोडून जाणाऱ्यांना अडखळण न करिता येशू बाराजणाकडे वळून म्हणाला, “तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?’DAMar 339.3

    पेत्राने उत्तर दिले, “प्रभुजी आम्ही कोणाकडे जाणार?” त्याने पुढे म्हटले, “सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत आणि आम्ही विश्वास ठेविला आहे व ओळखिले आहे की, आपण देवाचे पवित्र पुत्र आहा.’DAMar 339.4

    “आम्ही कोणाकडे जावे?” इस्राएलातील शिक्षक शीष्टाचार पालनाचे गुलाम होते. परूशी आणि सदूकी यांचा सतत झगडा चालला होता. येशूला सोडून जाणे म्हणजे विधिसंस्काराच्या बाबतीत हेकेखोर असणारे आणि स्वतःच्या कीर्तिसाठी महत्वाकांक्षी असणाऱ्या लोकात पडणे होय. पूर्वीच्या जीवनापेक्षा ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतरच्या जीवनांत शिष्यांना अधिक शांतता व हर्ष लाभला. पापी लोकांच्या मित्राचा ज्यांनी छळ व अपमान केला त्याच्याकडे ते परत कसे जाऊ शकत होते? फार दिवसापासून ते मशीहाची अपेक्षा करीत होते; आता तो आलेला होता आणि त्याला सोडून जे त्याचा प्राण घेण्याच्या नादात होते आणि त्याचे शिष्य झाल्याबद्दल त्यांचा छळ करीत होते त्यांच्याकडे ते जाऊ शकत नव्हते. DAMar 339.5

    “आम्ही कोणाकडे जावे?’ ख्रिस्ताची शिकवण आणि त्याने दिलेले प्रीतीचे व करुणेचे धडे सोडून अश्रद्धेचा अंधकार व जगाची दुष्टाई ह्याकडे जाणार नाही. त्याचे अद्भुत कार्य पाहिलेले असताना बहुतेक त्याला सोडून गेले होते, आणि पेत्राने शिष्यांचा विश्वास प्रदर्शित केला, “आपण देवाचे पवित्र पुत्र आहा.” त्याला सोडून जाण्याच्या विचाराने ते दुःखी आणि भयभीत झाले. ख्रिस्ताविरहित राहाणे म्हणजे अंधाऱ्या रात्री तुफानी समुद्रात असहाय्य स्थीतीत तरंगत राहाणे होय.DAMar 339.6

    मर्यादित मनाला येशूच्या काही उक्ती आणि कृती गूढ वाटतात, परंतु आमच्या उद्धारकार्याच्या बाबतीत प्रत्येक उक्ती व कृती यांच्यामध्ये विशिष्ट उद्देश होता; आणि प्रत्येकाचा ठराविक परिणाम अपेक्षिला होता. त्याचे विशिष्ट उद्देश समजून घेण्यास आपण कार्यक्षम असलो तर सर्व काही महत्त्वाचे, पूर्ण आणि त्याच्या कार्याशी जुळते असल्याचे दिसून येईल.DAMar 340.1

    जरी आम्हाला आता देवाचे कार्य व कार्य करण्याची रीत यांचे आकलन होत नाही तरी मानवाशी असलेली त्याची वागणूक ज्या पायावर अवलंबून आहे त्या सर्वश्रेष्ठ प्रीतीची कार्यक्षमता आम्हाला दिसून येते. ख्रिस्तसमीप राहाणाऱ्याला देवत्वाचे रहस्य बहुअंशी समजून येईल. निषेध करणारी, स्वभावाची कसोटी करणारी आणि मनातील उद्देश उघड करणारी सर्वश्रेष्ठ प्रीती त्याला पुन्हा ओळखून येईल.DAMar 340.2

    येशूने कसोटीस लावणारे सत्य सादर केल्यावर त्याचे बहुसंख्य अनुयायी त्याला सोडून गेले. त्याच्या वचनाचा परिणाम काय होईल हे त्याला माहीत होते परंतु त्याला करुणेचा उद्देश साध्य करायचा होता. प्रत्येक मोहाच्या प्रसंगी त्याच्या हरएक शिष्याची कडक कसोटी होणार होती हे त्याला आगाऊ दिसले. गेथशेमाने बागेतील त्याचे प्राणांतिक दुःख, त्याचा विश्वासघात व वधस्तंभ ही सर्व त्यांची सत्त्वपरीक्षा करणारी होती. अशा कसोटीला पूर्वी तोंड द्यावे लागले नव्हते आणि स्वार्थी हेतूने अनेकजन जर त्यात सामील झाले होते तर ते त्यांच्याबरोबर राहिले असते. न्यायालयात जेव्हा प्रभूला दोषी ठरवून शिक्षा फर्माविली; समुदायाने त्याला राजा संबोधून हुश हुश असा फुत्कार काढून नापसंती दर्शविली व नालस्ती केली; टवाळी करणारा घोळका मोठ्याने ओरडून म्हणाला, “त्याला वधस्तंभावर खिळा!” जेव्हा त्यांच्या जगिक महत्वकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तेव्हा ह्या स्वार्थी लोकांनी शिष्यांच्यावर कडवट हृदयभंग करणारे दुःख आणिले. त्यांच्या ऐहिक आशा धुळीस मिळून ते अगोदरच दुःखी व निराशा झाले होते. ह्या काळोखी प्रसंगी त्याच्यापासून पाठ फिरवून जे निघून गेले त्यांच्याबरोबर दुसरेही गेले. येशूने ही आणीबाणी त्या ठिकाणी आणिली तरी त्याच्या वैयक्तिक उपस्थितीने खऱ्या अनुयायांचा विश्वास तो भक्कम करू शकत होता.DAMar 340.3

    त्याचा नाश त्याच्यासाठी वाट पाहात आहे ह्याचे पूर्ण ज्ञान असलेल्या दयाळू कनवाळू उद्धारकाने शिष्यांचा मार्ग सुकर केला, बिकट कसोटीसाठी त्यांना सज्ज केले आणि अखेरच्या परीक्षेसाठी त्यांना समर्थ बनविलेDAMar 340.4