Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ५३—गालीलीहून शेवटचा प्रवास

    लूक ९:५१-५६; १०:१-२४.

    जसा कार्याचा शेवट जवळ आला तसे त्याच्या कार्यपद्धतीत ख्रिस्ताने बदल केला. आतापर्यंत त्याने प्रसिद्धी व खळबळ टाळण्याचा प्रयत्न केला होता. लोकांचा सत्कार त्याने टाळिला होता आणि जेव्हा लोकप्रिय उत्साह हाताबाहेर जात आहे असे वाटल्यावर तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घाईघाईने जात असे. तो ख्रिस्त असल्याची घोषणा न करण्यास तो पुन्हा पुन्हा सांगत होता.DAMar 425.1

    मंडपाच्या सणाच्या वेळी यरुशेलमाचा त्याचा प्रवास गुप्तपणे त्वरेने झाला. उघडपणे तू मशिहा असल्याचे घोषीत कर असे त्याच्या बंधूंनी त्याला सांगितले तेव्हा त्याने म्हटले, “माझा समय अजून आला नाही.’ योहान ७:६. तो यरुशलेमाला गुप्तपणे गेला आणि शहरात लोकांच्या दृष्टीस न पडता प्रवेश केला. परंतु ह्या अखेरच्या प्रवासाविषयी ती वस्तुस्थिती नव्हती. याजक व धर्मगुरू यांचा द्वेष व आकस ह्यामुळे काही काळासाठी त्याने यरुशलेम सोडले होते. परंतु आता उघडपणे, वळणाच्या रस्त्याने त्याच्या आगमनाची ललकारी देत तो येण्याच्या तयारीत होता. ह्यापूर्वी असे कधी घडले नव्हते. महान यज्ञ करण्यासाठी तो पुढे चालला होता आणि ह्याची लोकांनी दरवल घेतलीच पाहिजे. DAMar 425.2

    “जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे.” योहान ३:१४. इस्राएल लोकांना निकोप प्रकृति स्वास्थ्याचे चिन्ह उंच केलेला सर्प याच्यावर आपली दृष्टी लावण्यास सांगण्यात आले होते तसेच पतन पावलेल्या जगाला तारण प्राप्त करून देण्यास महायज्ञ बनणाऱ्या ख्रिस्ताकडे लोकांचे लक्ष वेधिले पाहिजे होते.DAMar 425.3

    मशिहाच्या कार्याविषयी चुकीचा विचार आणि येशूच्या दिव्य शीलस्वभावावरील अविश्वास ह्यामुळे मंडपाच्या सणाच्या समयी स्वतःला लोकांच्यासमोर उघडपणे व्यक्त करण्यास त्याचे भाऊ सांगत होते. येशूच्या शिष्यांनी यरुशलेमाला जाण्याचे टाळले असते. तेथे त्याचे काय होणार याविषयीच्या त्याच्या उद्गाराचे त्यांना स्मरण झाले. धार्मिक पुढऱ्यांचा तीव्र वैरभाव त्यांना माहीत होता आणि तेथे न जाण्यास त्यांच्या गुरूजीचे मन त्यांनी आनंदाने वळविले असते.DAMar 425.4

    त्याच्या प्रिय शिष्यांचा अविश्वास, निराशा आणि भीती यांच्या विरुद्ध आपली बाजू पुढे रेटणे हे ख्रिस्ताला फार कठीण गेले. यरुशलेममध्ये त्यांच्या वाट्याला येणारे दुःख व निराशा यांच्याकडे त्यांना नेणे अति त्रासाचे होते. मानवपुत्रावर मोहिनी घालण्यास सैतान तयारच होता. आता यरुशलेमला कशासाठी जायाचे होते, मरायला काय? जीवनी भाकरीसाठी भुकेलेले लोक त्याच्याभोवती होते. दुःख व व्याधीनी त्रस्त झालेले लोक बरे होण्यासाठी त्याच्या शब्दाची अगदी आतुरतेने वाट पाहात होते. त्याच्या कृपेच्या कार्याला नुकतीच सुरुवात झाली होती. प्रौढावस्थेचा जोम त्याच्यात दिसत होता. त्याच्या कृपेचे वचन आणि रोगमुक्त करण्याचा त्याचा स्पर्श घेऊन जगातील मोठ्या प्रदेशात, क्षेत्रात का जाऊ नये? अंधारात दुःख भोगीत असलेल्या लाखो लोकाकडे प्रकाश व सुख घेऊन जाऊन त्याचा आनंद का उपभोगू नये? विश्वासांत दुबळे, ग्रहणशक्तीत मंद, कर्तबगारीत मंद गतीचे अशा शिष्यांच्यावर पिकांची कापणी गोळा करण्याचे काम का सोपवावे? आताच मरणाला सामोरे जाऊन काम बाल्यावस्थेत का सोडावे? अरण्यामध्ये शत्रू ख्रिस्ताच्या समोरासमोर आला होता आणि आता धूर्त, उग्र व भयानक मोह आणून त्याच्यावर तुटून पडला होता. जरी क्षणासाठी ख्रिस्त शरण गेला असता, स्वतःच्या बचावासाठी नियोजित भूमिकेत बदल केला असता तरी सैतानाचे हस्तक विजयी झाले असते आणि जगाचा नाश झाला असता.DAMar 426.1

    परंतु “येशूने यरुशलेमेस जाण्याच्या दृढनिश्चयाने तिकडे आपले तोंड वळविले.” पित्याची आज्ञा पाळणे हा त्याच्या जीवनातील एक नियम होता. बालपणात मंदिराच्या भेटीच्या वेळी त्याने मरीयाला म्हटले, “जे माझ्या पित्याचे आहे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?’ लूक २:४९. कानामध्ये त्याने आपली अद्भूत शक्ती प्रगट करावी अशी मरीयाची अपेक्षा होती तेव्हा त्याने उत्तर दिले, “माझी वेळ अजून आली नाही.” योहान २:४. त्याच्या बंधूंनी त्याला सणासाठी जाण्याचा आग्रह केला तेव्हा त्याने उत्तर देण्यास हेच शब्द वापरले होते. देवाच्या महान संकल्पामध्ये मानवाच्या पापासाठी स्वतःचे यज्ञार्पण करण्याची वेळ ठरवून देण्यात आली आहे, आणि ती वेळ लवकरच येईल. त्यात तो चुकणार नाही किंवा अडखळणार नाही. त्याचे पाय यरुशलेमाच्या मार्गे वळले आहेत. तेथे त्याच्या शनी फार दिवसापासून त्याचा प्राण घेण्याचा कट केला होता; आता तो त्यासाठी तयार झाला होता. छळ, नकार, धिक्कार, दंडाज्ञा आणि मृत्यू यांना सामोरे जाण्याच्या दृढनिश्चयाने त्याने आपले तोंड तिकडे वळविले होते.DAMar 426.2

    “त्याने आपणापुढे निरोप्ये पाठविले. तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करावयास शोमरोन्याच्या एका गावात गेले.” तो यरुशलेमाच्या वाटेवर आहे म्हणून लोकांनी त्याचा स्वीकार करण्यास नकार दिला. ते यहूदी लोकांचा तीव्र द्वेष करीत होते आणि ख्रिस्त त्यांना अधिक पसंत करीत होता हा अर्थ त्यांनी काढिला होता. तो गरीझीम पर्वतावरील मंदिराची उभारणी करून उपासना करावयास आला असता तर त्यांनी त्याचा आनंदाने स्वीकार केला असता; परंतु तो यरुशलेमाला जात होता म्हणून त्याचा अतिथ्य सत्कार केला नाही. स्वर्गातील महान दान त्यांच्या दारी आले आहे त्याचा ते अव्हेर करीत आहे ह्याची जाणीव त्यांना झाली नाही. त्याचा स्वीकार करण्यास त्याने त्यांना पाचारण केले. त्याच्या नजीक येऊन त्यांच्यावर कृपाप्रसादाचा वर्षाव करण्यासाठी त्याच्या मदतीची त्याने अपेक्षा केली. परंतु त्यांच्या दुराग्रही आणि स्वमताचा फाजील अभिमान वृत्तीमुळे शोमरोनींचा फार मोठा तोटा झाला.DAMar 426.3

    त्यांच्या प्रभूचा अपमान केल्याबद्दल येशूचे निरोप्ये याकोब आणि योहान फार तापले होते. स्वतःच्या उपस्थितीत त्यांचा मान करीत असताना त्याला अशी उद्धट वागणूक दिल्याबद्दल ते फार संतापले होते. अलीकडेच त्यांनी त्याला रूपांतरच्या डोंगरावर देवाने त्याचे गौरव केलेले व मोशे आणि यलीया यांनी त्याचा सत्कार केलेले पाहिले होते. त्यांनी त्याचा केलेला अपमान शिक्षा दिल्याशिवाय दुर्लक्षिला जाऊ नये असे त्यांना वाटत होते.DAMar 427.1

    परत येऊन त्यांनी लोकांचे म्हणणे ख्रिस्ताला सादर केले आणि तेथे रात्रभर राहाण्यास जागा देण्याचे नाकारिले असे सांगितले. त्यांनी त्याला गंभीर वागणूक दिली आहे असे त्यांना वाटले आणि कार्मेल डोंगरावर एलीयाने खोट्या संदेष्ट्यांना मारले होते तो जवळच असल्याचे पाहून ते म्हणाले, “प्रभूजी, आकाशातून अग्नि पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे काय?” त्यांच्या उद्गाराने येशूला दुःख झालेले पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याने दिलेली धमकी ऐकून तर त्यांना अधिक आश्चर्य वाटले. “तुमच्या ठायी कोणता आत्मा आहे हे तुम्हाला माहीत नाही. मानवपुत्र मनुष्यांचा नाश करण्यासाठी आलेला नाही तर त्याचे तारण करण्यासाठी.’ नंतर ते दुसऱ्या गावास गेले.DAMar 427.2

    त्याचा स्वीकार करण्यास तो कोणावर जबरदस्ती करीत नाही. सैतान व त्याने प्रोत्साहन दिलेले लोक सदसद्विवेक बुद्धीवर जुलूम करितात. दुष्ट दूतांना साथीदार झालेले लोक धार्मिकतेच्या आमिषाखाली आपल्या बांधवावर व्याधि, दुःख आणितात आणि आपल्या धार्मिक मताशी जुळते घेण्यास सांगतात. परंतु ख्रिस्त सतत दया दाखवून आणि प्रेम प्रकट करून त्यांचे अंतःकरण वश करून घेण्याचा प्रयत्न करितो. तो अंतःकरणामध्ये स्पर्धेला स्थान देत नाही किंवा अर्धवट मनाची सेवा तो स्वीकारीत नाही. तो स्वेच्छेची सेवा प्रेमाने प्रेरित झालेली व स्वखुषीच्या अंत:करणाची शरणागति अपेक्षितो. जे आपल्या मताप्रमाणे वागत नाहीत आणि आपल्या कार्याची प्रशंसा करीत नाहीत त्यांच्यावर हल्ला करून नाश करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या अंतःकरणात सैतानाचे वर्चस्व असल्याचे सिद्ध होते.DAMar 427.3

    शरीर, आत्मा व जीव असलेला प्रत्येक मानवप्राणी देवाच्या मालकीचा आहे. सर्वांचा उद्धार करण्यासाठी ख्रिस्त मरण पावला. उद्धारकाच्या रक्ताने विकत घेतलेल्या मानवाचा स्वतःच्या फाजील धर्माभिमानामुळे छळ करणाऱ्या मनुष्यांचा देवाला तिटकारा आहे.DAMar 427.4

    “मग तो तेथून निघून यहदीया प्रांतात व यार्देनेच्या पलीकडे गेला; तेव्हा पुन्हा लोक घोळक्यांनी त्याच्याकडे आले; आणि पुन्हा तो आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांना शिकवू लागला.” मार्ग १०:१. DAMar 428.1

    ख्रिस्ताच्या सेवाकार्यातील बहुतेक शेवटचे दिवस यहूदापासून दूर असलेल्या यार्देन पलीकडील पेरीया प्रांतात घालविले. या ठिकाणी गालीली प्रांताप्रमाणे लोकांचा घोळका त्याचे ऐकण्यासाठी जमला आणि त्याने पूर्वी शिकविलेल्या वचनांची पुन्हा उजळणी केली.DAMar 428.2

    त्याने बारा जणाला कामासाठी बाहेर पाठविले. तसेच “त्याने आणखी सत्तर जणास नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यास आपणापुढे पाठविले.” लूक १०:१. हे शिष्य त्यांच्याबरोबर काही दिवस राहून कार्यासाठी प्रशिक्षण घेत होते. बारा शिष्यांना प्रथमच कार्यासाठी वेगवेगळे पाठविले होते व दुसरे शिष्य येशूबरोबर गालीली प्रातांतील प्रवासाला गेले. त्यामुळे त्यांचा त्याच्याशी आणि त्याच्या शिकवणीशी घनिष्ठ संबंध आला. आता ही मोठी टोळीसुद्धा अलगरित्या कार्यासाठी पाठविण्यात येणार होती.DAMar 428.3

    बारा जणाला दिलेले मार्गदर्शन तेच सत्तर जणाला लागू होते. परंतु हेल्लेणी किंवा शोमरोनी लोकांच्या शहरात प्रवेश करू नका असा बारा जणाला दिलेला आदेश सत्तर जणाला दिलेला नव्हता. जरी शोमरोनी लोकांनी तूर्तच ख्रिस्ताला झिडकारले होते तरी त्यांच्यावरील त्याचे प्रेम कमी झाले नव्हते. जेव्हा सत्तरजण ख्रिस्तानामामध्ये बाहेर पडले तेव्हा त्यांनी प्रथम शोमरोनी शहरांना भेटी दिल्या.DAMar 428.4

    शोमरोनीला प्रत्यक्ष उद्धारकाची भेट, नंतर चांगल्या शोमरोनीची प्रशंसा, त्या दहाजणापैकी एकटा बरा झालेला शोमरोनी कुष्ठ रोग्याचा कृतज्ञापूर्वक आनंद ह्या सर्व गोष्टी शिष्यांना, अर्थबोधक महत्त्वाच्या होत्या. त्यांच्या अंतःकरणावर त्यातील धड्यांचा मोठा प्रभाव पडला. स्वर्गारोहन होण्याच्या अगोदर शिष्यांवर कामगिरी सोपवीत असताना सुवार्ताप्रसार कार्यासाठी येशूने यरुशलेम आणि यहूदा यांच्या बरोबर शमरोनीचाही उल्लेख केला आहे. त्यांच्या प्रभूच्या नामामध्ये शोमरोनी येथे शुभवृत्त सांगण्यास गेले तेव्हा त्यांचा स्वीकार करण्यास लोक तयार होते. ख्रिस्ताने केलेली प्रशंसा आणि त्या लोकासाठी त्याने केलेली दयेची कामे याविषयी शोमरोनी लोकांनी ऐकिले होते. जरी त्यांनी त्याला असभ्य, उद्धट वागणूक दिली होती तरी त्यांच्यावर त्याने प्रेम व्यक्त केले आणि त्याने त्यांची अंतःकरणे जिंकली. त्याच्या आरोहनानंतर त्यांनी त्याच्या निरोप्यांचे स्वागत केले आणि शिष्यांनी एके काळी असलेल्या कट्टर शत्रूतून महत्त्वाची कापणी केली. “चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणीत वात तो विझविणार नाही; तो सत्याने न्यायाची प्रवृत्ति करील.” “आणि विदेशी त्याच्या नामाची आशा धरतील.’ यशया ४२:३; मत्तय १२:२१.DAMar 428.5

    बारा जणांना सांगितल्याप्रमाणे उद्धारकाने ह्या सत्तरजणाला सांगितले की, जेथे त्यांचा स्वीकार करण्यात येत नव्हता तेथे त्यांच्या उपस्थितीचा आग्रह धरू नका. “तुम्ही कोणत्याही गावात गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यावर बाहेर जाऊन असे म्हणा, आमच्या पायास लागलेली तुमच्या गावची धूळ देखील तुमची तुम्हास झाडून टाकितो; तथापि हे लक्षात ठेवा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.” अपमानास्पद वागणुकीने चिडून जाऊन किंवा तुमचा मोठेपणा दुखावल्यामुळे तुम्हाला हे करावयाचे नाही तर देवाचा संदेश किंवा निरोप्या यांचा नाकार करणे हे किती गंभीर आहे हे दाखविण्यासाठी हे करायचे. देवाच्या दासाचा नाकार करणे म्हणजे स्वतः ख्रिस्ताचा नाकार करणे होय.DAMar 429.1

    येशूने पुढे म्हटले, “मी तुम्हास सांगतो, त्या गावापेक्षा सदोमाला त्या दिवशी सोपे जाईल.” त्यानंतर त्याचे लक्ष गालीली प्रातांतील गावाकडे वळले कारण तेथे बरेच कार्य करण्यात आले होते, अति दुःखाने त्याने उद्गार काढिले, “हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हामध्ये जी पराक्रमी कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यात घडली असती तर त्यांनी मागेच गोणताट व राख अंगावर घेऊन बसून पश्चात्ताप केला असता. ह्यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर व सीदोन ह्यास सोपे जाईल. हे कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत चढविले जाशील काय? तू अधोलोकापर्यंत खाली टाकिले जाशील.”DAMar 429.2

    गालीली समुद्राच्या आसपास असलेल्या गावामध्ये स्वर्गातील मुबलक कृपाप्रसाद मोफत देण्यात आला आहे. जीवनाचा अधिपती सर्रासपणे त्यांच्यात जा ये करीत होता. जे देवाचे गौरव पाहाण्यास संदेष्टे व राजे लोक उत्सुक होते ते ख्रिस्त चरणी लागलेल्या मोठ्या समुदायावर प्रकाशले होते. तथापि त्यांनी ह्या स्वर्गीय दानाचा नाकार केला होता.DAMar 429.3

    नवीन गुरूने शिकविलेल्या शिकवणीचा स्वीकार करू नये म्हणून धर्मगुरूंनी अगदी सावधगिरीने व दूरदर्शीपणाने लोकांना इशारा दिला होता; कारण त्यांची तात्त्विक भूमिका आणि प्रत्यक्ष कृती, व्यवहार कुलपतींच्या शिकवणीविरुद्ध होती. देवाच्या शास्त्रवचनाचे ज्ञान होण्यासाठी लोक, याजक व परूश्यांनी दिलेल्या शिकवणीवर विश्वास ठेवीत होते. देवाच्या वचनाचा मान राखण्याऐवजी ते याजक व अधिकारी यांचा मान राखीत होते आणि स्वतःची प्रथा संप्रदाय यांचे पालन करण्यासाठी त्यांनी सत्याला झिडकारून दिले होते. अनेकांच्या मनावर चांगला परिणाम झाला होता व खात्री झाली होती; परंतु त्या अनुषंगाने त्यांची कृती झाली नाही आणि ते ख्रिस्ताच्या बाजूचे असल्याचे गणिले नाही. सैतानाच्या मोहामुळे त्यांना हा प्रकाश दिसला नाही. आशा प्रकारे तारण प्राप्त करून देणारे सत्य अनेकांनी नाकारिले.DAMar 429.4

    खरा साक्षी म्हणतो, “पाहा मी दाराशी उभा आहे व दार ठोठावीत आहे.’ प्रगटी ३:२०. देवाच्या वचनातील प्रत्येक इशारा, धमकी, कान उघाडणी आणि विनवनी किंवा निरोप्याचा संदेश अंतःकरणाच्या द्वारावरील ठोठावणे आहे. ही येशूची वाणी असून आत प्रवेश करण्याची मागणी करीत आहे. न ऐकिलेल्या प्रत्येक थापेमुळे द्वार उघडण्याची वृत्ती दुर्बल होते. पवित्र आत्म्याने मनावर केलेल्या परिणामाकडे आज दुर्लक्ष केल्यास उद्या ते इतके बळकट राहाणार नाही. हृदयावर कमी परिणाम होतो आणि अल्पकाळाच्या धोकादायक बेशुद्धावस्थेत ते लोप पावते. आम्ही चुकीच्या मार्गात होतो म्हणून नाही तर सत्य जाणून घेण्यासाठी स्वर्गाने आम्हाला दिलेल्या संधीकडे दुर्लक्ष केल्यामुळे न्यायाच्या समयी आम्हाला दोषी ठरविण्यात येईल.DAMar 429.5

    प्रेषितासारखी ह्या सत्तर जणाला त्यांच्या कार्याची खूण म्हणून निसर्गातील अलौकिक देणगी मिळाली होती. काम संपल्यावर ते आनंदाने परत आले आणि म्हणाले, “प्रभूजी, आपल्या नावाने भुते देखील आम्हास वश होतात.” तेव्हा येशूने उत्तर दिले, “सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले.”DAMar 430.1

    भूत कालीन आणि भावी दृश्ये येशूच्या पुढे सादर करण्यात आली होती. लुसीफराला स्वर्गातून खाली टाकिलेला त्याने पाहिला. त्याने स्वतःचे पुढे येणारे प्राणांतिक दुःख पाहिले. त्यावेळेस सर्व जगांच्यासमोर लबाडी करणाऱ्याचा स्वभाव उघड करण्यात येईल. “पूर्ण झाले आहे” (योहान १९:३०) ह्या वाणीद्वारे पतन पावलेल्या मानवप्राण्याचा उद्धार निरंतरचा झाल्याचे घोषीत केलेले आणि सैतानाने चिथावणी दिलेली फसवणूक, दोषारोप आणि आढ्यता यांच्यापासून स्वर्ग कायमचे सुरक्षीत केलेले त्याने ऐकिले.DAMar 430.2

    कॅलव्हरीवरील वधस्तंभाचे अति दुःख याच्या पलीकडे येशूचे लक्ष अंधकाराचा अधिपती ज्याने आपल्या बडखोरी वृत्तीने ह्या भूतलावर धुमाकूळ माजविला त्याच्या नाशाच्या महान दिवसाकडे वेधले गेले. दुष्टाईचे कार्य कायमचे संपुष्टात आलेले आणि स्वर्ग व पृथ्वी देवाच्या शांतीने भरलेले येशूने पाहिले.DAMar 430.3

    यापुढे सैतान हा पराजित शत्रू असल्याचे ख्रिस्ताच्या अनुयायांनी समजले पाहिजे. वधस्तंभावर येशू त्यांच्यासाठी विजय संपादन करणार होता; तो विजय त्यांचा असल्याचे त्यानी स्वीकारावे अशी त्याची अपेक्षा होती. त्याने म्हटले, “पाहा, मी तुम्हास साप आणि विंचू ह्यास तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हास काही एक बाधणार नाही.”DAMar 430.4

    पवित्र आत्माचे सर्व शक्तिमान सामर्थ्य प्रत्येक भग्नहृदयी आत्म्याचे संरक्षक आहे. श्रद्धेने आणि पश्चात्ताप वृत्तीने संरक्षणासाठी केलेली एकही मागणी ख्रिस्त शत्रूच्या कबज्यात जाऊ देणार नाही. त्याच्या लोकांची कसोटी आणि मोहाने परीक्षा होत असताना उद्धारक त्यांच्या बाजूला असतो. पराभव, तोटा, अशक्य ह्या गोष्टी त्याच्याजवळ असू शकत नाहीत; सर्व शक्तिमान ख्रिस्ताद्वारे आम्ही सर्व करू शकतो. मोह आणि कसोटी येते तेव्हा अडचणीची सारवासारव करण्यात वेळ दवडू नका तर तुमचा सहाय्यक येशू याच्यावर मन केंद्रित करा.DAMar 430.5

    सैतानाच्या सामर्थ्याविषयी फार विचार करून बोलबाला करणारे ख्रिस्ती आहेत. ते त्यांच्या प्रतिपक्षाचा विचार करितात, ते त्याच्याविषयी बोलतात, त्याच्याविषयी प्रार्थना करितात आणि त्यांच्या कल्पनाशक्तीत त्याला अग्रस्थान प्राप्त होते. सैतान शक्तिमान व्यक्ती आहे हे खरे आहे; परंतु ईश्वराची स्तुती असो ज्याने दुष्टाला स्वर्गातून खाली टाकिले असा सर्व शक्तिमान येशू आमच्यासाठी आहे. सैतानाची शक्ती आम्ही फुगवून सांगतो तेव्हा तो फार खूष होतो. ख्रिस्ताविषयी आम्ही का बोलू नये? त्याची शक्ती आणि त्याचे प्रेम ह्यांची प्रतिमा मोठी का करू नये?DAMar 431.1

    “देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.’ योहान ३:१६. ही अनंत साक्ष स्वर्गातील सिंहासनाभोवती वर्तुळ केलेल्या आश्वासनाच्या इंद्रधनुष्याची आहे. दुष्टाई बरोबरच्या झगड्यात गुंतलेल्या त्याच्या लोकांचा देव केव्हाही अव्हेर करणार नाही. जोपर्यंत सिंहासन टिकून राहाते तोपर्यंत ते सामर्थ्य व संरक्षण यांची खात्री आहे.DAMar 431.2

    येशूने पुढे म्हटले, “तथापि भुते तुम्हास वश होतात ह्याचा आनंद मानू नका; तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना.” सामर्थ्य प्राप्तीमध्ये आनंद करू नका, न जाणो तुम्ही देवावर अवलंबून आहे ह्या विचारापासून तुम्ही दूर व्हाल. खबरदारी घ्या नाहीतर तुम्ही स्वावलंबी बनून, प्रभूच्या सामर्थ्याने आणि वृत्तीने काम करण्याऐवजी तुम्ही स्वतःच्याच सामर्थ्याचे प्रदर्शन कराल, कामात आलेल्या यशाचे श्रेय स्वतः घेण्यास सदैव तयार राहाल. स्वतःची खुशामत करण्यात येते, स्तुती करण्यात येते आणि देव सर्व काही आहे असा छाप दुसऱ्याच्या मनावर पाडण्यात येत नाही. प्रेषित पौल म्हणतो, “जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.” २ करिंथ. १२:१०. आमच्या अशक्तपणाची जाणीव आम्हाला झाल्यावर उपजत नसलेल्या शक्तीवर अवलंबून राहाण्यास आम्ही शिकतो. देवाची असलेल्या जबाबदारीच्या टिकाऊ जाणीवेसारखा दुसऱ्या कशानेही आमच्या अंतःकरणावर परिणाम होणार नाही. ख्रिस्ताच्या क्षमामय प्रेमाच्या जाणीवेसारखे दुसऱ्या कशानेही आमच्या वर्तणुकीतील उद्देशाप्रत कोणी पोहंचू शकत नाही. आम्ही देवाच्या संबंधात आले पाहिजे मगच आम्हाला पवित्र आत्म्याची चेतना प्राप्त होईल आणि त्याद्वारे आम्ही बंधूवर्गाच्या संबंधात येऊ. ख्रिस्ताद्वारे आम्ही देवाशी आणि स्वर्गीय कुटुंबातील सदस्यांशी एकत्र जोडले जातो म्हणून हर्ष करा. जेव्हा तुम्ही स्वतःला सोडून वर दृष्टी करता तेव्हा तुम्हाला मानवतेच्या अशक्तपणाची जाणीव सतत राहील. जितका तुम्ही स्वतःविषयी कमी विचार कराल तितके अधिक स्पष्ट आणि पूर्ण आकलन तुम्हाला उद्धारकाच्या श्रेष्ठतेविषयी होईल. प्रकाश आणि सामर्थ्य यांच्या उगम स्थानाशी जितका घनिष्ठ संबंध तुम्ही ठेवाल तितका अधिक प्रकाश तुम्हावर चमकेल आणि देवाचे कार्य करण्यास तुम्हाला विपूल सामर्थ्य लाभेल. तुम्ही देवाशी, ख्रिस्ताशी आणि स्वर्गातील सबंध कुटुंबाशी एक झाला आहा म्हणून हर्ष करा.DAMar 431.3

    सत्तरजण ख्रिस्ताचे वचन ऐकत असतांना पवित्र आत्मा हुबेहुब वस्तुस्थितीचा त्यांच्या मनावर छाप पाडीत होता आणि आत्म्यावर सत्य कोरीत होता. त्यांच्या सभोवती लोकसमुदाय होता तरी ते देवाशी मग्न होते.DAMar 432.1

    त्या घटकेची प्रेरणा त्यांना मिळालेली पाहून “तो उल्लासित झाला आणि म्हणाला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभु, मी तुझे स्तवन करितो; कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रगट केल्या आहेत; होय, पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले. माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहे; पुत्र कोण आहे हे पित्यावाचून कोणाला ठाऊक नाही; आणि पिता कोण आहे हे पुत्रावाचून व ज्याला तो प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावाचून कोणाला ठाऊक नाही.” DAMar 432.2

    जगातील प्रतिष्ठित माणसे, महान आणि बुद्धिमान यांना ख्रिस्ताच्या शीलस्वभावाचे आकलन होऊ शकले नव्हते. त्यांनी बाह्य देखाव्याहून, मानव या नात्याने त्याच्यावर आलेल्या अपमानास्पद अनुभवावरून मत बनविले होते. परंतु कोळी आणि जकातदार यांना अदृश्य पाहाण्याचा प्रसंग दिला होता. ख्रिस्ताला जे काही प्रकट करायची इच्छा होती ते सर्व शिष्यांना समजले नव्हते; परंतु जसजसे ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला वेळोवेळी शरण गेले तसतशी त्यांची मने प्रकाशित झाली. मानवतेचा झगा पांघरलेला शक्तिमान देव त्यांच्यामध्ये उपस्थित असल्याची जाणीव त्यांना झाली. हे ज्ञान जरी बुद्धिवान आणि दूरदर्शी लोकांना प्राप्त झाले नाही तरी ह्या नम्र माणसांना प्रगट झाल्याबद्दल येशूला अत्यानंद झाला. वारंवार त्याने त्यांच्यासमोर जुना करारातील वचने सादर केली आणि त्याचा संदर्भ स्वतःशी व त्याच्या प्रायश्चित कार्याशी असलेला त्याने दाखविला. पवित्र आत्म्याच्याद्वारे ते जागृत होऊन स्वर्गीय वातावरणात उचलले गेले. संदेष्ट्यांनी विदित केलेल्या आध्यात्मिक सत्याचे स्पष्ट ज्ञान त्याना मूळ लेखकांपेक्षा झाले होते. त्यानंतर जुना करार, शास्त्री आणि परूशी यांची शिकवण म्हणून नव्हे, मृत झालेल्या ज्ञानी लोकांनी व्यक्त केलेले भाषण म्हणून नव्हे परंतु देवापासून मिळालेले नवीन प्रगटीकरण म्हणून त्यांनी त्याचे वाचन केले. “जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहात नाही अथवा त्याला ओळखित नाही; तुम्ही त्याला ओळखिता कारण तो तुम्हाबरोबर राहातो व तुम्हामध्ये वस्ती करील.’ योहान १४:१७.DAMar 432.3

    आम्ही आमची अंतःकरणे नम्र करून ख्रिस्ताच्या आत्म्याला शरण गेल्यानेच आम्हाला त्याच्या सत्याचे पूर्ण ज्ञान होण्यास ग्रहणशक्ती लाभेल. व्यर्थता व स्वतःविषयी पोकळ गर्व यांच्यापासून आत्म्याची शुद्धी झाली पाहिजे, अंतःकरणातील सर्व निरर्थक काढून टाकीले पाहिजे आणि अंतर्यामी ख्रिस्त विराजमान झाला पाहिजे. प्रायश्चित ह्या विषयाचे पूर्ण ज्ञान होण्यास मानवी विज्ञान तोकडे पडते. तारणाची योजना तत्त्वज्ञानाने समजावून सांगण्यास बुद्धीपलीकडचे होते. ती नेहमीच गूढ गोष्ट, रहस्य म्हणून राहील आणि खोल, गंभीर युक्तीवादाने त्याचा अंत लागणार नाही, किंवा अर्थ उकलणार नाही. तारणाच्या विज्ञानाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही परंतु त्याचा अनुभव घेऊ शकतो. ज्याला स्वतःचे पाप किंवा दुष्टाई यांची खात्री होते केवळ त्यालाच उद्धारकाचे बहुमोल स्पष्ट दिसते.DAMar 432.4

    गालीलावरून यरुशलेमाला येशू हळूहळू जात असताना येशूने शिक्षणातून पुष्कळ धडे शिकविले. उत्सुकतेने लोकांनी त्याचे म्हणणे ऐकिले. यहूदातील यहूदी लोकांच्या फाजील धर्माभिमानाच्या दडपणाखाली लोक होते तसे पेरीया आणि गालीली येथील लोक नव्हते आणि त्याच्या शिकवणीचा चांगला परिणाम लोकांच्या अंतःकरणावर झाला होता.DAMar 433.1

    त्याच्या सेवाकार्यातील अखेरच्या महिन्यात ख्रिस्ताने अनेक दाखले सांगितले. याजक व धर्मगुरू अगदी तीव्र द्वेषाने त्याच्या पाठीस लागले होते, आणि त्यांना तो दाखल्याच्यारूपाने इशारा देत होता. त्याच्या बोलण्यातील अर्थ त्यांना समजत होता तथापि त्याच्यावर आरोप करण्यासाठी त्याच्या शब्दात त्यांना अग्राह्य असे काही दिसत नव्हते. परूशी आणि जकातदार या दाखल्यातील स्वयंपूर्ण प्रार्थनेत काढिलेले उद्गार “हे देवा, इतर माणसासारखा मी नाही,” आणि पश्चात्तापदग्ध विनंती “हे देवा, मज पाप्यावर दया कर,” ही परस्परामधील मोठा विरोध दाखविणारी आहेत. लुक ८:११, १३. अशा प्रकारे ख्रिस्ताने यहदी लोकांच्या ढोंगीपणाला दटावणी दिली. फलहीन जैतूनाचे झाड आणि मोठी मेजवाणी यांच्याद्वारे पश्चात्ताप न केलेल्या राष्ट्राच्या नाशासंबंधी त्याने भविष्य सांगितले होते. सुवार्तेच्या मेजवानीसाठी दिलेले आमंत्रण ज्यांनी तिरस्काराने नाकारिले होते त्यांनी इशाऱ्याचे उद्गार ऐकिले: “मी तुम्हास सांगतो की आमंत्रित माणसापैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखावयास मिळणार नाही.’ लूक १४:२४.DAMar 433.2

    शिष्यांना दिलेले प्रबोधन फार मोलाचे होते. आग्रही विधवा आणि मध्यरात्री भाकरी मागणारा मित्र ह्या दाखल्याद्वारे त्याच्या बोलण्याला जोर आला, “मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हास सापडेल; ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल.” लूक ११:९. हेलकावे खाणारी त्यांची श्रद्धा ख्रिस्ताने काढिलेल्या उद्गाराने दृढ झाली, त्याने म्हटले, “देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करितात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हास सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील.’ लूक १८:७, ८. DAMar 433.3

    हरवलेले मेंढरू हा उत्तम दाखला ख्रिस्ताने पुन्हा सांगितला. हरवलेले नाणे आणि उधळ्यापुत्र ह्यांचा दाखला सांगून त्यातील अर्थाला त्याने अधिक उजाळा दिला. त्या धड्यात असलेल्या प्रभावाचे त्यावेळेस शिष्य गुणग्रहण करू शकत नव्हते, परंतु पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्यावर झाल्यावर विदेशी लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार करताना आणि यहूद्यांचा द्वेषमुलक संताप होताना त्यांनी पाहिला तेव्हा त्यांना उधळ्या पुत्राच्या दाखल्यातील अर्थबोध चांगल्या प्रकारे झाला आणि ख्रिस्ताने उद्गारलेल्या वचनातील आनंद त्यांनी उपभोगिलाः “तरी उत्साह व आनंद करणे हे योग्य आहे;” “कारण हा माझा मुलगा मेला होता तो पुन्हा जीवंत झाला आहे; हरवला होता तो सापडला आहे.’ लूक १५:३२, २४. प्रभूच्या नामामध्ये बाहेर पडताना त्यांना मानहानी, दारिद्र् आणि छळ यांना तोंड द्यावे लागले. ह्या शेवटच्या प्रवासात त्याने काढिलेले उद्गार ते वारंवार उच्चारत होते आणि त्याद्वारे त्याच्या अंतःकरणाला शक्ती प्राप्त होत होती. दिलेली आज्ञा अशी होती: “हे लहान कळपा, भिऊ नको; कारण तुम्हास राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटते. जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा; जीर्ण न होणाऱ्या थैल्या, तसेच स्वर्गातील अक्षय धन, आपणासाठी करून ठवा; तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही. जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.” लूक १२:३२-३४.DAMar 433.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents